21 January 2019

भाऊसाहेब बिराजदार साखर कारखान्याचा गाळप शुभारंभ उत्साहात संपन्न

भाऊसाहेब बिराजदार साखर कारखान्याचा गाळप शुभारंभ उत्साहात संपन्न

-------------------------------------------
लोहारा प्रतिनिधी :

भाऊसाहेब बिराजदार कारखान्याच्या उभारणीसाठी वीस वर्ष संघर्षाची वाटचाल करावी लागली. शासकिय भाग भांडवल मिळण्यास झालेला विलंब, कर्ज देण्यासाठी बँकाची उदासिनता आणि मध्यंतरीचे चार - पाच वर्षाच्या दुष्काळामुळे कारखाना सक्षमपणे सुरू करण्यासाठी अडचणी आल्या.  शेतकऱ्यांच्या हितासाठी कारखाना सक्षमपणे सुरू ठेवण्यासाठी संचालक मंडळाने क्युनर्जी इंडस्ट्रीजला भाडेतत्वावर दिला. ऊस उत्पादक सभासदांचा ऊस संपेपर्यंत कारखान्याचा गळीत हंगाम सुरू राहिल, शेतकऱ्यांना योग्य दरासह पंधरा दिवसाच्या आत ऊसबीलाची रक्कम पोहच होईल अशी हमी भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांनी दिली.
             क्युनर्जी इंडस्ट्रीज संचलित समुद्राळ ( ता. उमरगा ) येथील भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखान्याच्या पहिल्या गळीत हंगामाचा शुभारंभ सोमवारी ( ता. २१ ) माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील, क्युनर्जी इंडस्ट्रीजचे संचालक सचीन सिनगारे, पृथ्वीराज पाटील, कारखान्याचे अध्यक्ष प्रा. बिराजदार व संचालक मंडळाच्या उपस्थितीत संपन्न झाला. त्या वेळी प्रा. बिराजदार बोलत होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते गव्हाणीत मोळी टाकुुन गळीत हंगामाचा शुभारंभ झाला. प्रा. बिराजदार पुढे बोलताना म्हणालेे की,  या भागातील शेतकऱ्यांची ऊस पाठविण्यासाठी होणारी फरफट दूर होण्यासाठी माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली भाऊसाहेब बिराजदार साखर कारखान्याच्या उभारणीचा संकल्प केला. २००१ पासून कारखान्याच्या उभारणीसाठी प्रयत्न सुरू झाले. उभारणीदरम्यान अनेक आर्थिक अडचणी आल्या. संचालक मंडळ व शेतकऱ्यांनी शेतजमिनी  गहाण करून साडेचार कोटीचे कर्ज काढले आणि २०१२ मध्ये ऐन दुष्काळाच्या काळात पहिला गळीत चाचणी हंगाम सुरू झाला. त्यानंतर साखरेचेे कमालीचे दर उतरल्याने शेतकऱ्यांना बीलाची रक्कम देणे कठीण झाले. त्यानंतर पाच वर्ष सलग पडलेला दुष्काळ व बंद अवस्थेत वाढलेला व्याजाचा आकडा ,अशा परिस्थितीमूळे संचालक मंंडळाने सक्षम क्युनर्जी इंडस्ट्रीजला कारखाना भाडेतत्वावर देण्याचा निर्णय झाला. आता शेतकऱ्यांना नक्कीच न्याय मिळणार आहे. पंधरा दिवसात ऊसबीलाची रक्कम संबंधित कंपनी देण्यासाठी सक्षम आहे. शेतकऱ्यांनी कारखान्यावर वीस वर्ष विश्वास दाखवला असून आता चांगले दिवस आले आहेत, सर्वांचे ऊस घेण्याचा शंभर टक्के प्रयत्न रहाणार असल्याचे प्रा. बिराजदार यांनी सांगितले. श्री. सिनगारे म्हणाले की, कारखान्याचा कारभार पारदर्शक रहाणार असून येणाऱ्या काळात इथेनॉल, सहविज निर्मिती प्रकल्पाची उभारणी केली जाणार आहे. सर्व शेतकऱ्यांचा ऊस घेतला जाईल, शेतकऱ्यांनी चांगल्या प्रतिचा ऊस देवून आपल्या हक्काचा कारखाना सक्षम करावा, शेतकऱ्यांनी ऊसाची काळजी घ्यावी, आम्ही चांगल्या दराची नक्कीच काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केलेेे. या वेळी संचालक साहेबराव पाटील यांनी इतर कारखान्यापेक्षा अधिक दर देण्याची अपेक्षा व्यक्त केली.  अडीच हजार मेट्रीक टन गाळप क्षमतेेचा कारखाना शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सुरू झाला आहे. शेतकऱ्यांना वहातूक तोडणीसाठी कसलाही त्रास होणार नाही. थोडी सहनशिलता ठेवून सर्वांनी सहकार्य करावे, सर्वांचा ऊस नेण्यात येणार असल्याचे कारखान्याचे सरव्यवस्थापक संजीव गुुरव यांंनी सांगितले. या वेळी उमरगा बाजार समितीचे सभापती एम. ए. सुलतान, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष कैलास शिंदे, भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमोल मोरे, कारखान्याचे उपाध्यक्ष पद्माकरराव हराळकर, संचालक गोविंद साळुंके, सुनील माने, देवीदास माडीवाले, माणिकराव बिराजदार, किशोर साठे, इमाम पटेल, पंडीत आळंगे, विठ्ठलराव पाटील, अशोक इंगळे, गोविंद पवार आदींची उपस्थिती होती. या वेळी उमरगा, लोहारा, निलंगा व औसा तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते. कारखान्याचे संचालक व्यंकट सोनवणे यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment