13 June 2020

लोहारा तालुक्यातील लोहारा खुर्द येथे शेतीशाळा संपन्न - तालुका कृषी अधिकारी मिलिंद बिडबाग यांनी शेतकऱ्यांना केले सविस्तर मार्गदर्शन



प्रतिनिधी / लोहारा

तालुक्यातील लोहारा खुर्द येथे शुक्रवारी ( दि. १२) शेतकऱ्यांसाठी शेतीशाळा घेण्यात आली. या शेतीशाळेत बीजप्रक्रिया, पेरणी कशी करावी आदी अनेक विषयांवर तालुका कृषी अधिकारी मिलिंद बिडबाग यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
               कृषी विभागाच्या वतीने तालुक्यातील लोहारा खुर्द येथे शेतीशाळा संपन्न झाली. शेतकऱ्यांना सविस्तर माहिती मिळावी यासाठी कृषी सहाय्यक नागेश जट्टे यांनी याचे आयोजन केले होते. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना तालुका कृषी अधिकारी मिलिंद बिडबाग म्हणाले की, सोयाबीनचे घरगुती पावसात न भिजलेले बियाणे त्याची उगवनशक्ती तपासून आणि बीजप्रक्रिया करून पेरणीसाठी वापरावे. बीजप्रक्रिया करताना बुरशीजन्य रोगापासून संरक्षणसाठी ५० ग्राम ट्रायकोडर्मा किंवा कार्बोक्सिन + थायरम ३० ग्राम आणि तदनंतर नत्र स्थिरीकरणसाठी रायझोबियम  २५० ग्राम + पीएसबी २५० ग्राम प्रति १० किलो बियाणेस हळुवारपणे चोळावे. तसेच शेतकऱ्यांनी रुंद सरी वरंबा पद्धतीने पेरणी करावी. या पद्धतीने पेरणी केल्यास बियाणे हे पेरणीसाठी २० % कमी प्रमाणात लागते. आणि बियाण्याची बचत होते. चार सोयाबीनच्या ओळीनंतर एक सरी सोडल्यास पावसामध्ये खंड पडल्यास किंवा पाऊस कमी झाल्यास सरीमध्ये पाणी बराच काळ साठुन राहते आणि जरी पाऊस जास्त पडला तरी अतिरीक्त पाणी हे सरीद्वारे बाहेर काढता येते. आंतरमशागत आणि फवारणी ही चांगल्या प्रकारे करता येते. हवा खेळती राहून पिकाची वाढ चांगली होते आणि उत्पादनात २० % पर्यंत वाढ होते. तसेच सध्या सर्वच शेतकऱ्यांच्या शेतावर निंबोळ्या या मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. त्या सध्या गोळा करून ठेवाव्यात आणि भविष्यात फवारणीसाठी निंबोळी अर्काचा वापर केल्यास फवारणीचा खर्चही कमी होतो आणि रसशोषक किडी आणि आळ्याचे पण नियंत्रण होते. यासाठी ५ किलो निंबोळी ही बारीक कुटून घ्यावी आणि ९ लिटर पाण्यात ही निंबोळीची बुकटी रात्रभर भिजू द्यावी. त्यांनतर दुसऱ्या दिवशी हे द्रावण गाळून घ्यावे. यासोबतच १ लिटर पाण्यात साबणाचा चुरा मिसळून हे दोन्ही द्रावण एकत्र मिसळून घ्यावे. सदरील १० लिटर चे द्रावण (निंबोळी अर्क ९ + साबणाचे १ लिटर) हे 100 लिटर पाण्यात मिसळून फवारणी केल्यास सर्वच पिकावरील रसशोषक आळ्या व किडीचे नियंत्रण होण्यास मदत होईल असे मार्गदर्शन बिडबाग यांनी केले.



              या कार्यक्रमाचे नियोजन कृषी सहाय्यक नागेश जट्टे यांनी केले. यावेळी नागेश जट्टे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना बियाणे उगवनशक्ती आणि बीजप्रक्रियाचे प्रात्यक्षिक करून दाखवले. पोकरा आणि मनरेगा अंतर्गत फळबाग लागवडीची माहिती देऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले. यावेळी शेखर पाटील, पोकरा योजनेचे रमण आगळे, सचिन रसाळ, पोलीस पाटील बिरुदेव सूर्यवंशी यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment