29 January 2020

विद्यामाता इंग्लिश स्कुल चे नववे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न











प्रतिनिधी / लोहारा

तालुक्यातील धानुरी येथील विद्यामाता इंग्लिश स्कुल चे नववे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न झाले. यावेळी चिमुकल्यांनी विविध प्रकारच्या गीतांवर नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
                      या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि प चे माजी उपाध्यक्ष अशोकराव जवळगे होते. पंचायत समितीच्या सभापती हेमलता रनखांब यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी पं स उपसभापती व्यंकट कोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी स्कुल च्या चिमुकल्यानी बालगीते, आदिवासी गीत, शेतकरी गीत यासह विविध प्रकारच्या गीतांवर नृत्य सादर करून उपस्थित पालकांची मने जिंकली. यावेळी नृत्याच्या माध्यमातून मुलगी वाचवा या विषयी सादरीकरण केले. राष्ट्रीय स्तरावरील नृत्य स्पर्धेत या स्कुल ने तृतीय क्रमांक पटकावला. २५ गोल्ड मेडल मिळवत घवघवीत यश संपादन केले. तसेच ऑलम्पियाड स्पर्धा परीक्षेत विद्यार्थ्यांनी गोल्ड मेडल मिळवले आहे. या सर्व स्पर्धांमधील विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते कौतुक करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका हिरा सोलापूरे यांनी केले. सुत्रसंचालन मनिषा शिंदे यांनी केले. या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापिका हिरा सोलापूरे, सहशिक्षिका अश्विनी कारभारी, गजाला सय्यद, लता भोसले, सुनीता सलगरकर, यशोधरा बनसोडे, विद्या फुलसुंदर, मनीषा तेलकर, सोनाली माळेगावे, प्रिती वलदोडे, संतोषी घंटे, सोमनाथ कुसळकर यांच्यासह शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

28 January 2020

लोहारा येथे आमदार ज्ञानराज चौगुले यांनी घेतली आढावा बैठक







प्रतिनिधी / लोहारा

दुष्काळी परिस्थितीमुळे मागील अनेक वर्षांपासून शेतकरी संकटात आहे. आणि आता मुबलक पाणी उपलब्ध असतानाही विजेच्या समस्यांमुळे शेतकरी अडचणीत येत आहे. त्यामुळे प्राधान्याने शेतकऱ्यांच्या समस्या सोडवा अशी सूचना आमदार ज्ञानराज चौगुले यांनी लोहारा येथील बैठकीत केली.
                      आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या अध्यक्षस्थानी सोमवारी (दि. २७) तहसील कार्यालयाच्या सभागृहात बैठक संपन्न झाली.  यावेळी प्रभारी तहसीलदार रणजित शिराळकर, प्रभारी गटविकास अधिकारी अशोक काळे, तालुका कृषी अधिकारी मिलिंद बीडबाग, बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता एस.डी. माले, वीज वितरण कंपनीचे उपविभागीय अभियंता ए.एम. गोकुंदे, पोलिस उपनिरीक्षक आनंद वाठोरे, लघुपाटबंधारे विभागाचे अभियंता ई.टी. सूर्यवंशी, पंचायत समितीचे माजी सभापती सिद्रामप्पा दुलंगे, शिवसेना तालुकाप्रमुख मोहन पणुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
                 यावेळी तालुक्यातील प्रमुख अधिकाऱ्यांच्या कामाचा आढावा आमदार ज्ञानराज  चौगुले यांनी घेतला. या बैठकीत नागरिकांनी घरकुल सह विविध समस्या मांडल्या. परंतु सध्या मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. रब्बी हंगाम बहरला असताना वीजपुरवठा मात्र सातत्याने खंडित होत आहे. त्यामुळे रब्बी पिकांना पाणी देता येत नाही. शिवाय तालुक्यातील अनेक ठिकाणचे रोहित्र नादुरूस्त आहेत. याबाबत शेतकऱ्यांनी अनेक वेळा तक्रारी करूनही महिना-महिना रोहित्राची दुरूस्ती केली जात नाही. त्यामुळे विजेअभावी रब्बी हंगाम धोक्यात येत असल्याच्या व गावात पाणीपुरवठा करण्यासाठी अडचण येत असल्याच्या तक्रारी लोहारा शहरासह हिप्परगा रवा, कानेगाव, उंडरगाव, जेवळी, नागूर, सास्तूर, येथील शेतकऱ्यांनी केल्या. तसेच वीज वितरण कंपनी चे अधिकारी, कर्मचारी तक्रार घेऊन गेलेल्या शेतकऱ्यांना उद्धटपणे बोलतात अशा तक्रारीही अनेकांनी केल्या. त्यावर बोलताना आ. चौगुले यांनी वीज वितरण कंपनीचे उपविभागीय अभियंता ए.एम. गोकुंदे यांना शेतकऱ्यांचे प्रश्न सामंजसाने समजून घेऊन प्राधान्याने सोडवावे, तक्रारी घेऊन आलेल्या शेतकऱ्यांच्या तक्रारीची नोंद रजिस्टर मध्ये घेऊन त्या प्रमाणे त्याची सोडवणूक करावी, कोणत्याही शेतकरी, नागरिकांना उद्धटपणे न बोलता त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करावी अशा सूचना केल्या. तसेच नायब तहसिलदार रणजित शिराळकर यांनाही वीज वितरण कंपनी संबंधित शेतकरी, नागरिकांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्याची सूचना केली.
          शासनाकडून वीज वितरण कंपनीला दीड कोटी रूपये देण्यात आले आहेत. रोहित्राची तत्काळ दुरूस्ती करून तालुक्यात अखंडित वीजपुरवठा करा, यात कसल्याही प्रकारची कुचराई केल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही, असा सज्जड दम आमदार चौगुले यांनी अधिकाऱ्यांना दिला. या बैठकीस बाजार समितीचे उपसभापती प्रा. आनंद सूर्यवंशी, शिवसेना शहरप्रमुख सलीम शेख, नगरसेवक श्याम नारायणकर, गगन माळवदकर, युवासेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, श्रीकांत भरारे, भाजप शहराध्यक्ष आयुब शेख,  नामदेव लोभे, हिप्परग्याचे सरपंच राम मोरे, मार्डीचे उपसरपंच दत्ता पाटील, उमाकांत लांडगे, जगन्नाथ पाटील, श्रीकांत पाटील, कुलदीप गोरे, यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

लोहारा येथे राष्ट्रीय बालिका दिन साजरा



प्रतिनिधी / लोहारा

एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्प लोहारा कार्यालयाच्या वतीने बेटी बचाव , बेटी पढाव या सप्ताहा अंतर्गत लोहारा येथे शनिवारी ( दि. २५) राष्ट्रीय बालिका दिन साजरा करण्यात आला. यावेळी पंचायत समितीच्या सभापती हेमलता रणखांब, माजी सभापती अश्विनी पाटील, नगरसेविका जयश्री कांबळे, प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी एम .एस. जमादार यांची प्रमुख उपस्थिती होती. एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्प कार्यालयाच्या वतीने दि. २० जानेवारी ते २६ जानेवारी या कालावधीत तालुक्यात बेटी बचाव, बेटी पढाव या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहात तालुक्यातील विविध अंगणवाडी येथे विविध कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी एम. एस. जमादार यांनी केले. या कार्यक्रमात अंगणवाडी कार्यकर्ती वंदना भगत यांनी उपस्थित मान्यवरांना जिजाऊ चरित्र भेट दिले. या कार्यक्रमासाठी सुपरवायझर माया जाधव, आशा कुलकर्णी, मुक्ता रणसुरे, सुनीता बायस, अंगणवाडी कार्यकर्ती संघटना तालुकाध्यक्ष सुनीता कदम यांच्यासह अंगणवाडी कार्यकर्ती, मदतनीस उपस्थित होत्या. यावेळी पाककृती प्रदर्शन घेण्यात आले.

