31 May 2020
सौ. रुपालीताई चाकणकर - महाराष्ट्रातील महिलांचं हक्काचं लाडकं नेतृत्व
गेली चारपाच महिन्याची तशी माझी ओळख. साधारणपणे जानेवारी च्या शेवटी हळदीकुंकुवाच्या निमित्ताने अनोळखी असताना देखील मी घेतलेल्या हळदी कुंकुवाच्या पहिल्याच कार्यक्रमाला ताईंना आमंत्रित केलं लागलीच त्यांनी होकार दिला. सुरुवातीला येतील की नाही म्हणुन काळजी वाटत होती, त्यांच्या व्यस्त कार्यक्रमामधून वेळ काढुन आणि त्यात मी अनोळखी पण सर्वसामांन्य कार्यकर्त्यांना सन्मान द्यायचा ताईचा स्वभावगुन. त्या अनोख्या भेटीनंतर ताईंनी दिलेल्या रिस्पेक्ट मुळे ताईविषयी माझ्या मनात वेगळच स्थान निर्माण झालं, लागलीच महिनाभरात ताईंनी सर्व कार्यकर्त्याशी एक वेळेस भेट घेतली त्या भेटी दरम्यान ताईच्या नेतृत्वाची झलक मला बघण्याचं भाग्य लाभलं. कार्यकर्त्यांना स्वतःच्या भावंडासारखं प्रेम करणारं, त्यांचा मान सन्मान करणारं, महाराष्ट्रातील मी पाहीलेलं महिलांमधील पहिलंच नेतृत्व... आशा या लाडक्या नेतृत्वाखाली पक्षाचं काम करत मला ताईंमुळे महाराष्ट्रभर स्वतःची ओळख निर्माण करता आली. आज जेवढं काही मला मनोमनताईसाठी करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करतेय हे करत असताना माझं नेतृत्वानं खुप मोठी भरारी राजकीय, सामाजिक क्षेत्रात घ्यावी हा एवढाच उद्देश आजतरी किमान माझ्या डोळ्यासमोर आहे आणि त्यासाठी जे काही माझ्या परिने मला करता येईल ते सर्व काही मी ताईसाठी करतेय. महाराष्ट्रातील महिला असो की युवक-युवती ताईंना यापेक्षा वेगळ्या आणि महत्वाच्या जबाबदारीवर पाहण्यास इच्छुक आहेत. त्यासाठी कारण ही आहे महाराष्ट्रभर दौरे करुन लाखो कार्यकर्ते ताईंनी जे पक्षासोबत जोडलेत जिथं पोहचणं शक्य झालं नाही आशा कार्यकर्त्यासोबत ताईंनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून संपर्क ठेवत नेहमी कार्यकर्त्यांशी आपली नाळ जोडलीय एवढया उंचीवर असुन देखील प्रत्येक छोटया मोठया कार्यकर्त्यांना नेहमीच मोठया बहिणीची माया ताईंनी दिलीय आशा या अष्टपैलू आभ्यासु व्यक्तीमत्व असणाऱ्या आमच्या ताईचा आज वाढदिवस त्या निमित्त ईश्वर त्यांना खुप सारं निरोगी आरोग्य आणि उदंड असं आयुष्य देओ हीच प्रार्थना!
सौ. गीता प्रशांत पवार
उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवती काँग्रेस पश्चिम हवेली तालुका, पुणे
रुपालीताई चाकणकर युवा मंच महाराष्ट्र
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतिश चव्हाण यांची लोहारा ग्रामीण रुग्णालयास भेट
प्रतिनिधी / लोहारा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी शनिवारी (दि. ३०) लोहारा ग्रामीण रूग्णालयास भेट देऊन तेथील अडीअडचणी जाणून घेतल्या. तसेच याठिकाणी लागणार्या आवश्यक त्या सोई-सुविधा तात्काळ उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी संबंधीत अधिकार्यांना दिल्या.
आ. सतीश चव्हाण यांनी लोहारा ग्रामीण रूग्णालयाची पाहणी करून याठिकाणी कोण कोणत्या वस्तुंचा तुटवडा जाणवत आहे, सध्या तातडीने कोण कोणत्या वस्तुंची गरज आहे, कर्मचार्यांची संख्या पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे का, कर्मचार्यांना काम करताना कोणत्या अडचणी येत आहेत का, एन-९५ मास्क व पीपीई कीट उपलब्ध आहेत का आदीसंदर्भात वैद्यकीय अधिकारी डॉ. गोविंद साठे यांच्याशी चर्चा केली. यावेळी याठिकाणी अनेक आवश्यक वस्तूंचा तुटवडा असल्याचे आ. सतीश चव्हाण यांच्या लक्षात येताच त्यांनी उस्मानाबाद जिल्हा रूग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजकुमार गलांडे यांच्याशी फोनव्दारे चर्चा करून लोहारा ग्रामीण रूग्णालयास अत्यावश्यक वस्तूंची तात्काळ
पूर्तता करण्याची मागणी केली. तसेच मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोहारा येथील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील दीड महिन्यांपासून क्वारंटाईन केंद्र उभारण्यात आले आहे. याठिकाणी देखील आ. सतीश चव्हाण यांनी भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी नायब तहसीलदार रणजित शिराळकर, लोहरा नगरपंचायतचे मुख्याधिकारी गजानन शिंदे, वैद्यकीय अधिकारी डॉ. गोविंद साठे, सतीश इंगळे, नितीन बागवे, प्राचार्य डॉ. विरभद्रेश्वर स्वामी आदी उपस्थित होते.
