12 April 2020
लोहारा तालुक्यातील दक्षिण जेवळी ग्रामपंचायतीच्या वतीने कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना
प्रतिनिधी / लोहारा
तालुक्यातील दक्षिण जेवळी ग्रामपंचायतच्या वतीने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना बरोबरच १४ व्या वित्त आयोगातून साथरोग उपाय योजना अंतर्गत जवळपास ३५ हजार रुपये खर्च करून प्रत्येक कुटुंबाला सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले आहे. तसेच बचत गटामार्फत तयार करण्यात आलेले तीन हजार मास्क गावातील प्रत्येक व्यक्तीला देण्यात आले आहेत. बचत गटातील महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी गावातील महिला बचतगटाला हे मास्क तयार करण्याची ऑर्डर दिली होती.
तालुक्यातील दक्षिण जेवळी हे भूकंप पुनर्वसित झालेले जवळपास चार हजार लोकसंख्येचे गाव आहे. दक्षिण जेवळी, रुद्रवाडी व पश्चिम तांडा या तीन वस्ती मिळून दक्षिण जेवळी ग्रुप ग्रामपंचायत आहे. येथील सरपंच चंद्रकांत साखरे यांनी प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या, सामाजिक कार्यकर्ते, जिल्हा परिषद शिक्षक, ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या सहकार्याने गावातील नागरिकांना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी विविध उपाययोजना करीत आहेत. यात पुणे, मुंबई, दिल्ली आदी सारख्या बाहेरून आलेल्या नागरिकांची माहिती संकलित करून नोंदी ठेवल्या जात असून या व्यक्तींच्या घरी जाऊन प्रतिदिन आरोग्य विषयी विचारपूूस केली जात आहे. दररोज सकाळ, संध्याकाळ दवंडी व स्पीकरच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. दक्षिण जेवळी, रुद्रवाडी व पश्चिम तांडा येथील रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी मिनी ट्रॅक्टरच्या साहाय्याने सोडियम डायक्लोराईडची फवारणी करण्यात आली आहे. आता वैद्यकीय अधिकारी आर. के. शेख यांच्या मार्गदर्शनाखाली १४ व्या वित्त आयोगातून साथरोग उपाय योजना अंतर्गत जवळपास ३५ हजार रुपये खर्च करून प्रत्येक कुटुंबाला सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले आहे. यात सातशे बॉटल वाटप करण्यात आले. तसेच गावातील प्रत्येक व्यक्तीला मास्क वाटप करण्यात आले आहे. गावातील बचतगटातील महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी हे मास्क गावातील बचतगटामार्फत बनवून घेण्यात आले आहेत. जवळपास तीन हजार मास्क बनवून घेण्यात आले आहेत. यासाठी सरपंच चंद्रकांत साखरे, उपसरपंच पार्वती पाटील, ग्रामसेवक नेताजी मारेकर, ग्रामपंचायत सदस्य विवेकानंद बिराजदार, राम मोरे, प्रविण बोंदाडे, रोजगार सेवक संगप्पा मुखे, शिवराज चिनगुंंडे, मुख्याध्यापक देविदास साळुंके, जयश्री बिराजदार आदींनी पुढाकार घेतला.
-----------------------
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना बरोबरच १४ व्या वित्त आयोगातून साथरोग उपाययोजना अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले आहे. तसेच प्रत्येक व्यक्तीला मास्क देण्यात आले आहेत.
चंद्रकांत साखरे,
सरपंच
दक्षिण जेवळी ग्रामपंचायत
10 April 2020
ओंकार गोल्ड अँन्ड सिल्व्हर पॅलेस टेंभुर्णी, उमरगा, लोणी देवकर व लालबाग राजा मित्र मंडळ टेंभुर्णी यांच्या माध्यमातून अन्नदान
प्रतिनिधी / उमरगा
सध्या कोरोनामुळे लॉक डाऊन आहे. परराज्यातील मजुर महाराष्ट्रात विविध शहरांमध्ये मोलमजुरी करुन राहत होते. लॉक डाऊन च्या निर्णया नंतर ते मजूर आपल्या राज्यात परत पाई निघाले होते. परंतु शासनाने या लोकांना ज्या ठीकाणी आहे तेथेच राहण्यासाठी व्यवस्था केली.
त्याअनुषंगाने टेंभुर्णी शहरात संत रोहिदास आश्रमशाळा येथे ८४ नागरिकाची राहण्याची व्यवस्था केली आहे. विविध सामाजिक संघटनांनी, संस्थांनी पुढे येऊन अशा नागरिकांची मदत करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
त्यानुसार ओंकार गोल्ड अँन्ड सिल्व्हर पॅलेस टेंभुर्णी, उमरगा, लोणी देवकर व लालबाग राजा मित्र मंडळ टेंभुर्णी यांच्या माध्यमातून या नागरिकांची एक दिवसाची जेवणाची व्यवस्था करण्यात आली.
यावेळी टेंभुर्णी च्या मंडलाधिकारी मनिषा लकडे, जाधव भाऊसो, मदत देताना ग्रा .प. सदस्य औदुंबर देशमुख, शिवसेनेचे तालुका प्रमुख मधुकर देशमुख, ओंकार गोल्ड अँन्ड सिल्व्हर पॅलेस चे एम.डी. विजयकुमार आ. पाटील, पत्रकार मित्र सतिश काळे, भिमराव बरगंडे सर, विशाल आटकळे, विलास काका देशमुख, प्रमोद ( बाप्पा )देशमुख, सुधीर पाटील, किशोर भोरे, कोतवाल दिपक काळे, धर्मराज कुटे आदी उपस्थित होते.
या संकटकाळात बेघर कुटुंबांना प्रत्येकांनी होईल तेवढी मदत करावी असे आवाहन यावेळी उपस्थितांनी केले.
06 April 2020
लोहारा तालुक्यातील नागराळ येथील ग्रामस्थांनी मुख्यमंत्री निधीत पाठविण्यासाठी जमा केले रुपये अकरा हजार
प्रतिनिधी / लोहारा
कोरोना विरुद्ध लढा देण्यासाठी शासनास आर्थिक मदत करावी या उद्देशाने लोहारा तालुक्यातील नागराळ येथील ग्रामस्थांनी गावातील प्रत्येक नागरीकांकडून प्रत्येकी १० रुपये प्रमाणे अकरा हजार रुपये जमा केले असून ते मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्यात येणार आहेत.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असल्याने संचारबंदी करुन सिमा सिल करण्यात आल्या आहेत. राज्य सरकार अडचणीत असल्याने कोरोनाशी लढण्यासाठी मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड १९ या नावाने नवे बँक खाते सुरु करण्यात आले आहे. या खात्यात जनतेने सढळ हाताने मदत करावी असे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक दानशुर पुढे येत आहेत. या अनुषंगाने नागराळ ग्रामस्थांनी शासनाला मदत करण्यासाठी कुटूंबातील प्रत्येक व्यक्तीने दहा रुपये द्यावे असे आवाहन केले. त्यानुसार नागरीकांनी स्वत:हुन पैसे जमा केले. एकूण अकरा हजार रुपये एवढा निधी जमा झाला असून हे पैसे मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड १९ साठी देण्यासाठी रक्कम ट्रान्सफर करणार असल्याचे सरपंच रीतू कुलदिप गोरे, जेष्ठ नागरीक नारायण गोरे, पोलीस पाटील तानाजी माटे यांनी सांगितले आहे. गावची लोकसंख्या ८८० एवढी असलेल्या गावाने शासनास आर्थिक मदत करण्यासाठी राबविलेला हा उपक्रम सर्व गावांनी राबविणे आवश्यक आहे.
Subscribe to:
Posts (Atom)