24 January 2020

माकणी येथील बी एस एस कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या आठ विद्यार्थ्यांचा आविष्कार स्पर्धेत सहभाग



प्रतिनिधी / लोहारा

तालुक्यातील माकणी येथील बी एस एस कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या आठ विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथे आयोजित आविष्कार स्पर्धेत सहभाग घेतला. दि. २० व २१ जानेवारी रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने आयोजित या आविष्कार स्पर्धेत अमोल कुलकर्णी, आनंद ‌गंभीरे, गणेश पाटील, श्वेता इंगळे, दिपाली चव्हाण, अयशा मुल्ला, आसिफ मुल्ला, कृष्णा गाडीलोहार या विद्यार्थ्यांनी भूगोल , राज्यशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र आदी विषयातील नाविन्यपूर्ण संकल्पनेचा वापर करून पर्यावरण असंतुलन, कारणे, परिणाम व उपाय, जमिन पीक पाणी वीज व्यवस्थापन, रासायनिक खतांच्या ऐवजी सेंद्रिय खतांचा वापर व महत्त्व, पक्षी, प्राणी, जलचर प्राणी यांचे मानवी जीवनातील महत्त्व, तसेच औषधी वनस्पती आणि मानवी आरोग्य, डेंग्यू आजारांवर उपचार व जनजागृती, भारतीय संविधानाचे महत्व इत्यादी विषयांवर पोस्टर प्रदर्शन व प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून वर्तमानातील समस्या संदर्भात जाणिव जागृती निर्माण करुन  अनेकांची मने जिंकली. यावेळी संघ मार्गदर्शक म्हणून डॉ. बी. एच. जावळे व प्राध्यापिका आर. यू. चोचंडे यांनी काम पाहिले. सहभागी विद्यार्थी व प्राध्यापकांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एन. रेडे यांनी स्वागत केले. 

17 January 2020

उमरगा येथील तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयात ड्रग डिस्कव्हरी अँड अँपोर्चीनिटी इन अब्रॉड या विषयावर डॉ. विरसिंग रेड्डी यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन


प्रतिनिधी / उमरगा


उमरगा येथील भारत शिक्षण संस्था संचलित तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ  फार्मसी येथे  डॉ. विरसिंग रेड्डी यांनी ड्रग डिस्कव्हरी अँड अँपोर्चीनिटी इन अब्रॉड या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. विरसिंग रेड्डी यांची एमएससी केमेस्ट्री पुर्ण झाली आहे. त्यांनी I.I.S.E.R मोहली मधून डॉक्टरेट पदवी प्राप्त केली आहे. सध्या ते यूनिवर्सिटी ऑफ़ केपटाउन, साउथ आफ्रीका येथे पोस्ट डॉक्टरेट करत आहेत. औषधे निर्मिती करताना नैसर्गिक व रासायनिक पदार्थ आवश्यक असतात. लागणारी रासायनिक पदार्थ, त्या पदार्थांचा शोध व त्यावर  केल्या जाणाऱ्या  प्रकिया व त्या पदार्थांचे प्रमाण,  गुणवत्ता कशाप्रकारे ठरविण्यात येते याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. शिवाय फार्मसीच्या विद्यार्थ्यांना परदेशात असणाऱ्या नोकरीच्या संधी काय आहेत, कशा प्रकारे हस्तगत करता येतील, देशात फार्मसी शिक्षणाचे महत्त्व याबद्द्ल सविस्तर माहीती सांगितली. यावेळी प्रा. प्रशांत माने यांनी त्यांचे शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. प्रा. सुरज भगत यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. यावेळी प्रा. प्रदीप डीग्गे, प्राध्यापिका पुजा भावे उपस्थित होते.

07 January 2020

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वक्तृत्व स्पर्धा संपन्न









प्रतिनिधी / लोहारा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त लोहारा तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस, विद्यार्थी काँग्रेस, युवती काँग्रेस यांच्या वतीने लोहारा शहरातील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयात शुक्रवारी ( दि. ३) महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली.
           या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुनील साळुंके होते. यावेळी पं स चे माजी सभापती आसिफ मुल्ला, प्राचार्य डी. एस. बिराजदार, उपप्राचार्य विरभद्रेश्वर स्वामी, युवक तालुकाध्यक्ष माधव पाटील, विद्यार्थी तालुकाध्यक्ष पृथ्वीराज जगताप, युवक शहराध्यक्ष निहाल मुजावर, सतीश सुर्यवंशी, प्रकाश भगत, दादा पाटील, संजय जाधव, शैलेश चंदनशिवे, सुमित कदम, संकेत आनंदगावकर, मतीन शेख, राहुल चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अनेक स्पर्धकांनी या वक्तृत्व स्पर्धेत सहभाग नोंदवला. या स्पर्धेत मोहिनी बालाजी मोरे प्रथम, सृष्टी सुधाकर चव्हाण द्वितीय, गोपिका शिवकुमार स्वामी हिने तृतीय क्रमांक पटकावत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र झाले आहेत. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देण्यात आले.

लोहारा तालुक्यातील हिप्परगा व बेलवाडी येथे जिजाऊ ब्रिगेडच्या शाखेचे उद्घाटन




प्रतिनिधी / लोहारा

सावित्री- जिजाऊ जन्मोत्सव सप्ताहाअंतर्गत शुक्रवारी ( दि. ३)  लोहारा तालुक्यातील हिप्परगा व बेलवाडी येथे जिजाऊ ब्रिगेडच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिजाऊ - सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
                    यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा उपाध्यक्षा सुनंदा माने, जिल्हा प्रवक्ता रेखाताई सूर्यवंशी, जिल्हा संघटक वंदना भगत यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना रेखा सूर्यवंशी म्हणाल्या की, महिलांनी कोणत्याही कर्मकांडांना बळी न पडता स्वतःमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करावा आणि  सावित्रीमाई आणि जिजाऊंच्या विचारावर चालावे जेणेकरून त्या उद्याची प्रगल्भ वैचारिक पिढी निर्माण करू शकतील. लोहारा तालुक्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड च्या माध्यमातून वंदना भगत कार्यरत आहेत. त्यांच्या कार्याचा प्रभाव येथील महिलांमध्ये दिसून येत असल्याचे प्रतिपादन रेखा सूर्यवंशी यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शालेय मुलींनी जिजाऊ गौरव गीत, पोवाडे सादर केले.
                  ग्राम शाखा हिप्परगा येथे अध्यक्ष पदी गीता तुकाराम हराळे यांची तर सुवर्णा योगेश जाधव यांची सचिव पदी नियुक्ती करण्यात आली. तसेच ग्राम शाखा बेलवाडी येथे अध्यक्षपदी नीता शरद भगत तर अपर्णा लहू जाधव  यांची सचिव पदी निवड करण्यात आली. या कार्यक्रमासाठी महिला, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महिलांनी जास्तीत जास्त संख्येने जिजाऊ ब्रिगेड मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन सुनंदा माने यांनी यावेळी बोलताना केले. वंदना भगत यांनी आभार मानले.

04 January 2020

लोहारा शहरातील नेताजी सुभाष चंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालय येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी




प्रतिनिधी / लोहारा

लोहारा शहरातील वसंतदादा पाटील हायस्कूल संलग्न नेताजी सुभाष चंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालय येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.
              या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य यु व्ही पाटील होत्या. यावेळी जिजाऊ ब्रिगेड तालुकाध्यक्षा रंजना हासुरे, माजी नगराध्यक्षा पौर्णिमा लांडगे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा करून आलेल्या मुलींचाही विशेष गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुलोचना रसाळ यांनी केले. प्रास्ताविका नंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर भाषणे केली. यावेळी रंजना हासुरे यांनी विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले यांच्या जिवन कार्याबद्दल माहिती दिली. तसेच अध्यक्षीय समारोपात प्राचार्य यु व्ही पाटील यांनी सध्याच्या काळातील मुली व  त्यांचा संघर्ष याविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी व्ही धनवडे यांनी तर प्रा. एस डी शिंदे यांनी आभार मानले. यावेळी शाळा, महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

03 January 2020

सास्तुर येथील निवासी दिव्यांग शाळेत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त 'लेक वाचवा, लेक शिकवा' अभियानास प्रारंभ



प्रतिनिधी / लोहारा

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्तशुक्रवारी ( दि. ३) तालुक्यातील सास्तूर येथील निवासी दिव्यांग शाळेत लेक वाचवा, लेक शिकवा अभियानाची सुरूवात करण्यात आली. यावेळी शाळेतील विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले, फातिमा शेख, राष्ट्रमाता जिजाऊ, आनंदीबाई जोशी, गानकोकीळा लता मंगेशकर, किरण बेदी यांच्या वेषभूषा केल्या होत्या. या विद्यार्थिनींच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक बी.टी.नादरगे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याबाबत दिव्यांग विद्यार्थ्यांना माहिती दिली. तसेच दिव्यांग मुलींनी बालिका दिनानिमित्त सक्षम महिला होण्यासाठी प्रतिज्ञा म्हटली. दिव्यांग विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून सावित्रीबाईंच्या कार्याचा उहापोह केला. दि. ३ ते २६ जानेवारी २०२० या कालावधीत शाळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करून 'लेक वाचवा, लेक शिकवा' अभियान राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी डॉ. एम.आर.कुलकर्णी, शाळेतील शिक्षिका अंजली चलवाड, संध्या गुंजारे, यास्मिन शेख, शिक्षक रमाकांत ईरलापल्ले, आर. पी.गुंडूरे, बी.बी. गुणाले, प्रविण वाघमोडे, विठ्ठल शेळगे तसेच शिक्षकेतर कर्मचारी निजवंते अप्पा, ज्ञानोबा माने, शंकर गिरी, गोरख पालमपल्ले, एन.सी.सुर्यवंशी, निशांत सावंत, अनिल थोरमोठे, सुरेखा परीट, किरण मैंदर्गी, गिर्दवाड, कविता भंडारे आदींची उपस्थिती होती. या सर्वांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रयत्न केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दिव्यांग विद्यार्थी गौरव करदोरे याने तर प्रशांत भोसले याने आभार मानले.

02 January 2020

लोहारा तालुक्यातील सास्तुर येथील निवासी अपंग शाळेत राज्यस्तरीय कवी संमेलनाचे आयोजन


प्रतिनिधी / लोहारा

काव्यप्रेमी शिक्षक मंच सोलापूर या संस्थेच्या वतीने तालुक्यातील सास्तुर येथे रविवारी  (दि. ५) दिव्यांग बालमित्रांसोबत हितगुज करण्यासाठी आगळ्यावेगळ्या राज्यस्तरीय कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. सास्तुर येथील निवासी दिव्यांग शाळेत रविवारी ( दि. ५) सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत कवी संमेलन चालणार आहे. या कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी निर्मला बदामे राहणार आहेत. तसेच जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, जिल्हा समाजकल्याण अधिकारी नागनाथ चौगुले, राजन लाखे, अरविंद हंगरगेकर, सास्तुर चे सरपंच यशवंत कासार, स्पर्श रुग्णालयाचे प्रकल्प अधिकारी  रमाकांत जोशी, काव्यप्रेमी शिक्षक मंचचे राजाध्यक्ष आनंद घोडके, राज्य सचिव कालिदास चवडेकर, राज्य कोषाध्यक्ष कृष्णा शिंदे, राज्य सदस्य सत्येंद्र राऊत, पुणे विभागीय अध्यक्ष नवनाथ खरात यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
                  या कविसंमेलनाचे उद्घाटन दिव्यांग विद्यार्थ्यांच्या हस्ते होणार असून सर्व सहभागी कवी, कवयित्री यांना मानपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे. या नाविन्यपूर्ण उपक्रमाने दिव्यांग विद्यार्थ्यांना समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. निसर्गरम्य वातावरणात, दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षण, प्रशिक्षण,  पुनर्वसन, कला, क्रिडा, सांस्कृतिक प्रगतीसाठी आपल्या बहुमोल काव्य शब्दसुमनाने प्रोत्साहन देण्यासाठी पर्यायाने दिव्यांग सेवा हीच राष्ट्रीय सेवा समजून राज्यभरातील  साहित्यिक, कवी, कवयित्री यांनी या कविसंमेलनात सहभागी व्हावे असे आवाहन निवासी अपंग शाळेचे मुख्याध्यापक संयोजक बालाजी नादरगे, काव्यप्रेमी शिक्षक मंच सोलापूरचे जिल्हाध्यक्ष युवराज जगताप, भगवान चौगुले यांनी केले आहे.



नावनोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क -
युवराज जगताप - ९४०५२३७०८१
कृष्णा शिंदे - ९४२१८६१५२८
लक्ष्मण काटेकर - ७५८८०२०८८६
भगवान चौगुले - ७९७२६०२०३०