29 April 2020

समाज विकास संस्थेच्या वतीने बिरुदेव मंदिराजवळ लॉकडाऊन मुळे अडकलेल्या पालावरील एकेविस कुटुंबाना मदत



प्रतिनिधी / उमरगा

उमरगा येथील समाज विकास संस्थेच्या वतीने लॉकडाऊन मुळे अडकलेल्या पालावरील एकेविस कुटुंबाला बुधवारी ( दि. २९) रेशन देऊन मदत करण्यात आली. दोन दिवस पुरेल एवढे साहित्य या कुटुंबांना देण्यात आले. समाज विकास संस्थेच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या मदतीसाठी कार्यास ऑक्सफ़ँम इंडिया तसेच मित्र परिवारातून मदत मिळत आहे. समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन या प्रकारे अडचणीत असलेल्यांना मदत करावे असे आवाहन भूमिपुत्र वाघ यांनी केले आहे. या मदत कार्यासाठी मेजर संजय लोंढे, सारिका लोंढे, विजया वाघ, निखिल वाघ, किशोर होटकर, विक्रम ओव्हाळ, शालिनी पाटील, सुमन कावळे स्वयंसेवक म्हणून सातत्याने कार्य करीत आहेत.

25 April 2020

लोहारा तालुक्यातील सास्तुर ग्रामस्थांनी जमा केलेले ९३ क्विंटल धान्य जिल्हाधिकारी कार्यालयास सुपूर्त - जिल्हाधिकारी यांनी मानले ग्रामस्थांचे आभार



प्रतिनिधी / लोहारा

तालुक्यातील सास्तुर येथील ग्रामस्थांनी सध्याच्या परिस्थितीत अडचणीत असलेल्याना मदत व्हावी यासाठी ९३ क्विंटल धान्य जिल्हाधिकारी कार्यालयास दिले आहे. शुक्रवारी ( दि. २४) गावातील काही नागरिक जाऊन जिल्हाधिकारी कार्यालयात हे धान्य पोहोच केले.


           समाजातील अनेक लोकांना अन्न धान्याची आवश्यकता असल्याने अशा लोकांना मदत करण्यासाठी शासनाकडून वेळोवेळी मदतीचे आवाहन करण्यात येत आहे. भूकंपाच्या वेळी अनेकांनी मदत केली होती. त्याचप्रमाणे या भीषण परिस्थितीत आपणही आपल्याला होईल तेवढी मदत करू असा विचार सास्तुर येथील काही तरुण मित्रांच्या मनात आला. त्यानुसार त्यांनी गावातील प्रत्येक कुटुंबातून इच्छेनुसार धान्य देण्याची विनंती केली. सास्तुर येथील ग्रामस्थांनीही आपल्याला संकटकाळात झालेल्या मदतीची जाणीव ठेवून धान्य स्वरूपात मदत करत यातून ज्वारी, गहू, तांदूळ, डाळ, साखर धान्य जमा केले. जिल्हाधिकारी यांच्या मार्फत एखाद्या सामाजिक संस्थेला हे जमा झालेले धान्य द्यावे जेणेकरून गरजूंपर्यंत ते पोहोचेल असा विचार करून त्यांमी जमा झालेले धान्य जिल्हाधिकारी कार्यालयास देण्याचे निश्चित केले. त्यानुसार हे धान्य शुक्रवारी ( दि. २४) जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले. यावेळी  एकूण ९३ क्विंटल अन्न धान्य व ११६ पॉकेट पामतेल देण्यात आले. संकट काळात सास्तुर येथील ग्रामस्थांनी केलेली ही मदत महत्वाची असून त्याबद्दल जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी पत्राद्वारे ग्रामस्थांचे आभार व्यक्त केले.

यावेळी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे, सास्तुर चे सरपंच यशवंत कासार, उपसरपंच पृथ्वीराज पाटील, अप्पर जिल्हाधिकारी शिरीष यादव, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, माजी सरपंच विजयकुमार क्षीरसागर, ग्रा. पं. सदस्य बालाजी कांबळे, शाहबाज मुल्ला, नेताजी पवार, संजय बाबळसुरे, बालाजी बनसोडे आदी उपस्थित होते.

24 April 2020

लोहारा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गरजूंना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप



प्रतिनिधी / लोहारा

लोहारा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी ( दि. २४) गरजू, निराधार कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले.
           सध्या कोरोनामुळे सर्वत्र अडचण निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत गरजू व निराधार कुटुंबांना खूप अडचणी आहेत. त्यांची अडचण लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी दिलेल्या सूचनेनुसार लोहारा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने सुनील साळुंके यांनी गरजू व निराधार कुटुंबांना देण्यासाठी जीवनावश्यक वस्तूंच्या ७० किट तयार केल्या आहेत. पहिल्या टप्प्यात लोहारा, भातागळी, मार्डी येथे शुक्रवारी ( दि. २४) ३५ किटचे वितरण करण्यात आले. यावेळी सुनिल साळुंके, राजेंद्र कदम, नाना पाटील, प्रकाश भगत, नगरसेवक गगन माळवदकर, मुन्ना फकीर, संजय जाधव, पृथ्वीराज जगताप, प्रविण पाटील, तानाजी आनंदगावकर उपस्थित होते. दुसऱ्या टप्यात उर्वरित किटही वितरित करण्यात येणार असल्याचे सुनील साळुंके यांनी यावेळी सांगितले. सध्याच्या परिस्थितीत प्रशासनासह विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष यांच्या माध्यमातून गरजूंना मदत करण्यात येत आहे.

लोहारा तालुक्यातील सालेगाव येथे उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेने मोबाईल एटीएम व्हॅनच्या माध्यमातून वाटप केला पीक विमा - शेतकऱ्यांमध्ये समाधान





प्रतिनिधी / लोहारा

सध्याच्या अडचणीच्या परिस्थितीत उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेने मोबाईल एटीएम व्हॅनच्या माध्यमातून तालुक्यातील सालेगाव येथे गुरुवारी ( दि.२३) जवळपास १९ लाख रुपये पीक विमा वाटप करण्यात आला. या उपक्रमाचे शेतकऱ्यांतून कौतुक केले जात आहे.


                  उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून सध्या गावागावात जाऊन पीक विमा दिला जात आहे. कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे अनेकांना बँकेतील पैसे काढण्यासाठी अडचणी येत होत्या. सध्या अडचणीच्या काळात बँकेच्या मोबाईल एटीएम व्हॅनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या गावात जाऊन विमा देण्याची संकल्पना बँकेचे चेअरमन सुरेश बिराजदार यांना सुचली. या संकल्पनेनुसार त्यांनी विमा वाटप करण्याच्या सूचना दिल्या. तालुक्यातील सालेगाव येथे गुरुवारी ( दि. २३) बँकेच्या एटीएम व्हॅनच्या माध्यमातून जवळपास १५० खतेदारांना १९  लाख रुपयांचे वाटप करण्यात आले.



यावेळी शासनाच्या वतीने सांगण्यात आलेल्या सोशल डिस्टनसिंगच्या नियमांचे पालन करत हे वाटप करण्यात आले. कोरोना सारख्या संकटाच्या काळात लोकांना आपल्या गावात पीक विम्याचे वाटप झाल्यामुळे लोकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. यावेळी शाखा व्यवस्थापक  बालाजी सगर, इन्स्पेक्टर दिलीप जाधव, आलिम अत्तार, गोविंद साळुंके, गोविंद बिराजदार, सुनिल साळुंके उपस्थित होते. शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात ही रक्कम मिळाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

13 April 2020

कोरोना दहशतीच्या सावटात आशा कार्यकर्त्या करत आहेत 'आशा'दायी कार्य



प्रतिनिधी / लोहारा

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्यामुळे शासनाने प्रशासनाने संसर्ग रोखण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना करण्यात येत आहेत. सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी यात आपापली जबाबदारी पार पाडत आहेत. लोहारा तालुक्यातील धानुरी येथे ही एक रुग्ण आढळला. त्यानंतर आरोग्य विभागासह, महसूल, पोलीस विभागातील कर्मचारी, अधिकारी आपली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडत आहेत. त्यात सध्या धानुरी गावातील नागरिकांच्या सर्व्हेक्षणाची जबाबदारी आशा, अंगणवाडी कार्यकर्त्यांवर आहे. दररोज गावातील प्रत्येक कुटुंबातील सदस्यांची त्या चौकशी करत आहेत. एकीकडे कोरोना च्या दहशतीमुळे सर्वत्र दहशत पसरली असताना या सर्व आशा कार्यकर्त्या मात्र मोठ्या हिमतीने काम करत आहेत.



                तालुक्यातील धानुरी येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळला. त्यानंतर आरोग्य विभागाने तातडीने उपाययोजना सुरू केल्या. तसेच गावातील प्रत्येक कुटुंबाची माहिती मिळविण्यासाठी आशा, अंगणवाडी कार्यकर्तींकडून सर्व्हेक्षण करण्याचा निर्णय तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे यांनी घेतला. त्याप्रमाणे त्यांनी माकणी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील मंडले यांना सांगितले. हा निरोप डॉ. मंडले यांनी आशा गट प्रवर्तक यांना दिला. या पद्धतीच्या आदेशाचा फोन आल्यावर तो ऐकून सुरुवातीला त्यांना धक्काच बसला. कारण कोरोनाच्या भीतीमुळे कुणीही घराबाहेर ही पडत नाही. आणि आपण तिथे जाऊन सर्व्हे करायचा हेच त्यांच्या मनाला न पटण्यासारखे होते. परंतु त्यांनी त्यांच्या शंका तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील मंडले, समुदाय वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष मनाळे, डॉ. जाधव यांच्याशी बोलून व्यक्त केल्या. त्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाने आशा कार्यकर्तींच्या शंका दूर झाल्या. व त्या सर्व्हेक्षणाच्या कामाला लागल्या. तसेच तालुका आरोग्य अधिकारी यांनी सर्व्हेक्षणाच्या पहिल्या दिवशी सर्वांनी काय काळजी घ्यायची आहे, कुटुंबातील सदस्यांना काय माहिती विचारायची, घरी गेल्यानंतर काय काळजी घायची याबाबत मार्गदर्शन केले होते. त्याप्रमाणे त्यांनी काम सुरू केले आहे. दोन आशा कार्यकर्तींचे मिळून एक पथक आहे. हे पथक दररोज ९० ते ९५ कुटुंबांची माहिती घेत आहे. या ठिकाणी गट प्रवर्तक राजश्री साळुंके, संगीता क्षीरसागर यांच्यासह आशा कार्यकर्त्या मंगल वाडीकर, स्वाती सूर्यवंशी, वनिता सुरवसे, महानंदा चौरे, सविता नरसाळे, सुकाबाई घोडके, शशिकला कारभारी, रंजना क्षीरसागर, अर्चना क्षीरसागर, जयश्री माळी, भाग्यश्री दलाल, रेखा वाघमारे, सुकुमार रवळे, हारुबाई तिगाडे, गिता राठोड तसेच anm बुदाने, CHO जाधव, Mpw जाधव, थोरात आदी सर्वजण उत्कृष्ट पद्धतीने काम करत आहेत.



------------------

जेंव्हा धानुरीला सर्व्हे करायला जायचे आहे असा कॉल आला तेंव्हा घाबरले. थोडासा शांत बसून विचार केला. त्यावेळी वाटले की, आपणच घाबरून गेलो तर कसं हा विचार मनात आला. त्यामुळे आशा कार्यकर्तींना कॉल करून धानुरी येथे येण्यास सांगितले. तेंव्हा त्याही घाबरल्या होत्या. तेंव्हा मी त्यांना धीर देत म्हणाले की, आपल्याला समाजसेवा करायची हीच संधी आहे. त्यानंतर आम्ही धानुरी ला पोहोचलो. तिथे गेल्यावर आम्हाला मार्गदर्शन करण्यात आले. गावात सर्वत्र भीतीचे वातावरण होते. आमच्या सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेऊन आम्हाला योग्य ती साधने व सूचना देण्यात आली होती. आम्ही सर्व्हे सुरू केला. पहिल्या घरी गेलो, घराला आतून कडी होती. त्यामुळे मी आवाज दिला, ताई घरी कोणी आहे का. त्यावेळी घरातून आलेली महिला घाबरलेली दिसली. तेंव्हा मी म्हणाले, ताई घाबरू नका. फक्त घरीच राहून सहकार्य करा. कोणाला सर्दी, खोकला, ताप आहे का आदी माहिती विचारत सर्व्हे करत आहोत.
सर्व्हे करायला घराबाहेर पडताना माझ लहान बाळ मला दररोज विचारत, मम्मी तू परत केंव्हा येणार. त्यावेळी आपल्याच मनाला आवरून बाळाला सांगायचं, लवकर येते आणि कसेबसे समजावून सांगून घराबाहेर पडते. घरी परतल्यानंतर पहिल्यांदा गरम पाण्याने अंघोळ करते. तसेच गरम पाण्याने कपडेही धुते. नंतर थोड्या वेळाने लहान मुलांजवळ जाते.

