26 June 2020

आ. गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा - राष्ट्रवादी काँग्रेसची निवेदनाद्वारे मागणी



प्रतिनिधी / लोहारा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी अपशब्द वापरल्यामुळे गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी लोहारा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत गुरुवारी ( दि. २५) तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे.
                 या निवेदनात म्हटले आहे की, भारतीय जनता पक्षाच्या गोपीचंद पडळकर या आमदाराने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष
शरद पवार यांच्याबद्दल एका वृत्तवाहिनीवर अपशब्द वापरून अवमान केला आहे. पडळकराच्या माध्यमातून भाजपचा मराठा व धनगर समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा हा डाव आहे. आणि तो डाव आम्ही कदापीही यशस्वी होऊ देणार नाही. निव्वळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी अपशब्द वापरल्याने कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी या निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी सुनील साळुंके, प्रकाश भगत, गोविंदराव साळुंके, विजय लोमटे, हेमंत माळवदकर, नवाज सय्यद, राजेंद्र कदम, मिलिंद नागवंशी, सचिन रनखांब, विशाल गोरे, किरण पाटील, मनोज देशपांडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

25 June 2020

मराठवाडा विभागाचे समन्वयक म्हणून लोहारा तालुक्यातील सास्तुर येथील माजी पंचायत समिती सभापती असिफ मुल्ला यांची नियुक्ती



प्रतिनिधी / लोहारा

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने प्रशिक्षण शिबिराच्या अंमलबजावणी करिता बुधवारी ( दि. २४)  प्रशिक्षण कार्यक्रम राज्य समन्वयक व विभागीय समन्वयकाच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. यात मराठवाडा विभागाचे समन्वयक म्हणून लोहारा तालुक्यातील सास्तुर येथील माजी पंचायत समिती सभापती असिफ मुल्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
                    अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव तथा प्रशिक्षण कार्यक्रमाचे राष्ट्रीय समन्वयक सचिन राव यांनी सुरू केलेल्या प्रशिक्षण शिबीराच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या सूचनेनुसार राज्य समन्वयक व विभागीय समन्वयक यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यात मराठवाडा विभागाचे समन्वयक म्हणून लोहारा तालुक्यातील सास्तुर येथील माजी पंचायत समिती सभापती असिफ मुल्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. असिफ मुल्ला यांनी यापूर्वी जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा सरचिटणीस म्हणून काम केले आहे. या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

23 June 2020

लोहारा शहरातील वसंतदादा पाटील हायस्कूल सलग्न नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधासाठी ८८ हजार ६४५ रुपयांची मदत





प्रतिनिधी / लोहारा

लोहारा शहरातील वसंतदादा पाटील हायस्कूल सलग्न नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधासाठी ८८ हजार ६४५ रुपयांची मदत करण्यात आली आहे. सोमवारी ( दि. २२) शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेचे मॅनेजर सुमित्रा सिंह यांच्याकडे हा धनादेश सोपविण्यात आला.
           लोहारा शहरातील वसंतदादा पाटील हायस्कूल सलग्न नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालय यांच्या वतीने कोविड १९ या महाराष्ट्रवर आलेल्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनानुसार मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने मदत करण्यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्यांचा एक दिवसाच्या पगाराची रक्कम एकत्र करून ८८ हजार ६४५ रुपयांचा धनादेश स्टेट बँक ऑफ इंडिया लोहारा शाखेचे मॅनेजर सुमित्रा सिंह यांच्याकडे प्राचार्या उर्मिला पाटील यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी प्रा. ज्ञानदेव शिंदे, प्रा. उध्दव सोमवंशी, भास्कर जाधव, सुलोचना रसाळ, पौर्णिमा घोडके, श्रीकांत मोरे, अंकुश शिंदे, बँकेतील सहाय्यक अनिल नरवाडे व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी मॅनेजर सुमित्रा सिन्हा यांनी सर्वांचे आभार मानले.