29 March 2020
झी मराठी वाहिनीवरील स्वराज्यरक्षक संभाजी मालिका परत एकदा सुरू होणार - संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यू पवार यांनी केली होती मागणी -
झी मराठी वाहिनीवरील स्वराज्यरक्षक संभाजी मालिका परत एकदा सुरू होणार - संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यू पवार यांनी केली होती मागणी -
पुणे प्रतिनिधी -
झी मराठी वाहिनीवरील स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. या मालिकेमुळे छत्रपती संभाजी महाराज यांचा खरा इतिहास प्रेक्षकांसमोर आला होता. परंतु या मालिकेने काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉक डाऊन चा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या काळात नागरिकांनी घरी बसून राहावे व त्यांना परत एकदा छत्रपती संभाजी महाराज यांचा जीवनपट पाहता यावा यासाठी ही मालिका पुन्हा एकदा प्रदर्शित करावी अशी इच्छा महाराष्ट्रातील अनेक बहुजन लोकांची होती. त्यामुळे संभाजी ब्रिगेड ने पुढाकार घेत झी मराठी, डॉ. अमोल कोल्हे यांना स्वराज्यरक्षक संभाजी मालिका पुन्हा प्रदर्शित करावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यू पवार यांनी केली होती. या मागणीप्रमाणे अखेर सोमवार (दि. ३०) पासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मागच्या वेळी कामाच्या वेळा मुळे अनेकांना ही मालिका पाहत आली नव्हती. या लोकांना ही मालिका पाहता येईल.
कोरोना विषाणूचा जगात व देशात भयंकर तांडव चालू आहे. यावर उपाय म्हणजे स्वतःची काळजी घेणे, संसर्ग होऊ नये यासाठी अनावश्यक वर्दळीच्या ठिकाणी न जाणे. देशात कलम १४४ लागू झाल्यानंतर तर कुणालाही घराच्या बाहेर पडता येत नाही. सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीला तोंड देण्यासाठी या मालिकेचा समाजालाही एक खूप मोठा फायदा होणार आहे. आणि विशेष म्हणजे लाखो कुटुंब सध्या ही मालिका एकत्र पाहू शकतील.
कोणत्याही आव्हानाला कशा पद्धतीने सामोरे जायचं याचा संदेश छत्रपती संभाजी महाराजांच्या आत्म त्यागातून समाजाला मिळणार आहे. त्यावरील बाबींचा विचार केल्यास आम्हाला असे वाटते कि देश आणि समाजासाठी परीक्षेचा काळ आहे. त्यामुळे या काळात समाजाला प्रेरणादायी मालिका दाखविणे गरजेचे आहे. मागणीनुसार ही मालिका पुनः प्रदर्शित करण्यात येत असल्याने संभाजी ब्रिगेडच्या वतीने झी मराठी आणि डॉ. अमोल कोल्हे यांचे आभार मानण्यात आले. येत्या ३० मार्चपासून ही मालिका पुन्हा सुरू होत आहे. ३० मार्च रोजी मालिकेचा पहिल्या दिवसाचा दोन तासांचा भाग प्रदर्शित होईल. दुपारी ४ वाजता ही मालिका प्रसारित होईल. त्यानंतर दररोज ४ ते ८ या वेळेत ही मालिका झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
कोरोनावर मात करण्यासाठी स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेतून समाजाला प्रेरणा मिळणार आहे. त्यामुळे सर्वांनी ही मालिका पाहावी असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यू पवार यांनी केले आहे.
26 March 2020
लोहारा - तालुक्यातील हराळी गावात कोरोना रोखण्यासाठी युवक, ग्रामपंचायत, प्रशासन व आरोग्य विभाग यांचा एकत्रीत लढा
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या शासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याबरोबर च ग्रामस्तरावर ही उपाययोजना करण्यात येत आहेत. तालुक्यातील हराळी गावात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तरुणांची टीम, ग्रामपंचायत कार्यालय व प्रशासना मधिल लोहारा तालुक्याचे तहसीलदार विजय आवधाने यांच्या मार्गदर्शनाखाली समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. संतोष मनाळे, आरोग्य सेवक अजय रनखांब, सरप्ंच बलभीम सूर्यवंशी, ग्रामसेवक एस.एम.मुंढे, पोलीस पाटील नितीन सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते सचिन सूर्यवंशी, दगडू हासुरे, कालिदास सूर्यवंशी, नेताजी काशिनाथ सूर्यवंशी, किसन सूर्यवंशी, संतोष मोरे, सुनिल रनखांब, अतुल बिराजदार, आशा कार्यकर्ता संध्या कारभारी, ग्रामपंचायतचे सेवक रवी ढोबळे यांच्या माध्यमातून पुणे, मुबंई व इतर बाहेर गावातून आलेल्या नागरिकांची भेट घेवून त्यांची नाव नोंदणी व प्राथमिक तपासणी केली जात आहे.
