29 July 2020
मूग पिकावर पिवळा विषाणूजन्य केवडा रोगाची लक्षणे
प्रतिनिधी / लोहारा
सध्या मूग पिकावर पिवळा विषाणूजन्य केवडा रोगाची लक्षणे दिसून येत आहेत. हा रोग पांढरी माशी या किटकामार्फत पसरतो. या वाहक कीटकांचे नियंत्रण वेळीच केल्यास हा रोग पुढे पसरत नाही आणि नियंत्रणात येतो असे कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे.
यावर्षी चांगला पाऊस होईल असा हवामान खात्याने अंदाज वर्तविला होता. जून महिन्याच्या सुरुवातीला पाऊस झाला. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहात पेरणी केली. तालुक्यात जवळपास १०० टक्के पेरणी झाली आहे. तसेच काहींनी दुबार पेरणी केली. परंतु पिक वाढीच्या अवस्थेत असताना पाऊस गायब झाल्याने हंगाम वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांतून व्यक्त केली. त्यात आता मूग पिकावर पिवळा विषाणूजन्य केवडा रोगाची लक्षणे दिसून येत आहेत. त्यामुळे मूग पिकाचे नुकसान होण्याची भिती शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. तालुक्यात मुगाची एकूण २१३५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. तालुक्यातील आत्तापर्यंत सरासरी २२५ मिमी पाऊस झाला आहे.
लोहारा तालुक्यातील शेती पावसाच्या पाण्यावरच अवलंबून असून मागील दोन ते तीन वर्षापासून कमी अधिक प्रमाणात वेळ चूकवुन पाऊस पडत असुन पावसाने प्रमाण कमी होत चालले असल्याने शेती व्यवसाय तोट्यात आल्याचे चित्र निर्माण झाले आहे. तरीही शेतकरी शेतीकडे दुर्लक्ष न करता पाऊस पडेल या आशेवर काबाड कष्ट करीत असल्याची परिस्थिती आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार यावर्षी पाऊस चांगला होईल या आशेमुळे शेतकऱ्यांची अशा अधिक पल्लवित झाली होती. शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामे ही उन्हाळ्यातच पूर्ण केली. पाऊस पडेल या आशेवर पेरणीसाठी लागणारे बी बियाणे, खत खरेदी करुन ठेवली. मे महिन्यात एकही मोठा अवकाळी पाऊस झाला नाही. जून महिन्याच्या सुरुवातीला पाऊस झाला. आता पाऊस होत आहे या आशेवर शेतकऱ्यांनी पेरणी उरकली. परंतु नंतर पाऊस गायब झाला. त्यात काही शेतकऱ्यांच्या शेतातील बियाणे उगवले नाही. त्यामुळे त्यांनी दुबार पेरणीही केली. पीक वाढीची अवस्था असताना पाऊस गायब झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त होता. त्यात उन्हाची तीव्रता खूप आहे. त्यामुळे पिके सुकत होती. ज्यांच्याकडे पाणी उपलब्ध आहे ते शेतकरी पिके वाचविण्यासाठी तुषार सिंचनाच्या माध्यमातून धडपड करत होती. परंतु उन्हाची तीव्रता अधिक असल्याने पिके हातातून जाण्याची भीती शेतकऱ्यांतून व्यक्त केली जात होती. त्यात मागील ३-४ दिवसांपूर्वी लोहारा तालुक्यातील मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. त्यामुळे पिकांना थोडेफार जीवदान मिळणार असल्याचे सांगितले जात असतानाच आता मूग पिकावर पिवळा विषाणूजन्य केवडा रोगाची लक्षणे दिसून येत आहेत. सेंद्रीय आणि एकात्मिक शेती पद्धतीद्वारे सुरुवातीपासून योग्य काळजी घेत गेल्यास असे प्रादुर्भाव टाळता येऊ शकतात. रासायनिक कीटकनाशकांचा आणि तणनाशकांचा वाढता वापर शेतकऱ्यांच्या आणि जमिनीच्या आरोग्यासाठी हानीकारक आहे. त्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांनी पर्यावरणपूरक व आरोग्यपूरक शेतीचा अवलंब करावा असे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले. तालुका कृषी अधिकारी मिलिंद बिडबाग यांनी तालुक्यातील हराळी, तावशीगड येथे पाहणी केली.
सध्या मूग पिकावर पिवळा विषाणूजन्य केवडा रोगाची लक्षणे दिसून येत आहेत. हा रोग पांढरी माशी या किटकामार्फत पसरतो. या वाहक कीटकांचे नियंत्रण वेळीच केल्यास हा रोग पुढे पसरत नाही आणि नियंत्रणात येतो. पांढऱ्या माशीचे नियंत्रण करन्यासाठी डायमिथोएट ३० टक्के ईसी १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
मिलिंद बिडबाग
तालुका कृषी अधिकारी, लोहारा
Subscribe to:
Post Comments (Atom)



No comments:
Post a Comment