12 April 2020

लोहारा तालुक्यातील दक्षिण जेवळी ग्रामपंचायतीच्या वतीने कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना





प्रतिनिधी / लोहारा

तालुक्यातील दक्षिण जेवळी ग्रामपंचायतच्या वतीने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना बरोबरच १४ व्या वित्त आयोगातून साथरोग उपाय योजना अंतर्गत जवळपास ३५ हजार रुपये खर्च करून प्रत्येक कुटुंबाला सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले आहे. तसेच बचत गटामार्फत तयार करण्यात आलेले तीन हजार मास्क गावातील प्रत्येक व्यक्तीला देण्यात आले आहेत. बचत गटातील महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी गावातील महिला बचतगटाला हे मास्क तयार करण्याची ऑर्डर दिली होती.

             तालुक्यातील दक्षिण जेवळी हे भूकंप पुनर्वसित झालेले जवळपास चार हजार लोकसंख्येचे गाव आहे. दक्षिण जेवळी, रुद्रवाडी व पश्चिम तांडा या तीन वस्ती मिळून दक्षिण जेवळी ग्रुप ग्रामपंचायत आहे. येथील सरपंच चंद्रकांत साखरे यांनी प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या, सामाजिक कार्यकर्ते, जिल्हा परिषद शिक्षक, ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या सहकार्याने गावातील नागरिकांना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी विविध उपाययोजना करीत आहेत. यात पुणे, मुंबई, दिल्ली आदी सारख्या बाहेरून आलेल्या नागरिकांची माहिती संकलित करून नोंदी ठेवल्या जात असून या व्यक्तींच्या घरी जाऊन प्रतिदिन आरोग्य विषयी विचारपूूस केली जात आहे. दररोज सकाळ, संध्याकाळ दवंडी व स्पीकरच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. दक्षिण जेवळी, रुद्रवाडी व पश्चिम तांडा येथील रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी मिनी ट्रॅक्टरच्या साहाय्याने सोडियम डायक्लोराईडची फवारणी करण्यात आली आहे. आता वैद्यकीय अधिकारी आर. के. शेख यांच्या मार्गदर्शनाखाली १४ व्या वित्त आयोगातून साथरोग उपाय योजना अंतर्गत जवळपास ३५ हजार रुपये खर्च करून प्रत्येक कुटुंबाला सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले आहे. यात सातशे बॉटल वाटप करण्यात आले. तसेच गावातील प्रत्येक व्यक्तीला मास्क वाटप करण्यात आले आहे. गावातील बचतगटातील महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी हे मास्क गावातील बचतगटामार्फत बनवून घेण्यात आले आहेत. जवळपास तीन हजार मास्क बनवून घेण्यात आले आहेत. यासाठी सरपंच चंद्रकांत साखरे, उपसरपंच पार्वती पाटील, ग्रामसेवक नेताजी मारेकर, ग्रामपंचायत सदस्य विवेकानंद बिराजदार, राम मोरे, प्रविण बोंदाडे, रोजगार सेवक संगप्‍पा मुखे, शिवराज चिनगुंंडे, मुख्याध्यापक देविदास साळुंके, जयश्री बिराजदार आदींनी पुढाकार घेतला.


-----------------------

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना बरोबरच १४ व्या वित्त आयोगातून साथरोग उपाययोजना अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले आहे. तसेच प्रत्येक व्यक्तीला मास्क देण्यात आले आहेत.

चंद्रकांत साखरे,
सरपंच
दक्षिण जेवळी ग्रामपंचायत

No comments:

Post a Comment