28 February 2019

लोहारा येथील प्रभाग एक मधील सिमेंट रस्त्याचे उद्घाटन



लोहारा प्रतिनिधी -

लोहारा शहरातील प्रभाग एक मधील राम मंदीराकडे जाणाऱ्या रस्त्याचा प्रश्न मागील अनेक वर्षापासुन प्रलंबित होता. तो प्रश्न अखेर मार्गी लागला असून नगरसेविका आरती सतीश गिरी यांच्या प्रयत्नातुन नगरपंचायत सहाय्य अनुदानातुन सात लाख रुपये खर्चुन सिमेंट रस्ता करण्यात येणार आहे. या कामाचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा जोती मुळे, उपनगराध्यक्ष प्रताप घोडके, नगरसेविक आरती गिरी, जयश्री कांबळे, नगरसेवक श्रीनिवास माळी, आरीफ खानापुरे, गगन माळवदकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दयानंद गिरी, दिपक मुळे, माजी सरपंच नवाज सय्यद, अमोल बिराजदार, आयूब शेख, शब्बीर गवंडी, हरी लोखंडे, शिवा स्वामी, विजय फावडे, राजकुमार फूंडीपल्ले, रंगा महाजन यांच्यासह प्रभागातील नागरिक उपस्थित होते.

27 February 2019

लोहाऱ्याच्या शिक्षिका सुनंदा निर्मळे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान



लोहारा प्रतिनिधी -

लोहारा येथील जि.प.कें.प्रा. शाळेतील शिक्षिका श्रीमती सुनंदा निर्मळे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. औरंगाबाद येथे सरस्वती शिक्षण संस्थेच्या प्रांगणात झालेल्या आदर्श शिक्षक समितीच्या आधिवेशनात विधानसभेचे अध्यक्ष ना. हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष भागवत कराड, माजी आमदार गोविंद केंद्रे, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, शिरीषजी बोराळकर,आदर्श शिक्षक समितीचे संस्थापक अध्यक्ष दिलीपराव ढाकणे, महासचिव महादव लातुरे, प्रदेशाध्यक्ष अंकुश काळे, महिला प्रदेशाध्यक्ष मुक्ता पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती. राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल सुनंदा निर्मळे यांचे लोहारा तालुक्यातील शिक्षकांनी अभिनंदन केले.

22 February 2019

घरची परिस्थिती हलाखीची असताना जिद्द व चिकाटीच्या जोरावर झाल्या उपजिल्हाधिकारी



लोहारा प्रतिनिधी -

घरची परिस्थिती हलाखीची असतानाही जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर लोहारा तालुक्यातील उदतपुर येथील पूजा तानाजी गायकवाड यांनी स्पर्धा परीक्षेत यश संपादन केले असून त्यांची उपजिल्हाधिकारी पदावर निवड झाली आहे.
         लोहारा तालुक्यातील छोट्याशा उदतपुर या गावातील तानाजी गायकवाड हे वीस वर्षांपूर्वी नोकरी निमित्त पुणे येथे स्थायिक झाले. त्यांना एकूण तीन मुली. आपल्याला तिन्हीही मुलीच असल्या तरी त्या मुलींना शिक्षणात काहीच कमी पडू द्यायचे नाही असा गायकवाड यांनी निश्चय केला. तानाजी गायकवाड यांच्या मोठ्या मुलीची स्पर्धा परीक्षा देऊन महसुल विभागात लिपीक पदावर निवड झाली. यामुळे अभ्यास केल्यानंतर नक्कीच यश मिळते असा विश्वास पुजा गायकवाड यांना मिळाला. त्यामुळे त्यांनी ध्येय निश्चित करून जिद्द व चिकाटीच्या जोरावर अभ्यास सुरु केला. त्यानंतर त्यांनी २०१७ मध्ये झालेल्या राज्य सेवेच्या स्पर्धा परीक्षेत यश संपादन करुन नायब तहसिलदार पदी निवड झाली. त्यातच सन २०१८ मध्ये झालेल्या परीक्षेत उपजिल्हाधिकारी या पदावर त्यांची निवड झाली आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. परिस्थिती हलाखीची असली तरी जिद्द व चिकाटीच्या जोरावर यश नक्कीच मिळते याचे हे एक आदर्श उदाहरण आहे.

