02 February 2019

सास्तूर - गुबाळ रस्त्यावरील पुलाचे आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते व युवा नेते किरण गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत भूमिपूजन


लोहारा प्रतिनिधी -

लोहारा तालुक्यातील सास्तूर - गुबाळ रस्त्यावरील पुलाचे आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते व युवा नेते किरण गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी ( दि. २) भूमिपूजन करण्यात आले.
                यावेळी उमरगा शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव शहापूरे, माजी तालुकाप्रमख ज्ञानेश्वर सूर्यवंशी, सास्तुर चे सरपंच यशवंत कासार, बालेपिर शेख, उपअभियंता एस.डी. माले, शाखा अभियंता एम.के. हळासपुरे, दिलीप बेन्डगे, सुधाकर पाटील, तुकाराम जाधव, होळीचे सरपंच व्यंकट माळी, शिवसेना शाखाप्रमुख मुरली पवार, गुलाब पवार, भाऊ आंबेकर, सास्तूरचे माजी सरपंच विजय क्षीरसागर, मारुती जाधव आदी उपस्थित होते.
               उस्मानाबाद व लातूर जिल्ह्याला जोडणाऱ्या सास्तूर - गुबाळ रस्त्यावरील तेरणा नदीवरील पूल हा अत्यंत कमी उंचीचा असल्यामुळे नागरिकांना अनेक गैरसोयीचा सामना करावा लागत होता. तसेच पावसाळ्यामध्ये हा रस्ता पूर्णपणे बंद असायचा तर कधी पुलावरून पाणी वाहायचे. यामुळे याठिकाणी अनेक अपघात होऊन जीवितहानी झाली होती.   यामुळे याठिकाणी उत्तम दर्जाचा पूल उभारण्यासाठी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी मा.ना. चंद्रकांत दादा पाटील व अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांच्याकडे पाठपुरावा केला आहे.
            या अनुषंगाने ५० ५४ (४) नाबार्ड टप्पा - अंतर्गत ५ कोटी १५ लक्ष रु. एवढा निधी मंजूर झाला आहे.  यातुन ८० मीटर लांब व ०७.३० मीटर रुंद सबमर्सिबल पुलाचे बांधकाम होणार आहे. यात पोचमार्गाकरिता माती भराव, खडीकरण, मजबुतीकरण, डांबरीकरण, मुरूम बुजपट्टी, कच्चे गटर्स व इतर कामे केली जाणार आहेत.

लोहारा - शिवकरवाडी हे गाव तुळजापूर तालुक्यामधून लोहारा तालुक्यात समाविष्ट करण्यात यावे या मागणीसाठी लोहारा तालुका विकास समिती च्या वतीने तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांना निवेदन



लोहारा प्रतिनिधी -

शिवकरवाडी हे गाव तुळजापूर तालुक्यामधून लोहारा तालुक्यात समाविष्ट करण्यात यावे या मागणीसाठी लोहारा तालुका विकास समिती च्या वतीने तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन उपोषणाचा इशारा देण्यात आला.
                लोहारा शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या शिवकरवाडी या गावास ग्रामपंचायत हिप्परगा आहे. हिप्परगा हे गाव लोहारा तालुक्यात आहे. तर शिवकरवाडी हे गाव तुळजापूर तालुक्यात आहे. त्यामुळे या गावातील गावकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत गेली 9 वर्षे पाठपुरावा करण्यात येऊनही सरकार दरबारी अद्याप कसलाही निर्णय झाला नाही. त्यामुळे येत्या 10 तारखेपर्यंत याबाबत निर्णय नाही घेतल्यास 11 फेब्रुवारी पासून तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येणार आहे असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. लोहाऱ्याचे तहसीलदार राहुल पाटील, पोलीस निरीक्षक सर्जेराव भंडारे यांना हे निवेदन देण्यात आले आहे. यावेळी लोहारा तालुका विकास समितीचे मार्गदर्शक नागन्ना वकील, समितीचे अध्यक्ष जालिंदरकोकणे, सचिव कालिदास गोरे , सदस्य गोरख नारायणकर, रमाकांत गोरे, दिलीप जाधव, राम मोरे आदींसह शिवकरवाडी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोहारा तालुक्यातील अचलेर येथील विद्या विकास हायस्कूल शाळेत प्रा. राम चंदनशिवे यांच्या सेवा निवृतीनिमित्त निरोप समारंभ





लोहारा प्रतिनिधी -

माणूस हा जातीने, धर्माने मोठा होत नसतो तर स्वतःच्या कर्तृत्वाने मोठा होतो. जिद्द, परिश्रम, कष्ट करण्याची प्रवृत्ती व प्रामाणिकपणा माणसामध्ये आत्मसात झाली की मानवाचा सर्वांगीण विकास होतो. समाज घडविण्याचे पवित्र असे कार्य शिक्षकाकडूनच होते आणि त्यातूनच नवी क्रांती होते. असे पवित्र कार्य प्रा. राम चंदनशिवे यांनी केले आहे असे प्रतिपादन औरंगाबाद येथील विभागीय सह आयुक्त शिवानंद टाकसाळे यांनी केले.
           लोहारा तालुक्यातील अचलेर येथील विद्या विकास हायस्कूल शाळेत प्रा. राम चंदनशिवे यांच्या सेवा निवृतीनिमित्त शुक्रवारी ( दि.1 ) निरोप समारंभ घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, डी.व्ही. चंदनशिवे, पृथ्वीराज पाटील, सरपंच प्रकाश लोखंडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे तज्ञ संचालक राजेंद्र पाटील, मुख्याध्यापक भास्कर बेंडगे, माजी पं.स. सभापती सिद्रामप्पा दुलंगे, मंडळ अधिकारी स्वामी, राजेंद्र काटे, बालासिंग बायस, अमोल पुजारी, चंदरराव पाटील, कलप्पा गोपणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
           प्रा. राम चंदनशिवे हे विद्या विकास माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अचलेर येथून निवृत्त झाले. त्यानिमित्त प्रा. राम चंदनशिवे यांचा सपत्नीक सत्कार यावेळी मान्यरांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पृथ्वीराज पाटील यांनी केले. सुत्रसंचलन सिद्धाराम भालके यांनी तर पर्यवेक्षक उद्धव येरोलकर यांनी आभार मानले. या कार्यक्रमास विद्यार्थी, ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर सायंकाळी ह.भ.प. महेश महाराज पाटील यांचे किर्तन झाले. यानंतर भारुडे व भजनाचा कार्यक्रम घेण्यात आला.