16 August 2020

पंचायत समिती लोहारा येथे जागर अस्मिता मोहिमेचा शुभारंभ



प्रतिनिधी / लोहारा

मासीक पाळीच्या काळात महिला व किशोरवयीन मुलींनी सॅनिटरी नॅपकिनचा वापर  करावा याबाबत जनजागृतीचे दृष्टीने शासनाने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून अस्मिता प्लस योजना सुरू केली असून यामुळे खर्‍या अर्थाने महिलांचे आरोग्य सुधारण्यास मदत होणार आहे असे प्रतिपादन पंचायत समितीच्या सभापती हेमलता रणखांब यांनी शनिवारी ( दि. १५) केले.
            महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान मार्फत राज्यात दिनांक १५ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट या कालावधीमध्ये मासीक पाळी बद्दल व्यापक जनजागृती व्हावी आणि सॅनिटरी नॅपकिन अस्मिता प्लस योजनेची ची माहिती तालुक्यातील प्रत्येक गावात व्हावी यासाठी जागर अस्मिता या मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या मोहिमेचा शुभारंभ स्वातंत्र्यदिनी शनिवारी ( दि. १५) पंचायत समिती लोहारा येथे करण्यात आला. यावेळी सभापती रणखांब बोलत होत्या. यावेळी गटविकास अधिकारी अशोक काळे, सहाय्यक गटविकास अधिकारी संजय ढाकणे यांची उपस्थिती होती.
               लोहारा तालुका अंतर्गत स्वयंसहाय्यता समूहाने एकूण ५६ अस्मिता प्लस नॅपकीनचे बॉक्सची ऑर्डर प्रत्येक गावातून केली आहे. तसेच सभापती हेमलता रणखांब यांच्या हस्ते सास्तुर येथील बौद्धीसत्व महिला स्वयंसहाय्यता समुहाची एका बॉक्सची ऑर्डर सभापती रणखांब यांच्या हस्ते अस्मिता अँप द्वारे करण्यात आली. तसेच हिप्परगा सय्यद येथील स्वयंसहाय्यता समूहातील महिला बालिका राजेंद्र मोरे यांनी सर्वाधिक बॉक्स ऑर्डर केले असून त्यांचा सत्कार यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. ग्रामीण भागातील महिला व किशोरवयीन मुलीचे, महिलांचे आरोग्य चांगले राहावे या उद्देशाने अल्पदरात गावातच सॅनेटरी नॅपकिन उपलब्ध होणार आहे. बाजारात सध्या असलेल्या नामांकित सॅनिटरी नॅपकिन च्या तुलनेत अस्मिता सॅनिटरी नॅपकिन कमी किमतीत व चांगल्या गुणवत्तेचे आहे. तसेच सॅनेटरी नॅपकिन विक्रीच्या माध्यमातून गावातील महिलांना आर्थिक फायदा होणार आहे. महिलांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी जागर अस्मिता मोहीमेच्या माध्यमातून सॅनिटरी नॅपकिन २४ रूपयामध्ये उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलींना स्मार्ट कार्डच्या माध्यमातून फक्त 5 रूपयामध्ये सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून दिले जाणार आहे. याचा शुभारंभ शनिवारी ( दि. १५) पंचायत समिती लोहारा येथे करण्यात आला. पुढील १५ दिवसामध्ये गाव पातळीवर विविध कार्यक्रम राबवून प्रत्येक कुटुंबापर्यंत मासीक पाळी व्यवस्थापन आणि त्याबद्दल व्यापक जनजागृती केली जाणार आहे. जागर अस्मिता मोहीम यशस्वी करण्यासाठी उमेद अभियानातील सर्व समुदाय संसाधन व्यक्ती, तालुका अभियान कक्षातील सर्व कर्मचारी, पंचायत समिती व विविध शासकीय विभाग परिश्रम घेत आहेत. कार्यक्रमचे प्रास्तविक प्रणिता कटकदौंड यांनी केले. अमोल कासार यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रीतम बनसोडे, सौरभ जगताप, प्रदीप लोंढे, संगीता सोनटक्के यांनी परिश्रम घेतले.

14 August 2020

पालकमंत्री शंकरराव गडाख पाटील यांनी घेतली जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुरेश दाजी बिराजदार यांची सदिच्छा भेट



प्रतिनिधी / उस्मानाबाद

उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख पाटील हे शुक्रवारी ( दि. १४) उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर आले होते. या दरम्यान पालकमंत्री शंकरराव गडाख पाटील यांनी जिल्हा बँकेचे चेअरमन, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा. सुरेश दाजी बिराजदार व माणिकराव अप्पा बिराजदार यांची बलसुर येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.



यावेळी पालकमंत्री गडाख पाटील साहेबांचे बलसुर वासियांच्या वतीने सुरेश दाजी बिराजदार यांनी स्वागत केले. यावेळी उपस्थितांनी निळकंठेश्वर मंदिराला भेट देऊन आशीर्वाद घेतले. यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार ज्ञानराज चौगुले, आमदार कैलास घाडगे पाटील आदी उपस्थित होते.



लोहारा तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने कोविड शिक्षण शुल्कनीती अभियानाची सुरुवात



लोहारा शहरातील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयात निवेदन देण्यात आले.

प्रतिनिधी / लोहारा

लोहारा तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी ( दि. १४) लोहारा येथे कोविड शिक्षण शुल्कनीती अभियानाची सुरुवात करण्यात आली. शहरातील भानुदासराव चव्हाण महाविद्यालय व शंकरराव जावळे पाटील महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करून निवेदन देण्यात आले.
             सध्या राज्यभर कोरोना महामारीचे संकट आहे. हजारो लोक मृत्युमुखी पडत आहेत. अशा परिस्थितीत शासनाने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लॉकडाऊन जाहिर केला होता. त्याचे परिणाम गेल्या ३, ४ महिन्यांपासून अर्व्यव्यवस्थेवर पडताना दिसत आहेत. उद्योग धंदे पूर्ण क्षमतेने चालू नाहीत. अनेकांच्या हाताला काम उरलेले नाही. अनेक जणांची परिस्थिती हलाकीची झाली आहे. काही ठिकाणी उद्योगधंदे ठप्प झाले आहे. राज्याच्या तिजोरीवर देखील ताण आला आहे. पालक आणि शाळा महाविद्यालये देखील अपवाद नाहीत. शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस या महामारीमुळे गेली ४, ५ महिने बंद आहेत. बऱ्यापैकी कामकाज कमी झाले आहे. विद्यार्थ्यांचे वर्ग प्रत्यक्षात विद्यालय आवारात भरत नाहीत. परिणामी शाळा महाविद्यालयांना कुठल्याही प्रकारचा अधिकचा खर्च सध्या चालू नाही. उपाय म्हणून विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आणि वार्षिक अभ्यासक्रमाबाबत कुठलेही नुकसान होऊ नये म्हणून काही ठिकाणी ऑनलाइन वर्ग चालू केले आहेत. मात्र काही ठिकाणी शाळा, महाविद्यालये पालकांकडून अधिकचे शैक्षणिक शुल्क जबरदस्तीने घेताना आढळून येत आहे. तर काही ठिकाणी पालक व विद्यार्थ्यांच्या कडे शैक्षणिक शुल्कासाठी तगादा लावताना दिसत आहेत. अशा वेळेस काही शाळांसोबत व विद्यालयांसोबत संपर्क केला असता त्यांच्याही काही अडचणी आहेत असे निदर्शनास आले. मात्र पालक वर्गाचे देखील बरेच नुकसान झाल्यामुळे त्यांच्यावरही आर्थिक संकट ओढवले आहे.

लोहारा शहरातील शंकरराव जावळे पाटील महाविद्यालयात निवेदन देण्यात आले.


अशा परिस्थितीत शाळा, महाविद्यालये, क्लासेस यांनी शुल्क निश्चिती आणि विद्यार्थ्यांच्या कडून शुल्क मागणी या बाबत निश्चित धोरण ठरवणे गरजेचे आहे. यासाठी प्रदेश राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस कडून येणाऱ्या काळामध्ये कोरोना शिक्षण शुल्कनीती अभियान ही मोहीम संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येणार आहे. तरी कोणत्याही परिस्थितीत पालक किंवा विद्यार्थ्यांना शुल्क भरण्यासाठी सक्ती करू नये. त्याचबरोबर केवळ शुल्क न भरल्याचे कारण दाखवत कोणत्याही विद्यार्थ्यांला कुठल्याही प्रकारच्या शैक्षणिक सुविधेपासून वंचित ठेवू नये अशा आशयाचे निवेदन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसकडून प्राचार्यांना देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील साळुंके, विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पृथ्वीराज जगताप, राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष निहाल मुजावर, महेबूब फकीर, दादासाहेब पाटील, संजय गायकवाड, सचिन रनखांब, हरिप्रसाद जगताप, राहुल चव्हाण, अनिकेत जगताप, कृष्णा पवार आदी उपस्थित होते