04 May 2020

लोहारा तालुक्यातील जेवळी येथील माझं गाव सोशल डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांना २५ पीपीइ किटचे वितरण



प्रतिनिधी / लोहारा

तालुक्यातील जेवळी येथील ग्रामस्थ व माझं गाव सोशल डेव्हलपमेंट फाउंडेशन यांच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांना २५ पीपीइ (पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट) किटचे तर अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्यासाठी आरोग्य साहित्याचे वाटप करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर पीपीइ किट उपलब्ध करून देण्याची जिल्ह्यातील ही पहिली वेळ आहे.
                  तालुक्यातील जेवळी व परिसरातील बाहेरगावी, विविध विभागात कार्यरत असलेले अधिकारी, कर्मचारी, व्यवसायिक तसेच गावातील युवक एकत्र येत चार वर्षापूर्वी माझं गाव सोशल डेवलपमेंट फाउंडेशन या सामाजिक संस्थेची स्थापना केली आहे. या सामाजिक संस्थेच्या वतीने गेल्या चार वर्षापासून परिसरात विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जात आहेत. सध्या कोरोना विषाणूचा विळखा देशात अधिक घट्ट होत जातोय. दिवसेंदिवस वाढणारी आकडेवारीमुळे प्रत्येकाच्या मनात भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे या विषाणूविरोधात लढायचं असेल तर आपल्यालाही तेवढ्याच वैद्यकीय सक्षमतेने पुढे यायला हवे. त्यामुळे अशा अडचणीच्या काळात आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी काय करता येईल का याची चर्चा या संस्थेच्या सदस्यात करण्यात आली. यावेळी जेवळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व गावातील डॉक्टरांचे मत जाणून घेतले. यावेळी परिसरातील रुग्ण तपासताना आत्मविश्वास वाढण्यासाठी पीपीइ (पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट) किट उपलब्ध करून द्यावे अशी मागणी पुढे आली.  त्यानंतर संस्थेचे मार्गदर्शक मुंबई येथे जीएसटी विभागात कार्यरत असलेले सहआयुक्त धनंजय माळी, मुंबई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक राहुल कारभारी, लातूर चे उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांच्या पुढाकाराने हे पीपीइ किट व आरोग्य साहित्य उपलब्ध केले. मंगळवारी (दि. २८) जेवळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हणमंत वडगावे यांच्या हस्ते या पंचवीस पीपीइ किट व आरोग्य साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी एखाद्या संस्थेकडून जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या स्तरावर येथे पहिल्यांदाच पीपीइ किट उपलब्ध करून दिली असून जिल्ह्यातील दानशूर व्यक्तीनी, संस्थेने या संस्थेकडून प्रेरणा घेत कोरोना विषाणू संसर्गाची लढणाऱ्या सैनिकांना अशाप्रकारे संरक्षण कवच पुरवावे जेणेकरून आरोग्य सेवा सक्षम होईल असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हणमंत वडगावे यांनी यावेळी बोलताना केले. यावेळी जेवळी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. के. शेख, डॉ. धनश्री गावडे, डॉ. अमोल सूर्यवंशी, डॉ. संतोष ढोबळे, डॉ. सिद्धेश्वर मुळे, संस्थेचे संचालक सुधीर कोरे, संजय देसाई, महेश सारणे आदींची उपस्थिती होती.



या किटमुळे कोरोनाशी लढा देणाऱ्या आरोग्य विभागातील, अधिकारी, कर्मचारी यांचा आत्मविश्वास वाढण्यासाठी मदत होणार असून समाजातील दानशूर व्यक्तींनी आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी अशाच प्रकारची मदत करणे आवश्यक आहे.


                             डॉ. हणमंत वडगावे,
                         जिल्हा आरोग्य अधिकारी,


अशा अडचणीच्या काळात वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी काम करत आहेत. त्यांना आणखी ताकदीने काम करता यावे यासाठी पीपीइ किट व आरोग्य साहित्य संस्थेने उपलब्ध करून दिले आहे.


                                  सुधीर कोरे,
                                   संचालक,
                 माझं गाव सोशल डेव्हलपमेंट फाउंडेशन

No comments:

Post a Comment