29 March 2019

डॉ. विजय बेडदुर्गे यांचा डॉ. श्रीगिरे यांच्या वतीने सत्कार



लोहारा प्रतिनिधी -

उमरगा येथील डॉ. विजय बेडदुर्गे (एम.डी. चेस्ट) यांना वैद्यकीय सेवा व सामाजिक योगदानाबद्दल तामिळनाडुच्या ग्लोबल इकॉनॉमी प्रोग्रेस अँड रिसर्च असोसिएशनच्या वतीने भारतरत्न इंदिरा गांधी सुवर्ण पदक प्रदान करण्यात आले. त्यानिमित्त डॉ. विजय बेडदुर्गे यांचा उमरगा येथे सत्कार करण्यात आला. यावेळी लोहारा येथील डॉ. हेमंत श्रीगिरे माजी उपसरपंच व्यंकटराव घोडके, उत्तम  पाटील, प्रा. अशोक दुधभाते, जी.के घोडके, खंडु सरवदे आदी उपस्थित होते.

24 March 2019

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील मतदान अधिकार्‍यांचे प्रथम प्रशिक्षण उत्साहात संप्पन्न



     
उस्मानाबाद (दि. २३)

२४२- उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील मतदान अधिकार्‍यांचे प्रथम प्रशिक्षण शनिवारी दि.२३ मार्च रोजी उस्मानाबाद येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे उत्साहात पार पडले.
        हे प्रशिक्षण दोन सत्रांमध्ये आयोजित करण्यात आले होते. पहिल्या सत्रामध्ये आकराशे मतदान अधिकारी हजर होते तर दुसऱ्या सत्रात एक हजार सत्तर मतदान अधिकारी हजर होते. प्रथम सत्रात पंचेवीस क्षेत्रीय अधिकारी व दुसऱ्या प्रशिक्षण सत्रात एकूण वीस क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते.
      प्रथम प्रशिक्षण हे सकाळी ९.०० ते दुपारी १.०० या कालावधीत पूर्ण करण्यात आले तर दुसरे प्रशिक्षण दुपारी दोन ते सायंकाळी सहा या कालावधीत पूर्ण करण्यात आले. या प्रशिक्षणाच्या दरम्यान  मतदान अधिकारी यांची हजेरी घेण्यासाठी सकाळच्या सत्रात २४ व दुपारच्या सत्रात २४ टेबल लावण्यात आले होते. त्यानंतर टपाली मतदानासाठी सर्व मतदान अधिकाऱ्यांची सोय व्हावी, यासाठी २४ स्वतंत्र टेबल लावण्यात आले होते तसेच त्यांना त्यांची नावे सहज शोधता यावीत याकरिता त्या ठिकाणी मतदार सहाय्यता केंद्रही उभारण्यात आले होते. त्या ठिकाणी ऑनलाइन नाव शोधण्यासाठी संगणक व्यवस्था तसेच  मतदारयादीच्या चार प्रतीही ठेवण्यात आल्या होत्या. प्रशिक्षणासाठी  उपस्थित मतदान अधिकार्‍यांसाठी पाणी व अल्पोपहाराची व्यवस्थाही करण्यात आली होती. याशिवाय फिरते शौचालय (स्त्री व पुरुष), त्यांच्या वाहनांसाठी पार्किंग, आरोग्य पथक व सुरक्षिततेचा उपाय म्हणून अग्निशमन दल, वाहतूक पोलीस व शहर पोलीस स्थानकाचे पोलीस अधिकारी उपस्थित होते.
      प्रशिक्षणाच्या दरम्यान सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्री. चेतन गिरासे यांनी उपस्थित मतदान अधिकार्‍यांना दृकश्राव्य व संगणकीय सादरीकरणाद्वारे प्रशिक्षण दिले व  या प्रशिक्षणासाठी दोन मोठे एलईडी स्क्रीनही लावण्यात आले होते.
       त्यानंतर प्रत्येक प्रशिक्षणार्थी  मतदान अधिकार्‍याला प्रत्यक्ष वर्गामध्ये नेऊन त्या ठिकाणी क्षेत्रीय अधिकारी व  मास्टर ट्रेनर यांनी त्यांना सखोल व सूक्ष्मरित्या प्रशिक्षण दिले. त्या प्रशिक्षणात मतदान अधिकारी यांचे कार्य, कर्तव्य,जबाबदारी आणि ईव्हीएम कसे हाताळावे याचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देण्यात आले. दोन्ही सत्रांमध्ये याच प्रकारे प्रशिक्षण देण्यात आले.
       या प्रशिक्षणाला जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी श्रीमती दीपा मुधोळ-मुंडे यांनी स्वत: भेट देऊन संपूर्ण व्यवस्थेची पाहणी केली.             
       ही प्रशिक्षण कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी तहसिलदार विजय राऊत, श्रीमती मंजुषा लटपटे,नायब तहसिलदार मुस्तफा खोंदे, श्री. अस्लम जमादार,श्री. रवि राज जाधव, श्रीमती प्रियांका लोखंडे श्री. संतोष पाटील यांनी विशेष सहकार्य केले.

18 March 2019

लोहारा तालुक्यातील अचलेर येथे फिनिक्स फाउंडेशन तर्फे करीअर मार्गदर्शन मेळावा





लोहारा प्रतिनिधी -

लोहारा तालुक्यातील अचलेर येथे फिनिक्स कोचिंग क्लासेस तर्फे विद्यार्थी, युवक, युवतीसाठी  करीअर मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून पूणे येथील तज्ञ मोटीवेशनल ट्रेनर किसन गवळी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सुभाष माने, फिनिक्स फाऊंडेशन चे संचालक जगदीश सुरवसे, अमित लोखंडे, आएशा पटेल, गौरी धनशेट्टी, सोनाली करंडे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गौरी धनशेट्टी यांनी केले. यावेळी मार्गदर्शक किसन गवळी यांनी विद्यार्थ्यांना १० वी व १२ वी नंतर काय करावे, कोणते शिक्षण घ्यावे, स्पर्धा परीक्षेची तयारी कसे करावे व ध्यानधारणा करण्याचे महत्व अशा अनेक विषया बद्दल मार्गदर्शन केले. त्यानंतर सुभाष माने, जगदीश सुरवसे यांनीही मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आएशा पटेल यांनी तर आभार सोनाली करंडे यांनी मानले. या कार्यक्रमास विदयार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

12 March 2019

लोहारा येथील डॉ. रुपाली श्रीगिरे यांना सह्याद्री स्त्री शक्ती पुरस्कार प्रदान



लोहारा प्रतिनिधी -

उस्मानाबाद येथील सह्याद्री हॉस्पिटलच्या वतीने देण्यात येणारा सह्याद्री स्त्री शक्ती पुरस्कार शहरातील डॉ. रुपाली श्रीगिरे यांना प्रदान करण्यात आला आहे. याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.
                  आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉ. रुपाली श्रीगीरे यांना सह्याद्रीे स्री शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉ. श्रीगीरे यांनी २०० हुन अधिक दाम्पत्याना व्यंध्यत्व निवारणासाठी योग्य उपचार केले आहेत. तसेच गरोदर महिलांसाठी, किशोरवयीन मुलींसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीरे आयोजित केली जातात. त्यांच्या या सर्व कार्याची दखल घेऊन यंदाचा स्त्री शक्ती पुरस्कार देवुन त्यांना सन्मानित करण्यात आले.
                 या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. ए.डी. जाधव (सोलापुर) होते. तर प्रमुख पाहुणे  म्हणुन जिल्हा पोलीस उपअधिक्षक अनुराधा गुरव, सह्याद्री मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. वसुधा दिग्गज दापके देशमुख, विमल पानसे आदी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ.वसुधा दिग्गज दापके देशमुख यांनी केले. सुत्रसंचालन मयुरी शेळके यांनी तर निलेश प्रधान यांनी आभार मानले. या कार्यक्रमास सह्याद्रीचे प्रशासकीय अधिकारी संतोष पवार, डॉ. रमेश दापके देशमुख, सौ. शंकुतला दापके देशमुख, डॉ. दिग्गज दापके देशमुख, बिल गेट्स कॉलेजचे प्राचार्य अर्शद रजवी, अंजुमन हेल्थ वेल्फेरचे संस्थापक फेरोज पल्ला, मानवता संदेश ग्रुपचे अर्शद  सय्यद,बिलाल रजवी, दादासाहेब कोरके, गजानन पाटील,डॉ.हेमंत श्रीगिरे,गणेश कुलकर्णी,उत्तम पाटील, रघुवीर घोडके,व्यंकट घोडके यांच्यासह लोहारा शहरातील महिला वउपस्थित होते. शिक्षण,आरोग्य, क्रिडा, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना दरवर्षी स्त्री शक्ती पुरस्कार देवुन सन्मानित करण्यात आले.

09 March 2019

लोहारा येथील न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलमधे जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील यशस्वी महिलांचा सत्कार सोहळा



लोहारा प्रतिनिधी - 

लोहारा येथील न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलमधे शुक्रवारी (दि. 8 ) जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील यशस्वी महिलांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. रुपाली हेमंत श्रिगिरे या होत्या. या गुंजोटीचे माजी सरपंच शंकर पाटील, मोहन पाटील, सविता जाधव, सरिता बहनजी, प्राचार्य शहाजी जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
                   शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल लोहारा येथील वसंतराव पाटील हायस्कूलच्या मुख्याध्यापिका उर्मिला वसंतराव पाटील, वैद्यकीय क्षेत्रातल्या कार्याबद्दल स्पर्श रुग्णालय सास्तुर येथील डॉ. मयुरी आम्लेश्वर गारठे, राजकीय क्षेत्रात नागराळच्या महिला सरपंच रितू कुलदीप गोरे, सामाजिक क्षेत्रात टाकी तोरंबा येथील विमल शिवाजी जाधव यांनी स्वतःची किडनी पतीला दान करून समाजासमोर एक आदर्श ठेवल्याबद्दल या सर्वांचा स्कूलतर्फ मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देवन यथोचित सत्कार करण्यात आला. यानंतर उपस्थित सर्व महिला पालकांसाठी संगीत खुर्ची स्पर्धा घेण्यात आले. या स्पर्धेत रत्नमाला जाधव प्रथम व डॉ. रुपाली श्रीगिरे द्वितीय आल्या. या दोन्ही विजेत्यांना स्कूलचे प्राचार्य जाधव यांच्या हस्ते भेटवस्तू देण्यात आल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन ललिता रोडगे यांनी तर पूजा दालिंबकर यांनी आभार मानले. यावेळी महिला मोठ्या संख्यने उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सिद्धेश्वर सुरवसे, प्रकाश तोडकरी, हेडे, विशाल मुनाळे, आदीनीं परिश्रम घेतले.

08 March 2019

लोहारा येथील कब्बडी स्पर्धेत ओम पाटील युवा मंच लोहारा या संघाने पटकाविला प्रथम क्रमांक




लोहारा प्रतिनिधी -

लोहारा येथील महाशिवरात्री महोत्सवानिमित्त आयोजित कब्बडी स्पर्धेत ओम पाटील युवा मंच लोहारा या संघाने प्रथम, पूर्व जेवळी येथील जय सेवालाल या संघाने द्वितीय तर सोलापूर येथील रणझुंजार या संघाने तृतीय क्रमांक पटकाविला.
            लोहारा येथील महाशिवरात्री महोत्सवानिमित्त लोहारा हायस्कुल च्या मैदानावर बुधवारी ( दि. 6) रात्री कब्बडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत एकूण 28 संघांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेदरम्यान अनेक सामने लक्षवेधी ठरले. यात ओम पाटील युवा मंच लोहारा या संघाने प्रथम ( रु. 5000), पूर्व जेवळी येथील जय सेवालाल या संघाने द्वितीय (रु. 3000) तर सोलापूर येथील रणझुंजार या संघाने तृतीय (रु. 2100) क्रमांक पटकावला.
            रात्री 8 च्या सुमारास सुरू झालेल्या या स्पर्धा पहाटेपर्यंत सुरू होत्या. स्पर्धा पाहण्यासाठी शहर व परिसरातील क्रीडाप्रेमींनी गर्दी केली होती. माजी पंचायत समिती सदस्य चंद्रकांत पाटील, दयानंद गिरी, जिंदावली शेख, के डी पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी गोपाळ सुतार, नगरसेवक श्रीनिवास फुलसुंदर, विरेश स्वामी, सतीश ढगे, सुनील देशमाने, भीमाशंकर डोकडे, राजपाल वाघमारे, महेश कुंभार, विलास मुळे, प्रमेश मुळे, अमोल बिराजदार, किरण पाटील, ओम पाटील, उदय कुलकर्णी, योगीराज सोळसे, परमेश्वर चिकटे, बळी रनशूर, अंकुश परीट, अप्पू स्वामी आदींसह पदाधिकारी, तरुण उपस्थित होते.

07 March 2019

लोहारा येथील कुस्ती स्पर्धेत सिंदफळ येथील बबलु दनके यांनी पटकाविला लोहारा केसरी किताब



लोहारा प्रतिनिधी -

लोहारा येथे महाशिवरात्री महोत्सवा निमित्त आयोजित कुस्ती स्पर्धेत अंतिम कुस्तीमध्ये बाजी मारत सिंदफळ येथील बबलु दनके यांनी लोहारा केसरी किताब पटकाविला आहे. सिंदफळ येथील बबलु दनके व टाका येथील अक्षय शेळके यांच्यात अंतिम कुस्ती झाली.
               लोहारा येथील महाशिवरात्री महोत्सवानिमित्त मंगळवारी ( दि. 5) दुपारी पाचच्या सुमारास जंगी कुस्ती स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. या कुस्ती स्पर्धेसाठी तालुक्यातील पैलवानांसह बाहेर गावाहून शेकडो पैलवान सहभागी झाले होते. या कुस्ती स्पर्धेतील अंतिम कुस्ती ही सिंदफळ येथील बबलु दनके व टाका येथील अक्षय शेळके यांच्यात झाली. या लक्षवेधी कुस्तीत सिंदफळ येथील बबलु दनके यांनी बाजी मारली. व लोहारा केसरी किताब पटकाविला. त्यानंतर अंतिम कुस्ती विजेता पैलवान बबलु दनके यास २१ तोळे चांदीची महादेवाची पिंड चनबसप्पा जट्टे यांच्या वतीने देण्यात आली. यावेळी माजी पं स सदस्य चंद्रकांत पाटील, शंकर जट्टे, जालिंदर कोकणे, के.डी.पाटील, अभिमान खराडे, विठ्ठल वचने, श्रीनिवास माळी, विलास मुळे,अमोल बिराजदार, माणिक चिकटे, सतीश ढगे, विरेश स्वामी, महेश कुंभार, ओम पाटील, शहाजी जाधव, संभाजी पोतदार, शंकर मुळे, मोहन वचने, हरी वाघे, अंकुश परीट, बबन रणशुर, दिलीप पाटील, आदी उपस्थित होते.

लोहारा बसस्थानकात लोकसेवा फाऊंडेशन तुळजापूर च्या वतीने स्वच्छता मोहीम





लोहारा प्रतिनिधी -

लोहारा येथील बसस्थानकात मंगळवारी ( दि. 5) लोकसेवा फाऊंडेशन तुळजापूर च्या वतीने स्वच्छता करून परिवहन मंडळाचा निषेध व्यक्त केला.
            लोकसेवा फाउंडेशन तुळजापूरचे अध्यक्ष पंकज शहाणे हे मंगळवारी लोहारा बसस्थानक येथे आले होते. त्यावेळी लोहारा येथील बसस्थानकमध्ये खूपच विदारक परिस्थिती दिसली. प्रचंड धुळीने माखलेले बसस्थानक व संपूर्ण बसस्थानक मध्ये पाण्याचा एक थेंब ही नाही , पाण्याची कोणतीच व्यवस्था नाही. प्रवासी हतबल , बसस्थानक प्रशासन सुस्त व बसस्थानक बकाल अशी अवस्था त्यांना दिसली. त्यामुळे या बसस्थानकाची स्वच्छता करण्याचे त्यांनी ठरवले. लोकसेवा फाउंडेशनच्या वतीने पंकज शहाणे, स्नेहल शहाणे यांनी संपूर्ण बसस्थानक झाडून काढले. तसेच उपस्थित प्रवाशांना व प्रशासनास स्वछता संदेश दिला. बसस्थानकात पाण्याची कोणतीच व्यवस्था नसल्याने प्रवाशांचे हाल बघून लोहारा बस्थानक परिवहन चा त्यांनी निषेध केला.
               याबाबत लोकसेवा फाऊंडेशन चे अध्यक्ष पंकज शहाणे यांना विचारला असता ते म्हणाले की, लोहारा बसस्थानकात खूप अस्वच्छता होती. आम्ही स्वच्छता केली आहे. तसेच बसस्थानकात प्रवाशांना पिण्यासाठी पाणीही नाही. हे खूप गंभीर आहे. त्यामुळे याबाबत मी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन परिस्थिती सांगणार आहे.

04 March 2019

लोहारा तालुक्यातील जेवळी येथील शारदा इंग्लिश स्कूल मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न






लोहारा प्रतिनिधी -

लोहारा तालुक्यातील जेवळी येथील शारदा इंग्लिश स्कूल मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी लहान चिमुकल्याना विविध कलाप्रकार सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
                 जेवळी येथील गुरू सिद्धेश्वर विरक्त मठाचे मठाधिपती मनिप्र गंगाधर महास्वामी  यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी हभप सिद्धलिंग महाराज, सरपंच मोहन पणुरे, उपसरपंच मल्लिनाथ डिग्गे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्रीमंत कारभारी, धनराज हावळे, प्रा. किशोर वाघमारे, प्रा. शिंदे, डाॅ. संतोष ढोबळे, गुंडाप्पा कारभारी, बाबूराव ढोबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. विविध स्पर्धेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना यावेळी स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरवण्यात आले. यावेळी बाल चिमुकल्यानी विविध प्रकारच्या गीतांवर नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच पुलवामा शहिदांना श्रद्धांजली म्हणून ए वतन ए वतन हे गीत सादर केले. या कार्यक्रमासाठी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पोतदार यांनी तर कल्याणी ढोबळे यांनी आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य मंजुशा कुलकर्णी, ए. एस. गाडेकर, टी. पी. दीक्षित, एम. आर. भोसले, के. एस. ढोबळे यांच्या सह सतिश ढोबळे, परमेश्वर ढोबळे, अप्पू ढोबळे, सोमनाथ ढोबळे, नागेश ढोबळे, बसवराज ढोबळे यांनी परिश्रम घेतले.

02 March 2019

लोहारा येथील ग्रामदैवत शंभू महादेव यांच्या महाशिवरात्री यात्रा महोत्सवाला सोमवार ( दि. ४) पासून सुरुवात - सलग चार दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन



लोहारा प्रतिनिधी -

लोहारा येथील ग्रामदैवत शंभू महादेव यांच्या महाशिवरात्री यात्रा महोत्सवाला सोमवार ( दि. ४) पासून सुरुवात होत आहे. सलग चार दिवस धार्मिक, सांस्कृतिक, क्रिडा यासह विविध भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
        या यात्रेच्या पहिल्या दिवशी सोमवारी (दि. ४) लोहारा शहरातील जगदंबा मंदिर ते महादेव मंदिरापर्यंत सकाळी ९ वाजता हरिहर भजनी मंडळाचे वारकरी, ग्रामस्थ, युवकांच्या उपस्थितीत टाळ मृदुंगाच्या जयघोषात शोभायात्रा व शंभू महादेवाच्या पालखीची जंगी मिरवणूक काढण्यात येणार आहे. सकाळी १० वाजता महिलांसाठी रांगोळी स्पर्धा, त्यानंतर दुपारी १२ वाजता भारुडाचा कार्यक्रम होणार आहे. दुसऱ्या दिवशी मंगळवारी (दि.५) सकाळी १० वाजता शिवभक्त संगमेश्वर बिराजदार महाराज ( वलांडी) यांचे काल्याचे किर्तन, दुपारी १ वाजता भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे. सायंकाळी ४ वाजता जंगी कुस्ती स्पर्धांचा फड रंगणार असून या स्पर्धेतील शेवटची कुस्ती जिंकणाऱ्या मल्लास २१ तोळे चांदीची महादेवाची पिंड देण्यात येणार आहे. तिसऱ्या दिवशी बुधवारी (दि. ६) सकाळी ७ वाजता मॅरेथॉन स्पर्धा, सकाळी १० वाजता बुद्धीबळ स्पर्धा, सायंकाळी ६ वाजता पुरुषांसाठी भव्य खुल्या कबड्डी स्पर्धा होणार आहेत. तसेच चौथ्या दिवशी गुरुवारी (दि. ७) सायंकाळी ६ वाजता हायस्कुल लोहारा शाळेच्या मैदानावर भव्य खुल्या राज्यस्तरीय खुल्या नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांसाठी सव्वा लाखांपेक्षा अधिक रक्कमेची बक्षिसे व चषक विजेत्या स्पर्धकांना देण्यात येणार आहेत. तरी या यात्रामहोत्सव व विविध धार्मिक, क्रिडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ लोहारा तालुक्यासह परिसरातील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच स्पर्धांसाठी 8850104398, 9130661111, 9420332232, 8087123803, 7972083400 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

शिवजयंती मनामनात, शिवजयंती घराघरात या उपक्रमांतर्गत केलेल्या उत्कृष्ठ कार्याबद्दल तानाजी खापरे पाटील यांचा मा. शरद पवार साहेब यांच्या हस्ते पुणे येथे सत्कार



लोहारा प्रतिनिधी -

शिवजयंती मनामनात, शिवजयंती घराघरात या उपक्रमांतर्गत उत्कृष्ठ कार्य केल्याबद्दल उस्मानाबाद तालुक्यातील बेंबळी येथील तानाजी खापरे यांचा माजी केंद्रीय कृषिमंत्री मा. शरदचंद्र पवार साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
            अखिल भारतीय शिवजन्मोत्सव समिती, पुणे यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात राज्यभरातील विविध मान्यवरांचा त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल यथोचित सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी माजी केंद्रीय कृषिमंत्री मा. खा. शरदचंद्र पवार साहेब, ज्येष्ठ इतिहास संशोधक मा. म. देशमुख, उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, विकास पासलकर, माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेचे लेखक प्रताप गंगावणे, स्वराज रक्षक संभाजी या मालिकेत छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारणारे शंतनू मोघे यांची प्रमुख उपस्थिती होती.
             या कार्यक्रमात शिवजयंती मनामनात, शिवजयंती घराघरात या उपक्रमांतर्गत उत्कृष्ठ कार्य केल्याबद्दल उस्मानाबाद तालुक्यातील बेंबळी येथील तानाजी खापरे यांचा माजी केंद्रीय कृषिमंत्री मा. शरदचंद्र पवार साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन समितीचे अध्यक्ष विकास पासलकर यांनी केले होते. याबद्दल तानाजी खापरे पाटील यांचे अभिनंदन होत आहे.

01 March 2019

2 व 3 मार्चला विशेष मतदार नाव नोंदणी - वंचित राहिलेल्या मतदारांनी संधीचा लाभ घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन


उस्मानाबाद , दि.१ -
लोकसभा निवडणुकीत एकही नागरिक मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी निवडणूक आयोगाने कंबर कसली आहे.अंतिम मतदारयादी जाहीर केल्यानंतर गत आठवड्यात आयोगाने दोन दिवसांची विशेष नोंदणी मोहीम घेतल्यानंतर पुन्हा चालू आठवड्यात शनिवारी आणि रविवारी (२ व ३मार्च)दोन दिवस विशेष पुनरिक्षण मोहीम घेण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे वंचित असलेल्या मतदारांनी ही शेवटची संधी असल्याचे समजून तात्काळ नोंदणी करावी,असे आवाहन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी केले आहे. १जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर अंतिम मतदारयाद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.शिवाय २३ व २४ फेब्रुवारीला विशेष मोहीमही राबविण्यात आली आणि आता पुन्हा २ व ३ मार्चला ही मोहीम पुन्हा राबविण्यात येणार आहे.

*मतदारयादीतील नावाची खातरजमा करून घ्यावी*
मतदार ओळखपत्र आवश्यक असून मतदाराचे नाव यादीत असेल तरच मतदान करता येणार आहे.मतदार ओळखपत्र असले तरी नागरिकांनी मतदारयादीत आपल्या नावाची खातरजमा करून घ्यावी.विशेषतः १८ वर्षे पूर्ण केलेल्या युवकांनी,पात्र दिव्यांग नागरिकांनी आणि महिलांनी मतदार नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

*ऑनलाइन नाव नोंदणीची सुविधाही उपलब्ध*
मतदारांच्या सोयीसाठी www.nvsp.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच अधिक माहिती www.ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदारांच्या सुविधेसाठी १९५० हा टोल फ्री क्रमांकही उपलब्ध करून देण्यात आला आहे.

*महिला मतदारांनी मतदार नाव नोंदणी तसेच मतदारयादीतील आपल्या नावाची खात्री करून घेण्याचे आवाहन*
येणाऱ्या निवडणुकीमध्ये महिला मतदारांनीही मतदानाचा आपला हक्क बजावावा, यासाठीदेखील निवडणूक आयोग तसेच जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. त्यादृष्टीने महिला मतदारांनीही मतदारयादीतील आपल्या नावाची खात्री करावी आणि आपले नाव मतदारयादीत नसल्यास आपल्या नावाची नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी केले आहे.

*राजकीय पक्षांना सहभागाचे आवाहन*
मतदान केंद्राच्या ठिकाणी निरक्षर मतदारांसाठी मतदार यादीचे वाचन करण्यात येणार आहे. गावांमध्ये मतदार यादीचे चावडीवाचनही करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची माहिती सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना देण्यात आली आहे. प्रत्येक मतदान केंद्राकरिता त्यांच्या मतदान केंद्रस्तरीय सहाय्यकाची नेमणूक करण्यात येणार आहे.मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या मदतीने मतदारयाद्या अधिक अचूक व परिपूर्ण करण्यासाठी निवडणूक यंत्रणेला सहकार्य करावे,असे आवाहनही जिल्हा प्रशासनाकडून राजकीय पक्षांना करण्यात आले आहे.