13 April 2020
कोरोना दहशतीच्या सावटात आशा कार्यकर्त्या करत आहेत 'आशा'दायी कार्य
प्रतिनिधी / लोहारा
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्यामुळे शासनाने प्रशासनाने संसर्ग रोखण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना करण्यात येत आहेत. सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी यात आपापली जबाबदारी पार पाडत आहेत. लोहारा तालुक्यातील धानुरी येथे ही एक रुग्ण आढळला. त्यानंतर आरोग्य विभागासह, महसूल, पोलीस विभागातील कर्मचारी, अधिकारी आपली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडत आहेत. त्यात सध्या धानुरी गावातील नागरिकांच्या सर्व्हेक्षणाची जबाबदारी आशा, अंगणवाडी कार्यकर्त्यांवर आहे. दररोज गावातील प्रत्येक कुटुंबातील सदस्यांची त्या चौकशी करत आहेत. एकीकडे कोरोना च्या दहशतीमुळे सर्वत्र दहशत पसरली असताना या सर्व आशा कार्यकर्त्या मात्र मोठ्या हिमतीने काम करत आहेत.
तालुक्यातील धानुरी येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळला. त्यानंतर आरोग्य विभागाने तातडीने उपाययोजना सुरू केल्या. तसेच गावातील प्रत्येक कुटुंबाची माहिती मिळविण्यासाठी आशा, अंगणवाडी कार्यकर्तींकडून सर्व्हेक्षण करण्याचा निर्णय तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे यांनी घेतला. त्याप्रमाणे त्यांनी माकणी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील मंडले यांना सांगितले. हा निरोप डॉ. मंडले यांनी आशा गट प्रवर्तक यांना दिला. या पद्धतीच्या आदेशाचा फोन आल्यावर तो ऐकून सुरुवातीला त्यांना धक्काच बसला. कारण कोरोनाच्या भीतीमुळे कुणीही घराबाहेर ही पडत नाही. आणि आपण तिथे जाऊन सर्व्हे करायचा हेच त्यांच्या मनाला न पटण्यासारखे होते. परंतु त्यांनी त्यांच्या शंका तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील मंडले, समुदाय वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष मनाळे, डॉ. जाधव यांच्याशी बोलून व्यक्त केल्या. त्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाने आशा कार्यकर्तींच्या शंका दूर झाल्या. व त्या सर्व्हेक्षणाच्या कामाला लागल्या. तसेच तालुका आरोग्य अधिकारी यांनी सर्व्हेक्षणाच्या पहिल्या दिवशी सर्वांनी काय काळजी घ्यायची आहे, कुटुंबातील सदस्यांना काय माहिती विचारायची, घरी गेल्यानंतर काय काळजी घायची याबाबत मार्गदर्शन केले होते. त्याप्रमाणे त्यांनी काम सुरू केले आहे. दोन आशा कार्यकर्तींचे मिळून एक पथक आहे. हे पथक दररोज ९० ते ९५ कुटुंबांची माहिती घेत आहे. या ठिकाणी गट प्रवर्तक राजश्री साळुंके, संगीता क्षीरसागर यांच्यासह आशा कार्यकर्त्या मंगल वाडीकर, स्वाती सूर्यवंशी, वनिता सुरवसे, महानंदा चौरे, सविता नरसाळे, सुकाबाई घोडके, शशिकला कारभारी, रंजना क्षीरसागर, अर्चना क्षीरसागर, जयश्री माळी, भाग्यश्री दलाल, रेखा वाघमारे, सुकुमार रवळे, हारुबाई तिगाडे, गिता राठोड तसेच anm बुदाने, CHO जाधव, Mpw जाधव, थोरात आदी सर्वजण उत्कृष्ट पद्धतीने काम करत आहेत.
------------------
जेंव्हा धानुरीला सर्व्हे करायला जायचे आहे असा कॉल आला तेंव्हा घाबरले. थोडासा शांत बसून विचार केला. त्यावेळी वाटले की, आपणच घाबरून गेलो तर कसं हा विचार मनात आला. त्यामुळे आशा कार्यकर्तींना कॉल करून धानुरी येथे येण्यास सांगितले. तेंव्हा त्याही घाबरल्या होत्या. तेंव्हा मी त्यांना धीर देत म्हणाले की, आपल्याला समाजसेवा करायची हीच संधी आहे. त्यानंतर आम्ही धानुरी ला पोहोचलो. तिथे गेल्यावर आम्हाला मार्गदर्शन करण्यात आले. गावात सर्वत्र भीतीचे वातावरण होते. आमच्या सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेऊन आम्हाला योग्य ती साधने व सूचना देण्यात आली होती. आम्ही सर्व्हे सुरू केला. पहिल्या घरी गेलो, घराला आतून कडी होती. त्यामुळे मी आवाज दिला, ताई घरी कोणी आहे का. त्यावेळी घरातून आलेली महिला घाबरलेली दिसली. तेंव्हा मी म्हणाले, ताई घाबरू नका. फक्त घरीच राहून सहकार्य करा. कोणाला सर्दी, खोकला, ताप आहे का आदी माहिती विचारत सर्व्हे करत आहोत.
सर्व्हे करायला घराबाहेर पडताना माझ लहान बाळ मला दररोज विचारत, मम्मी तू परत केंव्हा येणार. त्यावेळी आपल्याच मनाला आवरून बाळाला सांगायचं, लवकर येते आणि कसेबसे समजावून सांगून घराबाहेर पडते. घरी परतल्यानंतर पहिल्यांदा गरम पाण्याने अंघोळ करते. तसेच गरम पाण्याने कपडेही धुते. नंतर थोड्या वेळाने लहान मुलांजवळ जाते.
संगीता क्षीरसागर,
आशा गटप्रवर्तक
-----------------
धानुरीत जाऊन सर्व्हे करायचा आहे हे ऐकल्यावर पहिल्या दिवशी आम्ही खूप घाबरलो होतो. आपण धानुरीत सर्व्हे केला तर काय होईल अशी भीती होती. परंतु त्यावेळी पती म्हणाले की, तू आरोग्य विभागात काम करतेस. घाबरायचं नाही असं म्हणत त्यांनी धीर दिला. तसेच आम्हाला डॉ. अशोक कटारे साहेबांनी मार्गदर्शन केले. त्यामुळे थोडेसे धाडस आले. मार्गदर्शन केल्याप्रमाणे आम्ही आमच्या पथकाला दिलेल्या कुटुंबांचे सर्व्हे सुरू केले. आम्हाला लागणारे ग्लोज, मास्क, सॅनिटायझर दररोज दिले जातात. सर्व्हेक्षण करताना गावातील नागरिक ही सहकार्य करतात. तसेच आम्हाला मार्गदर्शन मिळाल्याप्रमाणे मी सर्व्हेक्षण करून घरी आल्याबरोबर पहिल्यांदा गरम पाण्याने अंघोळ करते. मग थोड्या वेळाने घरातील मुलांजवळ जाते. सुरुवातीला भीती होती पण स्वतःची काळजी घेत आत्मविश्वासाने काम करत आहे. मला सुरुवातीला वाटणाऱ्या भीतीची जागा आता आत्मविश्वासाने घेतली आहे.
राजश्री साळुंके,
आशा गटप्रवर्तक
Subscribe to:
Post Comments (Atom)




No comments:
Post a Comment