29 December 2019

लोहारा तालुक्यातील लोहारा खुर्द येथील लोकमंगल माऊली साखर कारखान्याकडून मयत कर्मचाऱ्याच्या कुटुंबियाला आर्थिक मदत - रु. दोन लाख त्रेपन्न हजार सत्तर रुपयांचा धनादेश सुपूर्द



प्रतिनिधी / लोहारा

तालुक्यातील लोहारा खुर्द येथील लोकमंगल माऊली साखर कारखान्यातील कर्मचारी श्रीनिवास चिकुंद्रे (रा. माकणी ) यांचे दि. २ नोव्हेंबर ला हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले होते. चिकुंद्रे यांच्या कुटुंबाला आर्थिक साहाय्य म्हणून लोकमंगल माऊली लोहारा कारखान्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे वेतन देण्याचे ठरविले. त्याप्रमाणे एकुण रक्कम रु. १,५२०७०/- जमा झाले. तसेच लोकमंगल समूहाकडून चिकुंद्रे यांच्या कुटुंबाला आर्थिक साहाय्य म्हणून आर्थिक मदत म्हणून रु. १ लाख १ हजार देण्याचा निर्णय घेण्यात आला. ही दोन्ही रक्कम मिळून एकूण दोन लाख त्रेपन्न हजार सत्तर रुपयांचा धनादेश लोकमंगल समूहाचे चेअरमन महेश देशमुख, संचालक प्रशांत पाटील, टेक्नीकल डायरेक्टर मोहन पिसे यांच्या हस्ते गुरुवारी ( दि. २६) कै. श्रीनिवास चिकुंद्रे यांच्या पत्नी वर्षाराणी चिकुंद्रे व त्यांच्या कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आला. यावेळी लोकमंगल समूहाचे कर्मचारी राम पाटील, संजय जाधव, सुधाकर राठोड, प्रशासन अधिकारी अजमेर कारभारी, सगर साहेब, शेतकी अधिकारी अमरीष कदम, माकणीचे सरपंच विठ्ठल साठे, उपसरपंच दादासाहेब मुळे, सदस्य उमाशंकर कलशेट्टी, ज्ञानेश्वर सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

23 December 2019

लोहारा येथील न्यू व्हीजन इंग्लिश स्कुलचे प्राचार्य शहाजी जाधव यांना ग्लोबल टीचर रोल मॉडेल अवॉर्ड २०१९ पुरस्कार प्रदान



प्रतिनिधी / लोहारा

मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी ट्रस्टतर्फे शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा, निसर्ग अशा विविध क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य केलेल्या व्यक्तींना सोमवारी ( दि. २३) मुंबई येथील यशवंतराव चव्हाण केंद्रात आयोजित कार्यक्रमात पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात लोहारा येथील न्यू व्हीजन इंग्लिश स्कुलचे प्राचार्य शहाजी जाधव यांना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून उत्कृष्ठ कार्य केल्याबद्दल ग्लोबल टीचर रोल मॉडेल अवॉर्ड २०१९ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
               या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मश्री पुरस्कारप्राप्त  विजयकुमार शहा होते. यावेळी पोलीस अधिकारी रमेश आव्हाड, ट्रस्टचे पदाधिकारी कुमार गोगावले यांची प्रमुख उपस्थिती होती. लोहारा येथील न्यू व्हीजन इंग्लिश स्कुलचे संस्थापक तथा प्राचार्य शहाजी जाधव यांना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून उत्कृष्ठ कार्य केल्याबद्दल मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी ट्रस्टतर्फे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ग्लोबल टीचर रोल मॉडेल अवॉर्ड २०१९ हा पुरस्कार स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व लखोटा देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार स्वीकारताना शहाजी जाधव, अनुसया जाधव, सविता जाधव, उस्मानाबाद जिल्हा एज्युकेशन सोसायटी गुंजोटी या संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुहास भोसले, संचालक दत्तात्रय गायकवाड, अशोक राठोड, प्रा. विशाल तडकलकर, स्वप्नील गायकवाड उपस्थित होते. शहाजी जाधव यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे सर्व पदाधिकारी, स्कुलचे शिक्षक, कर्मचारी व पालक वर्गातून अभिनंदन होत आहे.

22 December 2019

लोहारा शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सदस्य नोंदणी कार्यक्रम -  शरद पवार यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा या मागणीसाठी स्वाक्षरी मोहिमेचेही उद्घाटन





प्रतिनिधी / लोहारा

लोहारा शहरात शुक्रवारी ( दि. २०) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सदस्य नोंदणी कार्यक्रम घेण्यात आला. शरद पवार यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा या मागणीसाठी सुरू केलेल्या स्वाक्षरी मोहिमेचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांच्या हस्ते करण्यात आले.
                जिल्ह्यात पक्षाची नव्याने बांधणी करण्यासाठी एक लाख सदस्य नोंदणीची मोहिम राबवून पक्षाची पूनर्बांधणी करण्याचा निर्णय उस्मानाबाद जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने घेण्यात आला. त्यानुसार तालुक्यात सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन कार्यकर्त्यांकडून गावकऱ्यांना पक्षाचे ध्येय, धोरणे, विचार, कार्य सांगितले जात आहेत. या सदस्य नोंदणीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शुक्रवारी ( दि. २०) लोहारा शहरात हा कार्यक्रम घेण्यात आला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम घेण्यात येत आहे. या मोहिमेचा शुभारंभ राष्ट्रवादी चे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी गोविंदराव साळुंके, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नाना पाटील, नगरसेवक गगन माळवदकर, सुनील साळुंके, विजयकुमार लोमटे, राजेंद्र कदम, हेमंत माळवदकर, नवाज सय्यद, मिलिंद नागवंशी, प्रकाश भगत, भागवत वाघमारे,  राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष निहाल मुजावर, महेबूब फकीर, प्रशांत गिराम, संजय जाधव, शैलेश चंदनशिवे, दादा पाटील, उत्तम जगताप, आकाश आष्टे, शरद कदम, संजय सूर्यवंशी, योगेश बिराजदार, मनोज देशपांडे, रफिक गंजीवाले, अमित देशमुख, सतिश गोरे, श्रीकांत देशमुख, गणेश मोरे, प्रशांत हाके, राज चाउस, मिजास चाउस यांच्यासह कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते.

21 December 2019

बलसुर येथील शिवाजी विद्यालयात जिल्हा आपत्ती प्राधिकरणाच्या वतीने प्रथमोपचार, शोध व बचावकार्य मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न





प्रतिनिधी / उमरगा

उमरगा तालुक्यातील बलसूर येथील श्री. छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालयात मंगळवारी (दि. १७) महाराष्ट्र आपत्ती धोके व्यवस्थापन कार्यक्रम जिल्हा आपत्ती प्राधिकरणाच्या वतीने प्रथमोपचार, शोध व बचावकार्य मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य शिवाजीराव मारेकर होते. यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वृषाली तेलोरे,  प्रशिक्षक योगेश परदेशी, गिरीश उपाध्ये, पर्यवेक्षक सुभाष औरादे,  क्रीडा शिक्षक मालाजी काळे, प्रा. परमेश्वर सूर्यवंशी आदींची उपस्थिती होती. यावेळी बोलताना तेलोरे म्हणाल्या की, भूकंप, महापूर, आगीच्या दुघटना, रस्ते अपघात यासारख्या आपत्तीमुळे  मोठे नुकसान होत असते. आपल्याला बचाव कामाबद्दल शास्त्रशुद्ध माहिती असल्यास होणारी हानी कमी करता येते. या बचाव कामासाठी कुदळ, खोरे, टोपले, रस्सी , कटर, शिडी, बँटरी, चादर , ब्लँकेट, सतरंज्या, बांबू, दोरी, बाज, मडके, लाकडी फळ्या,  ताडपत्री आदी  साहित्य असल्याने अनेकांचे जीव वाचवता येतात.  शाळेत प्रात्यक्षिकसह मार्गदर्शन करण्यात आले.  शाळेतील प्रशिक्षित विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक करून दाखविले. प्रास्ताविक प्राचार्य  शिवाजीराव मारेकर यांनी केले.  एम.डी. काळे,  योगेश परदेशी  यांचेही भाषण झाले. सूत्रसंचालन  बळीराम नांगरे यांनी तर संजय  गायकवाड यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

20 December 2019

लोहारा शहरातील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयात संगणक दिन तसेच संगणक साक्षरता दिन उत्साहात साजरा







प्रतिनिधी / लोहारा

लोहारा शहरातील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयात संगणक दिन तसेच संगणक साक्षरता दिन उत्साहात पार पडला. महाविद्यालयाच्या संगणक शास्त्र विभागाने हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाची सुरुवात संगणकशस्त्र विभागाची ए व्ही दाखवून करण्यात आली. या कार्यक्रमामध्ये पोस्टर सेमिनार व नोटीस बोर्डचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. डी.एस. बिराजदार होते. यावेळी प्रा. विवेकानंद पाटील, प्रा. ए.आर. मुळजकर, संगणक विभाग प्रमुख प्रा. मेघराज टापरे यांची प्रमुख उपस्थिती होती. महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी मध्ये पुजा पाटील, शैला सलगरे, मयुरी फरिदबादकर, निकीता शिंदे, पुष्पांजली बिराजदार यांनी सध्याच्या संगणक युगावर आधारित सेमिनार सादर केले. या कार्यक्रमासाठी प्रा. श्रीकांत वाडीकर, प्रा. अशोक भोसले तसेच संगणकसस्त्र विभागाच्या विद्यार्थिनींनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन निकीता शिंदे यांनी तर मयुरी फरिदबादकर यांनी आभार मानले.

19 December 2019

लोहारा शहरातील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयाचे क्रिडा स्पर्धेत यश



प्रतिनिधी / लोहारा

भारत सरकारच्या केंद्रीय युवक व क्रीडा कल्याण मंत्रालयाच्या नेहरु युवा केंद्रा तर्फे आयोजित तालुकास्तरीय क्रिडा स्पर्धेमध्ये लोहारा शहरातील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयाने विविध क्रिडा प्रकारात यश संपादन केले.
             महाविद्यालयाने खो-खो, व्हाॅलीबाॅल, कबड्डी या क्रिडा प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावला. या यशाबद्दल महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष प्रा. सतिश इंगळे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.एस.बिराजदार, महाविद्यालयाचे उप प्राचार्य प्रा. विरभद्रेश्वर स्वामी, अधिक्षक हंगरगेकर यांनी विद्यार्थी व क्रिडा शिक्षक प्रा. राजपाल वाघमारे यांचे अभिनंदन केले. यावेळी डॉ. प्रविण जगताप, प्रा. विपुल गायकवाड, प्रा. विनोद तुंगे, प्रा. अमर किर्तने, नवनाथ वकील, गणेश गरड व महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.

लोहारा येथे शिवसेना, युवासेना कार्यकर्ते व शेतकऱ्यांच्या वतीने गैरहजर अधिकाऱ्याच्या खुर्चीला हार घालून गांधीगिरी पद्धतीने आंदोलन



प्रतिनिधी / लोहारा

शेतकरी व वीज ग्राहकांच्या विविध मागण्यांसाठी युवासेना, शिवसेना कार्यकर्ते व शेतकरी महावितरणच्या उपकार्यकारी अभियंता कार्यालयात गेले असता संबंधित अधिकारी गैरहजर असल्याने बुधवारी ( दि.१८) गैरहजर अधिकाऱ्याच्या खुर्चीला हार घालून गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करण्यात आले.
             शेतकऱ्यांना व ग्राहकांना अवास्तव वीज बिल येणे, शेतीतील व लोहारा तालुक्यातील गावठाण, शेतातील डीपी नादुरुस्त असणे, अतीरिक्त लोड असलेल्या डीपीवरील वीजपुरवठा कमी करून सुरळीत वीजपुरवठा करणे, शेतकऱ्यांना दिवसा वीज देणे, लोहारा शहरातील जट्टे डीपीवरील लोड कमी करून अतिरिक्त डीपी बसवणे,  कार्यालयातील अधिकारी यांची गैेरहजेरी या मागण्याचे निवेदन देण्यासाठी उपकार्यकारी अभियंता कार्यालय लोहारा येथे बुधवारी (दि. १८) शेतकरी, युवासेना, शिवसेना कार्यकर्ते गेले असताना कार्यालयात अधिकारी उपस्थित नव्हते. त्यामुळे गैरहजर अधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार घालून गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करण्यात आले.
             यापुढे कामात हयगय करणे, शेतकऱ्यांना व ग्राहकांना त्रास झाल्यास यापुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशारा यावेळी देण्यात आला. यावेळी युवासेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार, नगरसेवक शाम नारायणकर ,शिवसेना उपतालुकाप्रमुख अजमेर कारभारी, सामाजिक कार्यकर्ते दत्ता मोरे, विलास जेवळीकर, शाखाप्रमुख रमेश जाधव, दत्ता चंदनशिवे, शिवाजी पाटील, रणजित चंदनशिवे, नबीलाल तांबोळी, जीवन जाधव, अनिल चंदनशिवे, दादासाहेब मसलकर, आनंदराव मुळे, लियाकत मुल्ला, दिलीप जाधव, इरफान शेख, जावेद दाळिंबकर, किसन पाटील यांच्यासह तालुक्यातील कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.

18 December 2019

मराठी साहित्य संघ, बेळगाव आयोजित ३५ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. बालाजी जाधव यांची निवड






प्रतिनिधी / उस्मानाबाद

मराठी साहित्य संघ, बेळगाव आयोजित ३५ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. बालाजी जाधव यांची निवड करण्यात आली आहे.
            ३५ वर्षांची प्रदीर्घ परंपरा असणाऱ्या आणि डॉ. आनंद यादव, डॉ. भालचंद्र नेमाडे, डॉ. गो. मा. पवार, बाबा कदम, डॉ. निर्मलकुमार फडकुले, रा. रं. बोराडे, फादर फ्रान्सिस दिब्रिटो, लक्ष्मण माने, लक्ष्मण गायकवाड, संभाजी भगत यांच्या सारख्या दिग्गज व लेखनातील आदर्श व्यक्तीच्या अध्यक्ष पदाने गौरविलेल्या मराठी साहित्य संघ, कडोली बेळगाव (कर्नाटक) आयोजित २०२० च्या साहित्य संमेलन अध्यक्ष पदी डॉ. बालाजी जाधव यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल डॉ. जाधव यांचे कौतुक होत आहे.

लोहारा तालुका संभाजी ब्रिगेड च्या प्रभारी तालुकाध्यक्ष पदी विठ्ठल सूर्यवंशी यांची निवड



प्रतिनिधी / लोहारा

लोहारा तालुका संभाजी ब्रिगेड च्या प्रभारी तालुकाध्यक्ष पदी विठ्ठल सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष अतुल गायकवाड यांनी हे नियुक्तीपत्र दिले आहे.
                           या नियुक्तीपत्रात म्हणले आहे की, आपण अनेक वर्षांपासून क्रियाशील कार्यकर्ता आहात. संभाजी ब्रिगेड चे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे व महासचिव सौरभ खेडेकर यांच्या आदेशानुसार आपली संभाजी ब्रिगेड पक्षाच्या प्रभारी तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात येत आहे. मंगळवारी ( दि. १७) हे नियुक्तीपत्र देण्यात आले.

13 December 2019

लोहारा - संभाजी ब्रिगेड चे तालुकाध्यक्ष सुनील साळुंके यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश








प्रतिनिधी / लोहारा

संभाजी ब्रिगेड चे लोहारा तालुकाध्यक्ष सुनील साळुंके यांनी कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला आहे. मुंबई येथे मंगळवारी ( दि.१०) प्रदेश कार्यालयात हा प्रवेश सोहळा संपन्न झाला.
                  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते सुनील साळुंके यांना प्रवेश देण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, माजी आमदार राहुल मोटे, जि प सदस्य महेंद्र धुरगुडे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांचे स्वागत करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी श्रीकांत गोरे, संजय जाधव, दादा पाटील, साहेबराव साळुंके, शैलेश चंदनशिवे, योगेश बिराजदार, राहुल जाधव, संदीप हराळे, सुरज साळुंके, विजय खराडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश घेतला. पक्षाची ध्येय, धोरणे, कार्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी काम करणार असल्याचे सुनील साळुंके यांनी सांगितले.

11 December 2019

भारत विद्यालय उमरगा येथे मोबाईल सायन्स बसची भेट






प्रतिनिधी / उमरगा


 नेहरू सायन्स सेंटर मुंबई अंतर्गत मोबाईल सायन्स बसने भारत विद्यालय उमरगा येथे दोन दिवसाची भेट दिली. विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्व कळावे म्हणून या बसमधे विविध स्वच्छतेच्या  प्रतिकृती उभारण्यात आल्या होत्या.त्याच सोबत विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व कळावे म्हणून प्रोजेक्टरच्या माध्यमातून विविध बाल कलाकारांनी साकारलेल्या लघुपट दाखवण्यात आले.त्याच सोबत सर्वांना खगोलीय ज्ञान अभ्यासता यावे म्हणून दुर्बिणीच्या माध्यमातून चंद्र व ताऱ्यांचे निरीक्षण करण्यात आले. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक शाहूराज जाधव,पर्यवेक्षक विक्रांत मोरे व पर्यवेक्षक संजय देशमुख तथा शहरातील अनेक ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

08 December 2019

लोहारा तालुक्यातील सास्तुर येथील दिव्यांग शाळेने जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत पटकाविले ४० पदके









प्रतिनिधी / लोहारा

समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांच्या वतीने जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिनांक २ व ३ डिसेंबर या कालावधीत श्री तुळजाभवानी स्टेडीयम, उस्मानाबाद येथे दिव्यांग मुला-मुलींच्या जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातून विविध प्रवर्गातील सुमारे एक हजार दिव्यांग खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते. तालुक्यातील सास्तूर येथील निवासी दिव्यांग शाळेतील खेळाडूंनी १५ सुवर्ण, १६ रौप्य व ९ कांस्य असे एकूण ४० पदकांची कमाई करीत या स्पर्धेतील जनरल चॅम्पियन्सिप सलग १९ व्या वर्षी आपल्याकडे कायम राखली आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह, उस्मानाबाद येथे संपन्न झालेल्या सांस्कृतिक स्पर्धेतील प्रथम पारितोषिकही सास्तूर निवासी दिव्यांग शाळेने पटकाविले आहे.
              सास्तूर निवासी दिव्यांग शाळेच्या संघातील सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंना सामाजिक न्याय विभागाच्या वतीने पुढील महिन्यात आयोजित करण्यात येत असलेल्या दिव्यांग मुला-मुलींच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत उस्मानाबाद जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे. स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना जिल्हा समाज कल्याण अधिकारी नागेश चौगुले, उद्योजक नितीन शेरखाने, रोटरी क्लबचे प्रवीणकुमार स्वामी, साधना कांबळे, सहाय्यक सल्लागार सुभाष शिंदे, श्रीमती पाटील, तुळजाई प्रतिष्ठानचे सचिव शहाजी चव्हाण, प्रताप भायगुडे, भारत सरवदे पाटील, रशिद कोतवाल, जूनेद  शेख, बालाजी शिंदे, दयानंद भोसले यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. संघातील सर्व खेळाडूंना अंजली चलवाड, संध्या गुंजारे, राम बेंबडे, डाॅ. मंगेश कुलकर्णी, रमाकांत ईरलापल्ले, राजकुमार गुंडूरे, डी. एस. माने, एन.सी. सुर्यवंशी, वीरभद्र स्वामी, जी. टी. पालमपल्ले, सुरेखा परीट, शंकरबावा गिरी, मन्मथअप्पा निजवंते आदींचे मार्गदर्शन लाभले.
सर्व यशस्वी खेळाडूंचे मुख्याध्यापक बी.टी.नादरगे, प्रा. बी. एम. बालवाड यांनी अभिनंदन केले आहे.


छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह, उस्मानाबाद येथे संपन्न झालेल्या सांस्कृतिक स्पर्धेतील प्रथम पारितोषिकही सास्तूर निवासी दिव्यांग शाळेने पटकाविले आहे. या स्पर्धेत उंगली पकडके चलना सीखाया या बहारदार नृत्यातून आईच्या महतीचे दर्शन घडवले. यावेळी उपस्थित प्रेक्षकांना आपले अश्रू रोखता आले नाहीत.

बार्टीच्या वतीने संविधान साक्षर ग्राम वडगांव(गां) येथे रक्तदान शिबिर संपन्न






प्रतिनिधी / लोहारा

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था(बार्टी) पुणेचे महासंचालक  कैलास कणसे (भा.प्र.से.) मुख्य प्रकल्प संचालिका प्रज्ञा वाघमारे, जिल्हा प्रकल्प अधिकारी तुषार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली समतादूत किरण चिंचोले, नागनाथ फुलसुंदर यांनी संविधान साक्षर ग्राम वडगाव(गां) मध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन केले. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधानाच्या प्रतिमेला पूजन करण्यात आले. त्यानंतर संविधानातील प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करून उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. प्रास्ताविकात समतादूत नागनाथ फुलसुंदर यांनी रक्तदानाचे महत्व सांगितले. समतादूत किरण चिंचोले यांनी बार्टीच्या योजना सांगितल्या. संविधान साक्षर ग्रामचे महत्व पटवून दिले. प्रमुख म्हणून लाभलेले डॉ गणेश साळुंके यांनी रक्तदान याविषयी सविस्तर माहिती दिली. हा उपक्रम अतिशय चांगल्या प्रकारे संपन्न झाला. या शिबिरास डॉ. अश्विनी गोरे, डॉ. गणेश साळुंके, डॉ. मेघशाम भोजने, डॉ. अक्कानवल, समतादूत नागनाथ फुलसुंदर, किरण चिंचोले यासह गावातील नागरिक, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रक्तदान शिबीरामध्ये समतादूतांसह 15 रक्तदात्यांनी रक्तदान केले. त्यामध्ये अमोल साळुंके, लहू गायकवाड, रफिक सय्यद, गणेश गोरे, भीमाशंकर बेळे, सुभाष आतकरे, हरी साळुंके, सुभाष भुजबळ, जितेंद्र गायकवाड, शिवाजी चव्हाण, आयाज सय्यद, बालाजी साळुंके यासह अनेकांनी रक्तदान केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समतादूत नागनाथ फुलसुंदर यांनी तर आभार डॉ अश्विनी गोरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी गणेश गोरे, सुभाष आतकरे, प्रमोद माळी, रफिक सय्यद यांनी पुढाकार घेतला.

06 December 2019

तालुक्यातील समुद्राळ येथील भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखाना देणार योग्य दर - २४५१ रुपये भाव जाहीर

प्रतिनिधी / उमरगा

तालुक्यातील समुद्राळ येथील भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखाना व क्वीनर्जी इंडस्ट्रीजच्या सन २०१९-२० चा गाळप हंगामाचा शुभारंभ २५ नोव्हेंबरला करण्यात आला असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर देण्याची हमी चेअरमन सुरेश बिराजदार यांनी दिली होती. अखेर गुरुवारी (दि. ५) दोन हजार ४५१ रुपये भाव देणार असल्याचे जाहीर करण्यात आले.
तालुक्यातील समुद्राळ येथील भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखान्याचा गळित हंगाम सुरू करण्यात आला असून कारखाना चालू करण्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध होऊ शकत नसल्याने संचालक मंडळाने पुणे येथील क्वीनर्जी इंडस्ट्रीज लि या आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि अनुभवी कंपनीला कारखाना भाडेतत्वावर दिला असून याचा फायदा ऊस उत्पादकांना होत आहे. येणाऱ्या काळात अन्य उपपदार्थ निर्मीती करण्याचा मानस आहे. तालुका व परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी व सभासदांची ससेहोलपट थांबनार आहे. कंपनी आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याने ऊसाला चांगला भाव मिळण्याची खात्री असल्याचे चेअरमन सुरेश बिराजदार यांनी गळीत हंगामाच्या शुभारंभाप्रसंगी बोलताना सांगितले होते. अखेर गुरुवारी यंदाच्या वर्षी एफआरपी प्रमाणे दोन हजार चारशे ५१ रुपये भाव देण्यात येणार असल्याचे बिराजदार यांनी जाहीर केले असुन शेतकरी अन सभासदांनी चांगल्या प्रतीचा ऊस पुरवठा करून सहकार्य करावे असे आवाहन सुरेश बिराजदार यांनी केले आहे. पुणे येथील क्वीनर्जी इंडस्ट्रीजचे संचालक सचिन सिनगारे यांनी संचालक, शेतकरी व सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बैठकीत ऊसाचा यंदाचा दर जाहीर करून ऊसाचे बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर दहा दिवसात जमा करणार असुन यावर्षी ऊस पुरवणाऱ्या शेतकऱ्यांना पुढील वर्षी प्राधान्य देण्यात येणार आहे अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

पदवीधर किंवा पदवीच्या अंतिम वर्षामध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलींसाठी / विद्यार्थींनींकरीता महाराष्ट्र लोकसेवा, राज्यसेवा आयोगामार्फत घेण्यात येत असलेल्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी मोफत स्वरूपात मार्गदर्शनाची सोय



प्रतिनिधी / उस्मानाबाद

जिल्हा परिषद, उस्मानाबाद आणि जि.प. कर्मचारी कल्याण निधी यांच्या संयुक्त विद्यमाने उस्मानाबाद जिल्ह्यातील होतकरू, गरजू  आणि गुणवंत पदवीधर किंवा पदवीच्या अंतिम वर्षामध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलींसाठी / विद्यार्थींनींकरीता महाराष्ट्र लोकसेवा, राज्यसेवा आयोगामार्फत घेण्यात येत असलेल्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी मोफत स्वरूपात मार्गदर्शनाची सोय जिल्हा परिषद  उस्मानाबाद येथील अधिकारी व कर्मचारी कल्याण निधीतून करण्यात आलेली आहे. सदरील केंद्रात दि. 1 मे 2016 पासून नियमितपणे वर्ग चालू असून आजपर्यंत STI , वित्त व लेखाधिकारी ( वर्ग 2), अशा विविध पदावर एकूण 31 पेक्षा अधिक मुलींची निवड झालेली आहे. या केंद्रात नियमितरित्या classes, नियमित चाचण्या, सुसज्ज ग्रंथालय, इंटरनेट सुविधा, Guest Lecturs, गट चर्चा, मुलाखतीची तयारी, IAS दर्जाचे उच्चपदस्थ अधिकारी यांचे मार्गदर्शन, वैयक्तिक मार्गदर्शन / समुपदेशनाची मोफत सोय करण्यात आलेली आहे.  या केंद्राच्या बॅचची सुरूवात प्रत्येक वर्षाच्या  दि. 1 नोव्हेंबर आणि 1 मे पासून सहा महिन्यांकरीता करण्यात येते.  दि. 1 नोव्हेंबर 2019 या महिन्यामध्ये आठवी बॅच सुरू करण्यात आलेली आहे. तरी पदवीधर किंवा पदवीच्या अंतिम वर्षातील मुलींनी जि. प. प्रशाला (मुलांची),  उस्मानाबाद (DIECPD समोर ) येथे जाऊन प्रवेश घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रवेशासाठी संपर्क :- 02472 222018,
मो. नं. 9226934100 
स्थळ - उमेद स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र , जिल्हा परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशाला, ( मुलांची ) जुनी इमारत , DIECPD समोर , बार्शी नाका , उस्मानाबाद.
                                                     

रोहिणी कुंभार
सनियंत्रण अधिकारी
         तथा
उपशिक्षणाधिकारी ( प्रा. ) जि.प. उस्मानाबाद






प्रतिनिधी / उमरगा

उमरगा तालुक्यातील व्हतांळ येथे व्हंताळ ते बेटजवळगा गावाला जोडणाऱ्या डांबरी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य सुरेश बिराजदार यांच्या हस्ते शुक्रवारी ( दि. ६) करण्यात आले.
                व्हंताळ ते बेटजवळगा गावाला जोडणारा, शेतकऱ्यांच्या दळणवळणासाठी महत्वाचा असलेल्या या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ जि. प . निधी गट अ अंतर्गत  डांबरी रस्त्याच्या १२ लक्ष रुपयाच्या कामाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी आयोजीत कार्यक्रमात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण दिनानिमित्त बाबसाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी व्हंताळचे उपसरपंच राजाभाऊ पाटील, संदीपान पाटील, सोसायटीचे चेअरमन प्रताप मोहिते, जयचंद्र जाधव, राजाभाऊ जगताप, हरिश्चंद्र पवार यांच्या सह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
                समाजातील अनिष्ठ रूढी परंपरा जर आपल्या प्रगतीला बाधक ठरत असतील तर त्याला थाराच का द्यायचा ? तरुण वर्गाने आवर्जून सामाजिक कार्यात सहभागी होऊन हुंडा प्रथा, बालविवाह, स्त्रीभ्रूण हत्या अश्या समाजविघातक अनिष्ठ प्रथा समूळ नष्ठ करण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे. मुलींना शिक्षणाचे महत्त्व सांगून शिक्षणाच्या प्रवाहात आणणे ही काळाची गरज आहे असे मत जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांनी व्यक्त केले. यावेळी गावातील जेष्ठ नागरिकांनी जि प सदस्य सुरेश बिराजदार यांच्या आतापर्यंतच्या कामाबाबत कौतुक करीत त्यांचा सत्कार केला. याच कार्यक्रमात एनटीव्ही चे प्रतिनीधी सचिन बिद्री, दै. संघर्ष चे पत्रकार अमोल पाटील यांनी समाजप्रबोधनपर बनवलेल्या "बालविवाह एक अभिशाप" या समाज प्रबोधनपर लघुचित्रपटात योगदान दिल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीपान पाटील यांनी तर प्रताप मोहिते यांनी आभार मानले.

लोहारा तालुक्यातील अचलेर येथील फिनिक्स फाऊंडेशन मध्ये महापरिनिर्वाण दिनानिमीत्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन







प्रतिनिधी / लोहारा

लोहारा तालुक्यातील अचलेर येथील फिनिक्स फाऊंडेशन मध्ये महापरिनिर्वाण दिनानिमीत्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.
              या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते मलिनाथ अष्टगे  होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन सरस्वती इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक रामसींग चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अमित लोखंडे, रामसींग चव्हाण, सुमित बनसोडे, संचालक जगदीश सुरवसे, आएशा पटेल, नाजीया  जमादार, लक्ष्मीकांत पटणे, वैभव माने, संदेश बनसोडे, सिद्धार्थ गायकवाड, यशपाल लोखंडे, अमर लोखंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नाजीया जमादार यांनी केले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर स्नेहा शिवपूरे, लक्ष्मीकांत पटणे, ज्ञानेश्वर देडे, गायत्री पाटील, वैभव माने, चाँद पडसालगे, श्रावणी क्षीरसागर यांनी मनोगत व्यक्त  केले. त्यानंतर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. त्यानंतर 'बाबासाहेब एक युगपुरुष ' या विषयावर सुमित बनसोडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. भारतीय समाज व बाबासाहेबांचे कार्य याविषयी मुख्याध्यापक रामसींग चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. तर जगदीश सुरवसे यांनी सर्व उपस्थितांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन याविषयी माहिती सांगितली.
                या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आएशा पटेल यांनी तर वैभवी पाटील यांनी आभार मानले.

05 December 2019

स्पर्धेत केवळ जिंकण्यासाठी न खेळता उत्कृष्ठ कामगिरी नोंदविण्यासाठी खेळा - जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे






उस्मानाबाद प्रतिनिधी -

स्पर्धेत केवळ जिंकण्यासाठी न खेळता आपली उत्कृष्ठ कामगिरी नोंदविण्यासाठी खेळल्यास यशस्वी होणारच असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी केले.
          क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषदेच्या वतीने भारत विद्यालय, उस्मानाबाद  येथे दि. ४ ते ७ डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय शालेय नेटबॉल स्पर्धेचे उदघाटन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले,त्यावेळी त्या बोलत होत्या.
    यावेळी पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन, श्री शिवछत्रपती पुरस्कारार्थी अंकुश पाटील, महाराष्ट्र राज्य नेटबॉल संघटनेचे सहसचिव श्याम देशमुख, जिल्हा नेटबॉल संघटनेचे अध्यक्ष कुलदीप खंडेरिया, जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले, सहायक जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक बनसोडे, तांत्रिक समितीचे सदस्य गणेश राऊत, संभाजी गायकवाड, श्रीमती वैशाली मेश्राम, तालुका क्रीडा अधिकारी सारिका काळे, क्रीडा अधिकारी कैलास लटके, नेटबॉल संघटनेचे सह सचिव महेश जाधव, राजेश बिलकले यांच्यासह कार्यालयातील सर्व कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते. ही राज्यस्तरीय शालेय स्पर्धा महत्वाची आहे. या स्पर्धेमधून मध्यप्रदेश( इंदोर) येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याच्या संघाची निवड करण्यात येणार आहे असे कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले यांनी सांगितले.
      या स्पर्धेमध्ये राज्यातील अमरावती, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, लातूर, मुंबई, पुणे व कोल्हापूर अशा एकूण आठ विभागातून १९२ खेळाडू, संघव्यवस्थापक, तांत्रिक अधिकारी सहभागी झाले आहेत. सुत्रसंचालन परमेश्वर मोरे यांनी तर क्रीडा अधिकारी कैलास लटके यांनी उपस्थितांचे आभार मानले.

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग विद्यार्थ्यांनी सादर केले स्वच्छतेवर आधारित भारूड



उस्मानाबाद प्रतिनिधी -

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात शेकापूर रोडवरील बालाजी नगर येथील स्वामी समर्थ मूकबधिर निवासी शाळेतील विशेष शिक्षक भगवान चौगुले लिखित राष्ट्रीय कार्यक्रम “स्वच्छ भारत सुंदर भारत” या विषयावर दिव्यांग विद्यार्थ्यांनी  स्वच्छतेचा संदेश देत व जनजागृती करीत अप्रतिम असे भारूड सादर केले.
                 यामध्ये महेश देवकुळे, कृष्णा शिंदे, अक्षय अलकुटे, विश्वनाथ राजे, अथर्व कोकाटे ,समर्थ मदने, काजल शेख, श्रेया गोवर्धन, सायमा सय्यद फातिमा शेख या दिव्यांग कलाकारांनी मनोरंजनातून प्रबोधन केले. तसेच सिमरन शेख या दिव्यांग विद्यार्थिनीने रेखा ओहोळ, विठ्ठल व्होरडे, भिमराव पाथरूड यांच्या मार्गदर्शनाखाली ८ ते १२ वयोगटातून रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला. या सर्वांचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी नागनाथ चौगुले, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्या साधना काबले, सहाय्यक सल्लागार सुभाष शिंदे, मुख्याध्यापक शकिल शेख, किरण जाधव, नागेश चव्हाण, संजय म्हमाणे यांनी अभिनंदन केले.

लोहारा - उस्मानाबाद तालुक्यातील करजखेडा येथे परिवर्तन महोत्सव २०१९ संपन्न







प्रतिनिधी / लोहारा

उस्मानाबाद तालुक्यातील करजखेडा येथील परिवर्तन फाउंडेशन आयोजित परिवर्तन महोत्सव - २०१९ (पर्व -७) मंगळवारी ( दि.३) रात्री जल्लोषात संपन्न झाला. झी टीव्ही वरील डान्स इंडिया डान्स या कार्यक्रमातील सेमी फायनलिस्ट दिपक हुलसुरे आणि चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातील सहभागी कलाकार मुज्जमिल पटेल हे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते.
                  या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी करजखेडच्या सरपंच सुरेखा हनमंत बनकर या होत्या. यावेळी पं स सदस्या प्रणिता क्षिरसागर, उपसरपंच सुभाष कळसुले, उद्योजक सुनील चव्हाण, तंटामुक्ती अध्यक्ष रवी आदटराव, ग्रामपंचायत सदस्य, यात्रा उत्सव समितीचे पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
                  कै. नामदेव आदटराव (गुरुजी) यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दिप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. परिवर्तन महोत्सव गेल्या ६ वर्षापासून विविधतेने नटलेले कार्यक्रम सादर करत आहे. अंधश्रद्धा निर्मूलन, मनोरंजन, प्रबोधन करत मुंबई, पुणे इ. सारख्या भागात होणारे कार्यक्रम ग्रामीण भागात घेणं आणि लोकांमध्ये जागृती करणं हे परिवर्तन फौंडेशनच ध्येय आहे. परिवर्तन महोत्सवाचे हे ७ वे वर्ष आहे. या कार्यक्रमात झी टीव्ही वरील डान्स इंडिया डान्स या कार्यक्रमातील सेमी फायनलिस्ट दिपक हुलसुरे आणि चला हवा येऊ द्या कार्यक्रमातील सहभागी कलाकार मुज्जमिल पटेल हे मुख्य आकर्षण होते. त्या दोघांनीही उत्कृष्ट सादरीकरण केले. त्यानंतर लावणी, लघुनाटिका इ. सादरीकरणाने कार्यक्रमाची सांगता झाली. या दरम्यान दिप्ती नायगावकर, दिव्या नायगावकर, प्राची जाधव, प्रांजली जाधव, साहिल शिंदे या कलाकारांनी रंगत आणली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अच्युत आदटराव व शाहूराज दबडे यांनी तर अनिल दुधभाते यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिवर्तन फाउंडेशन च्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

लोहारा तालुक्यातील वडगाव (गां) येथे बार्टीच्या वतीने आरोग्य शिबीर - १३२ नागरिकांची नेत्र तपासणी






प्रतिनिधी / लोहारा

तालुक्यातील वडगाव (गां) येथे बुधवारी ( दि. ४) बार्टीच्या वतीने आरोग्य शिबीर घेण्यात आले. या शिबिरात १३२ नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली.
                 महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या डॉ  आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे चे महासंचालक  कैलास कणसे (भा.प्र.से.) मुख्य प्रकल्प संचालिका प्रज्ञा वाघमारे, जिल्हा प्रकल्प अधिकारी तुषार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली किरण चिंचोले, नागनाथ फुलसुंदर, गोविंद लोमटे यांनी संविधान साक्षर ग्राम वडगावमध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधानाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर संविधानातील प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. प्रास्ताविकात किरण चिंचोले यांनी बार्टीच्या योजना सांगितल्या. तसेच संविधान साक्षर ग्रामचे महत्व पटवून दिले. यावेळी डॉ. दस्तगिर मुजावर यांनी डोळ्यांचे महत्व आणि घ्यावयाची काळजी याविषयी सविस्तर माहिती दिली. या शिबिरास डॉ. दस्तगिर मुजावर, आरोग्य सेवक डी. जे. कांबळे, शंकर पाटील, मुख्याध्यापक व्ही एम गायकवाड,आशा कार्यकर्ती शोभा पेठकर, लहू गायकवाड, मदार सय्यद, रामहरी माळी, मल्लिनाथ पाटील, समतादूत नागनाथ फुलसुंदर, किरण चिंचोले, गोविंद लोमटे यांच्यासह गावातील नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. आरोग्य शिबीराचा १३२ जणांनी लाभ घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समतादूत नागनाथ फुलसुंदर यांनी तर आभार आरोग्य सेवक डी जे  कांबळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी लहू गायकवाड, मल्लिनाथ पाटील, सुनील चिंचोले, शोभा पेटकर यांनी पुढाकार घेतला.

28 November 2019

उस्मानाबाद येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय विज्ञानमंच परीक्षेत भारत विद्यालय उमरगा येथील चार विद्यार्थ्यांची निवड



प्रतिनिधी / उमरगा

उस्मानाबाद येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय विज्ञानमंच परीक्षेत जिल्ह्यातील ३० विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. यात भारत विद्यालय उमरगा येथील चार विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. यामध्ये सृष्टि, क्षीरसागर, वैष्णवी मुसांडे, माधुरी आगडे, आस्था जोळदापके यांचा समावेश आहे. तर प्रतिक्षा यादीत धनश्री नांगरे हिचा समावेश आहे. विज्ञानमंच परीक्षेत निवड झाल्याबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक शाहूराज जाधव व पर्यवेक्षक विक्रांत मोरे, पर्यवेक्षक संजय देशमुख यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना व मार्गदर्शक शिक्षक मल्लिकार्जुन लोहार, रेणूका इंगळे, संदीप चव्हाण, व्यंकटेश पाटील यांचाही सत्कार करण्यात आला. सदरील विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

27 November 2019

उमरगा - मराठा सोयरिक संघटनेची तालुका कार्यकारिणी जाहीर





प्रतिनिधी / उमरगा

तालुक्यातील मराठा सोयरिक संघटनेची तालुका कार्यकारणी जाहिर  करण्यात आली असून खालील उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ही संघटना कार्य करणार असल्याचे मत तालुका प्रमुख विद्याताई वाघ यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
          समाजातील विधवा, परितक्ता, आर्थिक दृष्टय़ा दुर्बल, अनाथ अशा मुलींच्या लग्नाला आर्थिक मदत करणे, समाज विकास संस्थेचे मंगल कार्यालय मोफत पुरविणे आदी उद्दिष्ट असल्याचे विद्याताई वाघ यांनी सांगितले  तर रेखाताई पवार यांनी वय झालेल्या युवा युवतींचे लग्न जमविण्यावर जास्त भर देण्यात यावा असे मत व्यक्त केले. तसेच हुंडा विरोधी चळवळ सक्रिय करावी असे मत सुवर्णा उगले, सीता सूर्यवंशी यांनी व्यक्त केले. आंतरजातीय विवाहास प्राधान्य द्यावे असे मत सारिका लोढे यांनी व्यक्त केले. त्याचसोबत आजपासून तालुक्याचे मध्यवर्ती कार्यालय म्हणून समाज विकास संस्थेचे कार्यालयामध्ये लग्न जुळवनी केंद्र सुरु करण्यास मान्यता देण्यात आली. संघटनेची तालुका कार्यकारिणी यावेळी जाहीर करण्यात आली. त्याप्रमाणे मराठा सोयरिक संघटनेच्या तालुका प्रमुखपदी विद्या वाघ, कार्याध्यक्ष सीता सुर्यवंशी, उपाध्यक्ष सविता मुळे, सचिव सुवर्णा उगले, खजिनदार सारिका लोंढे, संघटक रेखाताई पवार, प्रचारक सविता मोरे यांची एकमताने निवड करण्यात आली. या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

भारत विद्यालय उमरगा येथे संविधान दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न






प्रतिनिधी / उमरगा

उमरगा येथील भारत विद्यालयात मंगळवारी (दि. २६) भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी भारत शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षणमहर्षी तात्याराव मोरे (आबा) यांच्या पुतळ्याचे पुजन प्रशालेचे मुख्याध्यापक  शाहुराज जाधव यांच्या हस्ते संपन्न झाले. यानंतर  संविधान दिनानिमित्त राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमचे पुजन प्रशालेचे पर्यवेक्षक विक्रांत मोरे यांनी केले. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी सामूहिक संविधान वाचन केले.
                संविधान दिनानिमित्त वक्तृत्व व निबंध स्पर्धा घेण्यात आली. वक्तृत्व स्पर्धेत* कु. आकांक्षा कांबळे  प्रथम तर कु.  प्रतिक्षा चव्हाण द्वितीय आली. तर निबंध स्पर्धेत कु. भाग्यश्री बिराजदार  प्रथम तर कु. रुपाली बनसोडे द्वितीय आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक शाहुराज जाधव होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्यंकट गुंजोटे यांनी तर आभार हरीबा चव्हाण यांनी आभार मानले. त्यानंतर २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना व मृत्यू पावलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी प्रशालेचे पर्यवेक्षक संजय देशमुख, प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

26 November 2019

लोहारा येथील न्यू व्हिजन इंग्लिश स्कुलमध्ये कौमी एकता सप्ताह साजरा




प्रतिनिधी / लोहारा

लोहारा येथील न्यू व्हिजन इंग्लिश स्कुलमध्ये सोमवारी ( दि. २५) कौमी एकता सप्ताह साजरा करण्यात आल्या. तसेच महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिना निमित्त  पूजन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक शहाजी जाधव यांच्या हस्ते स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांचे जीवनचरित्रावर प्रकाश टाकला आणि भारत हा देश विविधतेने नटलेला असुन त्या विविधता गुण्यागोविंदाने हजारो वर्षपासून एकत्र नांदत आहेत त्यासाठी आपण हिंदू, मुस्लिम शीख, इसाई - हम सब है भाई भाई असे म्हणत सर्वांनी एकत्र येऊन आपण भारतीय असल्याचे जगासमोर दाखवून दिले आहे असे सांगत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी स्कुलमधील विद्यार्थ्यांनी, पंजाबी, गुजराती, तमिळ आणि महाराष्ट्रातील मराठी, मुस्लिम, कोळी, ब्राह्मण, धनगर, लिंगायत अशा विविध वेशभूषेत येऊन विविधतेतून एकता म्हणजेच कौमी एकता सप्ताह साजरा केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पर्यवेक्षक सिद्धेश्वर सुरवसे यांनी तर आभार सविता जाधव यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक रामेश्वर पंजरकर, अनंत समदळे, परमेश्वर जाधव, रवींद्र चव्हाण, पूजा दाळिंबकर , हिना सौदागर, शीतल खराडे यांनी परिश्रम घेतले.