21 February 2019

लोहारा तालुक्यातील तोरंबा येथे शेळीपालन प्रशिक्षणास सुरुवात




लोहारा प्रतिनिधी -

ग्राम सामाजिक परिवर्तन संस्था (VSTF) अंतर्गत समाविष्ट लोहारा तालुक्यातील तोरंबा येथे ग्रामीण रोजगार व स्वयं रोजगार संस्था उस्मानाबाद च्या वतीने उमेद स्वयं सह्ययता महिलांचे शेळीपालनाचे 10 दिवसीय प्रशिक्षणाचा शुभारंभ करण्यात आला. गट विकास अधिकारी क्रांती बोराटे यांच्या मार्गदशनखाली आयोजित या कार्यक्रमास पंचयात समितीच्या उपसभापती हेमलता रणखांब, सरपंच वर्षाताई चव्हाण, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक निलेश विजयकर, RSETI चे संचालक मिलिंद चव्हाण, उमेद तालुका अभियान व्यवस्थापक भगवान अंकुश हे उपस्थित होते. यावेळी RSETI संचालक मिलिंद सावंत यांनी शेळीपालन व्यवसायाचा उद्देश व महत्त्व याबाबत प्रास्ताविकातून माहिती दिली. उमेद तालुका अभियान व्यवस्थापक भगवान अंकुश यांनी अशा प्रशिक्षणातून उमेद महिलांनी गावस्तरावर कायमस्वरूपी उपजीविका निर्माण करून उत्पन्नात वाढ करावी व शाश्वत उपजीविकेसाठी गावातील नैसर्गिक साधन संपत्तीचा उपयोग करून सामूहिक महिला व्यवसायाची निर्मिती करावी असे महिलांना आवाहन केले. यावेळी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक यांनी आर्थिक साक्षरता, बँकिंग व्यवहार हे महिलांना माहित असणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन केले व आधुनिक युगात कौशल्य पूर्ण व्यवसायाचा अंगीकार करावा असे मत व्यक्त केले. यावेळी ग्राम संघ सचिव शीतल रनखांब यांनी सर्व महिलांच्या वतीने मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास माकणी बँक व्यवस्थापक, CAM, CLM, कृषी सखी, पशु सखी व प्रशिक्षणार्थी महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुरवसे यांनी तर आभार किशोर हुडेकर यांनी मानले.

19 February 2019

लोहारा येथील न्यू व्हिजन इंग्लिश स्कुल चा वार्षिक स्नेह संमेलन व बक्षीस वितरण कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न





लोहारा प्रतिनिधी -

शिक्षकांनी सुशिक्षित पिढी घडविण्यापेक्षा सुसंस्कृत पिढी घडवुन आपला समाज व देश सक्षम करण्यासाठी प्रयत्न करावेत असे प्रतिपादन आ. ज्ञानराज चौगुले यांनी केले. लोहारा शहरातील न्यु व्हिजन इंग्लिश स्कुलच्या वार्षिक स्नेह समेलन व बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
           या कार्यक्रमासाठी नगराध्यक्षा ज्योती मुळे, माजी नगराध्यक्षा पौर्णिमा लांडगे, शिवसेना तालुका प्रमुख मोहन पणुरे, उपनगराध्यक्ष प्रताप घोडके, प्राचार्य शहाजी जाधव, नगरसेवक शाम नारायणकर, श्रीनिवास माळी, गगन माळवदकर, नगरसेविका आरती गिरी सुनिता ढगे, माजी उपनगराध्यक्षा सौ. नाजमिन शेख, नगरसेविका निर्मला स्वामी, माजी जि.प. सदस्या मिरा फुलसुंदर, सोलापुर येथील लावण्यखणी कलाकार सोनी सोलापुरकर, ज्योती मिरजकर, संस्थाध्यक्ष डॉ. सुहास भोसले, संचालिका माधुरी चोबे,  दिपक मुळे, श्रीकांत भरारे, शिवराज झिंगाडे, सुरेखा भोसले, दत्तात्रय गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीस पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विर जवानाना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यावेळी आ. ज्ञानराज चौगुले यांनी या स्कुलसाठी दोन संगणक भेट देत असल्याचे जाहिर केले. या नंतर सांस्कृतिक कार्यक्रमात चिमुकल्यांनी विविध गितांवर बहारदार नृत्य सादर करुन भारतीय विर जवानाना मानवंदना दिली. स्वच्छता अभियान, व्यसनमुक्ती, शेतकरी आत्महत्या, अशा सामाजिक विषयावर एकांकीका नाटिका सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. तसेच मराठी, हिंदी आदी विविध प्रकारच्या गीतांवर नृत्य सादर केली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सविता जाधव यांनी तर आभार प्रकाश तोडकरी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिध्देश्वर सुरवसे, हारुण हेड्डे, विशाल मुनाळे, रवि चव्हाण, वर्षा शेवाळे, वैशाली जाधव, अनुराधा बंडगर, वर्षा घोडके, ललीता रोडगे, प्रणिता जाधव, सोनाली राठोड,
चांदबी चाऊस, सुवर्णा पाटील आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास शहर व परिसरातील नागरीक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

लोहारा तालुक्यातील अचलेर येथे फिनिक्स फाउंडेशन तर्फे छत्रपती शिवराय यांना अभिवादन





लोहारा प्रतिनिधी -

लोहारा तालुक्यातील अचलेर येथे फिनिक्स फाउंडेशन अचलेर च्या वतीने मंगळवारी ( दि. 19) छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमीत्त विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम घेण्यात आले.
                 यावेळी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन अमित लोखंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सुमीत बनसोडे, जगदीश सुरवसे, सुशांत माळगे, अबुबकर पटेल आदी उपस्थित होते.
                   या जयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये आएशा पटेल, पंडीत सुरवसे, भाग्यश्री कुनाळे, वैष्णवी उपासे यांनी छत्रपती शिवराय यांच्या जीवनावर सखोल असे विचार मांडले. तसेच शिवराय व अफजलखान यांची लढाई या विषयावर विद्यार्थ्यांनी पोवाडा सादर केला. या विविध उपक्रमात विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यांनंतर छत्रपती एक पराक्रमी योध्दा या विषयावर जगदीश सुरवसे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कु. भाग्यश्री कुनाळे यांनी तर आभार वैष्णवी उपासे यांनी मानले. या कार्यक्रमास फिनिक्स फाउंडेशन चे सर्व सहकारी यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

09 February 2019

लोहारा तालुक्यातील सास्तुर येथील सागर इंग्लिश स्कुल चे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न - चिमुकल्यांच्या कलाविष्काराने उपस्थित मंत्रमुग्ध





लोहारा प्रतिनिधी -

लोहारा तालुक्यातील सास्तूर येथील सागर इंग्लिश स्कुलच्या वार्षिक स्नेहसंमेलन शुक्रवारी ( दि. 8) विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध कलाप्रकारांमुळे उपस्थित मंत्रमुग्ध झाले. यावेळी संस्थेच्या वतीने देण्यात येणाऱ्या सेवा गौरव पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
               तालुक्यातील सास्तुर येथील सागर इंग्लिश स्कुल चा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवय्या स्वामी हे होते. यावेळी सास्तुरचे सरपंच यशवंत कासार, पोलिस निरीक्षक सर्जेराव भंडारे, विजयकुमार क्षीरसागर, डॉ. मस्के, बालाजी नादरगे, मुरलीधर पवार, राहुल औसेकर, मनोज स्वामी, पंडित ढोणे, शब्बीर सय्यद, राम काळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
                यावेळी स्कुलच्या चिमुकल्यांनी मराठी, हिंदी, इंग्रजी गीतांसह विविध कलाप्रकार सादर उपस्थितांची मने जिंकली. तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या स्पर्श ग्रामीण रुग्णालयाचे प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी, सरपंच यशवंत कासार, निवासी अपंग शाळेचे मुख्याध्यापक बालाजी नादरगे यांना सेवा गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी सास्तुर व परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
               या कार्यक्रमासाठी प्रशालेचे मूख्याध्यापक शिवानंद स्वामी, सोमनाथ कुंभार, निलेश यादव, सागर स्वामी, अर्जुन नटवे, सतीश मेत्रे, महेश स्वामी, बबलू राठोड, संजय मुगळे, खंडू कोळी, राजेंद्र पवार, वैजीनाथ कुंभार, रूपा स्वामी, साधना यादव, अनुराधा क्षीरसागर, संध्या तुंगे, रोशनी मुल्ला, गुरुदेवी माळी, योगिता नटवे, ललिता कोळी यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

लोहारा येथील श्रीगिरे हॉस्पिटलच्या वतीने मोफत रक्त तपासणी शिबीर




लोहारा प्रतिनिधी -

लोहारा शहरातील श्रीगिरे हॉस्पिटल यांच्या वतीने शुक्रवारी ( दि. 8) मोफत रक्त तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. लोहारा तालुका विकास समितीचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते जालिंदर कोकणे यांच्या हस्ते या शिबाराचे उद्घाटन करण्यात आले. या शिबिरामध्ये शहर व परिसरातील 141 रुग्णांची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली.
                सध्याच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाला ताण तणाव असतो. यामुळे अनेकदा उच्च रक्तदाब, मधुमेह आदी विकार जडतात. मात्र आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. याची परिणीती ही गंभीर आजारात होते. अनेकदा पैशाअभावी रुग्णांना उपचार घेणे कठीण होते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. मात्र अनेकदा योग्यवेळी तपासणी झाली तर रुग्णांना मोठा दिलासा मिळू शकतो. याच भावनेतून हे मोफत रक्त तपासणी शिबीर घेण्यात आल्याचे डॉ. हेमंत श्रीगिरे यांनी यावेळी बोलताना सांगितले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते जालिंदर कोकणे, डॉ. रुपाली श्रीगिरे, उत्तम पाटील, गणेश हिप्परगेकर, मानवी हक्क सरंक्षण जनजागृती तालुकाध्यक्ष नवेद खानापुरे, सुदर्शन पाटील, हणमंत वाघे, कल्पना मिसाळ, खंडू सरवदे, मारुती गिरी आदींसह नागरिक उपस्थित होते.

05 February 2019

लोहारा तालुक्यातील सास्तुर येथील निवासी अपंग शाळा सास्तूर व श्री शांतेश्वर अपंग व्यावसायिक प्रशिक्षण केंद्राच्या संघाने राज्यस्तरीय स्पर्धेत नेत्रदीपक यश - उस्मानाबाद जिल्हा संघास मिळाले अस्थिव्यंग प्रवर्गातील विजेतेपद




लोहारा प्रतिनिधी -

महाराष्ट्र शासनाचा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, अपंग कल्याण आयुक्तालय पुणे व सत्यशोधक बहुउद्देशीय शिक्षण संस्था, मासोद, चांदूर बाजार,अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १,२ व ३ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत विभागीय क्रीडा संकुल, अमरावती येथे दिव्यांग मुला-मुलींच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत निवासी अपंग शाळा सास्तूर व श्री शांतेश्वर अपंग व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र सास्तूर चा संघ सहभागी झाला होता. राज्यस्तरीय स्पर्धेत भरीव कामगिरी करताना संघाने विविध क्रीडा प्रकारात ९ सुवर्ण, ९ रजत व ४ कांस्य अशी एकूण २२ पदके जिंकली असून, उस्मानाबाद जिल्ह्यास अस्थिव्यंग प्रवर्गातील विजेतेपद ५ व्यांदा मिळवून दिले. यामुळे दिव्यांगांच्या क्षेञात उस्मानाबाद जिल्ह्याचा महाराष्ट्रामध्ये क्रीडालौकिक निर्माण झाला आहे.
          मागील वर्षी उस्मानाबाद जिल्ह्यास उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. या स्पर्धेत उस्मानाबाद जिल्ह्याने भंडारा व नागपूर जिल्ह्यांना मागे टाकत विजेतेपदाला गवसणी घातली. भंडारा जिल्हा उपविजेता ठरला असून नागपूर जिल्हा तृतीय स्थानी राहीला आहे. सदर स्पर्धेत महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यातून ३००० खेळाडू सहभागी झाले होते. विजेत्या खेळाडूंना व संघांना आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू, अपंग कल्याण आयुक्त बालाजी मंजूळे,अमरावती क्रीडा व युवक सेवा विभागाच्या उपसंचालिका प्रतिभा देशमुख, सत्यशोधक बहुउद्देशीय शिक्षण संस्था चांदूर बाजार, अमरावतीच्या अध्यक्षा नयनाताई कडू, सचिव राहूल माला, प्रादेशिक उपायुक्त साळवी,  सामाजिक न्याय मंञ्यांचे स्वीय सहाय्यक गजानन वाघ , अमरावती चे जिल्हा समाज कल्याण अधिकारी यावलीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.
                  उस्मानाबाद जिल्हा समाज कल्याण अधिकारी नागनाथ चौगुले, सामाजिक कार्यकर्त्या साधना कांबळे, सहाय्यक सल्लागार सुभाष शिंदे, संघ व्यवस्थापक बी.टी.नादरगे, निशांत सावंत, मन्मथअप्पा निजवंते, प्रयाग पवळे, ज्ञानोबा माने, मदनेश्वर रोडगे, सुनिता कज्जेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली विजयी संघानी ही कामगिरी केली. विजयी संघातील खेळाडूंचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी नागनाथ चौगुले, संस्थेच्या सचिव निर्मलाताई बदामे, प्राचार्य बी.एम.बालवाड, साधना कांबळे, सहाय्यक सल्लागार सुभाष शिंदे आदींनी अभिनंदन केले आहे.

सास्तूर संघातील सर्व यशस्वीे खेळाडू व त्यांचे क्रीडा प्रकार पुढीलप्रमाणे

अस्थिव्यंग "अ" ८ ते १२ वयोगट,
१०० मीटर धावणे- साक्षी नाईक-सुवर्णपदक, रोहित वाघमारे -१०० मीटर धावणे- सुवर्णपदक,

१७ ते २१ वयोगट १०० मीटर धावणे व २०० मीटर धावणे- अश्विनी राठोड-सुवर्णपदक,

अस्थिव्यंग "क" वयोगट ८ ते १२- गौरव करदोरे-२५ मीटर धावणे /भरभर चालणे-सुवर्णपदक, ॠतुजा साळुंके -२५ मीटर धावणे/भरभर चालणे-सुवर्णपदक,

१३ ते १६ वयोगट-५० मीटर धावणे/भरभर चालणे- सागर मोहिते-सुवर्णपदक, कु. गायञी सुर्यवंशी-५० मीटर धावणे/भरभर चालणे-सुवर्णपदक,

१७ ते  २१ वयोगट, ५० मीटर धावणे/भरभर चालणे-सविता पुजारी-सुवर्णपदक

अस्थिव्यंग "अ" १३ ते १६ वयोगट-५० मीटर धावणे-
साक्षी नाईक-रजतपदक,

१३ ते १६ वयोगट-१०० मीटर धावणे-अभिषेक समुखराव-रजतपदक, १०० मीटर धावणे - दिव्या जोगदनकर-रजतपदक,

अस्थिव्यंग "ब" १३ ते १६ वयोगट-५० मीटर धावणे-निखील शितोळे-रजतपदक,

१७ ते २१ वयोगट-५० मीटर धावणे- स्नेहा कोकाटे -रजतपदक,

अस्थिव्यंग "क" १३ ते १६ वयोगट-५० मीटर व्हीलचेअर रेस- दत्ता गिरी -रजतपदक, व्हीलचेअरवर बसून साॅफ्ट बाॅल थ्रो  - सोनाली बेळे- रजतपदक,

२२ ते २५ वयोगट-१०० मीटर व्हीलचेअर रेस- रुपेश सुर्यवंशी-रजतपदक, उज्वला घुटे-रजतपदक,

१७ ते २१ वयोगट-१०० मीटर व्हीलचेअर रेस व व्हीलचेअरवर बसून गोळा फेक- पार्वती महावरकर-कांस्यपदक, ५० मीटर धावणे- गंगासागर केंद्रे -कांस्य पदक,

अस्थिव्यंग "ब" १७ ते २१ वयोगट १०० मीटर धावणे-अश्विनी जमादार-कांस्य पदक

विशेष रस्ते दुरुस्ती कार्यक्रम व मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत लोहारा व उमरगा तालुक्यातील रस्ते सुधारणेसाठी एकूण २६ कोटी ५० लक्ष रु. निधी मंजूर - आ. ज्ञानराज चौगुले यांची माहिती



लोहारा प्रतिनिधी -

विशेष रस्ते दुरुस्ती कार्यक्रम व मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत लोहारा व उमरगा तालुक्यातील रस्ते सुधारणेसाठी एकूण २६ कोटी ५० लक्ष रु. निधी मंजूर झाला असल्याची माहिती आ. ज्ञानराज चौगुले यांनी दिली आहे. यासाठी आ. ज्ञानराज चौगुले यांनी पाठपुरावा केला होता.
                लोहारा व उमरगा तालुक्यातील विविध रस्त्यांच्या सुधारणेसाठी राज्य शासनाच्या ३० ५४ रस्ते व पूल विशेष देखभाल दुरुस्ती कार्यक्रम २०१८-१९ अंतर्गत व मुख्यमंत्री  ग्रामसडक योजना सन २०१९-२० (टप्पा -१) अंतर्गत अनुक्रमे ५ कोटी व २१ कोटी ५० लक्ष असा सुमारे २६ कोटी ५० लक्ष रु निधी मंजूर झाला आहे.
             ३० ५४ विशेष दुरुस्ती अंतर्गत लोहारा तालुक्यातील लोहारा ते माकणी रस्त्यावरील दत्तनगर पाटी ते माकणी पर्यंतच्या रस्त्यासाठी २ कोटी १५ लक्ष व आष्टा कासार ते तालुका सरहद्द दरम्यानच्या रस्त्यासाठी २ कोटी ८५ लक्ष असे एकूण सुमारे ५ कोटी रु. निधीच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना सन २०१९-२० (टप्पा - १ ) एशियन बँक विकास कार्यक्रम अंतर्गत उमरगा तालुक्यातील कदेर गाव ते सरदार नगर - १५० लक्ष रु., कंटेकूर ते कोथळी - २६४.९४ लक्ष, आलूर रोड ते राज्य सीमा - ३३२.१८ लक्ष, मुरूम ते हिंदू स्मशानभूमी - २५५.८१ तसेच लोहारा तालुक्यातील उदतपुर ते तावशीगड - १५० लक्ष, अचलेर ते आनंद आश्रम - १५१.३ लक्ष, आष्टा ते तालुका सरहद्द (जळकोट) - २५७.६४, वडगाव गांजा ते होर्टी - ३२१ लक्ष, वडगाव गांजा ते  विलासपूर पांढरी - १७७ लक्ष, मार्डी ते उंडरगाव नागराळ रोड - ११८ लक्ष रु. याप्रमाणे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत  २१ कोटी ५० लक्ष रुपयांच्या कामास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे अशी माहिती त्यांनी दिली.
              आमदार ज्ञानराज चौगुले हे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या जिल्हास्तरीय समितीचे सदस्य असल्याने त्यांनी समितीचे अध्यक्ष तथा पालकमंत्री अर्जुन खोतकर यांच्याकडे याबाबत वेळोवेळी पाठपुरावा केला होता. विशेष रस्ते दुरुस्ती योजने अंतर्गत ५ कोटी रु. निधी मंजूर केल्याबद्दल आमदार ज्ञानराज चौगुले यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांचे व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून २१ कोटी ५० लक्ष रु निधी मंजूर केल्याबद्दल समितीचे अध्यक्ष पालकमंत्री अर्जुन खोतकर, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, राज्यमंत्री दादा भुसे तसेच याकामी वेळोवेळी मार्गदर्शन केल्याबद्दल खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांचे आभार मानले आहेत.

04 February 2019

लोहारा तालुक्यातील बेलवाडी येथील जि.प.प्रा. शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न





लोहारा प्रतिनिधी -

लोहारा तालुक्यातील बेलवाडी येथील जि.प.प्रा. शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचे प्रदर्शन करुन उपस्थितांचे मने जिंकली.
         यावेळी नायब तहसिलदार रणजित शिराळकर, लोहारा तालुका विकास समितीचे अध्यक्ष जालिंदर कोकणे, महादेव जाधव, नगरसेवक बाळासाहेब कोरे, सरपंच छाया जाधव, उपसरपंच शोभा हजारे, नेताजी शिंदे, दादा पाटिल, शा.व्य. समितीचे अध्यक्ष लहु जाधव, उपाध्यक्षा निता भगत, सुरेश वाघमोडे, कमलाकर येणेगुरे, सुधाकर मुळे, दत्तात्रय फावडे, कैलास माणिकशेट्टी सर, शहाजी जाधव आदींसह गावातील नागरिक उपस्थित होते. यावेळी प्रास्तविक नानासाहेब कोळी यांनी केले. कार्यक्रमासाठी बबिता शिंदे, सुजाता जाधव, प्रणिता मोरे, मोरवे खिजर, बब्रुवान शिंदे आदीनी परिश्रम घेतले. सुत्रसंचलन परमेश्वर सूर्यवंशी यांनी तर मल्लिकार्जुन कलशेट्टी यांनी आभार मानले. यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध कलाप्रकार सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

02 February 2019

सास्तूर - गुबाळ रस्त्यावरील पुलाचे आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते व युवा नेते किरण गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत भूमिपूजन


लोहारा प्रतिनिधी -

लोहारा तालुक्यातील सास्तूर - गुबाळ रस्त्यावरील पुलाचे आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते व युवा नेते किरण गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी ( दि. २) भूमिपूजन करण्यात आले.
                यावेळी उमरगा शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव शहापूरे, माजी तालुकाप्रमख ज्ञानेश्वर सूर्यवंशी, सास्तुर चे सरपंच यशवंत कासार, बालेपिर शेख, उपअभियंता एस.डी. माले, शाखा अभियंता एम.के. हळासपुरे, दिलीप बेन्डगे, सुधाकर पाटील, तुकाराम जाधव, होळीचे सरपंच व्यंकट माळी, शिवसेना शाखाप्रमुख मुरली पवार, गुलाब पवार, भाऊ आंबेकर, सास्तूरचे माजी सरपंच विजय क्षीरसागर, मारुती जाधव आदी उपस्थित होते.
               उस्मानाबाद व लातूर जिल्ह्याला जोडणाऱ्या सास्तूर - गुबाळ रस्त्यावरील तेरणा नदीवरील पूल हा अत्यंत कमी उंचीचा असल्यामुळे नागरिकांना अनेक गैरसोयीचा सामना करावा लागत होता. तसेच पावसाळ्यामध्ये हा रस्ता पूर्णपणे बंद असायचा तर कधी पुलावरून पाणी वाहायचे. यामुळे याठिकाणी अनेक अपघात होऊन जीवितहानी झाली होती.   यामुळे याठिकाणी उत्तम दर्जाचा पूल उभारण्यासाठी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी मा.ना. चंद्रकांत दादा पाटील व अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांच्याकडे पाठपुरावा केला आहे.
            या अनुषंगाने ५० ५४ (४) नाबार्ड टप्पा - अंतर्गत ५ कोटी १५ लक्ष रु. एवढा निधी मंजूर झाला आहे.  यातुन ८० मीटर लांब व ०७.३० मीटर रुंद सबमर्सिबल पुलाचे बांधकाम होणार आहे. यात पोचमार्गाकरिता माती भराव, खडीकरण, मजबुतीकरण, डांबरीकरण, मुरूम बुजपट्टी, कच्चे गटर्स व इतर कामे केली जाणार आहेत.

लोहारा - शिवकरवाडी हे गाव तुळजापूर तालुक्यामधून लोहारा तालुक्यात समाविष्ट करण्यात यावे या मागणीसाठी लोहारा तालुका विकास समिती च्या वतीने तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांना निवेदन



लोहारा प्रतिनिधी -

शिवकरवाडी हे गाव तुळजापूर तालुक्यामधून लोहारा तालुक्यात समाविष्ट करण्यात यावे या मागणीसाठी लोहारा तालुका विकास समिती च्या वतीने तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन उपोषणाचा इशारा देण्यात आला.
                लोहारा शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या शिवकरवाडी या गावास ग्रामपंचायत हिप्परगा आहे. हिप्परगा हे गाव लोहारा तालुक्यात आहे. तर शिवकरवाडी हे गाव तुळजापूर तालुक्यात आहे. त्यामुळे या गावातील गावकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत गेली 9 वर्षे पाठपुरावा करण्यात येऊनही सरकार दरबारी अद्याप कसलाही निर्णय झाला नाही. त्यामुळे येत्या 10 तारखेपर्यंत याबाबत निर्णय नाही घेतल्यास 11 फेब्रुवारी पासून तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येणार आहे असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. लोहाऱ्याचे तहसीलदार राहुल पाटील, पोलीस निरीक्षक सर्जेराव भंडारे यांना हे निवेदन देण्यात आले आहे. यावेळी लोहारा तालुका विकास समितीचे मार्गदर्शक नागन्ना वकील, समितीचे अध्यक्ष जालिंदरकोकणे, सचिव कालिदास गोरे , सदस्य गोरख नारायणकर, रमाकांत गोरे, दिलीप जाधव, राम मोरे आदींसह शिवकरवाडी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोहारा तालुक्यातील अचलेर येथील विद्या विकास हायस्कूल शाळेत प्रा. राम चंदनशिवे यांच्या सेवा निवृतीनिमित्त निरोप समारंभ





लोहारा प्रतिनिधी -

माणूस हा जातीने, धर्माने मोठा होत नसतो तर स्वतःच्या कर्तृत्वाने मोठा होतो. जिद्द, परिश्रम, कष्ट करण्याची प्रवृत्ती व प्रामाणिकपणा माणसामध्ये आत्मसात झाली की मानवाचा सर्वांगीण विकास होतो. समाज घडविण्याचे पवित्र असे कार्य शिक्षकाकडूनच होते आणि त्यातूनच नवी क्रांती होते. असे पवित्र कार्य प्रा. राम चंदनशिवे यांनी केले आहे असे प्रतिपादन औरंगाबाद येथील विभागीय सह आयुक्त शिवानंद टाकसाळे यांनी केले.
           लोहारा तालुक्यातील अचलेर येथील विद्या विकास हायस्कूल शाळेत प्रा. राम चंदनशिवे यांच्या सेवा निवृतीनिमित्त शुक्रवारी ( दि.1 ) निरोप समारंभ घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, डी.व्ही. चंदनशिवे, पृथ्वीराज पाटील, सरपंच प्रकाश लोखंडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे तज्ञ संचालक राजेंद्र पाटील, मुख्याध्यापक भास्कर बेंडगे, माजी पं.स. सभापती सिद्रामप्पा दुलंगे, मंडळ अधिकारी स्वामी, राजेंद्र काटे, बालासिंग बायस, अमोल पुजारी, चंदरराव पाटील, कलप्पा गोपणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
           प्रा. राम चंदनशिवे हे विद्या विकास माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अचलेर येथून निवृत्त झाले. त्यानिमित्त प्रा. राम चंदनशिवे यांचा सपत्नीक सत्कार यावेळी मान्यरांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पृथ्वीराज पाटील यांनी केले. सुत्रसंचलन सिद्धाराम भालके यांनी तर पर्यवेक्षक उद्धव येरोलकर यांनी आभार मानले. या कार्यक्रमास विद्यार्थी, ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर सायंकाळी ह.भ.प. महेश महाराज पाटील यांचे किर्तन झाले. यानंतर भारुडे व भजनाचा कार्यक्रम घेण्यात आला.