10 July 2020
लोहारा - पाऊस गायब झाल्याने पिके धोक्यात - हंगाम वाया जाण्याची शेतकऱ्यांना भीती
प्रतिनिधी / लोहारा
यावर्षी चांगला पाऊस होईल असा हवामान खात्याने अंदाज वर्तविला होता. जून महिन्याच्या सुरुवातीला पाऊस झाला. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहात पेरणी केली. तालुक्यात जवळपास ८१ टक्के पेरणी झाली आहे. तसेच काहींनी दुबार पेरणी केली. परंतु पिक वाढीच्या अवस्थेत असताना पाऊस गायब झाल्याने हंगाम वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांतून व्यक्त केली जात आहे.
लोहारा तालुक्यातील शेती पावसाच्या पाण्यावरच अवलंबून असून मागील दोन ते तीन वर्षापासून कमी अधिक प्रमाणात वेळ चूकवुन पाऊस पडत असुन पावसाने प्रमाण कमी होत चालले असल्याने शेती व्यवसाय तोट्यात आल्याचे चित्र निर्माण झाले आहे. तरीही शेतकरी शेतीकडे दुर्लक्ष न करता पाऊस पडेल या आशेवर काबाड कष्ट करीत असल्याची परिस्थिती आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार यावर्षी पाऊस चांगला होईल या आशेमुळे शेतकऱ्यांची अशा अधिक पल्लवित झाली होती. शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामे ही उन्हाळ्यातच पूर्ण केली. पाऊस पडेल या आशेवर पेरणीसाठी लागणारे बी बियाणे, खत खरेदी करुन ठेवली. मे महिन्यात एकही मोठा अवकाळी पाऊस झाला नाही. जून महिन्याच्या सुरुवातीला पाऊस झाला. आता पाऊस होत आहे या आशेवर शेतकऱ्यांनी पेरणी उरकली. परंतु नंतर पाऊस गायब झाला. त्यात काही शेतकऱ्यांच्या शेतातील बियाणे उगवले नाही. त्यामुळे त्यांनी दुबार पेरणीही केली. आता पीक वाढीची अवस्था आहे. परंतु पाऊस नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. त्यात सध्या उन्हाची तीव्रता खूप आहे. त्यामुळे पिके सुकत आहेत. ज्यांच्याकडे पाणी उपलब्ध आहे ते शेतकरी पिके वाचविण्यासाठी तुषार सिंचनाच्या माध्यमातून धडपड करत आहेत. परंतु उन्हाची तीव्रता अधिक असल्याने पिके हातातून जाण्याची भीती शेतकऱ्यांतून व्यक्त केली जात आहे.
लोहारा तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र ५४१०८ हेक्टर असून लागवड लायक क्षेत्र ४८५२७ हेक्टर आहे. खरीप हंगामाचे सरासरी पेरणी क्षेत्र ३९१११ हेक्टर असून त्यापैकी ३१६१४ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यापैकी २९३ शेतकऱ्यांनी बियाणे उगवण झाली नसल्याची तक्रार कृषी विभागाकडे केली. त्या शेतकऱ्यांनी जवळपास ४३९ हेक्टर क्षेत्रावर दुबार पेरणी केली आहे. या हंगामात शेतकऱ्यांनी सोयाबीन, तूर, मूग, उडीद, भुईमूग, खरीप ज्वारी, मका आदी पिकांची पेरणी केली आहे. यात सर्वाधिक सोयाबीन पिकाची २११०० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. आत्तापर्यत तालुक्यात सरासरी १३० मिमी पाऊस झाल्याची नोंद आहे. परंतु दहा पंधरा मिनिट पाऊस झाला की, परत ऊन असते. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची आशा आहे. पेरणी केलेल्या शेतकऱ्यांनी तणाचा बंदोबस्त करावा. त्यासाठी तणनाशक फवारणी, आंतरमशागत, कोळपणी करावी आणि ज्या शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध आहे त्यांनी स्प्रिंकलर च्या साहाय्याने पिकास पाणी द्यावे. ज्या शेतकऱ्याची पेरणी बाकी आहे. त्यांनी जमिनीत पुरेशी ओल असल्याशिवाय पेरणी करू नये असे आवाहन तालुका कृषी अधिकारी मिलिंद बिडबाग यांनी केले आहे.
सोयाबीन, उडीद पेरणी केली आहे. सध्या पिकांची वाढीची अवस्था आहे. मागील पंधरा दिवसांपासून पाऊस गायब झाला आहे. तसेच उन्हाची तीव्रता अधिक आहे. त्यामुळे पिके सुकू लागली आहेत. पाऊस नाही पडला तर हा हंगाम वाया जाईल.
संजय माशाळकर,
शेतकरी, लोहारा
पवनचक्की मुळे पाऊस पडत नसल्याची चर्चा
लोहारा तालुक्यातील हराळी, धानुरी, लोहारा खुर्द, माळेगाव, लोहारा बु, मोघा, बेलवाडी, हिप्परगा, शिवकरवाडी, मार्डी, बेंडकाळ आदी गावांच्या परिसरात जवळपास ४० ते ४५ पवनचक्की कार्यान्वित आहेत. मागील वर्षांपर्यंत आमच्या भागात पाऊस चांगला होत होता. परंतु यावर्षी इतर ठिकाणी पाऊस होत असताना आमच्या भागात पाऊस नाही. त्यामुळे पवनचक्की मुळेच पाऊस पडत नसल्याची चर्चा होत आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment