02 March 2019

लोहारा येथील ग्रामदैवत शंभू महादेव यांच्या महाशिवरात्री यात्रा महोत्सवाला सोमवार ( दि. ४) पासून सुरुवात - सलग चार दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन



लोहारा प्रतिनिधी -

लोहारा येथील ग्रामदैवत शंभू महादेव यांच्या महाशिवरात्री यात्रा महोत्सवाला सोमवार ( दि. ४) पासून सुरुवात होत आहे. सलग चार दिवस धार्मिक, सांस्कृतिक, क्रिडा यासह विविध भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
        या यात्रेच्या पहिल्या दिवशी सोमवारी (दि. ४) लोहारा शहरातील जगदंबा मंदिर ते महादेव मंदिरापर्यंत सकाळी ९ वाजता हरिहर भजनी मंडळाचे वारकरी, ग्रामस्थ, युवकांच्या उपस्थितीत टाळ मृदुंगाच्या जयघोषात शोभायात्रा व शंभू महादेवाच्या पालखीची जंगी मिरवणूक काढण्यात येणार आहे. सकाळी १० वाजता महिलांसाठी रांगोळी स्पर्धा, त्यानंतर दुपारी १२ वाजता भारुडाचा कार्यक्रम होणार आहे. दुसऱ्या दिवशी मंगळवारी (दि.५) सकाळी १० वाजता शिवभक्त संगमेश्वर बिराजदार महाराज ( वलांडी) यांचे काल्याचे किर्तन, दुपारी १ वाजता भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे. सायंकाळी ४ वाजता जंगी कुस्ती स्पर्धांचा फड रंगणार असून या स्पर्धेतील शेवटची कुस्ती जिंकणाऱ्या मल्लास २१ तोळे चांदीची महादेवाची पिंड देण्यात येणार आहे. तिसऱ्या दिवशी बुधवारी (दि. ६) सकाळी ७ वाजता मॅरेथॉन स्पर्धा, सकाळी १० वाजता बुद्धीबळ स्पर्धा, सायंकाळी ६ वाजता पुरुषांसाठी भव्य खुल्या कबड्डी स्पर्धा होणार आहेत. तसेच चौथ्या दिवशी गुरुवारी (दि. ७) सायंकाळी ६ वाजता हायस्कुल लोहारा शाळेच्या मैदानावर भव्य खुल्या राज्यस्तरीय खुल्या नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांसाठी सव्वा लाखांपेक्षा अधिक रक्कमेची बक्षिसे व चषक विजेत्या स्पर्धकांना देण्यात येणार आहेत. तरी या यात्रामहोत्सव व विविध धार्मिक, क्रिडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ लोहारा तालुक्यासह परिसरातील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच स्पर्धांसाठी 8850104398, 9130661111, 9420332232, 8087123803, 7972083400 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment