23 March 2020

जनता कर्फ्यु दरम्यान बाहेरगावातील रूग्णांसाठी घरगुती जेवण देत केला मुलाचा वाढदिवस, सर्व स्तरातुन कौतुक





प्रतिनिधी / लोहारा -

             उमरगा शहरात रविवारी जनता कर्फ्यु काटेकोरपणे पाळला गेला. पण यामुळे शहरातील दवाखान्यात ऍडमिट असलेल्या ग्रामीण भागातील अनेक रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना भोजन मिळू शकले नव्हते. त्यामुळे शहरातील सामाजिक कार्यकर्ते खाजाभाई मुजावर यांनी माणुसकीचे दर्शन घडवीत शहरातील विविध रुग्णालयातील गरजू रुग्णांना भोजन वाटप करून आपला मुलगा शाहिद याचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला. याबद्दल मुजावर यांचे कौतुक केले जात आहे.
            सध्या कोरोना विषाणूने भारतात ही धुमाकूळ घातला आहे. या संसर्गजन्य विषाणू ला संपविण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने रविवारी एक दिवसाचा जनता कर्फ्यु जाहीर करण्यात आला. उस्मानाबाद जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार दि. २१ व २२  हे दोन दिवस अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. परंतु जनता कर्फ्यु दिवशी हॉस्पिटल व मेडिकल वगळता सर्वच बाजारपेठ हॉटेल व वाहतूक सेवाही बंद होती व लोक घरामध्येच होते. शहरातील विविध रुग्णालयात ऍडमिट असलेले बाहेरगावचे रुग्ण यांची यामुळे मोठी गैरसोय होत होती. वाहतूक बंद असल्याने गावाकडून जेवणाचा डबाही येऊ शकत नाही. तर रुग्णालय परिसरातील व शहरातील सर्व हॉटेल बंद असल्यामुळे या रुग्णांना व रुग्णासोबत असलेल्या नातेवाईकांना उपाशीपोटी बसावे लागत होते. याची जाणीव ठेवून उमरगा शहरातील सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष ख्वाजा मुजावर यांनी त्यांचा मुलगा शाहिद याचा रविवारी वाढदिवस असल्याने तसेच या रुग्णाची उपाशीपोटी होणारी परवड लक्षात घेऊन शहरातील विविध रुग्णालयात असणाऱ्या गरजू रुग्णांना घरगुती भोजनाची व्यवस्था करून मुलगा शाहिद याच्या हस्ते वाटप करून त्याचा वाढदिवस साजरा केला. सामाजिक जाणिव ठेवून माणुसकीचे दर्शन घडवीत जाती धर्माच्या पलीकडचा विचार करण्यास प्रवृत्त करणाऱ्या अशा एका वेगळ्या सामाजिक उपक्रमांने वाढदिवस साजरा केल्यामुळे मुजावर यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

No comments:

Post a Comment