तालुक्यातील हराळी गावात आरोग्यवर्धिनी केंद्र तोर्ंबा, प्रा.आ.केंद्र माकणी, लोहारा ब्लॉक यांच्या वतीने बाहेरुन येणाऱ्या सर्व व्यक्तींची आरोग्य तपासणी केली जात आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीपासुन गावात कोरोना विषाणू जनजागृती माहिती पत्रक, घरोघरी जाऊन स्वच्छता ठेवणे, आरोग्य सल्ला इ. विषयी जनजागृती करण्यात आली. तसेच पुणे, मुंबई व बाहेरुन आलेल्या गावातील ग्रामस्थांच्या दररोज भेटी घेवून त्यांच्या आरोग्याविषयी चौकशी, सल्ला व घ्यावयाच्या काळजी विषयी माहिती देण्यात येत आहे. दि. २४ मार्च आखेरपर्यंत ११२ बाहेरून आलेल्या ग्रामस्थांची नोंद व तपासणी करण्यात आली आहे. या मधिल सर्व व्यक्तीचा रिपोर्ट नॉर्मल आले आहेत.
24 March 2020
आमदार ज्ञानराज चौगुले यांच्याकडून सास्तुर येथील स्पर्श ग्रामीण रुग्णालयातील आयसोलेटेड वार्डला भेट देऊन पाहणी
प्रतिनिधी / लोहारा
आमदार ज्ञानराज चौगुले यांनी सोमवारी ( दि. २३) तालुक्यातील सास्तुर येथील स्पर्श ग्रामीण रुग्णालयातील आयसोलेटेड वार्डला भेट देऊन पाहणी केली. यावेळी लोहारा तालुका प्रशासनाद्वारे कोरोना या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या विविध उपाय योजनांचा आढावा घेतला. यावेळी झालेल्या बैठकीत ग्रामीण भागातील प्रत्येक गावात पुणे, मुंबई सारख्या मोठया शहरातुन, परराज्यातून तसेच परदेशातून येणाऱ्या सर्व नागरिकांना पुढील किमान 14 दिवस त्यांच्या घरात स्वतंत्र राहून स्वतःची काळजी घेणेबाबत व जास्त सर्दी, खोकला व अती ताप यासारख्या आजाराची लक्षणे दिसून आल्यास त्यांनी तात्काळ जवळच्या शासकीय रुग्णालयात जाऊन स्वतःची तपासणी करून घेण्याची सूचना ग्रामीण भागात तात्काळ आदेशित करणेबाबत सर्व यंत्रणांनी दक्षता घेण्याची सूचना आमदार चौगुले यांनी केल्या. या बैठकीस उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, लोहारा तहसीलदार विजय अवधाने, स्पर्श ग्रामीण रुग्णालयाचे समन्वयक रमाकांत जोशी, लोहारा ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक राजेंद्र सूर्यवंशी, तालुका वैद्यकीय अधिकारी कटारे, सास्तुर चे सरपंच यशवंत कासार उपस्थित होते.
23 March 2020
जनता कर्फ्यु दरम्यान बाहेरगावातील रूग्णांसाठी घरगुती जेवण देत केला मुलाचा वाढदिवस, सर्व स्तरातुन कौतुक
प्रतिनिधी / लोहारा -
उमरगा शहरात रविवारी जनता कर्फ्यु काटेकोरपणे पाळला गेला. पण यामुळे शहरातील दवाखान्यात ऍडमिट असलेल्या ग्रामीण भागातील अनेक रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना भोजन मिळू शकले नव्हते. त्यामुळे शहरातील सामाजिक कार्यकर्ते खाजाभाई मुजावर यांनी माणुसकीचे दर्शन घडवीत शहरातील विविध रुग्णालयातील गरजू रुग्णांना भोजन वाटप करून आपला मुलगा शाहिद याचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला. याबद्दल मुजावर यांचे कौतुक केले जात आहे.
