प्रतिनिधी / लोहारा
परतीचा पाऊस व अतीवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी व निराधाराचे मानधन तात्काळ द्यावे अन्यथा शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा तहसिलदार यांना सोमवारी ( दि. २५) दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
तहसिलदार विजय अवधाने यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, यावर्षी परतीचा पाऊस व अतीवृष्टी मोठ्या प्रमाणात झाली. यामुळे सोयाबिन, तुर, मका, द्राक्ष, केळी बागायती पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. त्यामुळे राज्यात शेतकऱ्यांच्या संकटात वाढ झालेली आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करण्याकडे प्रवृत्त होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी २५ हजार रुपये मदत देणे गरजेचे आहे. पण आद्याप कसलीही मदत मिळाली नाही. तसेचे वयोवृध्द,विधवा महीला ,निराधार यांना शासनाकडून मदत दिली जाते. पण तहसिल कार्यालयातील काही कर्मचारी, दलाल या निराधाराना पैशाची मागणी करत त्यांच्याकडून पैसे घेत आहेत. याची चौकशी करुन आठ दिवसाच्या आत या निराधाराचे मानधन त्यांच्या खात्यावर जमा करावे. व शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी. अन्यथा शिवसेनेच्या वतीने तहसिल कार्यालयावर शेतकरी, निराधार, वयोवृध्द, विधवा महीलांचा मोर्चा काढण्यात येईल तसेच राष्ट्रीय माहामार्ग आष्टामोड येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल. तरी पुढील परीणामास प्रशासन जबाबदार राहील असे या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर शिवसेना तालुकाप्रमुख मोहन पणुरे, युवा सेना उपजिल्हाप्रमुख नामदेव लोभे, तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, शहरप्रमुख सलिम शेख, उपतालुका प्रमुख आमिन कुरेशी, नगरसेवक श्याम नारायणकर, अमिन सुंबेकर, श्रीकांत भरारे, बाळासाहेब कदम, सुरेश दंडगुले, प्रेम लांडगे, सलिम सय्यद, कुलदिप गोरे, कुंडलिक सुर्यवंशी, नितिन जाधव, पोपट सुर्यवंशी, रमेश जाधव, दत्ता मोरे, रोहीत काडगावे, दिलीप लोभे आदीच्या सह्या आहेत.


No comments:
Post a Comment