प्रतिनिधी / लोहारा
तालुक्यातील सास्तुर येथील ग्रामस्थांनी सध्याच्या परिस्थितीत अडचणीत असलेल्याना मदत व्हावी यासाठी ९३ क्विंटल धान्य जिल्हाधिकारी कार्यालयास दिले आहे. शुक्रवारी ( दि. २४) गावातील काही नागरिक जाऊन जिल्हाधिकारी कार्यालयात हे धान्य पोहोच केले.
समाजातील अनेक लोकांना अन्न धान्याची आवश्यकता असल्याने अशा लोकांना मदत करण्यासाठी शासनाकडून वेळोवेळी मदतीचे आवाहन करण्यात येत आहे. भूकंपाच्या वेळी अनेकांनी मदत केली होती. त्याचप्रमाणे या भीषण परिस्थितीत आपणही आपल्याला होईल तेवढी मदत करू असा विचार सास्तुर येथील काही तरुण मित्रांच्या मनात आला. त्यानुसार त्यांनी गावातील प्रत्येक कुटुंबातून इच्छेनुसार धान्य देण्याची विनंती केली. सास्तुर येथील ग्रामस्थांनीही आपल्याला संकटकाळात झालेल्या मदतीची जाणीव ठेवून धान्य स्वरूपात मदत करत यातून ज्वारी, गहू, तांदूळ, डाळ, साखर धान्य जमा केले. जिल्हाधिकारी यांच्या मार्फत एखाद्या सामाजिक संस्थेला हे जमा झालेले धान्य द्यावे जेणेकरून गरजूंपर्यंत ते पोहोचेल असा विचार करून त्यांमी जमा झालेले धान्य जिल्हाधिकारी कार्यालयास देण्याचे निश्चित केले. त्यानुसार हे धान्य शुक्रवारी ( दि. २४) जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले. यावेळी एकूण ९३ क्विंटल अन्न धान्य व ११६ पॉकेट पामतेल देण्यात आले. संकट काळात सास्तुर येथील ग्रामस्थांनी केलेली ही मदत महत्वाची असून त्याबद्दल जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी पत्राद्वारे ग्रामस्थांचे आभार व्यक्त केले.
यावेळी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे, सास्तुर चे सरपंच यशवंत कासार, उपसरपंच पृथ्वीराज पाटील, अप्पर जिल्हाधिकारी शिरीष यादव, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, माजी सरपंच विजयकुमार क्षीरसागर, ग्रा. पं. सदस्य बालाजी कांबळे, शाहबाज मुल्ला, नेताजी पवार, संजय बाबळसुरे, बालाजी बनसोडे आदी उपस्थित होते.



No comments:
Post a Comment