30 May 2020
उमरगा येथे जिल्हा बँक कर्मचाऱ्यांचे वतीने रक्तदान शिबीर संपन्न
प्रतिनिधी / उमरगा
सध्या कोरोनामुळे जनजीवन ठप्प झाले आहे. कोरोनाचा संसर्ग वाढल्यास रक्तदान करणे अवघड जाईल. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी रक्तदान आयोजीत करुन येणाऱ्या काळाचा सामना करण्यासाठी आपण सज्ज असले पाहिजे तसेच रक्ताची कमतरता झाल्याने रक्तदानाची विनंती श्रीकृष्ण रक्तपेढीने केली होती. त्या अनुशंगाने उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांनी राष्ट्रवादी रक्तदान अभियान सुरू केले आहे. उमरगा तालुक्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मचाऱ्यांनाही याबाबत आवाहन केले होते. त्यानुसार उमरगा तालुक्यातील जिल्हा बँक कर्मचाऱ्यांच्या वतीने शनिवारी ( दि. ३०) उमरगा शाखेत रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक कर्मचाऱ्यांसह इतरांनीही सकाळपासुनच रक्तदानासाठी उमरगा बँक शाखेत सुरुवात केली होती. रक्तदानावेळी सोशल डिस्टन्सचे भान ठेवत एक-एक जण जाऊन रक्तदान केले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन प्रा. बिराजदार, भाऊसाहेब बिराजदार बँकेचे माजी अध्यक्ष सुनील माने यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी श्रीकृष्ण रक्तपेढीचे डॉ. सागर पतंगे, प्रा. अभयकुमार हिरास, लॅब टेक्नीशीएन बाळु पवार उपस्थित होते. या शिबिरात बालाजी सगर, देविदास शिंदे, कपिल मस्के, शिवराज मदने, स्नेहल दुर्गे, अजय सूर्यवंशी, शिवाजी पाटील, नरहरी बारसे, प्रदीप गावकरे, सचिन केशवशेट्टी, अमोल सगर आदी कर्मचारी व नागरीकांनी रक्तदान केले.
लोहारा तालुक्यातील दक्षिण जेवळी येथील रक्तदान शिबिरात ५१ रक्तदात्यांनी केले रक्तदान
प्रतिनिधी / लोहारा
सध्या रक्ताचा तुटवडा निर्माण होत असल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत लोहारा तालुक्यातील दक्षिण जेवळी येथील युवकांनी गुरुवारी ( दि. २८) आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात एक्कावन्न नागरिकांनी रक्तदान केले.
जिल्हा रूग्णालय उस्मानाबाद व स्पर्श ग्रामीण रुग्णालय सास्तूर यांच्या संयुक्त विद्यमाने महादेव मंदिरात या रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराचे उद्घाटन स्पर्श ग्रामीण रूग्णालयाचे प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच चंद्रकांत साखरे, जिल्हा रूग्णालय रक्त संकलन कक्षातील गणेश साळुंखे, किशोर म्हेत्रे, दिनकर सुपेकर, स्पर्श रूग्णालयातील लँब टेक्निशियन जगदीश कुलकर्णी, फार्मासिस्ट उज्ज्वल कारभारी, महादेव कारभारी उपस्थित होते. यावेळी बोलताना स्पर्श ग्रामीण रुग्णालयाचे प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी यांनी कोरोनाबाबत काय काळजी घ्यायला हवी याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी सेवानिवृत्त मुख्याध्यापक बी.एम.बिरादार, हभप कमलाकर कोळी, हभप हणमंतप्पा भुसाप्पा, अशोक साखरे, काशिनाथ घोडके, वीरभद्र स्वामी उपस्थित होते. हे रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी महादेव कारभारी, काशिनाथ लकडे, प्रविण बोदाडे, महादेव भुसाप्पा, गुणवंत तांबडे, संदेश होनाजे, वैजीनाथ होनाजे, राहूल होनाजे, तानाजी शिवरे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून सुधीर येणेगुरे यांनी आभार मानले.
युवतींनीही केले रक्तदान
या शिबिरात शिवानी ज्ञानेश्वर कारभारी व सुप्रिया बाबुराव भुसणे या अठरा वर्षे पूर्ण झालेल्या युवतीनी पहिल्यांदाच रक्तदान केले. त्यांच्यामुळे रक्तदान करण्यासाठी महिलांना स्फूर्ती मिळाली आहे.
21 May 2020
लोहारा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आशा कार्यकर्तींना फेस शिल्ड चे वाटप
प्रतिनिधी / लोहारा
कोरोनाचा धोका उस्मानाबाद जिल्ह्यात वाढत चालला आहे. या परिस्थितीत डॉक्टर सोबत आशा कार्यकर्त्याही आपल्या जीवाची पर्वा न करता या लढ्यामध्ये मोठ्या धैर्याने सामना करत आहेत. याची जाणीव ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार व डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष अविनाश तांबारे यांच्या सूचनेनुसार लोहारा तालुक्यातील सर्व आशा कार्यकर्त्यांना फेस शिल्डचे वाटप करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने मंगळवारी ( दि. १९) लोहारा येथे तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात प्रातिनिधिक स्वरूपात आशा कार्यकर्तींना फेस शिल्ड चे वाटप करण्यात आले. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते गोविंद साळुंके, राजेंद्र कदम, सुनील साळुंके, विजय लोमटे, नगरसेवक गगन माळवदकर, हेमंत माळवदकर, संजय जाधव, प्रकाश भगत, दादा पाटील, पृथ्वीराज जगताप, शैलेश चंदनशिवे, मेहबूब शेख, नवाज सय्यद, प्रशांत हाके, मुक्तार चाउस, निहाल मुजावर, गोपाळ माने उपस्थित होते. यांच्या उपस्थितीत लोहारा शहरातील आशा कार्यकर्त्यांना फेस-शिल्ड चे वाटप करण्यात आले आहे. तालुक्यातील सर्व आशा कार्यकर्तींना फेस शिल्ड देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी डॉ. अशोक कटारे यांनी सध्याच्या परिस्थितीबद्दल उपस्थितांशी चर्चा केली.
20 May 2020
लोहारा तालुक्यातील दक्षिण जेवळी येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक व सोलापूर येथे वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर दाम्पत्यांनी सामाजिक ऋण म्हणून गावातील ४२ गरजू निराधार गरीब कुटुंबाना वाटप केले जीवनावश्यक वस्तूंचे कीट
प्रतिनिधी / लोहारा
लोहारा तालुक्यातील दक्षिण जेवळी येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक व सोलापूर येथे वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर दाम्पत्यांनी आपला शेजारी उपाशीपोटी राहू नये यासाठी सामाजिक ऋण म्हणून गावातील ४२ गरजू निराधार गरीब कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंच्या कीटचे वाटप केले.
कोरोनामुळे सर्वच उद्योगधंदे बंद झाले आहेत. मजूर आणि शेतमजुरांना हाताला कामे नाहीत. शहरातील मोठ्या प्रमाणावर नागरिक गावाकडे आलेले आहेत. अनेकांच्या रोजीरोटीचा गंभीर प्रश्न निर्माण झाले आहे. अशा वेळी सोलापूर येथे वैद्यकीय सेवा देत असलेले डॉ. संगमनेर बिरादार, डॉ. स्नेहा बिरादार, सेवानिवृत्त मुख्याध्यापक बी.एम.बिरादार, शिवपार्वती बहुउपयोगी सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा सुषमा तोळणुरे यांनी गावातील विधवा, निराधार, अपंग आणि विविध आजारांनी त्रस्त अशा गावातील ४२ गरजू कुटुंबीयांना जीवनावश्यक वस्तूंचे कीट देण्यात आले.
यावेळी कोरोनाचा सामना कसा करावा याबाबत डॉ. संगमनेर बिरादार यांनी माहिती देऊन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी जि.प.सदस्या शोभाताई तोरकडे, पंचायत समितीचे उपसभापती व्यंकट कोरे, सरपंच चंद्रकांत साखरे, उपसरपंच पार्वती पाटील, सेवानिवृत्त मुख्याध्यापक बी.एम.बिरादार, तंटामुक्त अध्यक्ष शिवाजी पाटील, मुरूम बाजार समितीचे संचालक श्यामसुंदर तोरकडे, युवासेना तालुका उपप्रमुख शिवराज चिनगुंडे, जेष्ठ नागरिक हणमंतप्पा भुसाप्पा, दौलप्पा तोरकडे, विवेकानंद बिराजदार, प्रविण बोदाडे, संगप्पा मुखे, बसवराज होनाजे हे उपस्थित होते.
18 May 2020
दुर्धर आजारग्रस्त एकल महिलांसाठी स्पर्श रुग्णालयाचा उपक्रम कौतुकास्पद - आमदार ज्ञानराज चौगुले
प्रतिनिधी / लोहारा
दोन महिन्यापासून संपूर्ण जगात कोरोनारूपी महामारीने थैमान घातले आहे. त्यामुळे संपूर्ण जनजीवन ठप्प झाले आहे. हाताला काम नसल्यामुळे रोजंदारी करून जगणाऱ्या जनतेवर कठीण प्रसंगाची वेळ आली आहे. दुर्धर आजार असलेल्या रुग्णांची प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे व हाताला काम नसल्यामुळे एकल महिलांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. नेहमीच सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या तालुक्यातील सास्तुर येथील स्पर्श ग्रामीण रुग्णालयामार्फत युथफीडच्या माध्यमातून या कोरोना महामारीच्या लॉकडाऊनच्या काळातही आपला सामाजिक बांधिलकीच्या कामाचे वेगळेपण संपूर्ण उस्मानाबाद- लातूर जिल्ह्यात दाखून दिले आहे. या कार्याबद्दल स्पर्श ग्रामीण रुग्णालयाचे अभिनंदन व कौतुक करावे तेवढे कमी आहे असे प्रतिपादन आमदार ज्ञानराज चौगुले यांनी शनिवारी ( दि. १६) केले.
उस्मानाबाद- लातूर जिल्ह्यातील १५०० दुर्धर आजारग्रस्त एकल महिला कुटुंबाना दैनंदिन जीवनासाठी आवश्यक धान्य व इतर किटचा वाटप शुभारंभ उमरगा तहसील कार्यालयाच्या प्रांगणात शनिवारी( दि. १६) करण्यात आला. यावेळी आमदार चौगुले बोलत होते. यावेळी प्रातिनिधिक स्वरुपात २७ एकल महिलांना मान्यवरांच्या हस्ते किट वाटप करण्यात आले.
उस्मानाबाद- लातूर जिल्ह्यतील दुर्धर आजारग्रस्त एकल महिलांना आधाराची खूप गरज होती. मुळातच त्यांची प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे व हाताला काम नसल्यामुळे त्यांची कुचंबणा होत होती. द प्राईड इंडिया स्पर्श ग्रामीण रुग्णालय सास्तूर यांनी याबाबत पुढाकार घेतला व दोन्ही जिल्ह्यमधील एकल महिला व बाधित मुलांची यादी तयार करून मदतीसाठी आवाहन केले. सदर आवाहनाला प्रतिसाद देत मुंबईस्थित युथफीड या संस्थने विशेष मोहीम राबवून स्पर्श ग्रामीण रुग्णालयला १००० अन्न धान्याचे कीटची मदत दिली. उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यतील बाधित एकल महिलांना त्याचा काही प्रमाणात आधार मिळेल या हेतूने सदर किटचे वाटप करण्याचे नियोजन केले. प्रायोगिक तत्वावर या मोहिमेचा शुभारंभ तहसील कार्यालय उमरगा येथे आ. ज्ञानराज चौगुले, किरण गायकवाड, उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, तहसीलदार संजय पवार, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. पंडित पुरी आदींच्या उपस्थितीत संपन्न झाला.
प्रास्ताविक करताना स्पर्श चे प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी म्हणाले कि, उस्मानाबाद- लातूर जिल्ह्यातील दुर्धर आजारग्रस्त १५०० एकल महिलेवर अवलबुन असलेल्या तिच्या मुलाबाळांचा कुटुंबाचा शोध घेऊन एकल महिलांना स्पर्श ग्रामीण रूग्णालया मार्फत जीवनावश्यक अन्न धान्याच्या साहित्याचे किट चे वाटप घरपोच करण्यात येणार आहे. या जीवनावश्यक अन्न धान्य कीटमध्ये १० किलो गहू आटा, १ किलो तांदूळ, १ किलो तुरडाळ, १ किलो मसूरडाळ, १ किलो साखर, चहा पावडर, २ किलो तांदूळ, पावकिलो लाल तिखट, १ किलो किर्तीगोल्ड तेल पाकीट, १ किलो मीठ, १ किलो कांदे, १ किलो बटाटे अंगाचा व कपड्याचा साबण, सँनिटायझर, मास्क व इतर एक महिना पुरेल एवढे साहित्य या कीट मध्ये आहे. कोरोनामुळे व दुर्धर आजारामुळे होणारी १५०० एकल महिला कुटुंबाची मानसिक ओढाताण व उपासमार कमी होणार आहे. अशी माहिती स्पर्श ग्रामीण रुग्णालयाचे प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी यांनी यावेळी दिली. आमदार ज्ञानराज चौगुले यांनी स्पर्शच्या कामाबद्दल व अशा परस्थितील सामाजिक बांधिलकी जोपासल्या बद्दल कौतुक केले. व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या व एकही गरजू वंचित राहणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन केले.
उपविभागिय अधिकारी श्री विठ्ठल उदमले यांनी सदर उपक्रमाबद्दल संस्थेचे आभार मानून गरजू पर्यंत लाभ दिल्याबद्दल कौतुक केले. यावेळी उमरगा व मुरूम आय.सी.टी.सी चे समुपदेशक अभय भालेराव, संतोष थोरात, अविनाश काळे, सामाजिक कार्यकर्ते किशोर शिंदे व स्पर्श ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी उपस्थित होते. स्पर्श च्या कर्मचाऱ्यांमार्फत गावोगावी जाऊन हे साहित्य घरपोच वाटप करण्याचे स्पर्श चे नियोजन असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
16 May 2020
लोहारा तालुक्यातील सास्तुर येथील स्पर्श ग्रामीण रुग्णालयाच्या आवाहनाला दक्षिण जेवळी ग्रामस्थांची साथ
प्रतिनिधी / लोहारा
आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दानाला अतिशय महत्व आहे. श्रीमंत, गरीब सर्वजण आपापल्या ऐपती नुसार दान करतात आणि आपल्या देशात हा माणुसकीचा झरा जिवंत आहे याचा प्रत्यय अवघ्या दोन तासात महादान जमा करून द. जेवळीच्या गावकऱ्यांनी दिला आहे असे प्रतिपादन स्पर्श ग्रामीण रुग्णालयाचे प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी यांनी बुधवारी ( दि. १३) जेवळी येथे केले.
कोरोना विषाणूच्या महामारीने संपूर्ण जग हवालदिल झालेले आहे. लॉकडाऊन मुळे संपूर्ण व्यवहार ठप्प आहेत. अनेक रुग्ण, गरोदर माता यांना यामुळे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. कोरोनाच्या या महामारीत अने रुग्ण गरोदर माता स्पर्श ग्रामीण रुग्णालयात हक्काने, आशेने येत आहेत. त्यामुळे दररोज स्पर्श ग्रामीण रुग्णालयात रुग्ण व गरोदर मातांची खूप गर्दी वाढत आहे. अशा परिस्थितही दीपस्तंभा प्रमाणे स्पर्श आपली आरोग्य सेवा देत आहे. परंतु रुग्णाची वाढती गर्दी लॉकडाऊन मुळे स्वतःच्या गावी जाण्यास सोय उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना संपूर्ण दिवस रुग्णालयात थाबावे लागते. रुग्णांची हि अडचण लक्षात घेऊन अशा रुग्णांसाठी व गरोदर मातांसाठी व त्यांच्या नातेवाईकांसाठी स्पर्श मार्फत दररोज मोफत भोजन व वाहतूक सुविधा दिली जात आहे. पण त्यामध्ये खूप अडचणी येत होत्या. विशेषतः अन्न धान्याची अडचण मोठी होती. त्यामुळे इच्छा असूनही सुविधा पुरविण्यात अडचणी येत होत्या. ही बाब लक्षात घेऊन स्पर्श ग्रामीण रुग्णालयामार्फत परिसरातील ग्रामस्थांनी धान्य व इतर स्वरुपात मदत करावी असे आवाहन करण्यात आले होते. तालुक्यातील दक्षिण जेवळी येथील ग्रामस्थांनी स्पर्शच्या या आवाहनाला बुधवारी ( दि. १३) प्रतिसाद देत अवघ्या दोन तासांत ५ क्विंटल गहू, ५ क्विंटल ज्वारी, २ क्विंटल तांदूळ, ५० किलो तुरडाळ, ५० किलो मुगडाळ, १०० किलो शेगदाणे, २५ किलो साखर, ४० पाकीट गोडेतेल, ५० किलो काकडी इ. साहित्य अवघ्या २ तासात जमा करून या संपूर्ण वस्तू गोळा करून स्पर्श ग्रामीण रुग्णालयास दिल्या. दक्षिण जेवळी ग्रामस्थांच्या या दातृत्वाने भाराउन गेलो व त्यामुळे कोरोनाच्या या महामारीच्या लॉकडाऊनच्या काळात रुग्णांना कसलीच अडचण येणार नाही याची संपूर्ण काळजी स्पर्श ग्रामीण रुग्णालय घेईल अशी हमी स्पर्श चे प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी यांनी यावेळी बोलताना दिली. तसेच दक्षिण जेवळी ग्रामस्थांचा आदर्श परिसरातील इतर गावांनी घेऊन या कोरोनाच्या संकटामध्ये इतराना मदत करावी व गावांनी एक होऊन परिसरातील गरीब समूहापर्यंत मदत पोहचवावी. दक्षिण जेवळीच्या ग्रामस्थांनी केलेल्या मदतीमुळे स्पर्श ग्रामीण रुग्णालयात आहाराबाबतच्या सुविधा वाढून रुग्ण व नातेवाईक यांना काही कमी पडणार नाही याची संपूर्ण खबरदारी घेतली जाईल असेही रमाकांत जोशी यांनी सांगितले. तसेच दक्षिण जेवळी ग्रामस्थांचे आभार मानले.
खऱ्या अर्थाने सामाजीक बांधिलकी जोपासून उदात्त भावनेतून मदत जमा केली. दक्षिण जेवळी येथील सामाजिक कार्यकर्ते बसवराज होनाजे, सरपंच चंद्रकांत साखरे, उपसरपंच पार्वतीबाई पाटील, शिवराज चिलगुंडे, मुख्याध्यापक बी एम बिराजदार, जेष्ठ नागरिक आण्णाप्पा कोरे गुरुजी, दौलप्पा तोरकडे, वीरभद्र स्वामी, धुळाप्पा होणाजे, अशोक भूसाप्पा, संभाजी कारभारी व गावातील युवक गट यांनी गावकऱ्यांना या मदतीचे आवाहन करताच अवघ्या दोन तासात वरील साहित्य जमा झाले. एका गरीब मातेने तिच्या रोजंदारीच्या पैशामधून २ किलो शेंगदाणे रमाकांत जोशी यांच्याकडे देताच करताच उपस्थित सर्वजण भाऊक झाले व माणुसकीचा झरा अद्यापही जिवंत असल्याचा प्रत्यय आल्याचे उपस्थितांनी सांगितले.
12 May 2020
लोहारा तालुक्यातील हिप्परगा ( सय्यद), करवंजी येथे सोयाबीन उगवण क्षमता प्रयोगाबाबत मार्गदर्शन
प्रतिनिधी / लोहारा
येणाऱ्या खरीप हंगामाच्या अनुषंगाने कृषी विभागाकडून तयारी सुरू आहे. या हंगामात सोयाबीन बियाणांचा तुटवडा भासणार असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे घरगुती बियाणे वापरासंबंधीचे प्रयोगाद्वारे मार्गदर्शन करण्यात येत आहे. तालुक्यातील हिप्परगा ( सय्यद) चे कृषी सहाय्यक दिपक जाधव हे गावात जाऊन सोयाबीन उगवण क्षमतेचे प्रयोग शेतकऱ्यांनासोबत घेत आहेत.
तालुक्यातील हिप्परगा ( सय्यद), करवंजी येथे कृषी सहाय्यक दिपक जाधव हे स्वतः जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत. यावेळी सोयाबीन उगवण क्षमता प्रयोगासोबतच बीबीएफ पेरणी यंत्राने पेरणी केल्याचे काय फायदे आहेत, माती परीक्षण करून खतांची मात्रा ठरविणे आदी अनेक विषयांवर ते शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत.
या हंगामात सोयाबीन बियाण्याचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी उपलब्ध बियाण्याची उगवण क्षमता पाहून पेरणी करावे असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. तालुक्यातील हिप्परगा ( सय्यद), करवंजी येथे जाऊन याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी सरपंच नागनाथ सदाशिव पाटील, पोलीस पाटील संतोष यादव, लक्ष्मण मोरे, गुरुनाथ आपचुंदे, मल्लिनाथ कार्ले, श्रीशैल्य ओवंडे, दयानंद ओवंडे आदी शेतकरी उपस्थित होते.
10 May 2020
लोहारा तालुका भाजपाच्या वतीने महाराणा प्रताप यांची जयंती साजरी
प्रतिनिधी / लोहारा
लोहारा तालुका भाजपाच्या वतीने शनिवारी ( दि. ९) तालुक्यातील अचलेर येथे महाराणा प्रताप यांची जयंती साजरी करण्यात आली. तालुक्यातील अचलेर येथे बालासिंग बायस यांच्या घरी जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे पुजन भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, गुरुसिंग बायस, मुकेश बायस, बालासींग बायस उपस्थित होते.
07 May 2020
भाऊसाहेब बिराजदार बँकेचे वतीने गरजू कुटुंबाना जिवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप
प्रतिनिधी / उमरगा
लॉकडाऊन मुळे सर्वत्र जनजीवन ठप्प झाले आहे. सर्व कामधंदे बंद आहेत. त्यामुळे अनेक रोजंदारी करणाऱ्यांसमोर उद्याचा दिवस कसा जाईल हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे अशा अडचणीत असणाऱ्या गरजू २५१ कुटुंबांना भाऊसाहेब बिराजदार नागरी सहकारी बँकेच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले. उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, तहसीलदार संजय पवार यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात हे वाटप करण्यात आले. यावेळी बँकेचे चेअरमन प्रा. सुरेश बिराजदार यांची प्रमुख उपस्थिती होती.
गरिब परिस्थितीत आपले जीवन व्यतीत करणाऱ्या व ज्यांना घरी कोणाचा आधार नाही अशा महिला, पुरुष, विधवा, वृद्ध महिला, ज्यांच्या घरात कर्ता पुरुष नाही अशा कुटुंबाना दैनंदिन जीवनात लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप बँकेच्या वतीने करण्यात येत आहे. गरजु लोकांची माहीती घेऊन त्यांना घरपोच मदत पोहचविली जात आहे. अशा कठीण प्रसंगी गरजुंना मदत करुन सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम भाऊसाहेब बिराजदार बँकेच्या वतीने केले जात आहे.
यावेळी किट वाटपासाठी नायब तहसीलदार विलास तरंगे, बँकेचे सरव्यवस्थापक रमेश शहापुरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा नगरसेवक संजय पवार, नगरसेवक बालाजी पाटील, डॉ. विजयानंद बिराजदार, प्रकाश कदम, खाजा मुजावर, वसुली अधिकारी सुरेंद्र पौळ, संदीप जाधव, दयानंद बिराजदार ,सह वसुली अधिकारी अमोल पाटील, विजय चव्हाण, अजित पाटील, संतोष शिरगुरे, सतीश सुरवसे, विनोद जाधव, वामन भोरे, राजु राठोड, बळी चव्हाण यांच्यासह कर्मचारी उपस्थिती होते.
06 May 2020
लोहारा - अशोकराजे सरवदे यांच्या वाढदिवसानिमित्त गरजूंना जीवनावश्यक वस्तू व मास्क चे वाटप
प्रतिनिधी / लोहारा
मुंबई येथील भायखळा जिल्हा कारागृहात पोलीस कर्मचारी म्हणून कार्यरत तालुक्यातील सास्तुर येथील रहिवासी अशोकराजे सरवदे यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी ( दि. ५) त्यांच्या चाहत्यांनी तालुक्यातील अनेक गावांत गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून साजरा केला.
तालुक्यातील सास्तुर येथील अशोकराजे सरवदे हे मुंबई भायखळा जिल्हा कारागृहात पोलीस कर्मचारी पदावर आहेत. कोरोना हॉटस्पॉट भागात ते राहतात. त्यामुळे २५ दिवस होम कोरोन्टाईन होऊन ते नुकतेच कामावर रुजू झाले आहेत. अशातच मंगळवारी ( दि. ५) त्यांचा वाढदिवस. सध्या लॉकडाऊन मुळे हातावर पोट असणाऱ्या शेतमजूर, कामगारांना जगण्यासाठी अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे अशा लोकांना थोडीशी मदत म्हणून या वाढदिवसाच्या निमित्ताने तालुक्यातील सरवदे यांच्या चाहत्यांनी गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तालुक्यातील लोहारा, राजेगाव, एकोंडी, होळी, सास्तूर, तोरंबा, हराळी, धानुरी आदी गावात जाऊन गरजूंना जीवनावश्यक वस्तू व मास्क देण्यात आले.
लोहारा तालुक्यातील जेवळी येथील युवकांनी गावातून जमा केलेली एकावन्न हजाराची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा
![]() |
| मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करण्यासाठी निधी संकलित करताना जेवळी येथील युवक |
प्रतिनिधी / लोहारा
तालुक्यातील जेवळी येथील युवकांनी सामाजिक बांधिलकी जपत घरोघरी जाऊन व गावात मदतफेरी काढून जमा केलेले एकावन्न हजार रुपये मंगळवारी ( दि. ५) मुख्यमंत्री सहायता निधीत जमा केले आहेत.
सध्या कोरोनामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. या अडचणीच्या काळात अनेकजण आपल्या परीने जी मदत करता येईल ती मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत. कोणी अडचणीत असलेल्या व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वितरण करत आहेत तर कोणी मुख्यमंत्री सहायता निधीत रक्कम जमा करत आहेत.
१९९३ साली झालेल्या महाप्रलयंकारी भूकंपात जेवळी हे गाव उध्वस्त झाले होते. यावेळी गावाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यानंतर शासनाकडून गावचे नवीन ठिकाणी पुनर्वसन केले. यावेळी देशाबरोबरच परदेशातून मोठी भरीव मदतही आली होती. यामुळे समाजाचे ऋण म्हणून येथील नागरिक अन्य ठिकाणी झालेल्या नैसर्गिक आपत्ती वेळी आपल्या परीने मदतीसाठी पुढाकार घेतात. मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या संकटामुळे सर्वत्र भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन जाहीर केले आहे. त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा भार पडत आहे. त्यामुळे आपल्या परीने शासनाच्या मदतीसाठी काही तरी करूया या विचाराने जेवळी येथील युवक एकत्र येत रक्कम जमा करून मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करण्याचा निश्चय केला. त्यानुसार या युवकांनी प्रत्येक घरी जाऊन व गावात मदतफेरी काढून नागरिकाकडून जमेल तेवढी मदत स्विकारत पाच दिवसात ५१ हजार रुपये जमविले. यावेळी युवकांचा उपक्रम पाहून नागरिकांनीही सढळ हाताने मदत केली. यात येथील सरपंच व ग्रामपंचायतच्या सर्व सदस्यांनीही एक महिन्याचे मानधन स्वरूपात एकूण आठ हजार रुपये जमा केले. मंगळवारी (दि. ५) उमरगा येथील उमरगा जनता बँकेतून मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या खात्यावर ५१ हजार ५५१ रुपये जमा केले आहेत. सामाजिक बांधिलकीतून युवकांनी केलेल्या या मदतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या उपक्रमासाठी मेघराज कारभारी, गुणवंत भैरप्पा, राहुल कारभारी, महेश सारणे, अर्जुन कारभारी, प्रशांत दंडगुले, बालाजी भैराप्पा, अभिजीत वर्दे, वैभव देसाई आदी युवकांनी पुढाकार घेतला.
04 May 2020
लोहारा तालुक्यातील जेवळी येथील माझं गाव सोशल डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांना २५ पीपीइ किटचे वितरण
प्रतिनिधी / लोहारा
तालुक्यातील जेवळी येथील ग्रामस्थ व माझं गाव सोशल डेव्हलपमेंट फाउंडेशन यांच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांना २५ पीपीइ (पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट) किटचे तर अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्यासाठी आरोग्य साहित्याचे वाटप करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर पीपीइ किट उपलब्ध करून देण्याची जिल्ह्यातील ही पहिली वेळ आहे.
तालुक्यातील जेवळी व परिसरातील बाहेरगावी, विविध विभागात कार्यरत असलेले अधिकारी, कर्मचारी, व्यवसायिक तसेच गावातील युवक एकत्र येत चार वर्षापूर्वी माझं गाव सोशल डेवलपमेंट फाउंडेशन या सामाजिक संस्थेची स्थापना केली आहे. या सामाजिक संस्थेच्या वतीने गेल्या चार वर्षापासून परिसरात विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जात आहेत. सध्या कोरोना विषाणूचा विळखा देशात अधिक घट्ट होत जातोय. दिवसेंदिवस वाढणारी आकडेवारीमुळे प्रत्येकाच्या मनात भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे या विषाणूविरोधात लढायचं असेल तर आपल्यालाही तेवढ्याच वैद्यकीय सक्षमतेने पुढे यायला हवे. त्यामुळे अशा अडचणीच्या काळात आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी काय करता येईल का याची चर्चा या संस्थेच्या सदस्यात करण्यात आली. यावेळी जेवळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व गावातील डॉक्टरांचे मत जाणून घेतले. यावेळी परिसरातील रुग्ण तपासताना आत्मविश्वास वाढण्यासाठी पीपीइ (पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट) किट उपलब्ध करून द्यावे अशी मागणी पुढे आली. त्यानंतर संस्थेचे मार्गदर्शक मुंबई येथे जीएसटी विभागात कार्यरत असलेले सहआयुक्त धनंजय माळी, मुंबई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक राहुल कारभारी, लातूर चे उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांच्या पुढाकाराने हे पीपीइ किट व आरोग्य साहित्य उपलब्ध केले. मंगळवारी (दि. २८) जेवळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हणमंत वडगावे यांच्या हस्ते या पंचवीस पीपीइ किट व आरोग्य साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी एखाद्या संस्थेकडून जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या स्तरावर येथे पहिल्यांदाच पीपीइ किट उपलब्ध करून दिली असून जिल्ह्यातील दानशूर व्यक्तीनी, संस्थेने या संस्थेकडून प्रेरणा घेत कोरोना विषाणू संसर्गाची लढणाऱ्या सैनिकांना अशाप्रकारे संरक्षण कवच पुरवावे जेणेकरून आरोग्य सेवा सक्षम होईल असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हणमंत वडगावे यांनी यावेळी बोलताना केले. यावेळी जेवळी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. के. शेख, डॉ. धनश्री गावडे, डॉ. अमोल सूर्यवंशी, डॉ. संतोष ढोबळे, डॉ. सिद्धेश्वर मुळे, संस्थेचे संचालक सुधीर कोरे, संजय देसाई, महेश सारणे आदींची उपस्थिती होती.
या किटमुळे कोरोनाशी लढा देणाऱ्या आरोग्य विभागातील, अधिकारी, कर्मचारी यांचा आत्मविश्वास वाढण्यासाठी मदत होणार असून समाजातील दानशूर व्यक्तींनी आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी अशाच प्रकारची मदत करणे आवश्यक आहे.
डॉ. हणमंत वडगावे,
जिल्हा आरोग्य अधिकारी,
अशा अडचणीच्या काळात वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी काम करत आहेत. त्यांना आणखी ताकदीने काम करता यावे यासाठी पीपीइ किट व आरोग्य साहित्य संस्थेने उपलब्ध करून दिले आहे.
सुधीर कोरे,
संचालक,
माझं गाव सोशल डेव्हलपमेंट फाउंडेशन
Subscribe to:
Posts (Atom)































