31 July 2020
वडिलांचे छत्र हरवलेल्या तेजस सोलंकरने घेतली फिनिक्स भरारी
प्रतिनिधी / लोहारा
दहावीच्या वर्गात प्रवेश घेतल्यानंतर अवघ्या काही दिवसातच एका अपघातात वडीलांचे निधन झाले. वडिलांचे छत्र हरवल्यानंतर आईने केलेल्या कष्टाच्या बळावर तसेच जिद्द व अथक परिश्रम करीत लोहारा तालुक्यातील अचलेर येथील विद्या विकास हायस्कुल मधील तेजस प्रशांत सोलंकर या विद्यार्थ्याने इयत्ता १० वी च्या बोर्ड परीक्षेत ९२.६० टक्के गुण मिळवून उत्तुंग यश मिळविले आहे.
अवघ्या १५ वर्षांचा असताना तेजसच्या वडिलांचे अपघाती निधन झाले. एवढ्या लहान वयातच त्याच्यावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला. घरातील कर्ता पुरुष अचानकपणे गेल्याने आईने स्वतःला धीर देत दुःखाचा डोंगर मनामध्ये साठवून ठेवत मोठ्या जिद्दीने तेजसला शिकविण्याच्या निर्धार केला. आईचे कष्ट, जिद्द पाहुन तेजसनेही अथक परिश्रम घेत इयत्ता १० वी मध्ये ९२.६० टक्के गुण मिळवून अचलेरच्या विद्या विकास हायस्कूल शाळेतून प्रथम क्रमांक मिळविला.
कै. बाळासाहेब सोलंकर व त्यांच्या पत्नी बालिका सोलंकर या दाम्पत्यांना तीन मुली व एक मुलगा आहे. तिन्ही मुली विवाहीत असुन मुलगा हा दहावीत शिकत होता. कै. बाळासाहेब यांना शिक्षणाची खूप आवड होती. ते जिल्हा मध्यवर्ती बँकेत कर्मचारी होते. शिक्षणाचे महत्व त्यांना ज्ञात होते. आपल्या मुलाने उच्च शिक्षण घेतले पाहीजे असे त्यांना नेहमी वाटायचे. म्हणून आपल्या पाल्यांना ते नेहमी शिक्षणाचे महत्व पटवून द्यायचे. त्यांचीच प्रेरणा घेवून तेजसने आपल्या वडीलांचे स्वप्न पूर्ण केले. जिद्द व अथक परिश्रम करून तेजस सोलंकर याने मिळवलेले यश व त्याच्या आईने केलेले कष्ट पाहुन त्याच्या यशाचे अचलेरसह परीसरातून कौतुक केले जात आहे. भविष्यात उच्च शिक्षण घेवून भारतीय प्रशासकीय सेवेत काम करण्याचा मानस तेजसने व्यक्त केला आहे. तेजसने सांगितले की, माझ्या यशात माझ्या आईचे कष्ट व वडीलांचे आशीर्वाद आहेत. आईने केलेले कष्ट मला नेहमी प्रेरणा देत असत. तसेच शाळेतील गुरूजनांचा मोठा वाटा होता. शाळेव्यतीरिक्त मी दररोज पाच तास अभ्यास करीत होतो. जिद्दीने अभ्यासात सातत्य ठेवले. तसेच फिनिक्स कोचिंग क्लासेस अचलेरचे संचालक जगदीश सुरवसे, अमित लोखंडे, सुमित बनसोडे यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनामुळे, त्यांनी सतत घेतलेल्या सराव परीक्षेमुळे मी नियमीत व सातत्याने अभ्यास केला. यापुढेही जिद्द व परिश्रम करून भविष्यात उच्च शिक्षण घेवून भारतीय प्रशासकीय सेवेत काम करण्याचा मानस तेजसने व्यक्त केला आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment