27 January 2019

लोहारा तालुक्यातील सास्तुर येथील स्पर्श ग्रामीण रुग्णालय येथे दिव्यांग (अपंगत्व) निवारण शस्त्रक्रिया व तपासणी शिबिर





लोहारा प्रतिनिधी -

मी कोणासाठी थोडे काही केले तर त्या बदल्यात मला काय मिळेल असा विचार करणाऱ्या या जगात केवळ निस्वार्थ आरोग्य सेवेचे ब्रीद जोपासणाऱ्या सास्तूरच्या स्पर्श ग्रामीण रुग्णालयाने आरोग्य सेवेमध्ये आपला नवा ‘ स्पर्श पॅटर्न’ निर्माण केला आहे असे गौरवोदगार लोहारा - उमरगाचे आमदार ज्ञानराज चौगुले यांनी काढले. तालुक्यातील सास्तुर येथील स्पर्श ग्रामीण रुग्णालय येथे दिव्यांग (अपंगत्व) निवारण शस्त्रक्रिया व तपासणी शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी शनिवारी ( दि. २६) ते बोलत होते.
              या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आरोग्य सेवा लातूर परिमंडळचे उपसंचालक डॉ. एकनाथ माले हे होते. यावेळी डॉ. शिवाजी फुलारी, लंडन येथे सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. जॉन क्लेग, सरस्वती प्रतिष्ठान मुंबई सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. मयुरेश वारके, भूलतज्ञ डॉ. प्रमोद काळे, लंडन येथील डॉ. सायमन ह्म्प्री, डॉ. डॅनियल वेस्टा कॉट, डॉ. जामिये मॅक्लेन, मुंबई येथील डॉ. शहबाज अहमद, डॉ. कल्पेश शहा, डॉ. लुबना अहमद, डॉ. हिमांशू बेंद्रे, किर्तीका पी. राव, नायोनिका पाटणकर, रोहन भाल, रचना मेहता, गणेश केळुस्कर, नरेश शेणॅय, नागेश भट्ट, राहुल पटवर्धन, पदमा कपूर, आनंद राणे, मुकेश विसपुते, लोहारा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, स्पर्श ग्रामीण रुगणालय सास्तुरचे प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी, निवासी अपंग शाळा सास्तुरचे मुख्याध्यापक बालाजी नादारगे, डॉ मोहन कुरुम, डॉ. सुरज सूर्यवंशी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
              यावेळी पुढे बोलताना आ. चौगुले म्हणाले की, प्रामाणिक प्रयत्नांना आपुलकीची, तळमळीची जोड असली कि स्पर्श ग्रामीण रुग्नालयासारखे अत्युच्च दर्जाचे जनसेवेचे, लोकसेवेचे कार्य घडते व त्यामुळे गरजू रुग्णांना ते आपले माहेरघर वाटते. त्यामुळे येथील दर्जेदार आरोग्य सेवेसाठी स्पर्शच्या अडी अडचणीसाठी या भागाचा आमदार म्हणून आपले नेहमीच सहकार्य राहील असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
              या कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्पर्श ग्रामीण रुग्णालय सास्तुरचे प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी यांनी केले. सलग १० वर्ष ९०० च्या वर दिव्यांग बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया करून दिव्यांग बालकांच्या आयुष्यात नवा प्रकाश निर्माण करणाऱ्या डॉ जॉन क्लेग, डॉ. मयुरेश वारके, डॉ. प्रमोद काळे तसेच रोटरी क्लब देवनार, अंबरनाथ, कॉव्हेंट्री लंडन, प्रशांतराव परिचारक फाउंडेशन पंढरपूर यांचे त्यांनी आभार व्यक्त केले. या सर्व देवदूतांच्या निस्सीम सेवाभावी वृत्तीमुळेच ग्रामीण भागातील ९०० च्या वर बालकांच्या हातातील काठी बाजूला ठेऊन ते आज आपल्या पायावर चालत, पळत आहेत असे प्रतिपादन त्यांनी केले.
                 तर अध्यक्षीय भाषणात डॉ. माले म्हणाले की, वयाची ७५ वर्ष पूर्ण केल्यानंतरही डॉ. जॉन क्लेग ज्या उत्साहाने दिव्यांगाच्या चेहऱ्यावर हसू फुलविण्यासाठी जे अहोरात्र प्रयत्न करतात, त्यांचा आदर्श सर्वांनी घ्यावा असे गौरवोदगार डॉ. एकनाथ माले यांनी काढले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अच्चूत आदटराव यांनी तर आभार डॉ. रहीम पटेल यांनी मानले.
--------------------------------------------------------

या शिबिरदरम्यान दिनांक २६ जानेवारी रोजी १४० दिव्यांग बालकाची तपासणी झाली तर ४५ बालकांवर दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या शस्त्रक्रियांमध्ये, सी.टी.इ.व्ही, टेडन, लेन्दनिग, अर्थोदेसीस इ प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. दि. २७ जानेवारी रोजी देखील शस्त्रक्रिया व तपासणी सुरु राहणार आहे.

No comments:

Post a Comment