31 August 2020
मराठा सेवा संघाच्या वर्धापनदिनाच्या हार्दिक शुभेच्छा- शिवश्री विठ्ठल सूर्यवंशी, तालुकाध्यक्ष संभाजी ब्रिगेड लोहारा
जय जिजाऊ
१ सप्टेंबर १९९०
मराठा सेवा संघ वर्धापनदिन
बहुजन समाजातील महापुरुषांच्या विचारावर आधारित असणाऱ्या मराठा सेवा संघाची स्थापना आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी केली.आज मराठा सेवा संघाला 30 वर्ष पूर्ण होत आहेत. बहुजन समाजातील पोरांच मस्तक सशक्त करण्याचं काम अखंड व अविरतपणे सुरू ठेवण्याचं काम आज मराठा सेवा संघ करत आहे.आज बहुजन समाजातील पोर लेखणी घेऊन क्रांतीच वार निर्माण करत आहेत.कित्येक बहुजन पोर लिहायला शिकली बोलायली शिकली,स्वतःवर होणाऱ्या सांस्कृतिक व धार्मिक अन्याला वाचा फोडायला शिकली,इतिहासात महापुरुषांच्या चरित्राचा झालेल विद्रुपीकरण खऱ्या अर्थाने बाहेर काढून बहुजन समाजाला सत्य इतिहास जर कुणामुळे समजला असेल तर तो फक्त आणि फक्त मराठा सेवा संघामुळे.आजही शत्रूच्या गोटात मराठा सेवा संघाचं नाव घेतलं तर त्यांना घाम फुटतो. आज मराठा सेवा संघाचा वटवृक्ष झाला आहे या सगळ्याच श्रेय खेडेकर साहेब या 30 वर्षाच्या तुमच्या त्यागात,प्रयत्नांत, सत्यात आहे.साहेब तुम्ही आम्हाला जी चळवळ रुपी शिदोरी दिली आहे ती घेऊन आम्ही तुम्हला अभिप्रेत असणारी क्रांती नक्की घडवू.
होता मराठा सेवा संघ
म्हणुन कळले जीवनाचे रंग
मराठा सेवा संघ
वर्धापनदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
👏💐
शिवश्री विठ्ठल सूर्यवंशी
तालुकाध्यक्ष संभाजी ब्रिगेड लोहारा
माजी राष्ट्रपती, भारतरत्न प्रणव मुखर्जी यांना भावपूर्ण श्रद्धांजली !
माजी राष्ट्रपती, भारतरत्न प्रणव मुखर्जी यांना भावपूर्ण श्रद्धांजली !
भारतीय राजकारणाचे भीष्म पितामह म्हणून त्यांचा लौकिक राहीला. त्यांनी अर्थमंत्री पदापासून विविध स्तरांवर भारतीय राजकारण, समाजकारण आदींबाबत दिलेले योगदान कायम स्मरणात राहील. 💐💐🙏🙏
मराठा सेवा संघ वर्धापन दिनाच्या सदिच्छा - शिवश्री मोहन जाधव
•|| वीर भगतसिंह विद्यार्थी परिषद ||•
✒लेखणी परिवर्तनाची💪🏽
#१_सप्टेंबर_१९९०_ते_२०२०...,
#मराठा_सेवा_संघ_वर्धापनदिन...!!
मराठा समाजाच्या सामाजिक जाणिवा अधिक बळकट करुन वैचारिक क्षेत्रात प्रचंड मोठ्या कामाचा डोंगर उभ्या करणाऱ्या मराठा सेवा संघाचा आज वर्धापनदिन होय. गेल्या २९ वर्षांमध्ये मराठा सेवा संघाने समाजाला काय दिले हा प्रश्न विचारायची आज कोणत्याही सुज्ञ मराठा बांधवाला गरज पडत नाही, हे या संस्थेचे यश आहे. माजलेल्या काटेरी झुडुपांच्या भुमीची मशागत करुन तिला विचारांचं भरघोस पीक मिळावण्याईतपत सुपीक बनविण्याचे अवघड कार्य मराठा सेवा संघाने करुन दाखविले आहे. मराठा समाजाच्या प्रश्नांना ३३ प्रकारात विभागुन त्या प्रत्येक प्रश्नासाठी एक कक्ष उभा करणे आणि तो चालवणे ही सोपी गोष्ट नाही. समाजातुन वेळ, बुद्धी, कौशल्य, श्रम व पैसा हे पंचदान गोळा करुन समाजाला धर्मसत्ता, राजसत्ता, अर्थसत्ता, शिक्षणसत्ता व प्रचार-प्रसार माध्यमसत्ता या पंचसत्ता हस्तगत करण्याची दिशा देणाचे कार्य ही संस्था मा.पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहे.
समाजातील वाईट विचारांचे, अनिष्ट चालीरितींचे तसेच व्यसनाधीनतेचे प्रमाण कमी करुन त्याच समाजाला वाचण्याचे, लिहिण्याचे, बोलण्याचे आणि विचार करण्याचे विधायक व्यसन लावण्याचे काम या संस्थेने केले आहे. सामाजिक क्षेत्रात कामाचा डोंगर उभा करताना मात्र आपल्या कामाची नोंद ठेवण्यात ही संस्था कमी पडली अशी अनेक सहकाऱ्यांची भावना आहे. मागच्या ३० वर्षांचा आढावा घेतला तर महाराष्ट्राच्या प्रगतीच्या आलेखावर मराठा सेवा संघाच्या योगदानाचा बिंदु नजरेत भरेल अशा पातळीवरच दिसेल याबद्दल काही शंका नाही. अशा संस्थेशी जोडलं जाणं हा आमच्यासारख्या असंख्य तरुणांच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा होता. कमी वयातच सामाजिक भान आणि कामाचा नेमकेपणा याचे धडे आम्हाला इथे मिळाले. पुढचा प्रवास करत असताना मराठा सेवा संघाने दीर्घकाळ परिणामकारक ठरणारी रचनात्मक कामं हातात घ्यावीत, अशी समाजातुन अपेक्षा व्यक्त होत आहे. मराठा समाजाला योग्य दिशा देण्याचे काम करणाऱ्या मराठा सेवा संघाच्या ३० व्या वर्धापन दिनानिमित्त सर्व सहकाऱ्यांना स्नेहपुर्वक सदिच्छा...!!
•|| शिवेच्छुक ||•
*- शिवश्री मोहन जाधव {जिल्हाध्यक्ष}*
*वीर भगतसिंह विद्यार्थी परिषद, उस्मानाबाद.*
30 August 2020
डॉ. रोहित विष्णू साळुंके यांची पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेच्या केरळ प्रदेशाध्यक्षपदी निवड
प्रतिनिधी / उस्मानाबाद
लोहारा तालुक्यातील सालेगाव येथील रहिवासी असलेले व केरळ राज्यातील बालूसेरी येथील संस्कृत विद्यापीठात प्राध्यापक पदावर कार्यरत असलेले डॉ. रोहित विष्णू साळुंके यांची पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेच्या केरळ प्रदेशाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. याबद्दल साळुंके यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
डॉ. रोहित विष्णू साळुंके हे लोहारा तालुक्यातील सालेगाव येथील रहिवासी आहेत. त्यांनी एम. ए. पूर्ण केले असून संस्कृत विषयात पीएचडी मिळवली आहे. सध्या ते कलिकट संस्कृत विद्यापीठ बालीसेरी येथे संस्कृत विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. मराठा सेवा संघ प्रणित डाॅ. पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेच्या केरळ राज्य प्रदेशाध्यक्ष पदी त्यांची निवड करण्यात आली आहे. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदेव दळवी व मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार यांनी साळुंके यांना नियुक्तीपत्र दिले आहे. डॉ. रोहित विष्णू साळुंके यांची निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
24 August 2020
पीक कर्जबाबत तालुक्यातील बँकांची बैठक आयोजित करून कर्जवाटपाचा आढावा घ्यावा - लोहारा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची निवेदनाद्वारे मागणी
प्रतिनिधी / लोहारा
पीक कर्जबाबत तालुक्यातील बँकांची बैठक आयोजित करून कर्जवाटपाचा आढावा घ्यावा व जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्याच्या सूचना द्याव्यात अशी मागणी लोहारा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने गटविकास अधिकारी यांच्याकडे सोमवारी ( दि. २४) निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात म्हणले आहे की, यावर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहात खरिपाची पेरणी केली. परंतु अनेकांची बियाणे उगवले नाही. त्यामुळे दुबार पेरणी करावी लागली. त्यात तालुक्यातील बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करत असल्याच्या तक्रारी येत आहेत. एकीकडे शेतकरी अडचणीत असताना बँकेने शेतकऱ्यांना पीककर्ज देऊन सहकार्य करणे आवश्यक असताना काही बँकेमार्फत टाळाटाळ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. पीक कर्जाची मुदत ३१ ऑगस्ट पर्यंत आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व बँकांची तातडीने बैठक घेऊन पिककर्जाची सद्यस्थिती काय आहे, किती टक्के वाटप झाले, पीककर्ज वाटप करण्यास टाळाटाळ का होत आहे याबाबत विचारणा व्हावी. तसेच पुढील ५ - ६ दिवसांत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्जवाटप करावे अशा सूचना द्याव्यात अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सहाय्यक प्रशासन अधिकारी पी. एस. चौगुले यांनी हे निवेदन स्वीकारले. या निवेदनावर तालुकाध्यक्ष सुनील साळुंके, उमरगा लोहारा विधानसभा अध्यक्ष विजयकुमार लोमटे, महेबूब फकीर, व्यंकट समदळे, संजय गायकवाड, मनोज देशपांडे, विठ्ठल माने आदींच्या सह्या आहेत.
22 August 2020
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश दाजी बिराजदार व तालुकाध्यक्ष सुनील साळुंके यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा
प्रतिनिधी / लोहारा
कोरोनाच्या काळात ज्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील फळे नागरिकांना मोफत दिली अशा तालुक्यातील तीन शेतकऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने गुरुवारी ( दि. २०) कोविड शेतकरी योद्धा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
तालुक्यातील सालेगाव येथे गुरुवारी ( दि. २०) हा कार्यक्रम संपन्न झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार व लोहारा तालुकाध्यक्ष सुनील साळुंके यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, तालुकाध्यक्ष सुनील साळुंके, सरपंच नारायण गुरव, युवक जिल्हा कार्याध्यक्ष बाबा जाफरी, सचिन कदम, गोविंद साळुंके, गोविंद बिराजदार, उपसरपंच मुरलीधर पाटील, आबासाहेब साळुंके, प्रकाश भगत यांची प्रमुख उपस्थिती होती. कोरोना काळात आपल्या शेतातील फळे नागरिकांना मोफत दिलेले सास्तुर येथील दत्तात्रय सुतार, जेवळी येथील मल्लिनाथ कारभारी, कानेगाव रघुनाथ कदम या तीन शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते कोविड शेतकरी योद्धा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
वाढदिवसानिमित्त शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी विलास देशपांडे, साहेबराव साळुंके, संजय जाधव, योगेश बिराजदार, गोपाळ माने, मनोज देशपांडे, विशाल बडूरे, महादेव रवळे, गोविंद देशपांडे, बाळू यादव आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन पप्पू गोरे यांनी तर गोविंद साळुंके यांनी आभार मानले.
कोविड काळात गावपातळीवर चांगल्या प्रकारे काम करत असल्याबद्दल लोहारा येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पोलीस पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उमरगा लोहारा विधानसभा अध्यक्ष विजय लोमटे, तालुकाध्यक्ष सुनील साळुंके, युवक तालुकाध्यक्ष नाना पाटील, राजेंद्र कदम, मिलिंद नागवंशी, हेमंत माळवदकर, नवाज सय्यद, नगरसेवक गगन माळवदकर, आयुब शेख, शब्बीर गवंडी, युवक शहराध्यक्ष निहाल मुजावर, प्रकाश भगत, पृथ्वीराज जगताप, महेबूब फकीर, विठ्ठल बुरटूकणे, राहुल जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
काही दिवसांपूर्वी लोहारा शहरातील आमीनाबी मकबूल बागवान या महिलेने प्रसंगावधान दाखवत दोन लहान चिमुकल्यांचा जीव वाचवला होता. त्याबद्दल या महिलेचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने साडी चोळी देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच कोविड केअर सेंटर मधील सफाई कामगारांचाही सत्कार करण्यात आला.
19 August 2020
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुरेश (दाजी) बिराजदार यांच्या वाढदिवसानिमित्त करजखेडा येथे वृक्षारोपण
प्रतिनिधी / लोहारा
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष सुरेशदाजी बिराजदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लोहारा तालुकाध्यक्ष सुनिल साळुंके यांच्या वाढदिवसानिमित्त करजखेडा गावात वृक्षारोपण करण्यात आले. पारंपरिक केक वगैरे या गोष्टींना टाळून पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून वृक्षलागवड करून वाढदिवस साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी जिल्हाध्यक्ष सुरेश दाजी बिराजदार, लोहारा तालुकाध्यक्ष सुनिल साळुंके, जगदिश पाटील, प्रकाश भगत, लोहारा राष्ट्रवादी विद्यार्थी कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष पृथ्वीराज जगताप, सचिन रणखांब, करजखेडा ग्रामपंचायतीच्या सरपंच सुरेखा बनकर, उपसरपंच सुभाष कळसुले, तंटामुक्ती अध्यक्ष रवी आदटराव, बाळासाहेब कांबळे, धोंडिराम आदटराव, भागवत भंडारकर, बाळासाहेब चव्हाण, गणेश आदटराव, विनोद चव्हाण, आमित कांबळे उपस्थित होते.
18 August 2020
गणेशोत्सव, कोरोना उपाययोजनांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
प्रतिनिधी / मुंबई
गणेशोत्सव, कोरोना उपाययोजनांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची दक्षता घेत साधेपणाने गणेशोत्सव साजरा करावा
समाजप्रबोधन करण्याचे गणेश मंडळांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन
मुंबई, दि. १८:
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येणारा गणेशोत्सव हा सामाजिक भान राखत शांततेने साजरा करावा. याकाळात गर्दी होणार नाही, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन करतानाच कोरोना युद्धाच्या मध्यावर आपण काही ठिकाणी शिखराकडे गेलो तर काही ठिकाणी जात आहोत. त्यामुळे गाफील न राहाता आतापर्यंत ज्या उपाययोजना सुरू आहेत त्या यापुढेही नेटाने राबवाव्यात असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबई येथे आढावा बैठकीत दिले.
गणेशोत्सव, राज्यातील कोरोना उपाययोजना यांचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. यावेळी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महानगर पालिका आयुक्त, जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याशी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, गृह मंत्री अनिल देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव संजय कुमार, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, राज्य टास्क फोर्सचे सदस्य सहभागी झाले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी जिल्हानिहाय कोरोना उपाययोजना आणि मृत्यूदर यासंदर्भात आढावा घेतला.
मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, कोरोनामुळे सर्वधर्मियांनी आतापर्यंतचे सगळे सण साधेपणाने घरातच साजरे करून शासनाला सहकार्य केले आहे. याप्रमाणेच आता येऊ घातलेला गणेशोत्सव आणि मोहरम हे सण गर्दी न करता साजरे करावेत. गणेशोत्सवासंदर्भात गृहविभागाने मार्गदर्शक सुचनांचे परिपत्रक निर्गमित केले आहे. त्यातील तरतूदींचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
सार्वजनिक गणेश मंडळांसाठी गणपतीची मूर्ती ४ फुटांची तर घरगुती गणेश मुर्ती २ फुटांची असावी असे या मार्गदर्शक सुचनांमध्ये नमूद केले आहे. त्याचे पालन करतानाच आगमन आणि विसर्जन मिरवणूका निघणार नाहीत, गणेशोत्सवात गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची दक्षता घेणे अत्यावश्यक असून गृह विभागाचे परिपत्रक सर्व संबंधितांपर्यंत पोहोचविण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
विसर्जनाच्या वेळी होणारी गर्दी टाळावी
या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन शक्यतो घरीच करावे, जिथे शक्य नाही तिथे मोठ्या प्रमाणात कृत्रिम तलाव निर्माण करावेत व तेथेही गर्दी होणार नाही याची दक्षता घेऊन विसर्जनाची व्यवस्था करण्यात यावी. महापालिका यंत्रणेकडे गणेश मूर्ती दान करण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.
गणेशोत्सवातून सार्वजनिक गणेश मंडळांनी सामाजिक, प्रबोधनात्मक संदेश द्यावा. कोरोना आणि एकंदरीतच आरोग्य विषयक जनजागृती मोहिम होती घेण्याचे आवाहन करतानाच दर्शनासाठी भक्तांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मंडळांनी ऑनलाईन दर्शनाची सुविधा उपलब्ध करून दिल्यास सोयीचे होईल. उत्सव काळात कायदा आणि सुव्यवस्था चोख राहील याची काळजी घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. गणेशोत्सवासाठी कोकणात मोठ्या प्रमाणात लोक गेले असून तिथे अधिक खबरदारी घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
मृत्यूदर रोखण्यासाठी टास्क फोर्सच्या तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्या
कोरोनाबाबत आढावा घेतल्यानंतर सूचना करताना मुख्यमंत्री म्हणाले, काही ठिकाणी परिस्थिती आटोक्यात तर काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढतांना दिसत आहे. ही परिस्थिती नियंत्रणात राहील याकडे लक्ष देण्याची गरज आहे. मृत्यूदर रोखण्यासाठी राज्यस्तरीय टास्क फोर्समधील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्याचे आवाहन त्यांनी केले. राज्यात ज्या भागात कोरोनाचे रुग्ण जास्त प्रमाणात आढळून येत आहेत तेथे अतिदक्षता विभागातील (आयसीयू) बेड आणि ऑक्सीजनची व्यवस्था असलेले बेड वाढविण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
चाचण्यांचे प्रमाण वाढवावे
कोरोना उपचारासाठी जम्बो सुविधांची उभारणी राज्यभर सुरु असून पावसाळा, कोरोनाचा प्रादुर्भाव आणि सणवार एकत्र आल्याने अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचे सांगत पावसाळी आजार डोके वर काढतात त्याकडे लक्ष देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. चाचण्यांचे प्रमाण वाढवावे, चाचण्यांचे दर नियंत्रित राहतील याकडे लक्ष द्यावे,चाचणी रिपोर्ट लवकर येईल यासाठी प्रयत्न करावेत. कोरोनातून बरे होऊन घरी गेल्यानंतर रुग्णांना पुन्हा त्रास होत असल्याचे दिसून आले आहे त्यामुळे पोस्ट कोविड परिस्थितीकडे, रुग्णांकडे लक्ष देण्याची अधिक गरज असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
कोरोना दक्षता समित्यांच्या माध्यमातून गावागावात जनजागृती मोहिम
स्वयंशिस्त, मास्क वापरणे, हात धुणे, स्वच्छता राखणे यासारखे उपायच कोरोनावर सध्याचे औषध असल्याचे सांगतानाच आज ८० टक्के रुग्णांना कोरोनाची लक्षणे नाहीत. पण ते संक्रमण करू शकतात. त्यांच्या माध्यमातून होणारा प्रसार गंभीर बाब असल्याने अशा रुग्णांचे विलगीकरण करणे, त्यांना क्वारंटाईन करणे आवश्यक असून या रुग्णांकडे दुर्लक्ष करू नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. कोरोना दक्षता समित्यांच्या माध्यमातून गावागावात जनजागृती मोहिम घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. कोरोनाच्या विषाणुला जोपर्यंत हरवत नाही तोपर्यंत अहोरात्र अविश्रांत मेहनत सुरु ठेवण्याचे आवाहन त्यांनी यंत्रणेला केले.
कायमस्वरूपीच्या सुविधांसाठी रुग्णालयांचे श्रेणीवर्धन करावे -
उप मुख्यमंत्री अजित पवार
गणेशोत्सवासाठीचे मार्गदर्शक सुचनांचे परिपत्रक राज्यात सर्वांसाठी एक सारखे असावे अशी सूचना उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी गृह विभागाला केली. लिक्वीड ऑक्सीजन पुरवठ्याकडे मुख्य सचिवांनी लक्ष द्यावे त्याचे दर वाढणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. जिल्ह्यातून आलेल्या निधीच्या मागणीवर बोलताना उप मुख्यमंत्री म्हणाले की, एसडीआरएफ, जिल्हा विकास निधी (डीपीसी) वापरावा. सीएसआरचा निधी अधिकाधिक मिळवण्यासाठी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे. राज्यात जम्बो सुविधा उभ्या करतच आहोत पण त्याचबरोबर विभागीय आयुक्तांनी, जिल्हाधिकाऱ्यांनी आहे त्या रुग्णांलयांमध्ये हा निधी खर्च करून तिथे आयसीयु बेड, ऑक्सीजनची सुविधा निर्माण करून या रुग्णालयांचे श्रेणीवर्धन केल्यास कायमस्वरूपी सुविधा म्हणून त्या उपयोगात येतील.
समाज माध्यमांवरील चुकीच्या व्हिडिओंवर पोलीसांनी लक्ष ठेवावे - गृहमंत्री अनिल देशमुख
समाज माध्यमांवर प्रसारित होणाऱ्या चुकीच्या व्हिडिओंवर पोलीसांनी लक्ष ठेवण्याच्या सुचना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यावेळी दिल्या. गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची स्थानिक यंत्रणेने अधिकाधिक निर्मिती करावी जेणेकरून विसर्जनाला गर्दी होणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
टेलीआयसीयुचा विस्तार करण्याची आवश्यकता
- आरोग्यमंत्री राजेश टोपे
आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, राज्यात सुरू असलेल्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून कोरोना रुग्णांना मोफत उपचार मिळतील यासाठी जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांनी विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. तालुकास्तरावर रुग्णवाहिका उपलब्ध राहतील याकडे जिल्हाधिकऱ्यांनी लक्ष घालावे. लवकर निदानासाठी काही जिल्ह्यांमध्ये कॉण्टॅक्ट ट्रेसिंग वाढविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. चाचण्यांची क्षमता पुरेशी असून त्याचा पूर्णपणे वापर करण्याचे आवाहन आरोग्मंत्र्यांनी केले. टेलीआयसीयु सुविधा राज्यात सुरू झाली असून भिवंडी मध्ये त्याच्या वापराने फायदा होत असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. जेथे विशेषज्ञ उपलब्ध नाही तेथे ही सुविधा फायदेशीर ठरत असल्याचे सांगतानाच सध्या सीएसआरच्या माध्यमातून ही योजना सुरू असून राज्यात तिचा विस्तार करण्याची आवश्यकता असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
17 August 2020
उमरगा येथील तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयात औषधनिर्माण शास्त्र पदवीला (बी फार्मसी) मान्यता
प्रतिनिधी / उमरगा
उमरगा येथील भारत शिक्षण संस्था संचलित तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयाला महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र तंत्रशिक्षण संचालनालय, मुंबई व फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया (PCI), नवी दिल्ली यांच्याकडून औषधनिर्माण शास्त्र पदवीला (बी फार्मसी) मान्यता मिळाली आहे. प्रवेश क्षमता ६० असणार आहे. तसेच हे महाविद्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजीकल युनिव्हर्सिटी लोणेर (BATU) या विद्यापीठाशी संलग्नित आहे. महाविद्यालयाची सुरुवात करण्यात आली आहे. तसेच चालू शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये महाविद्यालयामध्ये औषधनिर्माणशास्त्र पदविका (डी फार्मसी) अभ्यासक्रम व पदवी अभ्यासक्रम (बी फार्मसी) प्रवेश प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे अशी माहिती प्राचार्य कवलजीत बिराजदार यांनी दिली आहे.
भारत विद्यालय उमरगा येथे स्वातंत्र्यदिन साजरा
प्रतिनिधी / उमरगा
भारत विद्यालय उमरगा येथे शनिवारी ( दि. १५) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्देशानुसार स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला.
यावेळी भारत शिक्षण संस्थेचे संस्थापक कै. तात्यारावजी मोरे आबा यांच्या पुतळ्याचे पुजन मुख्याध्यापक शाहूराज जाधव व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पुजन पर्यवेक्षक विक्रांत मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्याध्यापक शाहूराज जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पर्यवेक्षक विक्रांत मोरे, पर्यवेक्षक संजय देशमुख, माजी शिक्षक नंदु कुलकर्णी व शिक्षकवृंद उपस्थित होते. कोरोनाला न घाबरता सर्वांनी सामना करून कोरोनासह जगण्याची तयारी करावी लागणार आहे. शाळा नाही, शिक्षण सुरु या उद्देशाने सुरू असलेल्या आॅनलाईन अभ्यासक्रमाबद्दल मुख्याध्यापक शाहूराज जाधव यांनी माहिती दिली. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे शासनाच्या निर्देशांचे पालन यावेळी करण्यात आले. सूत्रसंचालन व्यंकट गुंजोटे यांनी केले.
लोहारा येथील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयामध्ये ७४ वा स्वातंत्र्य दिन व गुणवंतांचा सत्कार सोहळा संपन्न
प्रतिनिधी / लोहारा
लोहारा येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे भानुदासराव चव्हाण महाविद्यालयामध्ये शनिवारी (दि. १५) स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष प्रा. सतीश इंगळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. देवगिरी ग्लोबल अकॅडमी कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा निकाल पहिल्याच वर्षी सायन्स ९६.४७ टक्के व काॅमर्स १०० टक्के लागला आहे. या निमित्ताने प्राचार्य, सर्व प्राध्यापक व विद्यार्थी यांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार आयोजित करण्यात आला होता. महाविद्यालयातून प्रथम आलेली शुभांगी विकास ढोले, आकाश शिवशंकर स्वामी, मुस्कान रफिक मुलानी, कीर्ती नवनाथ माळी, लता लिंबराज बादुले, स्नेहल वैजनाथ पाटील, कमल पंडित मडोळे, निकिता इराप्पा बादुले, जना महादेव पाटील, शिवकन्या सहदेव कदम या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष प्रा. सतीश इंगळे, नगराध्यक्षा ज्योती मुळे, किशोर साळुंके, प्रवीण पाटील, पांडुरंग पाटील, कोंडीबा जगताप, महाविद्यालयाचे प्राचार्य वीरभद्रेश्वर स्वामी यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा. यशवंत चंदनशिवे, प्रा. व्यंकट चिकटे, प्रा. राजपाल वाघमारे, प्रा. विनोद तुंगे, प्रा. स्वाती निकम, प्रा. अमृता दिक्षित, प्रा. उमा हलकुडे यांच्यासह महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
16 August 2020
लोहारा तालुक्यातील स्पर्श ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्यसेवेतील कार्य उल्लेखनीय - पालकमंत्री शंकरराव गडाख
प्रतिनिधी / लोहारा
सास्तुर येथील स्पर्श ग्रामीण रुग्णालयाने मागील २५ वर्षात आरोग्यसेवेत अतिशय उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यामुळे स्पर्श रुग्णालयाची महाराष्ट्रात वेगळी ओळख निर्माण झाली आहे असे गौरवोद्गार उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी काढले. दि १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.३० च्या दरम्यान पालकमंत्री गडाख यांनी स्पर्श ग्रामीण रुग्णालय सास्तूरला भेट दिली. यावेळी ते बोलत होते.
पालकमंत्री गडाख दोन दिवस उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी शुक्रवारी ( दि. १४) तालुक्यातील सास्तुर येथील स्पर्श ग्रामीण रुग्णालयास भेट दिली. यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार ज्ञानराज चौगुले, आमदार कैलास पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी रुपाली अवले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हणमंत वडगावे, उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, तहसीलदार विजय अवधाने, गटविकास अधिकारी अशोक काळे, लोहारा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, सास्तुरचे सरपंच यशवंत कासार, ग्रामविकास अधिकारी शिवानंद बिराजदार उपस्थित होते. यावेळी त्यांनी स्पर्श रुग्णालयात पाहणी केली. यावेळी स्पर्श रुग्णालयाचे प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी यांनी स्पर्शच्या कामकाजाची माहितीचे प्रोजेक्टरद्वारे प्रेझेन्टेशन केले. मान्यवरांच्या हस्ते स्त्री जन्माचे स्वागत म्हणून रुग्णालयात जन्मलेल्या बालिका व मातांना बेबी कीट, पैंजण, साडी चोळी देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सर्व गरोदर माता व प्रसूती मातांना हिमोग्लोबिन वाढीसाठी एक महिना पुरेल एवढे सकस आहार गुळ, शेंगदाणे लाडू वाटप करण्यात आले.
जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आरोग्य सेवेत उत्कृष्ट कार्य करीत असलेल्या ग्रामीण रुग्णालय स्पर्श सास्तूरच्या अडचणी प्रामुख्याने सोडवण्यात येतील तसेच स्पर्श रुग्णालयाच्या भविष्यातील सुधारण्यासाठी शासना तर्फे संपूर्ण सहकार्य केले जाईल असे प्रतिपादन पालकमंत्री गडाख यांनी यावेळी केले. स्पर्श ग्रामीण रुग्णालय सास्तूरची पाहणी व कामकाजाचा आढावा घेतल्याबद्दल प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
पंचायत समिती लोहारा येथे जागर अस्मिता मोहिमेचा शुभारंभ
प्रतिनिधी / लोहारा
मासीक पाळीच्या काळात महिला व किशोरवयीन मुलींनी सॅनिटरी नॅपकिनचा वापर करावा याबाबत जनजागृतीचे दृष्टीने शासनाने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून अस्मिता प्लस योजना सुरू केली असून यामुळे खर्या अर्थाने महिलांचे आरोग्य सुधारण्यास मदत होणार आहे असे प्रतिपादन पंचायत समितीच्या सभापती हेमलता रणखांब यांनी शनिवारी ( दि. १५) केले.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान मार्फत राज्यात दिनांक १५ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट या कालावधीमध्ये मासीक पाळी बद्दल व्यापक जनजागृती व्हावी आणि सॅनिटरी नॅपकिन अस्मिता प्लस योजनेची ची माहिती तालुक्यातील प्रत्येक गावात व्हावी यासाठी जागर अस्मिता या मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या मोहिमेचा शुभारंभ स्वातंत्र्यदिनी शनिवारी ( दि. १५) पंचायत समिती लोहारा येथे करण्यात आला. यावेळी सभापती रणखांब बोलत होत्या. यावेळी गटविकास अधिकारी अशोक काळे, सहाय्यक गटविकास अधिकारी संजय ढाकणे यांची उपस्थिती होती.
लोहारा तालुका अंतर्गत स्वयंसहाय्यता समूहाने एकूण ५६ अस्मिता प्लस नॅपकीनचे बॉक्सची ऑर्डर प्रत्येक गावातून केली आहे. तसेच सभापती हेमलता रणखांब यांच्या हस्ते सास्तुर येथील बौद्धीसत्व महिला स्वयंसहाय्यता समुहाची एका बॉक्सची ऑर्डर सभापती रणखांब यांच्या हस्ते अस्मिता अँप द्वारे करण्यात आली. तसेच हिप्परगा सय्यद येथील स्वयंसहाय्यता समूहातील महिला बालिका राजेंद्र मोरे यांनी सर्वाधिक बॉक्स ऑर्डर केले असून त्यांचा सत्कार यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. ग्रामीण भागातील महिला व किशोरवयीन मुलीचे, महिलांचे आरोग्य चांगले राहावे या उद्देशाने अल्पदरात गावातच सॅनेटरी नॅपकिन उपलब्ध होणार आहे. बाजारात सध्या असलेल्या नामांकित सॅनिटरी नॅपकिन च्या तुलनेत अस्मिता सॅनिटरी नॅपकिन कमी किमतीत व चांगल्या गुणवत्तेचे आहे. तसेच सॅनेटरी नॅपकिन विक्रीच्या माध्यमातून गावातील महिलांना आर्थिक फायदा होणार आहे. महिलांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी जागर अस्मिता मोहीमेच्या माध्यमातून सॅनिटरी नॅपकिन २४ रूपयामध्ये उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलींना स्मार्ट कार्डच्या माध्यमातून फक्त 5 रूपयामध्ये सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून दिले जाणार आहे. याचा शुभारंभ शनिवारी ( दि. १५) पंचायत समिती लोहारा येथे करण्यात आला. पुढील १५ दिवसामध्ये गाव पातळीवर विविध कार्यक्रम राबवून प्रत्येक कुटुंबापर्यंत मासीक पाळी व्यवस्थापन आणि त्याबद्दल व्यापक जनजागृती केली जाणार आहे. जागर अस्मिता मोहीम यशस्वी करण्यासाठी उमेद अभियानातील सर्व समुदाय संसाधन व्यक्ती, तालुका अभियान कक्षातील सर्व कर्मचारी, पंचायत समिती व विविध शासकीय विभाग परिश्रम घेत आहेत. कार्यक्रमचे प्रास्तविक प्रणिता कटकदौंड यांनी केले. अमोल कासार यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रीतम बनसोडे, सौरभ जगताप, प्रदीप लोंढे, संगीता सोनटक्के यांनी परिश्रम घेतले.
14 August 2020
पालकमंत्री शंकरराव गडाख पाटील यांनी घेतली जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुरेश दाजी बिराजदार यांची सदिच्छा भेट
प्रतिनिधी / उस्मानाबाद
उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख पाटील हे शुक्रवारी ( दि. १४) उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर आले होते. या दरम्यान पालकमंत्री शंकरराव गडाख पाटील यांनी जिल्हा बँकेचे चेअरमन, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा. सुरेश दाजी बिराजदार व माणिकराव अप्पा बिराजदार यांची बलसुर येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.
यावेळी पालकमंत्री गडाख पाटील साहेबांचे बलसुर वासियांच्या वतीने सुरेश दाजी बिराजदार यांनी स्वागत केले. यावेळी उपस्थितांनी निळकंठेश्वर मंदिराला भेट देऊन आशीर्वाद घेतले. यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार ज्ञानराज चौगुले, आमदार कैलास घाडगे पाटील आदी उपस्थित होते.
लोहारा तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने कोविड शिक्षण शुल्कनीती अभियानाची सुरुवात
![]() |
| लोहारा शहरातील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयात निवेदन देण्यात आले. |
प्रतिनिधी / लोहारा
लोहारा तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी ( दि. १४) लोहारा येथे कोविड शिक्षण शुल्कनीती अभियानाची सुरुवात करण्यात आली. शहरातील भानुदासराव चव्हाण महाविद्यालय व शंकरराव जावळे पाटील महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करून निवेदन देण्यात आले.
सध्या राज्यभर कोरोना महामारीचे संकट आहे. हजारो लोक मृत्युमुखी पडत आहेत. अशा परिस्थितीत शासनाने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लॉकडाऊन जाहिर केला होता. त्याचे परिणाम गेल्या ३, ४ महिन्यांपासून अर्व्यव्यवस्थेवर पडताना दिसत आहेत. उद्योग धंदे पूर्ण क्षमतेने चालू नाहीत. अनेकांच्या हाताला काम उरलेले नाही. अनेक जणांची परिस्थिती हलाकीची झाली आहे. काही ठिकाणी उद्योगधंदे ठप्प झाले आहे. राज्याच्या तिजोरीवर देखील ताण आला आहे. पालक आणि शाळा महाविद्यालये देखील अपवाद नाहीत. शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस या महामारीमुळे गेली ४, ५ महिने बंद आहेत. बऱ्यापैकी कामकाज कमी झाले आहे. विद्यार्थ्यांचे वर्ग प्रत्यक्षात विद्यालय आवारात भरत नाहीत. परिणामी शाळा महाविद्यालयांना कुठल्याही प्रकारचा अधिकचा खर्च सध्या चालू नाही. उपाय म्हणून विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आणि वार्षिक अभ्यासक्रमाबाबत कुठलेही नुकसान होऊ नये म्हणून काही ठिकाणी ऑनलाइन वर्ग चालू केले आहेत. मात्र काही ठिकाणी शाळा, महाविद्यालये पालकांकडून अधिकचे शैक्षणिक शुल्क जबरदस्तीने घेताना आढळून येत आहे. तर काही ठिकाणी पालक व विद्यार्थ्यांच्या कडे शैक्षणिक शुल्कासाठी तगादा लावताना दिसत आहेत. अशा वेळेस काही शाळांसोबत व विद्यालयांसोबत संपर्क केला असता त्यांच्याही काही अडचणी आहेत असे निदर्शनास आले. मात्र पालक वर्गाचे देखील बरेच नुकसान झाल्यामुळे त्यांच्यावरही आर्थिक संकट ओढवले आहे.
![]() |
| लोहारा शहरातील शंकरराव जावळे पाटील महाविद्यालयात निवेदन देण्यात आले. |
अशा परिस्थितीत शाळा, महाविद्यालये, क्लासेस यांनी शुल्क निश्चिती आणि विद्यार्थ्यांच्या कडून शुल्क मागणी या बाबत निश्चित धोरण ठरवणे गरजेचे आहे. यासाठी प्रदेश राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस कडून येणाऱ्या काळामध्ये कोरोना शिक्षण शुल्कनीती अभियान ही मोहीम संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येणार आहे. तरी कोणत्याही परिस्थितीत पालक किंवा विद्यार्थ्यांना शुल्क भरण्यासाठी सक्ती करू नये. त्याचबरोबर केवळ शुल्क न भरल्याचे कारण दाखवत कोणत्याही विद्यार्थ्यांला कुठल्याही प्रकारच्या शैक्षणिक सुविधेपासून वंचित ठेवू नये अशा आशयाचे निवेदन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसकडून प्राचार्यांना देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील साळुंके, विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पृथ्वीराज जगताप, राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष निहाल मुजावर, महेबूब फकीर, दादासाहेब पाटील, संजय गायकवाड, सचिन रनखांब, हरिप्रसाद जगताप, राहुल चव्हाण, अनिकेत जगताप, कृष्णा पवार आदी उपस्थित होते
11 August 2020
लोहारा येथील वसंतदादा पाटील हायस्कूल संलग्न नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न
प्रतिनिधी / लोहारा
लोहारा येथील वसंतदादा पाटील हायस्कूल संलग्न नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालय लोहारा येथे सोमवारी (दि. १०) शैक्षणिक वर्ष २०१९-२० मधील इयत्ता १० वी व इयत्ता १२ वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या यु व्ही पाटील या होत्या. यावेळी प्रा. सुनील बहिरे, प्रा. व्ही. एम. बुवा, प्रा. आर सी आष्टेकर, बी. एल. जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक शिंदे सर यांनी केले. यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यात १० वी बोर्ड परीक्षेत तालुक्यातून व शाळेतून सर्वप्रथम आलेली विद्यार्थिनी कु. यशश्री श्रीकांत मोरे सह नेहा उद्धव सोमवंशी, साक्षी उमेश जवादे, रेणुका संतोष सूर्यवंशी यांचा सत्कार करण्यात आला. कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेतील प्रथम आलेली विद्यार्थिनी स्वरांजली प्रकाश मुळे, द्वितीय रोहिणी राम काडगावे, तृतीय आकांक्षा किशोर चिद्रे, वाणिज्य शाखेतून प्रथम क्रमांक निकिता नानासाहेब गोरे, द्वितीय क्रमांक मनीषा व्यंकट कडबाने, तृतीय कु. प्रगती शाम पालकर, कला शाखेतून प्रथम शिवम सतिश कांबळे, द्वितीय पृथ्वीराज भागवत चव्हाण, तृतीय इम्रान मेहबूब शेख या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
यानंतर महाविद्यालयातून सर्व प्रथम येणारी निकिता नानासाहेब गोरे या विद्यार्थिनीस प्रा. पी.जी. काळे यांच्या वतीने १००१ रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. तसेच मराठी विषयात सर्व प्रथम आलेली स्वरांजली प्रकाश मुळे या विद्यार्थिनीस प्रा. बुवा व्ही. एम. यांच्या वतीने १००१ रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. तसेच महाविद्यालयातून संरक्षण शास्त्र या विषयात प्रथम आलेला विद्यार्थी शिवम सतीश कांबळे यास प्रा. एस. डी. शिंदे यांच्यातर्फे ५०१ रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. यावेळी यशश्री श्रीकांत मोरे, स्वरांजली प्रकाश मुळे, निकिता नानासाहेब गोरे या विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्या यु व्ही पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यात त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्नशील राहण्याची गरज व्यक्त केली. सूत्रसंचालन डी व्ही धनवडे यांनी तर प्रा. एस. डी. शिंदे यांनी आभार मानले. यावेळी प्रा. शिंदे डि. व्ही, प्रा. काळे पी. जी, प्रा. साठे डि. आर, प्रा. कांबळे जी. एम, प्रा. सोमवंशी यु. व्ही, प्रा. कलमे व्ही. टी., बालाजी ईरूदे , जाधव डी. आर, श्रीकांत मोरे, पांढरे एन. एस, आदींसह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विदयार्थी, पालक उपस्थित होते.
10 August 2020
लोहारा तालुक्यातील सास्तुर येथील निवासी दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांना मशाल फाऊंडेशन, पुणे यांचेकडून शैक्षणिक साहित्याची मदत
प्रतिनिधी / लोहारा
लोहारा तालुक्यातील सास्तूर येथील निवासी दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांना पुण्यातील मशाल फाऊंडेशनच्या वतीने ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून रविवारी ( दि.९) शैक्षणिक साहित्याचे किट्स वितरित करण्यात आले. सास्तूर दिव्यांग शाळेत आयोजित कार्यक्रमात हे किट्स वितरित करण्यात आले.
या शैक्षणिक किट्स मध्ये १०० दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्कूल बॅग्ज,५०० वह्या, चित्रकलेचे साहित्य, सॅनिटायझेशनसाठी साबण, मास्क इ. साहित्य शाळेचे मुख्याध्यापक बी. टी.नादरगे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. प्रातिनिधीक स्वरूपात शाळेत उपस्थित निराधार दिव्यांग विद्यार्थी दत्ता गिरी व सोनाली बेळे यांना मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक किट्स चे वितरण करण्यात आले. सदर किट्स मशाल फाऊंडेशन, पुणे या संस्थेचे प्रमुख शरद महाजन यांच्या दातृत्वातून उपलब्ध करून देण्यात आले.
सास्तूर निवासी दिव्यांग शाळेतील १०० दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार साहित्याचे वितरण करण्यात आले. सास्तूर सारख्या ग्रामीण भागात निवासी दिव्यांग शाळेच्या माध्यमातून दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासाचे कार्य निस्वार्थ भावनेने केले जात आहे. समाजानेही या चांगल्या कार्याला भरीव मदत करावी. यासाठी पुणे येथील मशाल फाऊंडेशनकडून समाजातील दात्यांनी प्रेरणा घेवून, सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेतला पाहिजे असे प्रतिपादन प्रा. डॉ. महादेव शिंदे यांनी याप्रसंगी बोलताना केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी आॅगस्ट क्रांती दिनानिमित्त क्रांतिकारकांना अभिवादन करण्यात आले. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माकणी गावचे सुपुत्र, सामाजिक कार्यकर्ते तथा शिक्षणतज्ञ प्रा. डॉ. महादेव शिंदे हे होते. यावेळी मशाल फाऊंडेशन पुणे या संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक प्रा. विष्णु शिंदे, माकणी येथील आदर्श शिक्षक गौरीशंकर कलशेट्टी, आयसीड फाऊंडेशन माकणी या संस्थेचे संचालक महेश शिंदे, आयसीड संस्थेचे पुणे येथील सदस्य नितीन नरखेडकर, हराळी येथील किशन सूर्यवंशी, सुरेश मरगळे, श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तुळशीराम नादरगे, शांतेश्वर दिव्यांग व्यावसायीक प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य प्रा. बी. एम. बालवाड, प्रशालेचे मुख्याध्यापक बी. टी. नादरगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमासाठी शाळेतील विशेष शिक्षिका अंजली चलवाड, राष्ट्रीय दिव्यांग खेळाडू प्रयागताई पवळे, प्रशालेतील कर्मचारी वृंद विठ्ठल शेळगे, ज्ञानोबा माने, एन. सी. सूर्यवंशी, गोरक पालमपल्ले, डी. एस. सगर, सूर्यकांत कोरे, शंकरबाबा गिरी, माधव मुंडकर, सुरेखा परीट, सविता भंडारे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मशाल फाऊंडेशनचे व्यवस्थापक प्रा. विष्णु शिंदे यांनी केले. तर सूत्रसंचलन विठ्ठल शेळगे यांनी केले.
येणेगुर येथील वैद्यकीय सहायता कक्षास पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते, रुद्रा बिल्डर्सचे मालक दिपक मदने यांनी सदिच्छा भेट
प्रतिनिधी / उस्मानाबाद
शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती वर्धापनदिनानिमित्त येनेगुर येथील अंतिम निर्णय संपर्क कार्यालयाचे रुपांतर वैद्यकीय सहायता कक्षात करण्यात आले. या कार्यालयास पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते, रुद्रा बिल्डर्सचे मालक DM ग्रुपचे संस्थापक मा श्री दिपक मदने यांनी सदिच्छा भेट दिली. येणेगुर फेस्टिवल टिमच्या वतीने राबविण्यात येण्याऱ्या सर्वच उपक्रमास DM ग्रुप सातत्याने आपल्या सोबत असेल असे त्यांनी सांगीतले.
यावेळी आरोग्य सहायता कक्ष टिमच्या वतीने दिपक मदने व त्यांच्यासमवेत असणाऱ्या सर्वाचे ऑक्सोमिटर पल्स व टेम्प्रेचरची तपासणी करण्यात आली. यावेळी येणेगुर महोत्सव टिम व D M ग्रुपच्या तालुका शाखेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जि.प. सदस्य रफीक तांबोळी, उपसरपंच वैभव बिराजदार, येणेगुर शिवसेना सर्कल प्रमुख खय्युम चाकुरे, शंकर हुळमजगे सर, प्रा शरद गायकवाड, रियाज शेख, बालाजी दुधभाते, शिवसेना नेते श्रीकांत मंगरुळे, जयसिंग राजपुत, येणेगुर महोत्सवाचे निमंत्रक प्रशांत पोचापुरे, युवा नेते संतोषदादा कलशेट्टी, माजी सरपंच आयुबभाई जवळगे, दस्तगीरभाई जवळगे, किरण दासमे, भगत माळी, उत्तम कांबळे सर, आकाशराजे कांबळे, परमेश्वर मडगुडे, माजी ग्रा पं सदस्य दिनेश मदने, महोत्सवाचे संचालक गणेश बंडगर, आसिफ मुल्ला, महेबुब शेख, मुन्नाभाई तांबोळी, DM ग्रुपचे शिवराम मदने, अजय मदने, व्यंकट मदने, मच्छिंद्र मदने, सचिन मदने, धुळपा मदने, येणेगुर महोत्सवाचे संयोजक प्रदीप मदने व मित्र परिवार उपस्थित होते.
लोहारा - राष्ट्रवादी काँग्रेसचे लोमटे, साळुंके यांचा निवडीबद्दल सत्कार
प्रतिनिधी / लोहारा
लोहारा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष पदी सुनील साळुंके तर उमरगा लोहारा विधानसभा अध्यक्षपदी विजय लोमटे यांची निवड झाल्याबद्दल तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रविवारी (दि. ९) सत्कार करण्यात आला.
चार दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष व उमरगा लोहारा विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडी जाहीर झाल्या. तालुकाध्यक्ष पदी सुनील साळुंके तर विधानसभा अध्यक्षपदी विजय लोमटे यांची निवड झाली आहे. या निवडीबद्दल राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नाना पाटील यांनी नवनियुक्त दोन्ही पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला. यावेळी बाळासाहेब लांडगे, मिलिंद नागवंशी, नवाज सय्यद, हेमंत माळवदकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष निहाल मुजावर, संजय जाधव, दिपक रोडगे, राजपाल वाघमारे, प्रतिक सिरसाट आदी उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल सुनील साळुंके यांचा लोहारा खुर्द येथे सत्कार
राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोहारा तालुकाध्यक्ष पदी सुनील साळुंके यांची निवड झाल्याबद्दल लोहारा खुर्द येथे साळुंके यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोहारा तालुकाध्यक्ष पदी सुनील साळुंके यांची निवड करण्यात आली आहे. त्यानिमित्त लोहारा खुर्द येथील राष्ट्रवादी विचार मंच व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नवनियुक्त तालुकाध्यक्ष सुनील साळुंके यांचा सत्कार केला. यावेळी स्वप्नपूर्ती समुहाचे अमोल रसाळ यांनी आपल्या कार्याच्या जोरावर नक्कीच नवीन पदाधिकारी आपल्या पदाला न्याय देतील अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी गावातील कार्यकर्ते संजय रसाळ, अजय रसाळ, प्रकाश रसाळ, सुशांत रसाळ, एकनाथ रसाळ, बालाजी सूर्यवंशी आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.
09 August 2020
जोपर्यंत कोरोनाची तीव्रता कमी होत नाही, तोपर्यंत एमपीएससी पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात - स्टुडंट हेल्पींग युनिटीच्या अध्यक्षा आकांक्षा ज्ञानराज चौगुले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली विनंती
जोपर्यंत कोरोनाची तीव्रता कमी होत नाही, तोपर्यंत एमपीएससी पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी विनंती स्टुडंट हेल्पींग युनिटीच्या अध्यक्षा आकांक्षा ज्ञानराज चौगुले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
या पत्रात त्यांनी म्हणले आहे की, कोरोनाच्या परिस्थितीचा अंदाज घेउन आपण विद्यार्थ्यांच्या हिताचे अनेक धाडसी निर्णय घेतले त्याबद्दल आभार. यावर्षी 13 सप्टेंबर 2020 ला होणार्या राज्यसेवा पुर्व परीक्षा घेण्याची तयारी आयोगाने सुरु केली आहे. एकीकडे सरकार अंतिम वर्षाच्या परीक्षा घेउ नये म्हणून न्यायालयात गेले आहे, परंतु एमपीएससी विद्यार्थ्यांसोबत परीक्षा घेणार असा दुजाभाव का ?
सरकारने 31 ऑगस्ट पर्यत लॉकडाऊन वाढवले आहे. त्यात बसगाडया ही बंद आहेत. जर बस सरकारने आठ दिवस आधी सुरु केली नाही तर पुर्वनियोजन नसताना विद्यार्थांच्या गोंधळात आणखीनच भर पडेल. म्हणून बस कधी सुरु करणार हे आधी सरकारने स्पष्ट करावे. जेणे करून विद्यार्थी परीक्षेच्या चार दिवस आधी तरी शहरात जाऊ शकतील. अनेक विद्यार्थ्यांना खाजगीवाहने करुन जाणे परवडणार नाही.
या विद्यार्थ्यांना केंद्र बदलायला सरकारने परवानगीे दिली नाही. राज्यातील लाखो विदयार्थी या परीक्षेला बसतात. यातील 50% विदयार्थी पुण्यातच अभ्यास करतात आणि परीक्षा केंद्रही प्राधान्याने ते पुणेच देतात. अशा वेळी एकदम विदयार्थी शहराकडे आले तर संक्रमणाचा धोका निश्चित आहे. त्याच बरोबर या विद्यार्थ्यांना एका दिवसाच्या परीक्षासाठी यांना कोण लगेच रुम देणार नाही. मान्य आहे की या परीक्षासाठी लाखो विदयार्थी रात्रंदिवस अभ्यास करतात. वेळेवरती परीक्षा घेणे महत्वाचेच आहे. परंतु सध्या तसा काळ आणि वेळ नाही. हि भयावह कोरोना स्थिती आपण वारंवार सोशलमिडीया व प्रसार माध्यमातुन सांगत असता, की काळजी घ्या. त्यांत सरकारने लोकल ट्रेन पण सुरु केल्या नाहीत मुबंई ,ठाणे यासारख्या परिसरातील विदयार्थीनी परीक्षेस कसे सामोरे जायचं? शाळा ,काँलेज, वसहतीगृह मिळेल ती जागा आपण कोरोना चे सेंटर म्हणुन उभे केलेत. सर्व परीक्षा केंद्र याच ठिकाणी असतात. त्याचबरोबर राज्यातील अनेक मंत्री, आमदार, खासदार, अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत, जर अशी महत्वपूर्ण मंडळी संक्रमणातुन सुटत नसतील तर सर्वसामान्य विद्यार्थ्यांचं काय?
त्यामुळेचं वरील सर्व मुद्याचा आपण गांभीर्याने विचार करून जोपर्यंत करोनाची तीव्रता कमी होत नाही. तोपर्यत या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी विनंती स्टुडंट हेल्पींग युनिटीच्या अध्यक्षा आकांक्षा ज्ञानराज चौगुले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे.
कोरोनामुक्तांची आतापर्यंतची सर्वोच्च संख्या; दिवसभरात १३,३४८ रुग्ण बरे, राज्यभरात साडे तीन लाख रुग्ण झाले कोरोनामुक्त
![]() |
कोरोनामुक्तांची आतापर्यंतची सर्वोच्च संख्या; दिवसभरात १३,३४८ रुग्ण बरे, राज्यभरात साडे तीन लाख रुग्ण झाले कोरोनामुक्त - आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबई, दि.९: राज्यात आज आतापर्यंतच्या सर्वोच्च संख्येने १३ हजार ३४८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यभरात कोरोनाचे एकूण ३ लाख ५१ हजार ७१० रुग्ण बरे झाले आहेत. आज देखील नविन निदान झालेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक असून आज १२ हजार २४८ नविन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्याचे रुग्ण बरे होणाचे प्रमाण ६८.२५ टक्के एवढे आहे. सध्या १ लाख ४५ हजार ५५८ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत. आज देखील राज्यभरात सर्वाधिक ७८ हजार ७० चाचण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
आज निदान झालेले १२,२४८ नविन रुग्ण आणि नोंद झालेले ३९० मृत्यू यांचा तपशील खालीलप्रमाणे - (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) :
मुंबई मनपा-१०६६ (४८), ठाणे- २४७ (७), ठाणे मनपा-२१४ (३),नवी मुंबई मनपा-३४८ (९), कल्याण डोंबिवली मनपा-३१९ (१३),उल्हासनगर मनपा-२४ (१), भिवंडी निजामपूर मनपा-२४ (२), मीरा भाईंदर मनपा-११७ (१२), पालघर-२२७ (५), वसई-विरार मनपा-२२७ (५), रायगड-२३९ (५), पनवेल मनपा-२०६ (२), नाशिक-१३६ (३), नाशिक मनपा-८०७ (९), मालेगाव मनपा-२९ (२),अहमदनगर-३९९ (१),अहमदनगर मनपा-१९९ (३), धुळे-९५, धुळे मनपा-३४ (१), जळगाव-२७३ (२४), जळगाव मनपा-५७ (४), नंदूरबार-२६, पुणे- ५१७ (१७), पुणे मनपा-१४३३ (५८), पिंपरी चिंचवड मनपा-१०६६ (२०), सोलापूर-३२७ (७), सोलापूर मनपा-८० (३), सातारा-२५७ (८), कोल्हापूर-३०७ (८), कोल्हापूर मनपा-१३७ (५), सांगली-६९ (१), सांगली मिरज कुपवाड मनपा-२४० (६), सिंधुदूर्ग-२७ (२), रत्नागिरी-१०३ (२), औरंगाबाद-१६५ (७), औरंगाबाद मनपा-११५ (२), जालना-११० (१), हिंगोली-३१ (२), परभणी-२१ (४), परभणी मनपा-५३ (३), लातूर-१७८ (८), लातूर मनपा-१०१ (४), उस्मानाबाद-१६१ (१), बीड-२३५ (१), नांदेड-१४१ (३), नांदेड मनपा-१ (२), अकोला-४२, अकोला मनपा-२६, अमरावती-१४, अमरावती मनपा-५४, यवतमाळ-८८ (१०), बुलढाणा-८६ (३), वाशिम-४२, नागपूर-११६ (३), नागपूर मनपा-४८८ (३७), वर्धा-२३ (१), भंडारा-२, गोंदिया-२८ (१), चंद्रपूर-१८, चंद्रपूर मनपा-१३, गडचिरोली-५ (१), इतर राज्य २३.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २७ लाख २५ हजार ०९० नमुन्यांपैकी ५ लाख १५ हजार ३३२ नमुने पॉझिटिव्ह (१८.९१ टक्के) आले आहेत. राज्यात १० लाख ५८८ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३४ हजार ८५७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३९० करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.४५ टक्के एवढा आहे.
राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टीव्ह रुग्णांचा तपशील
मुंबई: बाधीत रुग्ण- (१,२३,३८२) बरे झालेले रुग्ण- (९६,५८६), मृत्यू- (६७९९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२९७), ॲक्टीव्ह रुग्ण- (१९,७००)
ठाणे: बाधीत रुग्ण- (१,०४,९३५), बरे झालेले रुग्ण- (८१,०९५), मृत्यू (३००८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (२०,८३१)
पालघर: बाधीत रुग्ण- (१८,४०८), बरे झालेले रुग्ण- (१२,१७९), मृत्यू- (४२४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५८०५)
रायगड: बाधीत रुग्ण- (२०,१४३), बरे झालेले रुग्ण-(१५,६५८), मृत्यू- (५१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (३९७३)
रत्नागिरी: बाधीत रुग्ण- (२११९), बरे झालेले रुग्ण- (१४०५), मृत्यू- (७८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६३६)
सिंधुदुर्ग: बाधीत रुग्ण- (४८९), बरे झालेले रुग्ण- (३४६), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१३४)
पुणे: बाधीत रुग्ण- (१,१३,००४), बरे झालेले रुग्ण- (६९,९३०), मृत्यू- (२७२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४०,३४६)
सातारा: बाधीत रुग्ण- (५६७९), बरे झालेले रुग्ण- (३४८२), मृत्यू- (१७२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (२०२४)
सांगली: बाधीत रुग्ण- (४६८७), बरे झालेले रुग्ण- (१९८६), मृत्यू- (१२४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२५७७)
कोल्हापूर: बाधीत रुग्ण- (८८८५), बरे झालेले रुग्ण- (३३४७), मृत्यू- (२१८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५३२०)
सोलापूर: बाधीत रुग्ण- (११,७१२), बरे झालेले रुग्ण- (६८४१), मृत्यू- (५८०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (४२९०)
नाशिक: बाधीत रुग्ण- (२०,५९७), बरे झालेले रुग्ण- (१२,६२१), मृत्यू- (५६९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७४०७)
अहमदनगर: बाधीत रुग्ण- (९१११), बरे झालेले रुग्ण- (४९२८), मृत्यू- (९७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४०८६)
जळगाव: बाधीत रुग्ण- (१४,४३८), बरे झालेले रुग्ण- (९७६७), मृत्यू- (६११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४०६०)
नंदूरबार: बाधीत रुग्ण- (९२३), बरे झालेले रुग्ण- (५१५), मृत्यू- (४३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३६५)
धुळे: बाधीत रुग्ण- (४०६३), बरे झालेले रुग्ण- (२५४१), मृत्यू- (१२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (१३९३)
औरंगाबाद: बाधीत रुग्ण- (१६,२९८), बरे झालेले रुग्ण- (१०,६६०), मृत्यू- (५४५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५०९३)
जालना: बाधीत रुग्ण-(२४६०), बरे झालेले रुग्ण- (१६१८), मृत्यू- (८६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७५६)
बीड: बाधीत रुग्ण- (१६७१), बरे झालेले रुग्ण- (५५५), मृत्यू- (३१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टीव्ह रुग्ण- (१०८५)
लातूर: बाधीत रुग्ण- (३६३८), बरे झालेले रुग्ण- (१५३५), मृत्यू- (१४६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१९५७)
परभणी: बाधीत रुग्ण- (१०२८), बरे झालेले रुग्ण- (४६०), मृत्यू- (३९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५२९)
हिंगोली: बाधीत रुग्ण- (७८६), बरे झालेले रुग्ण- (५४६), मृत्यू- (१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२२३)
नांदेड: बाधीत रुग्ण- (३०८१), बरे झालेले रुग्ण (१०८३), मृत्यू- (१०७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१८९१)
उस्मानाबाद: बाधीत रुग्ण- (२२४९), बरे झालेले रुग्ण- (८५८), मृत्यू- (६२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१३२९)
अमरावती: बाधीत रुग्ण- (२८०९), बरे झालेले रुग्ण- (१९३०), मृत्यू- (८२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७९७)
अकोला: बाधीत रुग्ण- (२९८१), बरे झालेले रुग्ण- (२४४७), मृत्यू- (१२९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (४०४)
वाशिम: बाधीत रुग्ण- (९३०), बरे झालेले रुग्ण- (५६१), मृत्यू- (१८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३५१)
बुलढाणा: बाधीत रुग्ण- (१९००), बरे झालेले रुग्ण- (१०९०), मृत्यू- (५२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७५८)
यवतमाळ: बाधीत रुग्ण- (१४६६), बरे झालेले रुग्ण- (९६०), मृत्यू- (४४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४६२)
नागपूर: बाधीत रुग्ण- (८५८५), बरे झालेले रुग्ण- (२७५६), मृत्यू- (२३०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (५५९८)
वर्धा: बाधीत रुग्ण- (२८०), बरे झालेले रुग्ण- (१७७), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (९३)
भंडारा: बाधीत रुग्ण- (३७२), बरे झालेले रुग्ण- (२४३), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२७)
गोंदिया: बाधीत रुग्ण- (५४४), बरे झालेले रुग्ण- (३१४), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२२६)
चंद्रपूर: बाधीत रुग्ण- (७३५), बरे झालेले रुग्ण- (३८२), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३५२)
गडचिरोली: बाधीत रुग्ण- (४२०), बरे झालेले रुग्ण- (३०८), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (११०)
टीप: आज नोंद झालेल्या एकूण ३९० मृत्यूंपैकी २६० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ७६ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ५४ मृत्यू हे एक आठवडयापेक्षाही अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ५४ मृत्यू ठाणे जिल्हा – २५, पुणे जिल्हा १५, जळगाव ४, पालघर ३, बुलढाणा – २, अहमदनगर -१, लातूर -१, मुंबई -१,नागपुर १ आणि नाशिक -१ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारी नुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.
08 August 2020
डी फार्मसी पदविका प्रवेश प्रक्रियेला सोमवार दि. 10 ऑगस्ट 2020 पासून सुरुवात
प्रतिनिधी / लोहारा
महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण संचालनालयाच्या वतीने डी फार्मसी पॉलिटेक्निक, हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी, सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी या विषयांचे पदविका अभ्यासक्रम दिनांक 10 ऑगस्ट 2020 पासून ऑनलाईन व ऑफलाईन महाविद्यालयात सुरू करण्यात येत आहेत. ऑनलाइन (Online) प्रवेश प्रक्रिया DTE महाराष्ट्र यांच्या www. dte maharashtra. org. in या संकेतस्थळावरून ई रजिस्ट्रेशन विद्यार्थ्यांना करता येईल तसेच फिजिकल प्रजेंस राहुन (Offline) महाविद्यालयात सुद्धा प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची सुविधा करण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात सुविधा केंद्रावर (FC) येताना covid-19 च्या प्रादुर्भावामुळे सोशल डिस्टंसिंग शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. त्यामध्ये विद्यार्थी व सोबतच्या पालकांनी मास्क वापरणे, सॅनिटायजर वापर करणे, सोशल डिस्टंसिंग चे पालन करणे आवश्यक आहे अशी माहिती उमरगा येथील तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य कवलजीत सतिश बिराजदार यांनी दिली.
Subscribe to:
Posts (Atom)

















































