प्रतिनिधी / लोहारा
लोहारा तालुक्यातील अनेक गावात हॅलो मेडिकल फाउंडेशनच्या माध्यमातून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनजागृती करण्यात आली आहे. तसेच लॉकडाऊनच्या काळात उपासमार होत असलेल्या जवळपास ३०० जणांना किराणा साहित्याचे किट देण्यात आले आहे. तसेच आर्थिक अडचणीत असलेल्या ९० एकल विधवा महिलांना महिलांना सोयाबीन बियाणे वाटप करण्यात आले. या प्रकारे मदत करून अडचणीच्या काळात गरजूंना एक प्रकारे मदतीचा हात दिला आहे.
हॅलो मेडिकल फाउंडेशन ही संस्था १९९३ च्या भूकंपापासून लोहारा तालुक्यातील गावात महिला व बालकाचे आरोग्य, महिला सक्षमीकरण, बचत गट, स्वावलंबन, आरोग्य शिक्षण, स्त्री पुरुष समानता, महिलांचे हक्क व अधिकार, एकल विधवा यांना रेशन, पेन्शन, रोजगार बाबत प्रशिक्षण, तसेच निर्धार समानतेचा प्रकल्पाच्या माध्यमातून महिलांवरील होणारा कौटुंबिक हिंसाचार कमी व्हावा यासाठी संस्था युवक गट व किशोरी गटासोबत १५ गावात काम करीत आहे. या भागात पावसाअभावी दर तीन वर्षाला पडणारा दुष्काळ, नैसर्गीक आपत्ती या संकटावेळी जनावरांना पिण्याच्या पाण्याचे हौद, एकल महिलांना मदत, वाडी वस्ती या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची दोन हजार लिटर क्षमता असलेल्या टाक्या देण्यात आल्या. त्याचाच एक भाग म्हणून कोविड १९ या साथरोगाच्या पार्श्वभूमीवर लोहारा तालुक्यातील ३३ गावात कोरोना बाबत काळजी घेण्याबाबत स्पीकरच्या माध्यमातून व माहिती पत्रक वाटून जनजागृती केली आहे. कोरोनामुळे पुणे, मुंबई येथून आलेल्या नागरिकांची माहिती घेणे, स्विस एड पुणे यांच्या आर्थिक सहकार्यातून लॉकडाऊन मुळे उपासमार होत असलेल्या लघुउद्योग (हॉटेल, न्हावी), भिक्षुक, पुजारी, गरजू वृद्ध,नागरिक अशा जवळपास ३०० जणांना दोन महिण्याचे किराणा साहित्य किट, हँड वॉश, मास्क व कोरोनाबाबत माहितीपत्रक घरपोच देण्यात आले. या ३३ गावातील निराधार, वृद्ध, गरजू, एकट्या, आजारी अशा १५० नागरिकांना दोन वेळेस जेवणाची व्यवस्था करण्यात आली. तसेच लॉकडाऊन मुळे आर्थिक अडचणीत असलेल्या एकल विधवा महिलांना एक एकरची पूर्व मशागत व ९० महिलांना सोयाबीन बियाणे वाटप करण्यात आले. हॅलो मेडिकल फाउंडेशन संस्थेचे अध्यक्ष डॉ. शशिकांत अहंकारी यांचा मार्गदर्शनखाली लोहारा तालुक्यातील मुर्षदपूर, राजेगाव, एकोंडी, वडगाव (गांजा), रुद्रवाडी, कानेगाव, विलासपुर, नागुर, हिप्परगा (रवा) आदी ३३ गावात संस्थेने मदत व जनजागृती केली आहे. यासाठी तालुका समनव्यक सतीश कदम, क्षेत्रिय पर्यवेक्षक श्रीकांत कुलकर्णी, संग्राम पाटील, पवन गायकवाड, स्वाती पाटील गाव रिलीफ समिती सदस्य, प्रेरक, प्रेरिका यांनी सहकार्य केले आहे.


No comments:
Post a Comment