संगीता क्षीरसागर,
आशा गटप्रवर्तक
-----------------

धानुरीत जाऊन सर्व्हे करायचा आहे हे ऐकल्यावर पहिल्या दिवशी आम्ही खूप घाबरलो होतो. आपण धानुरीत सर्व्हे केला तर काय होईल अशी भीती होती. परंतु त्यावेळी पती म्हणाले की, तू आरोग्य विभागात काम करतेस. घाबरायचं नाही असं म्हणत त्यांनी धीर दिला. तसेच आम्हाला डॉ. अशोक कटारे साहेबांनी मार्गदर्शन केले. त्यामुळे थोडेसे धाडस आले. मार्गदर्शन केल्याप्रमाणे आम्ही आमच्या पथकाला दिलेल्या कुटुंबांचे सर्व्हे सुरू केले. आम्हाला लागणारे ग्लोज, मास्क, सॅनिटायझर दररोज दिले जातात.  सर्व्हेक्षण करताना गावातील नागरिक ही सहकार्य करतात. तसेच आम्हाला मार्गदर्शन मिळाल्याप्रमाणे मी सर्व्हेक्षण करून घरी आल्याबरोबर पहिल्यांदा गरम पाण्याने अंघोळ करते. मग थोड्या वेळाने घरातील मुलांजवळ जाते. सुरुवातीला भीती होती पण स्वतःची काळजी घेत आत्मविश्वासाने काम करत आहे. मला सुरुवातीला वाटणाऱ्या भीतीची जागा आता आत्मविश्वासाने घेतली आहे.

राजश्री साळुंके,
आशा गटप्रवर्तक

12 April 2020

लोहारा तालुक्यातील दक्षिण जेवळी ग्रामपंचायतीच्या वतीने कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना





प्रतिनिधी / लोहारा

तालुक्यातील दक्षिण जेवळी ग्रामपंचायतच्या वतीने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना बरोबरच १४ व्या वित्त आयोगातून साथरोग उपाय योजना अंतर्गत जवळपास ३५ हजार रुपये खर्च करून प्रत्येक कुटुंबाला सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले आहे. तसेच बचत गटामार्फत तयार करण्यात आलेले तीन हजार मास्क गावातील प्रत्येक व्यक्तीला देण्यात आले आहेत. बचत गटातील महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी गावातील महिला बचतगटाला हे मास्क तयार करण्याची ऑर्डर दिली होती.

             तालुक्यातील दक्षिण जेवळी हे भूकंप पुनर्वसित झालेले जवळपास चार हजार लोकसंख्येचे गाव आहे. दक्षिण जेवळी, रुद्रवाडी व पश्चिम तांडा या तीन वस्ती मिळून दक्षिण जेवळी ग्रुप ग्रामपंचायत आहे. येथील सरपंच चंद्रकांत साखरे यांनी प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या, सामाजिक कार्यकर्ते, जिल्हा परिषद शिक्षक, ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या सहकार्याने गावातील नागरिकांना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी विविध उपाययोजना करीत आहेत. यात पुणे, मुंबई, दिल्ली आदी सारख्या बाहेरून आलेल्या नागरिकांची माहिती संकलित करून नोंदी ठेवल्या जात असून या व्यक्तींच्या घरी जाऊन प्रतिदिन आरोग्य विषयी विचारपूूस केली जात आहे. दररोज सकाळ, संध्याकाळ दवंडी व स्पीकरच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. दक्षिण जेवळी, रुद्रवाडी व पश्चिम तांडा येथील रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी मिनी ट्रॅक्टरच्या साहाय्याने सोडियम डायक्लोराईडची फवारणी करण्यात आली आहे. आता वैद्यकीय अधिकारी आर. के. शेख यांच्या मार्गदर्शनाखाली १४ व्या वित्त आयोगातून साथरोग उपाय योजना अंतर्गत जवळपास ३५ हजार रुपये खर्च करून प्रत्येक कुटुंबाला सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले आहे. यात सातशे बॉटल वाटप करण्यात आले. तसेच गावातील प्रत्येक व्यक्तीला मास्क वाटप करण्यात आले आहे. गावातील बचतगटातील महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी हे मास्क गावातील बचतगटामार्फत बनवून घेण्यात आले आहेत. जवळपास तीन हजार मास्क बनवून घेण्यात आले आहेत. यासाठी सरपंच चंद्रकांत साखरे, उपसरपंच पार्वती पाटील, ग्रामसेवक नेताजी मारेकर, ग्रामपंचायत सदस्य विवेकानंद बिराजदार, राम मोरे, प्रविण बोंदाडे, रोजगार सेवक संगप्‍पा मुखे, शिवराज चिनगुंंडे, मुख्याध्यापक देविदास साळुंके, जयश्री बिराजदार आदींनी पुढाकार घेतला.


-----------------------

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना बरोबरच १४ व्या वित्त आयोगातून साथरोग उपाययोजना अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले आहे. तसेच प्रत्येक व्यक्तीला मास्क देण्यात आले आहेत.

चंद्रकांत साखरे,
सरपंच
दक्षिण जेवळी ग्रामपंचायत

10 April 2020

ओंकार गोल्ड अँन्ड सिल्व्हर पॅलेस टेंभुर्णी, उमरगा, लोणी देवकर व लालबाग राजा मित्र मंडळ टेंभुर्णी यांच्या माध्यमातून अन्नदान



प्रतिनिधी / उमरगा

सध्या कोरोनामुळे लॉक डाऊन आहे. परराज्यातील मजुर महाराष्ट्रात विविध शहरांमध्ये मोलमजुरी करुन राहत होते. लॉक डाऊन च्या निर्णया नंतर ते मजूर आपल्या राज्यात परत पाई निघाले होते. परंतु शासनाने या लोकांना ज्या ठीकाणी आहे तेथेच राहण्यासाठी व्यवस्था केली.


 त्याअनुषंगाने टेंभुर्णी शहरात संत रोहिदास आश्रमशाळा येथे ८४ नागरिकाची राहण्याची व्यवस्था केली आहे. विविध सामाजिक संघटनांनी, संस्थांनी पुढे येऊन अशा नागरिकांची मदत करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.



 त्यानुसार ओंकार गोल्ड अँन्ड सिल्व्हर  पॅलेस टेंभुर्णी, उमरगा, लोणी देवकर व लालबाग राजा मित्र मंडळ टेंभुर्णी यांच्या माध्यमातून या नागरिकांची एक दिवसाची जेवणाची व्यवस्था करण्यात आली.



यावेळी टेंभुर्णी च्या मंडलाधिकारी मनिषा लकडे, जाधव भाऊसो, मदत देताना ग्रा .प. सदस्य औदुंबर देशमुख, शिवसेनेचे तालुका प्रमुख मधुकर देशमुख, ओंकार गोल्ड अँन्ड सिल्व्हर पॅलेस चे एम.डी. विजयकुमार आ. पाटील, पत्रकार मित्र सतिश काळे, भिमराव बरगंडे सर, विशाल आटकळे, विलास काका देशमुख, प्रमोद ( बाप्पा )देशमुख, सुधीर पाटील, किशोर भोरे, कोतवाल दिपक काळे, धर्मराज कुटे आदी उपस्थित होते.
               या संकटकाळात बेघर कुटुंबांना प्रत्येकांनी होईल तेवढी मदत करावी असे आवाहन यावेळी उपस्थितांनी केले.

06 April 2020

लोहारा तालुक्यातील नागराळ येथील ग्रामस्थांनी मुख्यमंत्री निधीत पाठविण्यासाठी जमा केले रुपये अकरा हजार



प्रतिनिधी / लोहारा

कोरोना विरुद्ध लढा देण्यासाठी शासनास आर्थिक मदत करावी या उद्देशाने लोहारा तालुक्यातील नागराळ येथील ग्रामस्थांनी गावातील प्रत्येक नागरीकांकडून प्रत्येकी १० रुपये प्रमाणे अकरा हजार रुपये जमा केले असून ते मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्यात येणार आहेत.



               राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असल्याने संचारबंदी करुन सिमा सिल करण्यात आल्या आहेत. राज्य सरकार अडचणीत असल्याने कोरोनाशी लढण्यासाठी मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड १९ या नावाने नवे बँक खाते सुरु करण्यात आले आहे. या खात्यात जनतेने सढळ हाताने मदत करावी असे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक दानशुर पुढे येत आहेत. या अनुषंगाने नागराळ ग्रामस्थांनी शासनाला मदत करण्यासाठी कुटूंबातील प्रत्येक व्यक्तीने दहा रुपये द्यावे असे आवाहन केले. त्यानुसार नागरीकांनी स्वत:हुन पैसे जमा केले. एकूण अकरा हजार रुपये एवढा निधी जमा झाला असून हे पैसे मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड १९ साठी देण्यासाठी रक्कम ट्रान्सफर करणार असल्याचे सरपंच रीतू कुलदिप गोरे, जेष्ठ नागरीक नारायण गोरे, पोलीस पाटील तानाजी माटे यांनी सांगितले आहे. गावची लोकसंख्या ८८० एवढी असलेल्या गावाने शासनास आर्थिक मदत करण्यासाठी राबविलेला हा उपक्रम सर्व गावांनी राबविणे आवश्यक आहे.