31 July 2020

लोहारा तालुक्यातील जेवळी येथे तालुका उद्योग विकास केंद्राचे उदघाटन



प्रतिनिधी / लोहारा

उमेद - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका व्यवस्थापन कक्ष लोहारा अंतर्गत उद्योग विकास केंद्राचे उद्घाटन दिनांक 23 जुलै 2020 रोजी तालुक्यातील जेवळी येथे पंचायत समिती सभापती हेमलता रणखांब यांच्या हस्ते करण्यात आलेे. तालुक्यातील उमेद अंतर्गत स्वयंसहायता गटातील उद्योजक महिलांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी सभापती रणखांब यांनी केले.
              यावेळी जिल्हा अभियान व्यवस्थापक अल्ताफ जिकरे, जिल्हा व्यवस्थापक (मार्केटिंग) समाधान जोगदंड, जिल्हा व्यवस्थापक सनियंत्रण व मूल्यमापन अमोल शिरसट, तालुका अभियान व्यवस्थापक अमोल कासार, तालुका समन्वयक नरेंद्र गवळी, तालुका व्यवस्थापक प्रणिता कटकदौंड, उद्योग विकास केंद्रातील व्यवस्थापन समिती अध्यक्ष मालती जेवळीकर, सचिव शशिकला चवले उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत राष्ट्रीय ग्रामीण आर्थिक परिवर्तन प्रकल्प अंतर्गत उद्योग विकास केंद्राची स्थापना जेवळी येथे करण्यात आली. उद्योग विकास केंद्राच्या माध्यमातून नवीन अकृषी उद्योग उभारणे, विद्यमान उद्योगांना सहाय्य करणे, उद्योग व्यवसाय आराखडा तयार करणे, व्यवसायिकांना तज्ञ मार्गदर्शकाकडून तांत्रिक मार्गदर्शन, व्यवसाय आधारित प्रशिक्षण, बाजारपेठेची जोडणी, पॅकेजिंग, लेबलिंग ब्रँडिंग इत्यादी आवश्यक सेवा पुरविण्यात येणार असल्याचे जिल्हा अभियान व्यवस्थापक अल्ताफ जिकरे यांनी सांगितले. सदर केंद्राचे संचालन तालुकास्तरावर तालुका समन्वयक व उद्योग विकास केंद्र व्यवस्थापन समिती यांच्यामार्फत करण्यात येणार आहे. उद्योग विकास केंद्रांना अनुभवी उद्योजक, सनदी लेखापाल यांचे तांत्रिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. उद्योग विकास केंद्राच्या माध्यमातून तालुक्यातील दीडशे उद्योगांना सहाय्य केले जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. सदर उद्योग विकास केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी शिवशंकर कांबळे, अविनाश चव्हाण, किशोर हुडेकर, उमादेवी चवले, माधुरी मुळे यांनी परिश्रम घेतले.

वडिलांचे छत्र हरवलेल्या तेजस सोलंकरने घेतली फिनिक्स भरारी



प्रतिनिधी / लोहारा

दहावीच्या वर्गात प्रवेश घेतल्यानंतर अवघ्या काही दिवसातच एका अपघातात वडीलांचे निधन झाले. वडिलांचे छत्र हरवल्यानंतर आईने केलेल्या कष्टाच्या बळावर तसेच जिद्द व अथक परिश्रम करीत लोहारा तालुक्यातील अचलेर येथील विद्या विकास हायस्कुल मधील तेजस प्रशांत सोलंकर या विद्यार्थ्याने इयत्ता १० वी च्या बोर्ड परीक्षेत ९२.६० टक्के गुण मिळवून उत्तुंग यश मिळविले आहे.
                अवघ्या १५ वर्षांचा असताना तेजसच्या वडिलांचे अपघाती निधन झाले. एवढ्या लहान वयातच त्याच्यावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला. घरातील कर्ता पुरुष अचानकपणे गेल्याने आईने स्वतःला धीर देत दुःखाचा डोंगर मनामध्ये साठवून ठेवत मोठ्या जिद्दीने तेजसला शिकविण्याच्या निर्धार केला. आईचे कष्ट, जिद्द  पाहुन तेजसनेही अथक परिश्रम घेत इयत्ता १० वी मध्ये ९२.६० टक्के गुण मिळवून अचलेरच्या विद्या विकास हायस्कूल शाळेतून प्रथम क्रमांक मिळविला.
                   कै. बाळासाहेब सोलंकर व त्यांच्या पत्नी बालिका सोलंकर या दाम्पत्यांना तीन मुली व एक मुलगा आहे. तिन्ही मुली विवाहीत असुन मुलगा हा दहावीत शिकत होता. कै. बाळासाहेब यांना शिक्षणाची खूप आवड होती. ते जिल्हा मध्यवर्ती बँकेत कर्मचारी होते. शिक्षणाचे महत्व त्यांना ज्ञात होते. आपल्या मुलाने उच्च शिक्षण घेतले पाहीजे असे त्यांना नेहमी वाटायचे. म्हणून आपल्या पाल्यांना ते नेहमी शिक्षणाचे महत्व पटवून द्यायचे. त्यांचीच प्रेरणा घेवून तेजसने आपल्या वडीलांचे स्वप्न पूर्ण केले. जिद्द व अथक परिश्रम करून तेजस सोलंकर याने मिळवलेले यश व त्याच्या आईने केलेले कष्ट पाहुन त्याच्या यशाचे अचलेरसह परीसरातून कौतुक केले जात आहे. भविष्यात उच्च शिक्षण घेवून भारतीय प्रशासकीय सेवेत काम करण्याचा मानस तेजसने व्यक्त केला आहे. तेजसने सांगितले की, माझ्या यशात माझ्या आईचे कष्ट व वडीलांचे आशीर्वाद आहेत. आईने केलेले कष्ट मला नेहमी प्रेरणा देत असत. तसेच शाळेतील गुरूजनांचा मोठा वाटा होता. शाळेव्यतीरिक्त मी दररोज पाच तास अभ्यास करीत होतो. जिद्दीने अभ्यासात सातत्य ठेवले. तसेच फिनिक्स कोचिंग क्लासेस अचलेरचे संचालक जगदीश सुरवसे, अमित लोखंडे, सुमित बनसोडे यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनामुळे, त्यांनी सतत घेतलेल्या सराव परीक्षेमुळे मी नियमीत व सातत्याने अभ्यास केला. यापुढेही जिद्द व परिश्रम करून भविष्यात उच्च शिक्षण घेवून भारतीय प्रशासकीय सेवेत काम करण्याचा मानस तेजसने व्यक्त केला आहे.

लोहारा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने उपराष्ट्रपती व्यंकया नायडू यांना पाठविली १५०० पत्रे



प्रतिनिधी / लोहारा

लोहारा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने उपराष्ट्रपती व्यंकया नायडू यांना शुक्रवारी (दि. ३१) जय भवानी, जय शिवाजी मजकूर लिहिलेली १५०० पत्रे पाठवण्यात आली आहेत.
                     राज्यसभा सदस्यांच्या शपथविधी कार्यक्रमावेळी नवनिर्वाचित राज्यसभा सदस्य उदयनराजे भोसले यांनी शपथ घेतल्यानंतर जय भवानी, जय शिवाजी अशी घोषणा दिली होती. त्यावेळी राज्यसभा सभापती उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी इथे अशा घोषणा देता येणार नाहीत असे सांगितले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमी म्हणून भारताकडे पाहिले जाते. परंतु त्याच भारत देशात छत्रपती शिवाजी महाराज यांचे १३ वे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या शपथविधी दरम्यान जो काही प्रसंग उद्भवला त्याचा आम्ही निषेध करत आहोत असे कार्यकर्त्यांनी सांगितले. तसेच मोदी सरकार छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेऊनच सत्तेत आले आहे. परंतु त्यांना याचा विसर पडला आहे असे दिसत आहे. त्यामुळे याची आठवण करून देण्यासाठी लोहारा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जय जिजाऊ जय शिवराय, जय भवानी जय शिवराय असा मजकूर लिहून १५०० पत्र पाठवण्यात आली. लोहारा शहरातील डाक कार्यालयातून ही पत्रे पाठविण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगरसेवक गगन माळवदकर, सुनील साळुंके, माधव पाटील, पृथ्वीराज जगताप, निहाल मुजावर, हेमंत माळवदकर, नवाज सय्यद, महेबूब फकीर, संजय जाधव, सचिन रणखांब, राहुल जाधव, दादा पाटील, शैलेश चंदनशिवे आदी उपस्थित होते.

30 July 2020

लोहारा - विद्यार्थिनीने शिक्षकांना पेढ्याऐवजी वाटले सॅनिटायझर



प्रतिनिधी / लोहारा

लोहारा येथील वसंतदादा पाटील हायस्कूलची विद्यार्थीनी कु. नेहा उद्धवराव सोमवंशी ही दहावी परीक्षेत ९४.६० टक्के गुण मिळवून विद्यालयातून द्वितीय आली. त्याबद्दल या विद्यार्थिनीने शिक्षकांना पेढे देण्याऐवजी वसंतदादा पाटील हायस्कूल व नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षकांना सँनिटायझर स्प्रेच्या बाटल्या दिल्या आहेत. या विद्यार्थिनीने एकूण ५० बाटल्या दिल्या आहेत. तिच्या या वेगळ्या उपक्रमाबद्दल संस्थेचे सचिव प्रा. शेषेराव जावळे, मुख्याध्यापिका यु. व्ही. पाटील आणि सर्व शिक्षक प्राध्यापक यांनी या विद्यार्थ्यांनीचे अभिनंदन केले आहे.

नेहा उद्धव सोमवंशी 

घरगुती व शेतीचे संपूर्ण वीजबिल माफ करण्यात यावे - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी



प्रतिनिधी / लोहारा

घरगुती व शेतीचे संपूर्ण वीजबिल माफ करण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तहसीलदार विजय अवधाने यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
                   या निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाच्या संकटामुळे तालुक्यासह संपूर्ण देशाचे अर्थचक्र थांबले आहे. लोकांच्या हाताला काम नाही, जनता प्रचंड अडचणीत सापडली आहे. कोरोनाच्या या महाभयंकर संकटामुळे मागील चार महीने सर्व नागरिक घरात बसून आहेत. अनेक छोटे मोठे व्यवसाय बंद पडले आहेत. अशातच विज वितरण कंपनीने भरमसाठ वीज बिले पाठऊन नागरिकांची एक प्रकारची लुबाडणूक सुरु केल्याचे दिसून येत आहे. नागरिक आधीच चिंताग्रस्त असताना हे नवीन आर्थिक संकट ओढवले आहे. त्यामुळे लोकांना दिलासा देण्यासाठी शेती व घरगुती विजबिल माफ करावे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. तालुकाध्यक्ष अतुल जाधव यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. निवेदनावर तालुका उपाध्यक्ष दादासाहेब रवळे, सतीश बनसोडे, संदीप मोरे, नागेश संदिकर, बालाजी साळुंके यांच्या सह्या आहेत.

29 July 2020

वसंतदादा पाटील हायस्कूलची विद्यार्थिनी यशश्री श्रीकांत मोरे ९७.२० टक्के गुण मिळवून प्रथम, तर नेहा उध्दव सोमवंशी ९४.२० टक्के गुण घेऊन द्वितीय



प्रतिनिधी / लोहारा

लोहारा शहरातील वसंतदादा पाटील हायस्कुलने उज्वल यशाची परंपरा कायम राखली असून बुधवारी ( दि. २९) जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात शाळेचा निकाल ८१.५७ टक्के लागला आहे. शाळेची विद्यार्थिनी यशश्री श्रीकांत मोरे हिने ९७.२० टक्के गुण मिळवित प्रथम, नेहा उध्दव सोमवंशी ९४.२० टक्के गुण घेऊन द्वितीय, तर साक्षी उमेश जवादे व रेणुका संतोष सुर्यवंशी ९२.६० टक्के घेऊन तृतीय क्रमांक मिळविला. या शाळेचे दहा विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल संस्थेचे सचिव डॉ. शेषेराव जावळे पाटील, मुख्याध्यापिका यु. व्ही. पाटील, सर्व शिक्षक यांनी अभिनंदन केले आहे.

यशश्री श्रीकांत मोरे - ९७.२० टक्के

नेहा उध्दव सोमवंशी - ९४.२० टक्के


साक्षी उमेश जवादे ९२.६० टक्के


रेणुका संतोष सुर्यवंशी - ९२.६० टक्के

उस्मानाबाद जिल्ह्यातील पवनचक्क्या पावसाळ्यात बंद ठेवाव्यात - पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे मनसेची निवेदनाद्वारे मागणी



प्रतिनिधी / लोहारा

उस्मानाबाद जिल्ह्यातील पवनचक्क्या पावसाळ्यात बंद ठेवाव्यात अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे यांना हे निवेदन देण्यात आले.
                     या निवेदनात म्हणले आहे की, उस्मानाबाद जिल्ह्यात यावर्षी पावसाचे प्रमाण कमी झालेले आहे. सर्वसामान्य माणसातून व शेतकऱ्यांतून असा समज आहे की, यावर्षी जिल्ह्यात चालू झालेल्या पवनचक्कीमुळे आलेले ढग पुढे सरकत जात आहेत. त्यामुळे पाऊस कमी होताना दिसत आहे. तरी या संदर्भात शासन स्तरावर चौकशी समिती नेमून जर पावसावरती या पवनचक्क्याचा परिणाम होत असेल तर पावसाळ्यात या पवनचक्क्या तात्काळ बंद करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात याव्यात. याची प्रशासनाने योग्य वेळी दखल नाही घेतली तर जिल्ह्यातील शेतकरी व सर्वसामान्यांना आवश्यक शेतीसाठी व पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल. मराठवाडा नेहमी दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. त्यात उस्मानाबाद जिल्हा अतिदुष्काळी म्हणून शासन दरबारी नोंद आहे. त्यामुळे पुढील आठ दिवसांत पवनचक्क्या बंद करून शेतकरी व सर्वसामान्यांना दिलासा देण्याचे काम शासन व प्रशासनाने करावे अन्यथा या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने संपूर्ण जिल्हाभर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशारा या निवेदनाद्वारे दिला आहे. या निवेदनावर मनसेचे जिल्हा संघटक अमराराजे कदम, उमरगा लोहारा विधानसभा अध्यक्ष जालिंदर कोकणे, जिल्हा सचिव दादा कांबळे, अजित पवार, अमोल सलगरे आदींच्या सह्या आहेत.

उमरगा शहरातील श्री श्री रविशंकर माध्यमिक विद्यामंदिचा निकाल १०० टक्के


प्रतिनिधी / उस्मानाबाद

महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इ. १० वी चा निकाल बुधवारी ( दि.२९) दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर झाला.  उमरगा शहरातील श्री श्री रविशंकर माध्यमिक विद्यामंदिरचा निकाल १०० टक्के लागला आहे. कु. श्रद्धा माने हिने ९७.६० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला आहे. उमरगा शहरातील श्री श्री रविशंकर माध्यमिक विद्यामंदिर चे एकूण २७ विदयार्थी परीक्षेस बसले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन शाळेचा निकाल १०० टक्के लागला असून विद्यालयातील श्रद्धा माने ९७.६० टक्के प्रथम, वैभव बिराजदार ९३.८० टक्के द्वितीय तर वैष्णव माने ९३.६० टक्के गुण मिळवित तृतीय क्रमांक मिळविला. विद्यालयाच्या एकूण दहा विद्यार्थ्यांनी ९० टक्के पेक्षा जास्त गुण संपादन केले आहेत. गायकवाड सानिका, जाधव स्नेहा, जाधव प्राची, सुर्यवंशी पल्लवी, पाटील श्वेता, माने महेश यांनी उज्वल यश संपादन केले आहे. संस्थेच्या अध्यक्षा डॉ. दीपा मोरे, सचिव डॉ. सुरेश चव्हाण, मार्गदर्शक डॉ. उदयसिंह मोरे, अशोक जोशी, मुख्याध्यापक डिगंबर कुलकर्णी, गणपत देवकर, हिरानाथ सगर, शिल्पा जगताप यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

श्रद्धा माने - ९७.६० टक्के



वैभव बिराजदार - ९३.८० टक्के

                         

वैष्णव माने - ९३.६० टक्के





मूग पिकावर पिवळा विषाणूजन्य केवडा रोगाची लक्षणे



प्रतिनिधी / लोहारा

सध्या मूग पिकावर पिवळा विषाणूजन्य केवडा रोगाची लक्षणे दिसून येत आहेत. हा रोग पांढरी माशी या किटकामार्फत पसरतो. या वाहक कीटकांचे नियंत्रण वेळीच केल्यास हा रोग पुढे पसरत नाही आणि नियंत्रणात येतो असे कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे.
                   यावर्षी चांगला पाऊस होईल असा हवामान खात्याने अंदाज वर्तविला होता. जून महिन्याच्या सुरुवातीला पाऊस झाला. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहात पेरणी केली. तालुक्यात जवळपास १०० टक्के पेरणी झाली आहे. तसेच काहींनी दुबार पेरणी केली. परंतु पिक वाढीच्या अवस्थेत असताना पाऊस गायब झाल्याने हंगाम वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांतून व्यक्त केली. त्यात आता मूग पिकावर पिवळा विषाणूजन्य केवडा रोगाची लक्षणे दिसून येत आहेत. त्यामुळे मूग पिकाचे नुकसान होण्याची भिती शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. तालुक्यात मुगाची एकूण २१३५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. तालुक्यातील आत्तापर्यंत सरासरी २२५ मिमी पाऊस झाला आहे.



                     लोहारा तालुक्यातील शेती पावसाच्या पाण्यावरच अवलंबून असून मागील दोन ते तीन वर्षापासून कमी अधिक प्रमाणात वेळ चूकवुन पाऊस पडत असुन पावसाने प्रमाण कमी होत चालले असल्याने शेती व्यवसाय तोट्यात आल्याचे चित्र निर्माण झाले आहे. तरीही शेतकरी शेतीकडे दुर्लक्ष न करता पाऊस पडेल या आशेवर काबाड कष्ट करीत असल्याची परिस्थिती आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार यावर्षी पाऊस चांगला होईल या आशेमुळे शेतकऱ्यांची अशा अधिक पल्लवित झाली होती.  शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामे ही उन्हाळ्यातच पूर्ण केली. पाऊस पडेल या आशेवर पेरणीसाठी लागणारे बी बियाणे, खत खरेदी करुन ठेवली. मे महिन्यात एकही मोठा अवकाळी पाऊस झाला नाही. जून महिन्याच्या सुरुवातीला पाऊस झाला. आता पाऊस होत आहे या आशेवर शेतकऱ्यांनी पेरणी उरकली. परंतु नंतर पाऊस गायब झाला. त्यात काही शेतकऱ्यांच्या शेतातील बियाणे उगवले नाही. त्यामुळे त्यांनी दुबार पेरणीही केली. पीक वाढीची अवस्था असताना पाऊस गायब झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त होता. त्यात उन्हाची तीव्रता खूप आहे. त्यामुळे पिके सुकत होती. ज्यांच्याकडे पाणी उपलब्ध आहे ते शेतकरी पिके वाचविण्यासाठी तुषार सिंचनाच्या माध्यमातून धडपड करत होती. परंतु उन्हाची तीव्रता अधिक असल्याने पिके हातातून जाण्याची भीती शेतकऱ्यांतून व्यक्त केली जात होती. त्यात मागील ३-४ दिवसांपूर्वी लोहारा तालुक्यातील मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. त्यामुळे पिकांना थोडेफार जीवदान मिळणार असल्याचे सांगितले जात असतानाच आता मूग पिकावर पिवळा विषाणूजन्य केवडा रोगाची लक्षणे दिसून येत आहेत. सेंद्रीय आणि एकात्मिक शेती पद्धतीद्वारे सुरुवातीपासून योग्य काळजी घेत गेल्यास असे प्रादुर्भाव टाळता येऊ शकतात. रासायनिक कीटकनाशकांचा आणि तणनाशकांचा वाढता वापर शेतकऱ्यांच्या आणि जमिनीच्या आरोग्यासाठी हानीकारक आहे. त्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांनी पर्यावरणपूरक व आरोग्यपूरक शेतीचा अवलंब करावा असे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले. तालुका कृषी अधिकारी मिलिंद बिडबाग यांनी तालुक्यातील हराळी, तावशीगड येथे पाहणी केली.





सध्या मूग पिकावर पिवळा विषाणूजन्य केवडा रोगाची लक्षणे  दिसून येत आहेत. हा रोग पांढरी माशी या किटकामार्फत पसरतो. या वाहक कीटकांचे नियंत्रण वेळीच केल्यास हा रोग पुढे पसरत नाही आणि नियंत्रणात येतो. पांढऱ्या माशीचे नियंत्रण करन्यासाठी डायमिथोएट ३० टक्के ईसी १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

मिलिंद बिडबाग
तालुका कृषी अधिकारी, लोहारा
                 

25 July 2020

उमरगा शहरातील वृंदावन नगरमध्ये पाणी साचले - पक्क्या पुलासाठी नागरिकांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन




प्रतिनिधी / उमरगा

अनेक दिवसानंतर तालुक्यात मोठ्या पावसाने हजेरी लावली. पावसाळा सुरु होऊन महीना उलटला तरी मोठा पाऊस झाला नव्हता. पहिल्यांदाच नाल्यामार्गे पाणी वाहत असल्याचे दिसुन आले. उमरगा शहारातील मलंग प्लॉट येथील वृंदावन नगर येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. पाऊस छोटा आला तरी याठिकाणी दुरुन पाणी येत असल्याने मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. याठिकाणी पाण्याचा दाब इतका मोठा असतो की, यापुर्वी छोटा पुल वाहुन गेला होता. व त्यातील सिमेंटचे मोठे पाईप दुरपर्यंत वाहुन गेले होते. यापुर्वी मोठ्या पावसामुळे अनेकदा शहराशी संपर्क तुटला होता. कॉलनीत सध्या पक्के रस्ते होत असून दोन ठिकाणी छोट्या पक्क्या पुलाची आवश्यकता आहे. यामुळे गुरुवारी (दि. २३) वृंदावन नगर येथील नागरीकांनी मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन पक्क्या पुलाची मागणी केली आहे.



या निवेदनावर दत्तु वडदरे, राजकुमार दुधनाळे, युसुफ मुल्ला, भरत चौधरी, शिवकुमार दळवी, रमेश पवार, शिवराम जाधव, अॅड. बाळासाहेब लुल्ल, राजेंद्र गणापुरे, अविनाश माळी, जयदीप कुलकर्णी, बी.एस. हंगरगे, धनराज देशमुख, दत्तात्रय जवळगे, शैलेश बिराजदार, सुनिल जगदाळे, सुदाम सुर्यवंशी, सुरेश निंगशेट्टी, महेश हेबळे, सुधिर कुरुम, रविंद्र मुरुमकर, समाधान पसरकल्ले आदींच्या सह्या आहेत.


वृंदावननगर येथे पक्क्या रस्त्याचे काम सुरु आहे. शहरात जाण्यासाठी सोईचे असलेल्या ठिकाणी पुल नसल्याने नागरीकांना अडचण होणार असुन पुल होणे आवश्यक आहे.

दत्तु वडदरे, उमरगा



या नाल्यात डिग्गी रोडपासुन पाणी येत असुन अनेक वेळा घरात पाणी शिरले आहे. पक्का पुल न झाल्यास पाण्याने पक्क्या रस्त्याचे नुकसान होऊ शकते.

भरत चौधरी, उमरगा

आमदार ज्ञानराज चौगुले यांनी करून घेतली रॅपिड अँटीजन टेस्ट - अहवाल आला निगेटिव्ह



प्रतिनिधी / उमरगा

सध्या सर्वसामान्य नागरिकांमध्ये कोविड १९ आजाराच्या तपासणी बाबत कमालीची भीती आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक सदर तपासणी करून घेण्यास सहसा धजावत नाही असे दिसून येत आहे. कोरोना रुग्णांची संख्या  वाढण्यामागे हेही एक महत्वाचे कारण असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत जनमानसात जागरूकता निर्माण व्हावी, त्यांच्यातील भीती कमी व्हावी या उद्देशाने आमदार ज्ञानराज चौगुले यांनी रॅपिड अँटीजन टेस्ट ही कोविड १९ आजाराची प्राथमिक तपासणी करून घेतली. सदर चाचणीचा अहवालही निगेटिव्ह आला. सदर चाचणी ही अत्यंत साधी व सोप्या पद्धतीची असून चाचणी केल्यानंतर काही वेळात लगेच अहवाल समजतो. याचप्रमाणे मतदारसंघातील जास्तीत जास्त नागरिकांनी तपासण्या करून घ्याव्यात असे आवाहन आमदार ज्ञानराज चौगुले यांनी केले आहे.

23 July 2020

लोहारा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सुनील साळुंके यांच्या तर्फे तालुक्यातील सास्तुर येथील निवासी अपंग शाळेच्या ग्रंथालयासाठी कपाट भेट



प्रतिनिधी / लोहारा

लोहारा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सुनील साळुंके यांच्या तर्फे तालुक्यातील सास्तुर येथील निवासी अपंग शाळेच्या ग्रंथालयासाठी बुधवारी ( दि. २२) कपाट भेट देण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेस ही भेट देण्यात आली.



               तालुक्यातील सास्तुर येथील निवासी अपंग शाळेतील ग्रंथालयासाठी पुस्तके ठेवण्यासाठी कपाट आवश्यक असल्याचे समजले. त्यामुळे ही भेट देण्यात आली. यावेळी कपाटाच्या चाव्या दिव्यांग विद्यार्थ्यांकडे  सूपूर्द करण्यात आल्या. यावेळी गोविंदराव साळुंके, सुनील साळुंके, प्रकाश भगत, राजेंद्र कदम, निवासी अपंग शाळेचे मुख्याध्यापक बालाजी नादरगे, सचिन रणखांब, गोपाळ माने, तुळशीराम नादरगे, प्रा. बी. एम. बालवाड, शाळेतील दिव्यांग विद्यार्थी दत्ता गिरी, सोनाली बेळे, कर्मचारी निशांत सावंत, सुर्यकांत कोरे, ज्ञानोबा माने, माधव मुंडकर उपस्थित होते.

21 July 2020

लोहारा तालुका भाजपाच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन



प्रतिनिधी / उस्मानाबाद

लोहारा तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट अनुदान देण्यात यावे यासह विविध मागण्यांचे निवेदन भाजप तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी तहसिलदार विजय अवधाने यांच्यामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सोमवारी ( दि. २०) दिले आहे.
               या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून दुधाचे भाव १६ ते १८ रुपये पर्यंत घसरले आहेत. कोरोना संकटामुळे दूध संकलन होत नसल्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे. या शेतकऱ्यांना दुधाचा योग्य तो दर मिळत नाही. तरी शासनाने सरसकट १० रुपये अनुदान द्यावे, प्रति लिटर दुधाला ३० रुपये खरेदी भाव द्यावे, दूध भुकटीकरिता प्रति किलो ५० रुपये अनुदान द्यावे, यंदाच्या खरीप हंगामात विविध कंपन्याचे सोयाबीन बियाणे न उगवल्याने शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून अशा शेतकऱ्यांच्या शेताचे पंचनामे करून तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी, दोन लाखापेक्षा अधिक पीक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी न झाल्यामुळे व त्यांना चालू वर्षातील नवीन पीक कर्ज मिळत नसल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे दोन लाखापेक्षा अधिक पीक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन तात्काळ नवीन पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे. लॉकडॉऊन काळात घरगुती व शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करावे. या मागण्यावर राज्य शासनाने तात्काळ निर्णय घ्यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आल्या आहेत. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, विक्रांत संगशेट्टी, तालुका सरचिटणीस नेताजी शिंदे, इकबाल मुल्ला, दगडू तिगाडे उपस्थित होते.

लोहारा तालुक्यातील सर्व गावांतील शेतकऱ्यांनी दिलेल्या मुदतीत पीकविमा भरून घ्यावा - आमदार ज्ञानराज चौगुले यांनी केले आवाहन


प्रतिनिधी / लोहारा

लोहारा तालुक्यातील पर्जन्यमान अद्यापपर्यंत अत्यल्प प्रमाणात आहे. भविष्यात कोणतेही संकट उदभवल्यास नुकसानभरपाई मिळणेकरीता लोहारा तालुक्यातील सर्व गावांतील शेतकऱ्यांनी दिलेल्या मुदतीत पीकविमा भरून घ्यावा असे आवाहन आमदार ज्ञानराज चौगुले यांनी केले आहे.
             शेतकऱ्यांना आवाहन करताना आमदार चौगुले यांनी म्हणले आहे की, सध्या खरीप पीकविमा भरण्याची शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. यासाठी शासनाने शेतकऱ्यांसाठी ३१ जुलै व पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी २७ जुलै अंतिम तारीख दिलेली आहे. परंतु लोहारा तालुक्यातील हिप्परगा रवा, हिप्परगा सय्यद, कास्ती बु., कास्ती खु., व लोहारा मंडळात असलेले शिवकरवाडी ही गावे पीकविमा कंपनीच्या पोर्टलवर दिसत नसल्याच्या व इतर तांत्रिक अडचणी असल्याबाबत असंख्य तक्रारी प्राप्त झाल्या. या अनुषंगाने  जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उस्मानाबाद यांच्याशी सम्पर्क साधला असता सदरबाबत विमा कंपनीच्या एन आय सी कार्यालय, दिल्ली येथूनच पुढील कारवाई शक्य असल्याचे निदर्शनास आले. या दोन्ही कार्यालयाकडून याबाबत दिल्ली येथील कार्यालयात तक्रारही नोंदवण्यात आली. व  याबाबत खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनीही दिल्ली येथील कार्यालयास आवश्यक त्या सूचना केल्या. याची फलप्राप्ती म्हणून सध्या हिप्परगा रवा, हिप्परगा सय्यद, शिवकरवाडी या तीन गावांबाबतची तंत्रिक अडचण दूर झाली आहे. कास्ती बु. व कास्ती खु. ही दोन गावे सदर पोर्टलवर एकाच नावाने दिसून येत असली तरी ही दोन्ही गावे एकाच मंडळातील असल्याने व पीकविमा हा सध्याच्या निकषानुसार मंडळनिहाय मंजूर होत असल्याने या दोन्ही गावातील शेतकऱ्यांनी पिकविमा भरल्यास भविष्यात त्यांना कोणतीही अडचण येणार नाही. सध्या लोहारा तालुक्यातील पर्जन्यमान अद्यापपर्यंत अत्यल्प प्रमाणात आहे. भविष्यात कोणतेही संकट उदभवल्यास नुकसानभरपाई मिळणेकरीता लोहारा तालुक्यातील सर्व गावांतील शेतकऱ्यांनी दिलेल्या मुदतीत पीकविमा भरून घ्यावा असे आवाहन आमदार चौगुले यांनी केले आहे.

20 July 2020

लोहारा तालुक्यातील अनेक गावात हॅलो मेडिकल फाउंडेशन कडून गरजूंना मदतीचा हात



प्रतिनिधी / लोहारा

लोहारा तालुक्यातील अनेक गावात हॅलो मेडिकल फाउंडेशनच्या माध्यमातून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनजागृती करण्यात आली आहे. तसेच लॉकडाऊनच्या काळात उपासमार होत असलेल्या जवळपास ३०० जणांना किराणा साहित्याचे किट देण्यात आले आहे. तसेच आर्थिक अडचणीत असलेल्या ९० एकल विधवा महिलांना महिलांना सोयाबीन बियाणे वाटप करण्यात आले. या प्रकारे मदत करून अडचणीच्या काळात गरजूंना एक प्रकारे मदतीचा हात दिला आहे.




            हॅलो मेडिकल फाउंडेशन ही संस्था १९९३ च्या भूकंपापासून  लोहारा तालुक्यातील गावात महिला व बालकाचे आरोग्य, महिला  सक्षमीकरण, बचत गट, स्वावलंबन, आरोग्य शिक्षण, स्त्री पुरुष समानता, महिलांचे हक्क व अधिकार, एकल विधवा यांना रेशन, पेन्शन, रोजगार बाबत प्रशिक्षण, तसेच निर्धार समानतेचा प्रकल्पाच्या माध्यमातून महिलांवरील होणारा कौटुंबिक हिंसाचार कमी व्हावा यासाठी संस्था युवक गट व किशोरी गटासोबत १५ गावात काम करीत आहे. या भागात पावसाअभावी दर तीन वर्षाला पडणारा दुष्काळ, नैसर्गीक आपत्ती या संकटावेळी जनावरांना पिण्याच्या पाण्याचे हौद, एकल महिलांना मदत, वाडी वस्ती या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची दोन हजार लिटर क्षमता असलेल्या टाक्या देण्यात आल्या. त्याचाच एक भाग म्हणून कोविड १९ या साथरोगाच्या पार्श्वभूमीवर लोहारा तालुक्यातील ३३ गावात कोरोना बाबत काळजी घेण्याबाबत स्पीकरच्या माध्यमातून व माहिती पत्रक वाटून जनजागृती केली आहे. कोरोनामुळे पुणे, मुंबई येथून आलेल्या नागरिकांची माहिती घेणे, स्विस एड पुणे यांच्या आर्थिक सहकार्यातून  लॉकडाऊन मुळे उपासमार होत असलेल्या लघुउद्योग (हॉटेल, न्हावी), भिक्षुक, पुजारी, गरजू वृद्ध,नागरिक अशा जवळपास ३०० जणांना दोन महिण्याचे किराणा साहित्य किट, हँड वॉश, मास्क व कोरोनाबाबत माहितीपत्रक घरपोच देण्यात आले. या ३३ गावातील निराधार, वृद्ध, गरजू, एकट्या, आजारी अशा १५०  नागरिकांना दोन वेळेस जेवणाची व्यवस्था करण्यात आली. तसेच लॉकडाऊन मुळे आर्थिक अडचणीत असलेल्या एकल विधवा महिलांना एक एकरची पूर्व मशागत व ९० महिलांना सोयाबीन बियाणे वाटप करण्यात आले. हॅलो मेडिकल फाउंडेशन संस्थेचे अध्यक्ष डॉ. शशिकांत अहंकारी यांचा मार्गदर्शनखाली लोहारा तालुक्यातील मुर्षदपूर, राजेगाव, एकोंडी, वडगाव (गांजा), रुद्रवाडी, कानेगाव, विलासपुर, नागुर, हिप्परगा (रवा) आदी ३३ गावात संस्थेने मदत व जनजागृती केली आहे. यासाठी तालुका समनव्यक सतीश कदम, क्षेत्रिय पर्यवेक्षक श्रीकांत कुलकर्णी, संग्राम पाटील, पवन गायकवाड, स्वाती पाटील गाव रिलीफ समिती सदस्य, प्रेरक, प्रेरिका यांनी सहकार्य केले आहे.

17 July 2020

लोहारा तालुक्यातील हिप्परगा ( रवा) येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यालयाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी सुरू केला ऑनलाईन शिक्षण उपक्रम



प्रतिनिधी / उस्मानाबाद

लोहारा तालुक्यातील हिप्परगा ( रवा) येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यालयाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असताना ऑनलाईन सह ऑफलाइन शिक्षण सुरू केले आहे. या ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थी व पालक यांच्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
                 सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद आहेत. अशा वेळी विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यालयाच्या
शिक्षकांनी शाळा बंद पण शिक्षण सुरू हा उपक्रम यशस्वीपणे राबविला आहे. या शाळेत आठवी ते दहावीचे वर्ग असून प्रत्येक वर्गाचे उन्हाळ्यात व्हाट्सअप ग्रुप बनवले. लॉकडाऊन च्या काळात पालकांना व विद्यार्थ्यांना कॉल करून संवाद साधून त्यांच्या समस्या सोडवल्या. शैक्षणिक व्हिडिओ, शैक्षणिक युट्युब चॅनेल, ऑनलाइन टेस्ट व अभ्यासक्रमाच्या पीडीएफ पालकांच्या मोबाईलवर पाठवून अभ्यास करून घेत आहेत. एक जुलैपासून शाळेने गुगल मीट या ॲपच्या साहाय्याने दररोज प्रत्येक वर्गाला सकाळी दहा ते बारा या वेळेत ऑनलाईन तास सुरू केले आहेत. दररोज दोन विषयाचे अध्यापन शिक्षक करतात. शाळेने ऑनलाईन तासिकेचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. त्याप्रमाणे संबंधित विषयाचे शिक्षक अगोदरच्या दिवशी लिंक पाठवतात. लिंकच्या खाली विषय, वेळ, पाठाचे नाव व्हाट्सअप ग्रुप वर पाठवतात. शाळेच्या लर्न फ्रॉम होम व  वर्क फ्रॉम होम या उपक्रमास पालकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. हे नियोजन करीत असताना शाळेने प्रत्यक्ष पालकांशी संपर्क साधून वेळेचे नियोजन केले. पालकांची मानसिकता तयार केली. ज्या शिक्षकांचे तास नाहीत ते शिक्षक जॉईन न झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांशी संपर्क साधतात. बाहेरगावच्या विद्यार्थ्यांचे नियोजन सेवक पाहतात. शाळेने सर्व विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर दीक्षा ॲप डाऊनलोड केलेले आहे. सर्व विद्यार्थ्यांना घरोघरी जाऊन मोफत पाठ्यपुस्तके वाटप केले आहे. सध्या शिक्षक पीपीटी तयार करणे, नोट्स काढणे, ऑनलाइन टेस्ट तयार करीत आहेत. प्रत्यक्ष गृहभेटी देऊन पालकांचे व विद्यार्थ्यांचे समुपदेशन करत आहेत. या ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थी व पालक यांच्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. ज्या विद्यार्थ्याकडे स्मार्टफोन नाही अशा विद्यार्थ्यांना नोट्स देणे, माहिती सांगणे, फोनवरून शंका समाधान करणे व जे विद्यार्थी ऑनलाइन तासिकेला जॉईन झाले नाहीत. त्या विद्यार्थ्यांची अडचण समजून घेतल्या जातात. या शाळेचे मुख्याध्यापक संजय भोयटे हे सर्व शिक्षकांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वीपणे राबवत आहेत. तसेच परिसरातील शिक्षकांना सतत मार्गदर्शन करत आहेत. हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष वामनराव जाधव, सचिव पंडीत जाधव यांनीही योगदान दिले आहे. तसेच संस्थेचे पदाधिकारी, शाळेतील शिक्षक एम.के. जाधव, बी.एस. स्वामी, जी.डी. मैंदाड, बी.जे. मनोहर, ए .व्ही. जाधव, एस . के. जाधव, सेवक एन .पी. जाधव, एस.के. पांचाळ, एम.एम. प्रताप हे प्रयत्न करीत आहेत.


स्वामी रामानंद तीर्थ विद्यालयाने ऑनलाइन शिक्षणाचा हा उपक्रम अतिशय यशस्वीपणे सुरु केला असून त्याबद्दल मुख्याध्यापक संजय भोयटे व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन करतो. इतर शाळाने ही असे उपक्रम राबवावेत.














दत्तप्रसाद जंगम,
विस्तार अधिकारी, लोहारा



स्वामी रामानंद तीर्थ विद्यालयाच्या ऑनलाईन तासिकेला मी स्वतः जॉईन होतो. शाळेच्या सर्व शिक्षकांनी मेहनत घेऊन तासिका सुरू केल्या आहेत . या शाळेचे मी अभिनंदन करतो.



 








संतोष माळी 
विस्तार अधिकारी, माध्यमिक
जि.प. उस्मानाबाद


ऑनलाइन शिक्षणाचा उपक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष वामनराव जाधव, सचिव पंडीतराव जाधव, मुख्याध्यापक संजय भोयटे, शाळेतील शिक्षक एम.के. जाधव, बी.एस. स्वामी, जी.डी. मैंदाड, बी.जे. मनोहर, ए .व्ही. जाधव, एस . के. जाधव, सेवक एन .पी. जाधव, एस.के. पांचाळ, एम.एम. प्रताप हे प्रयत्न करीत आहेत.












संजय भोयटे,
मुख्याध्यापक,
स्वामी रामानंद तीर्थ विद्यालय,

16 July 2020

लोहारा येथे आ. ज्ञानराज चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न - आ. चौगुले यांनी केली कोविड केअर सेंटरची पाहणी



प्रतिनिधी / लोहारा

लोहारा तालुक्यातील सुज्ञ नागरिकांच्या जागरुकतेमुळे प्रशासनास मदत झाल. प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्यातील योग्य समन्वयामुळे तालुक्यातील सद्यस्थितीपर्यन्त कोरोना आटोक्यात राहिला असे मत आ. ज्ञानराज चौगुले यांनी व्यक्त केले. लोहारा तालुक्यातील विविध समस्या संदर्भात आ. चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि.१५) लोहारा तहसिल कार्यालयात आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते.



               या बैठकीसाठी उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, तहसीलदार विजय अवधाने, गटविकास अधिकारी अशोक काळे, लोहारा नगर पंचायतीचे मुख्याधिकारी गजानन शिंदे, नायब तहसिलदार रणजित शिराळकर, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक आर. यु. सूर्यवंशी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, तालुका कृषी अधिकारी मिलिंद बिडबाग,  शिवसेना तालुकाप्रमुख मोहन पनुरे,उपनगराध्यक्ष प्रताप घोडके, शिवसेना गटनेते अभिमान खराडे, नगरसेवक शाम नारायणकर, अबुलवफा कादरी, गगन माळवदकर, युवा सेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, शहरप्रमुख श्रीकांत भरारे, आदी उपस्थित होते.



                  या बैठकीत कोरोना आजरापासून दक्ष राहण्यासाठी सर्व ग्रामपंचायत व धार्मिक स्थळे याठिकाणी ध्वनिक्षेपकाद्वारे जनजागृती करणेबाबत निर्णय घेण्यात आला. तसेच विलगीकरण करण्यासाठी शिक्षण विभागाकडे परत देण्यात आलेल्या शाळा गरज पडल्यास आवश्यक त्या ठिकाणी प्रशासनाच्या ताब्यात घेण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. यावेळी तालुक्यातील सर्व ठिकाणचे पर्जन्यमान, दुबार पेरणीचे संकट, बियाणे न उगवलेल्या तक्रारी, अन्नसुरक्षा योजना याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीनंतर आमदार ज्ञानराज चौगुले व वरिष्ठ अधिकारी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह, या ठिकाणी असलेल्या कोविड केअर सेंटरला भेट देऊन त्याठिकाणी असलेल्या सोयी सुविधांची पाहणी केली.

12 July 2020

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्यावर टीका करणाऱ्या आ. सुजितसिंह ठाकुर यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांचे खरमरीत उत्तर



उस्मानाबाद प्रतिनिधी -

भाजपाचे विधानपरिषदेचे आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी शनिवारी ( दि. ११) ट्विटरद्वारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्यावर टीका केली होती. या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
              प्रा. बिराजदार यांनी आ.  ठाकूर यांच्या टीकेला उत्तर देताना म्हणले की,  स्वर्गीय इंदिरा गांधी पासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत अनेकांनी आदरणीय लोकनेते शरदचंद्रजी पवार साहेब यांचं नेतृत्व, कर्तृत्व मान्य केलं आहे.  असे असतानाही कधीही विधानसभेची निवडणूक न लढवता विधीमंडळात मागच्या दाराने प्रवेश केलेल्या व्यक्तीने ज्यांची तब्बल ५० वर्षांची उत्तुंग, अपराजित राजकीय कारकीर्द राहीली आहे अशा लोकनेत्यावर  टीका टिपणी करायचं म्हणजे थोडं हास्यास्पद आहे. अनेक राज्यात तोडफोडीचे राजकारण करून सत्ता हस्तगत केलेल्या पक्षाच्या जनाधार नसलेल्या नेत्याने नैतिकतेच्या, अनैसर्गीकतेच्या गप्पा माराव्यात हे सदसद्विवेकबुद्धीला न पटण्यासारखे आहे.
                विधानसभेत सर्वाधिक संख्या येऊन देखील या महाराष्ट्रासाठी संकटकाळात काय योगदान दिलं त्याचं आत्मपरीक्षण विरोधी पक्षाने व त्यांच्या वाचाळवीर नेत्यांनी करावं. महाराष्ट्रातील जनतेने तुमच्या सत्ताकाळात महाराष्ट्रावरती आलेल्या पुराच्या  संकटाचा सामना करताना आपल्या कामाची दखल विधानसभा निवडणूकीत घेतलीच की ! तुमच्या प्रदेशाध्यक्षाला स्वतःचा मतदार संघ सोडुन सुरक्षित ठिकाणी जावं लागलं. म्हणुनच तुम्हाला सत्तेबाहेर करण्यात त्या भागाचा वाटा जास्त राहीला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार, आमदार हे तुमच्या तीनशे खासदाराला आणि १०५ आमदारांना कामाच्या बाबतीत केंद्रात आणि महाराष्ट्रात भारी पडले हे तुम्ही परवा संसदरत्न, महासंसदरत्न पुरस्कार मिळाले तेव्हा तुमच्या निदर्शनास नाही आले वाटतं. आकडेवारीत फापट पसारा गोळा करुन काम न करणाऱ्या खासदारापेक्षा आमच्या पक्षातील कर्तृत्ववान खासदार तुमच्या तीनशेला नक्कीच भारी आहेत. राहीला प्रश्न महाराष्ट्राचा, तर विधानसभा निवडणूकीपुर्वी तुम्ही जे वातावरण तयार केलं, महाराष्ट्रात जे फोडाफोडीचं राजकारण केलं, ते कोणत्या नैतिकतेला धरून होतं याचं आत्मपरिक्षण करावं. पवार साहेबांच्या कार्यकर्त्यांची बरोबरी नसणाऱ्या स्टंटबाज नेत्यांनी कर्तृत्व नसताना लहान तोंडी मोठा घास घेऊ नये. पवार साहेबा सारख्या व्यक्तीमत्वा वरती बोलण्याआधी विचार करून बोलावं. अविचाराने साहेबावरती टिका करणारे तुमच्याच पक्षातील दिग्गज नेते आज साहेबांना राजकारणातील आपला पितामह समजत निवडणूकीपुर्वी केलेली टिका झाकण्याचा केविलवाना प्रयत्न करत आहेत. तुमच्यावरती तशी वेळ येऊ नये एवढीच आमची इच्छा ! कारण पवार साहेबांनी त्यांच्यावर टिका करणाऱ्याकडे एकदा लक्ष दिलं की त्याच पुढे काय होतं हे तुमच्या माजी मुख्यमंत्र्याना विचारा. त्यांच्यावर आलेल्या केविलवान्या परिस्थीतीचा अंदाज घेत चला म्हणजे आपली राजकीय कारकीर्द टिकुन राहील असे खरमरीत उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांनी दिले आहे.

कुस्ती मल्लविद्या महासंघाच्या लोहारा तालुकाध्यक्ष पदी पै. रामेश्वर कार्ले यांची निवड झाल्याबद्दल भाजपाच्या वतीने सत्कार



प्रतिनिधी / लोहारा

कुस्ती मल्लविद्या महासंघाच्या लोहारा तालुकाध्यक्ष पदी पै. रामेश्वर कार्ले यांची निवड झाल्याबद्दल लोहारा तालुका भाजपाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
                          तालुक्यातील विलासपुर पांढरी येथील रामेश्वर कार्ले यांची कुस्ती मल्लविद्या महासंघाच्या लोहारा तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. पैलवान होण्यासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कार्ले यांनी खडतर प्रवास केला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील एक होतकरू व अग्रगण्य पैलवान म्हणून त्यांनी नावलौकिक मिळविला आहे. त्यांच्या या निवडीबद्दल भाजपाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष बालाजी चव्हाण, उपसरपंच डिगबंर मुळे, गजेंद्र बिराजदार  खंडेराव कार्ले उपस्थित होते.

10 July 2020

लोहारा - पाऊस गायब झाल्याने पिके धोक्यात - हंगाम वाया जाण्याची शेतकऱ्यांना भीती



प्रतिनिधी / लोहारा

यावर्षी चांगला पाऊस होईल असा हवामान खात्याने अंदाज वर्तविला होता. जून महिन्याच्या सुरुवातीला पाऊस झाला. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहात पेरणी केली. तालुक्यात जवळपास ८१ टक्के पेरणी झाली आहे. तसेच काहींनी दुबार पेरणी केली. परंतु पिक वाढीच्या अवस्थेत असताना पाऊस गायब झाल्याने हंगाम वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांतून व्यक्त केली जात आहे.
                     लोहारा तालुक्यातील शेती पावसाच्या पाण्यावरच अवलंबून असून मागील दोन ते तीन वर्षापासून कमी अधिक प्रमाणात वेळ चूकवुन पाऊस पडत असुन पावसाने प्रमाण कमी होत चालले असल्याने शेती व्यवसाय तोट्यात आल्याचे चित्र निर्माण झाले आहे. तरीही शेतकरी शेतीकडे दुर्लक्ष न करता पाऊस पडेल या आशेवर काबाड कष्ट करीत असल्याची परिस्थिती आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार यावर्षी पाऊस चांगला होईल या आशेमुळे शेतकऱ्यांची अशा अधिक पल्लवित झाली होती.  शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामे ही उन्हाळ्यातच पूर्ण केली. पाऊस पडेल या आशेवर पेरणीसाठी लागणारे बी बियाणे, खत खरेदी करुन ठेवली. मे महिन्यात एकही मोठा अवकाळी पाऊस झाला नाही. जून महिन्याच्या सुरुवातीला पाऊस झाला. आता पाऊस होत आहे या आशेवर शेतकऱ्यांनी पेरणी उरकली. परंतु नंतर पाऊस गायब झाला. त्यात काही शेतकऱ्यांच्या शेतातील बियाणे उगवले नाही. त्यामुळे त्यांनी दुबार पेरणीही केली. आता पीक वाढीची अवस्था आहे. परंतु पाऊस नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. त्यात सध्या उन्हाची तीव्रता खूप आहे. त्यामुळे पिके सुकत आहेत. ज्यांच्याकडे पाणी उपलब्ध आहे ते शेतकरी पिके वाचविण्यासाठी तुषार सिंचनाच्या माध्यमातून धडपड करत आहेत. परंतु उन्हाची तीव्रता अधिक असल्याने पिके हातातून जाण्याची भीती शेतकऱ्यांतून व्यक्त केली जात आहे.
                 लोहारा तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र ५४१०८ हेक्टर असून लागवड लायक क्षेत्र ४८५२७ हेक्टर आहे. खरीप हंगामाचे सरासरी पेरणी क्षेत्र ३९१११ हेक्टर असून त्यापैकी ३१६१४ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यापैकी २९३ शेतकऱ्यांनी बियाणे उगवण झाली नसल्याची तक्रार कृषी विभागाकडे केली. त्या शेतकऱ्यांनी जवळपास ४३९ हेक्टर क्षेत्रावर दुबार पेरणी केली आहे. या हंगामात शेतकऱ्यांनी सोयाबीन, तूर, मूग, उडीद, भुईमूग, खरीप ज्वारी, मका आदी पिकांची पेरणी केली आहे. यात सर्वाधिक सोयाबीन पिकाची २११०० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. आत्तापर्यत तालुक्यात सरासरी १३० मिमी पाऊस झाल्याची नोंद आहे. परंतु दहा पंधरा मिनिट पाऊस झाला की, परत ऊन असते. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची आशा आहे. पेरणी केलेल्या शेतकऱ्यांनी तणाचा बंदोबस्त करावा. त्यासाठी तणनाशक फवारणी, आंतरमशागत, कोळपणी करावी आणि ज्या शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध आहे त्यांनी स्प्रिंकलर च्या साहाय्याने पिकास पाणी द्यावे. ज्या शेतकऱ्याची पेरणी बाकी आहे. त्यांनी जमिनीत पुरेशी ओल असल्याशिवाय पेरणी करू नये असे आवाहन तालुका कृषी अधिकारी मिलिंद बिडबाग यांनी केले आहे.



 सोयाबीन, उडीद पेरणी केली आहे. सध्या पिकांची वाढीची अवस्था आहे. मागील पंधरा दिवसांपासून पाऊस गायब झाला आहे. तसेच उन्हाची तीव्रता अधिक आहे. त्यामुळे पिके सुकू लागली आहेत. पाऊस नाही पडला तर हा हंगाम वाया जाईल.

संजय माशाळकर,
शेतकरी, लोहारा



पवनचक्की मुळे पाऊस पडत नसल्याची चर्चा

लोहारा तालुक्यातील हराळी, धानुरी, लोहारा खुर्द, माळेगाव, लोहारा बु, मोघा, बेलवाडी, हिप्परगा, शिवकरवाडी, मार्डी, बेंडकाळ आदी गावांच्या परिसरात जवळपास ४० ते ४५ पवनचक्की कार्यान्वित आहेत. मागील वर्षांपर्यंत आमच्या भागात पाऊस चांगला होत होता. परंतु यावर्षी इतर ठिकाणी पाऊस होत असताना आमच्या भागात पाऊस नाही. त्यामुळे पवनचक्की मुळेच पाऊस पडत नसल्याची चर्चा होत आहे.

लोहारा तालुक्यातील सर्व कृषी सेवा केंद्र तीन दिवसांसाठी बंद - लोहारा तालुका कृषी निविष्ठा विक्रेते संघटनेने दिले निवेदन



प्रतिनिधी / लोहारा

लोहारा तालुक्यातील सर्व कृषी सेवा केंद्र तीन दिवसांसाठी बंद राहतील. याबाबत लोहारा तालुका कृषी निविष्ठा विक्रेते संघटनेच्या वतीने गुरुवारी ( दि. ९) तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले आहे.
              या निवेदनात म्हटले आहे की, राज्य संघटनेने विक्रेत्यांच्या काही मागण्यांसाठी व सद्य परिस्थितीत विक्रेत्यांवर कोणताही अन्याय होऊ नये यासाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तीन दिवसीय बंद पुकारला आहे. या बंद मध्ये उस्मानाबाद जिल्हा फर्टिलायझर्स पेस्टीसाईड्स सिड्स डिलर्स असोसिएशन सहभागी आहे. त्याप्रमाणे उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्र तीन दिवस बंद राहणार आहेत. त्यानुसार राज्य संघटनेच्या पत्रानुसार आम्हीही या संपात सहभागी असून तीन दिवस तालुक्यातील सर्व कृषी सेवा केंद्र बंद राहतील याबाबत लोहारा तालुका कृषी निविष्ठा विक्रेते संघटनेच्या वतीने तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले आहे. या निवेदनावर तालुकाध्यक्ष सागर पाटील, सचिव नाना पाटील, उपाध्यक्ष नेताजी ओवांडकर यांच्या सह्या आहेत.

05 July 2020

मनसेच्या उमरगा - लोहारा विधानसभा अध्यक्षपदी जालिंदर कोकणे यांची नियुक्ती



प्रतिनिधी / लोहारा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमरगा - लोहारा विधानसभा अध्यक्षपदी लोहारा शहरातील जालिंदर कोकणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जालिंदर कोकणे यांनी २०१९ मध्ये झालेली विधानसभा निवडणुक लढवली होती. त्यांच्या कार्याची दखल घेत ही नियुक्ती करण्यात आली आहे. मनसेचे जिल्हा संघटक अमरराजे कदम यांनी कोकणे यांना नियुक्तीपत्र दिले आहे. विधानसभा अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल जिल्हा संघटक अमरराजे कदम, जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे, उपजिल्हाध्यक्ष अविनाश साळुंके, लोहारा तालुकाध्यक्ष अतुल जाधव, उमरगा तालुकाध्यक्ष हरिदास जाधव, मनसे विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष विवेक बनसोडे, लोहारा शहराध्यक्ष प्रविण संगशेट्टी आदींनी जालिंदर कोकणे यांचे अभिनंदन केले आहे.

04 July 2020

नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र मिळत नसल्याने राज्यमंत्री बच्चू कडू यांना मनिषा सूर्यवंशी यांचे निवेदन - शासन निर्णयात बदल करण्याची केली विनंती

प्रतिनिधी / लोहारा

जातीचे प्रमाणपत्र वडिलांच्या नावे आहे. आणि आपण मागणी करत असलेल्या अर्जावर पतीचे नाव आहे. त्यामुळे आपला अर्ज अमान्य करण्यात येत आहे असे सांगितल्यावर लोहारा तालुक्यातील हराळी येथील महिलेने राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांना निवेदन पाठविले असून याबाबत च्या शासन निर्णयात बदल करावा अशी मागणी केली आहे.
                सूर्यवंशी यांनी राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांना
दिलेल्या निवेदनाप्रमाणे, तालुक्यातील हराळी येथील मनिषा उमाकांत सूर्यवंशी यांनी नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र मिळणेसाठी दोन वेळा अर्ज दाखल केला. परंतु त्यांचा अर्ज अमान्य झाल्याचे सांगण्यात आले. वडिलांचे नाव व आडनाव जुळत नाही असे कारण देण्यात आले. त्यानंतर त्यांनी फोनवरून विचारणा केल्यास असे सांगण्यात आले की, आपले जातीचे प्रमाणपत्र आपल्या वडीलांच्या नावाचे आहे. आपण प्रमाणपत्र मागणी पती कडील नावाने केली आहे. जर आपणास प्रमाणपत्र पाहिजे आसल्यास पतीच्या नावा ऐवजी आपल्या वडीलांच्या नावे मागणी केली तरच आपणास नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र मिळेल अन्यथा नाही असे सांगण्यात आले. त्यावर त्यांनी सांगितले की, माझे लग्न होऊन १३ वर्ष झाले. आता पतीचे नावाने मला प्रमाणपत्र मिळाले पाहीजे. तहसिलदार यांनी पतीकडील नावाने तीन वर्षांचे उत्पन्न प्रमाण पत्र दिले आहे. त्यामुळे वडीलाचे नाव वापरून पतीचे किंवा माझे उत्पन्न दाखवुन प्रमाणपत्र घेणे योग्य नाही असे सांगितले. तरीही त्यांनी वडीलांचे उत्पन्न दाखवून फेर मागणी अर्ज सादर करा. मगच आपणास नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र मिळेल असे सांगीतले.
                  त्यामुळे मनीषा सूर्यवंशी यांनी राज्यमंत्री बच्चू कडू यांना निवेदन पाठविले आहे. त्यात म्हणले आहे की, हि बाब मला खटकत आहे. लग्न झाल्यानंतर १३ वर्षानंतर सुध्दा वडीलांच्या नावे नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र मागणी करणे योग्य नाही.  असे वाटत असताना यावर योग्य न्याय अपाणस कोण देईल. कारण भारतीय घटनेनुसार महिलांना पण स्वतंत्र अधिकार असताना हे योग्य नाही. कारण संबधित उमरगा उपविभागीय अधिकारी यांनी तसेच शासन निर्देश आहेत असे सांगितले आहे. जर असे असेल तर या शासन निर्णयात बदल झाला पाहिजे असे मला वाटत आहे. मा.ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू भाऊ वंचितांना न्याय देऊ शकतील असे वाटले म्हणून महाराष्ट्रातील तमाम महिलाना आपल्या कडून न्याय मिळेल अशी आपेक्षा व्यक्त करत आहे. तसेच महिलांचे खातेही आपल्याकडेच आहे. त्यामुळे या अर्जाचा सहानूभूतीपुर्वक विचार करून या शासन निर्णयात बदल करून महाराष्ट्रातील तमाम महिलांना न्याय द्यावा अशी विनंती मनिषा सूर्यवंशी यांनी या निवेदनाद्वारे केली आहे.

03 July 2020

कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक - उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले


प्रतिनिधी / लोहारा

कोरोना १९ विषाणू प्रतिबंधाबाबत प्रशासनाकडून वेळोवेळी उपाययोजना करण्यात येत आहेत.  त्यामध्ये नागरिकांचेही सहकार्य अपेक्षित आहे असे आवाहन उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले यांनी एका प्रेसनोट द्वारे केले आहे.
                       यामध्ये म्हणले आहे की, कोरोना १९ विषाणूंचे प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे अनुषंगाने सर्व नागरीकांना तसेच दुर्धर आजारग्रस्त व्यक्तीं ज्यामध्ये कर्करोग, एचआयव्ही एड्स, मधुमेह, हायपर टेन्शन, अस्थमा, ह्यदयविकार इ. व्यक्तींनी काळजी घेणे आवश्यक आहे. सदर व्यक्तींनी अत्यावश्यक गरजेसाठीच घराबाहेर पडावे. तसेच कोरोना बाधीत क्षेत्रातून आलेल्या नागरीकांची माहिती प्रशासनाला तात्काळ द्यावी. नागरींकामध्ये कोरोनाची लक्षणे उदा. ताप, सर्दी, श्वसनास त्रास, खोकला, अशक्तपणा इ. दिसून येत असल्यास त्यांनी जवळच्या शासकीय रुग्णालयात जावून आपली तपासणी करुन घ्यावी. तसेच बाहेर फिरताना तोंडाला मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर राखणे आवश्यक आहे.  तथापि वरिल बाबींचे उल्लंघन केल्यास संबधित नागरीकांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५, साथरोग अधिनियम १८९७, महाराष्ट्र कोव्हीड १९ उपाययोजना नियम २०२० तसेच भारतीय दंड संहिता १८६० नुसार कारवाई करणेत येईल. याबाब नागरीकांनी सहकार्य करावे असे आवाहन उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले यांनी केले आहे.

लोहारा - सलून व्यावसायिकांना फेसशिल्ड व सँनिटायझरचे वाटप



प्रतिनिधी / लोहारा

सलून व्यावसायिकांना दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यांचा कोविड-१९ या रोगापासुन बचाव होण्यासाठी लोहारा शहरातील सर्व सलून व्यावसायीकांना युवासेनेचे तालुकाप्रमुख अमोल बिराजदार यांच्या वतीने फेसशिल्ड व सँनिटायझरचे वाटप करण्यात आले. यावेळी नगरसेवक अभिमान खराडे, युवासेनेचे तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, दत्ता मोरे, किरण पाटिल,  संत सेना नाभीक मंडळाचे उपाध्यक्ष बालाजी माने, संतोष फरीदाबादकर, अमोल फरिदाबादकर, दिपक फरिदाबादकर, कल्याण ढगे यांच्यासह शहरातील सलून व्यावसायिक उपस्थित होते. काही दिवसांपूर्वी युवासेनेचे तालुकाप्रमुख अमोल बिराजदार यांनी स्वतःचा वाढदिवसानिमित्त लोहारा शहरात आर्सेनिक अल्बम गोळ्या, सॅनिटायझर, फेस शिल्ड चे वाटप केले होते.