22 February 2019

घरची परिस्थिती हलाखीची असताना जिद्द व चिकाटीच्या जोरावर झाल्या उपजिल्हाधिकारी



लोहारा प्रतिनिधी -

घरची परिस्थिती हलाखीची असतानाही जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर लोहारा तालुक्यातील उदतपुर येथील पूजा तानाजी गायकवाड यांनी स्पर्धा परीक्षेत यश संपादन केले असून त्यांची उपजिल्हाधिकारी पदावर निवड झाली आहे.
         लोहारा तालुक्यातील छोट्याशा उदतपुर या गावातील तानाजी गायकवाड हे वीस वर्षांपूर्वी नोकरी निमित्त पुणे येथे स्थायिक झाले. त्यांना एकूण तीन मुली. आपल्याला तिन्हीही मुलीच असल्या तरी त्या मुलींना शिक्षणात काहीच कमी पडू द्यायचे नाही असा गायकवाड यांनी निश्चय केला. तानाजी गायकवाड यांच्या मोठ्या मुलीची स्पर्धा परीक्षा देऊन महसुल विभागात लिपीक पदावर निवड झाली. यामुळे अभ्यास केल्यानंतर नक्कीच यश मिळते असा विश्वास पुजा गायकवाड यांना मिळाला. त्यामुळे त्यांनी ध्येय निश्चित करून जिद्द व चिकाटीच्या जोरावर अभ्यास सुरु केला. त्यानंतर त्यांनी २०१७ मध्ये झालेल्या राज्य सेवेच्या स्पर्धा परीक्षेत यश संपादन करुन नायब तहसिलदार पदी निवड झाली. त्यातच सन २०१८ मध्ये झालेल्या परीक्षेत उपजिल्हाधिकारी या पदावर त्यांची निवड झाली आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. परिस्थिती हलाखीची असली तरी जिद्द व चिकाटीच्या जोरावर यश नक्कीच मिळते याचे हे एक आदर्श उदाहरण आहे.

No comments:

Post a Comment