सध्या कोरोना विषाणूने भारतात ही धुमाकूळ घातला आहे. या संसर्गजन्य विषाणू ला संपविण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने रविवारी एक दिवसाचा जनता कर्फ्यु जाहीर करण्यात आला. उस्मानाबाद जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार दि. २१ व २२ हे दोन दिवस अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. परंतु जनता कर्फ्यु दिवशी हॉस्पिटल व मेडिकल वगळता सर्वच बाजारपेठ हॉटेल व वाहतूक सेवाही बंद होती व लोक घरामध्येच होते. शहरातील विविध रुग्णालयात ऍडमिट असलेले बाहेरगावचे रुग्ण यांची यामुळे मोठी गैरसोय होत होती. वाहतूक बंद असल्याने गावाकडून जेवणाचा डबाही येऊ शकत नाही. तर रुग्णालय परिसरातील व शहरातील सर्व हॉटेल बंद असल्यामुळे या रुग्णांना व रुग्णासोबत असलेल्या नातेवाईकांना उपाशीपोटी बसावे लागत होते. याची जाणीव ठेवून उमरगा शहरातील सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष ख्वाजा मुजावर यांनी त्यांचा मुलगा शाहिद याचा रविवारी वाढदिवस असल्याने तसेच या रुग्णाची उपाशीपोटी होणारी परवड लक्षात घेऊन शहरातील विविध रुग्णालयात असणाऱ्या गरजू रुग्णांना घरगुती भोजनाची व्यवस्था करून मुलगा शाहिद याच्या हस्ते वाटप करून त्याचा वाढदिवस साजरा केला. सामाजिक जाणिव ठेवून माणुसकीचे दर्शन घडवीत जाती धर्माच्या पलीकडचा विचार करण्यास प्रवृत्त करणाऱ्या अशा एका वेगळ्या सामाजिक उपक्रमांने वाढदिवस साजरा केल्यामुळे मुजावर यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
21 March 2020
लोहारा येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मास्क चे वाटप
प्रतिनिधी / लोहारा
लोहारा पोलिस ठाण्याचे कर्मचारी व नगरपंचायतच्या सफाई कामगारांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शनिवारी (दि.२१) मास्कचे वाटप करण्यात आले.
सध्या कोरोना विषाणूचा संसर्ग वाढला आहे. रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशा परिस्थितीत नगरपंचायतचे सफाई कामगार मात्र जनतेच्या आरोग्याची काळजी घेत सकाळपासून शहर स्वच्छ करीत असतात. परंतु त्यांच्या आरोग्याची पुरेशी काळजी घेतली जात नाही. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सुमारे चाळीस सफाई कामगारांना मास्कचे वाटप करण्यात आले. त्यानंतर येथील पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्यांनाही मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी शहरातील पत्रकारांना ही मास्क देण्यात आले. यावेळी सहायक पोलिस निरीक्षक अशोक चौरे, राष्ट्रवादीचे सुनील साळुंके, विजय लोमटे, नाना पाटील, राजेंद्र कदम, महेबूब फकीर, पृथ्वीराज जगताप, प्रकाश भगत, दादासाहेब पाटील, संजय गायकवाड, अमोल माटे, प्रकाश कांबळे, निशिकांत कांबळे, आकाश आष्टे, विशाल गोरे, गोपाळ माने आदी उपस्थित होते.
11 March 2020
उस्मानाबाद जिल्ह्यातील कलाकार सोमनाथ तडवळकर यांनी भूमिका साकारलेला इभ्रत हा मराठी चित्रपट शुक्रवारपासून चित्रपटगृहात
![]() |
| सोमनाथ तडवळकर |
प्रतिनिधी / उस्मानाबाद
आपल्या मराठी मातीतील मल्हार-मायडी ची प्रेमकथा लवकरच 'इभ्रत' या चित्रपटातून रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात उस्मानाबाद जिल्ह्यातील कलाकार सोमनाथ तडवळकर यांनी भूमिका साकारली आहे. शुक्रवारी ( दि. १३) हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.
'आवडी' या अण्णाभाऊ साठेंच्या कादंबरीवर आधारलेल्या सत्य घटनेवर आधारित इभ्रत चित्रपटाची कथा-पटकथा आहे. शिवाय 'इभ्रत' या चित्रपटाला साधना सरगम, बेला शेंडे, रुपकुमार राठोड, आनंद शिंदे, नंदेश उमप, जसराज जोशी, आकांक्षा भोईर यांनी आपल्या सुमधुर आवाजात शब्दबद्ध केले आहे. तर संगीत दिग्दर्शक अशोक कांबळे आणि बबन अडागळे यांनी चित्रपटातील गाण्यांना संगीत दिले आहे. या चित्रपटातील प्रेमकथेची पटकथा, संवाद आणि गाण्याचे बोल संजय नवगिरे लिखित आहेत.
या चित्रपटात उस्मानाबाद जिल्ह्यातील कलाकार सोमनाथ तडवळकर यांची भूमिका आहे. तडवळकर यांनी याआधी चित्रपट, मालिकामध्ये भूमिका साकारली आहे. आपल्या मातीतील सोमनाथ तडवळकर यांच्या अभिनयाने नटलेला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. त्यामुळे हा चित्रपट पाहण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
Subscribe to:
Posts (Atom)




















