21 July 2020
लोहारा तालुक्यातील सर्व गावांतील शेतकऱ्यांनी दिलेल्या मुदतीत पीकविमा भरून घ्यावा - आमदार ज्ञानराज चौगुले यांनी केले आवाहन
प्रतिनिधी / लोहारा
लोहारा तालुक्यातील पर्जन्यमान अद्यापपर्यंत अत्यल्प प्रमाणात आहे. भविष्यात कोणतेही संकट उदभवल्यास नुकसानभरपाई मिळणेकरीता लोहारा तालुक्यातील सर्व गावांतील शेतकऱ्यांनी दिलेल्या मुदतीत पीकविमा भरून घ्यावा असे आवाहन आमदार ज्ञानराज चौगुले यांनी केले आहे.
शेतकऱ्यांना आवाहन करताना आमदार चौगुले यांनी म्हणले आहे की, सध्या खरीप पीकविमा भरण्याची शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. यासाठी शासनाने शेतकऱ्यांसाठी ३१ जुलै व पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी २७ जुलै अंतिम तारीख दिलेली आहे. परंतु लोहारा तालुक्यातील हिप्परगा रवा, हिप्परगा सय्यद, कास्ती बु., कास्ती खु., व लोहारा मंडळात असलेले शिवकरवाडी ही गावे पीकविमा कंपनीच्या पोर्टलवर दिसत नसल्याच्या व इतर तांत्रिक अडचणी असल्याबाबत असंख्य तक्रारी प्राप्त झाल्या. या अनुषंगाने जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उस्मानाबाद यांच्याशी सम्पर्क साधला असता सदरबाबत विमा कंपनीच्या एन आय सी कार्यालय, दिल्ली येथूनच पुढील कारवाई शक्य असल्याचे निदर्शनास आले. या दोन्ही कार्यालयाकडून याबाबत दिल्ली येथील कार्यालयात तक्रारही नोंदवण्यात आली. व याबाबत खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनीही दिल्ली येथील कार्यालयास आवश्यक त्या सूचना केल्या. याची फलप्राप्ती म्हणून सध्या हिप्परगा रवा, हिप्परगा सय्यद, शिवकरवाडी या तीन गावांबाबतची तंत्रिक अडचण दूर झाली आहे. कास्ती बु. व कास्ती खु. ही दोन गावे सदर पोर्टलवर एकाच नावाने दिसून येत असली तरी ही दोन्ही गावे एकाच मंडळातील असल्याने व पीकविमा हा सध्याच्या निकषानुसार मंडळनिहाय मंजूर होत असल्याने या दोन्ही गावातील शेतकऱ्यांनी पिकविमा भरल्यास भविष्यात त्यांना कोणतीही अडचण येणार नाही. सध्या लोहारा तालुक्यातील पर्जन्यमान अद्यापपर्यंत अत्यल्प प्रमाणात आहे. भविष्यात कोणतेही संकट उदभवल्यास नुकसानभरपाई मिळणेकरीता लोहारा तालुक्यातील सर्व गावांतील शेतकऱ्यांनी दिलेल्या मुदतीत पीकविमा भरून घ्यावा असे आवाहन आमदार चौगुले यांनी केले आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment